Monday, 11 March 2019

रात्र काळी घागर काळी

आपल्याकडे संत काव्याला संगीतबद्ध करायची मोठी परंपरा आहे आणि त्यानिमित्ताने संत काव्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचले, ही फार मोठी उपलब्धी म्हणायला हवी. संत काव्याचा नेमका अर्थ कळला नाही तरी देखील सुरांच्या साहाय्याने. तेच काव्य परिचित वाटायला लागते. नुसते वाचताना काव्याचा आस्वाद अवघड जातो कारण संत काळातील मराठी आता जवळपास लयालाच गेली आहे. कुठलेही काव्य वाचताना जर का एखाद्या शब्दाचे अचूक अर्थ मिळाला नाही तर एकूणच आस्वादात विक्षेप निर्माण होतो, हे मान्यच करायला हवे. 
आपले भारतीय संगीत भक्तीपर संगीत आहे, असे विधान वारंवार केले जाते. असे म्हटले जाते कारण भक्तिसंगीत फार पूर्वापार चालत आलेले आहे, त्याला इतिहास आहे. सर्वसाधारणपणे इ.स. ८०० पासून भक्तिसंगीत वेगवेगळ्या देवळांत फिरू लागले. इतिहास हेच सांगतो, संतकवी आणि तत्वज्ञानी भक्तांमुळे वैष्णव भक्ती देशभर फैलावली. याचाच परिणाम महाराष्ट्रात भक्तिसंगीताचा फैलाव प्रचंड प्रमाणात झाला. संगीतशास्त्रात ज्या ६ कोटी सांगितल्या आहेत, त्यातील धर्म संगीत कोटीच्या जवळ भक्तीसंगीत येते आणि याचा परिणाम, भक्ती संगीत धर्मपर झाले. 
आजची आपली संगीतरचना, संत नामदेवांच्या अभंगावर आधारलेली आहे. कवी म्हणून विचार करायचा झाल्यास, संत ज्ञानेश्वरांच्या बरोबरीने वावर केल्यावर, साहजिकच "ज्ञानेश्वरी" बरोबर तुलना होणे साहजिकच ठरते. कवितेतील काव्य आणि आशय, याबाबतीत नामदेवांच्या रचना काहीशा कमी पडतात, हे म्हणावेच लागेल. असे असून देखील त्यांचे अभंग अतिशय लोकप्रिय झाले कारण त्यातील सरळ, साधी अभिव्यक्ती. अर्थात या अभंगाची भाषा ही जवळपास ७०० ते ८०० वर्षांपूर्वीची असल्याने त्याकाळातील मराठी आणि काही शब्द याबाबत अनभिज्ञता निर्माण होते. उदाहरणार्थ "बुंथ" (आवरण), " एकावळी " (एक पदरी हार), " कांस कांसिली " (नेसलेले लुगडे/पातळ). आता हे शब्द सध्याच्या काळात कुणीही वापरात नसल्याने बाद झाले आहेत (मी या गाण्याच्या निमित्ताने अर्थ शोधून काढले इतकेच).  काव्य म्हणून बघायला गेल्यास, एका किर्र रात्री, एक अभिसारिका किंवा गोपी, कालिंदीच्या काठावर घागर घेऊन पाणी भरायला निघाली अर्थात पाणी भरणे हे एक निमित्त परंतु त्या निमित्ताने कृष्णाचे दर्शन घेण्याचा ध्यास. आता ती निघाली, त्यानिमित्ताने तिची वस्त्रप्रावरणे, स्पंदने आणि विष्णुदासांचा लटका विरोध इत्यादी घटना यात येतात.  

रात्र काळी, घागर काळी 
यमुनाजळे ही काळी वो माय 

काव्याच्या ओळी वाचतानाच, शाब्दिक लय आपल्याला सापडतो आणि एकामागोमाग ओळींचा ध्वन्यार्थ ध्यानात येतो. संत काव्याचा एक विशेष सान्गता येईल, बरेचवेळा आशय थेटपणे मांडला जातो ,उगीच  आडवळणे  घेतली जात नाहीत. 
संगीतकार दत्ताराम गाडेकर आहेत. इथे एक प्रश्न नेहमी उद्भवतो. दत्ताराम गाडेकर आणि असेच काही संगीतकार, यांची कारकीर्द अतिशय अल्पकाळ असल्याने मूल्यमापनाच्या दृष्टीने फार अडचणी निर्माण होतात. हिंदीत एखादा दुसरा चित्रपट केल्याचे वाचायला मिळते आणि मराठीत काही भावगीते स्वरांकित केली. तेंव्हा या संगीतकाराचे मूल्यमापन हे याच गाण्याच्या संदर्भात होईल. चाल अगदी सरळ, सोपी  आहे, कुठेही कसलीच वक्र लय नाही की प्रयोग केलेले नाहीत. यात गमतीचा भाग असा आहे, आपल्याकडे सोपी चाल निर्माण करणे, याला फारशी मान्यता मिळत नाही जणू काही सोपी चाल कुणीही करू शकतो. प्रत्यक्षात सोपी चाल तयार करण्यासाठी तितकाच आवाका असणे जरुरीचे असते. 
बुंथ  काळी, बिलवर काळी 
गळा मोतीं एकावळी काळी वो माय

गायक गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर आहेत. गायक म्हणून आकाशवाणीने प्रसिद्धीच्या झोतात आलेले हे गायक. विशेषतः: मराठी भावगीतांच्या प्रांतात गोविंद पोवळ्यांनी लक्षणीय योगदान दिलेले आहे. गायक म्हणून विचार करताना काही खास बाबी ध्यानात येतात. आवाजाचा पल्ला फार विस्तृत नाही, शक्यतो छोट्या हरकती घेण्याकडे अधिक कल. गेल्यावर शास्त्रोक्त संगीताची तालीम झाल्याची काही खास लक्षणे दिसत नाहीत. (खरंतर ललित संगीतासाठी रागदारी सांगीताची "तालीम" घ्यायलाच हवी, हाच मानदंड फार चुकीच्या अर्थाने मांडला गेला आहे) 

मी काळी काचोळी काळी 
कांस कांसिली ते काळी वो माय

तंत्राच्या दृष्टीने मांडायचे झाल्यास, गोविंद पोवळ्यांच्या आवाजात, भारतीय संगीतात "गमक" म्हणून प्रसिद्ध असलेला आवाजाचा लगाव ऐकू येतो तसेच आवाज जलद गती पेलू शकतो. या गाण्याची चाल थोडी द्रुत आहे पण छोट्या हरकती सुरेखपैकी घेतल्या आहेत,  पण दीर्घ ताण वा तत्सम प्रकार त्यांच्या पसंतीचे वाटत नाही. 

एकली पाण्याला नवजाय साजणी 
सर्वें पाठवा मूर्ती सांवळी वो माय 

हेच वैशिष्ट्य थोड्याफार प्रमाणात प्रभाकर नागवेकरांच्या बाबतीत मांडावेसे वाटते. किंबहुना, या  गाण्यात,दोघांचे आवाज एकमेकांना पूरक असे झाले आहेत. या गायकीला जोडून कोरस गायन घेतले आहे. अशा प्रकारच्या स्वररचना गाताना, गळा हलका ठेवणे तसेच शब्दोच्चार देखील सहज गळ्यातून काढणे गरजेचे असते. विस्तार करू शकता येईल अशा जागा असतात परंतु संगीतकाराने जे गायला सांगितले आहे, त्याच नकाशात वावर करून आपले इप्सित गाठायचे, इतपतच उद्दिष्ट असते आणि त्याबाबत या दोन्ही गायकांनी समयोचित न्याय दिला आहे. 
       
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी 
कृष्णमूर्ती बहू काळी वो माय

आकाशवाणीने अशा असंख्य अपरिचित कलाकारांना प्रकाशाच्या झोतात आणले. गोविंद पोवळे हे नाव या बाबतीत निश्चितच घ्यावे लागेल. वास्तविक स्वतः: संगीतकार आहेत आणि त्यांच्या बहुतेक स्वररचना या आकाशवाणीवरूनच प्रसिद्ध झाल्या. संगीत रचना देखील त्यांच्या गायकीच्या धर्माला अनुसरून केलेल्या आहेत. खरंतर संगीतकार दत्ताराम गाडेकर, गोविंद पोवळे किंवा प्रभाकर नागवेकर, ही सगळीच फार गुणी कलाकार परंतु योग्य संधीच्या अभावी फारशी लोकमान्यता मिळू शकली नाही, हेच खरे. 


9 comments:

  1. तुमचे लेख आम्ही आवडीने वाचतो. रात्री काळी घागर काळी याचा अर्थ देखील आम्हाला समजला. परंतु आम्ही आत्तापर्यंत संत नामदेव आणि विष्णुदास नामा या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असे आत्ता पर्यंत आमच्या वाचनात आले आहे. या दोन व्यक्ती एकच आहेत अशी गल्लत तुमच्याकडून झालेली आढळते. नवनीतकार परशुराम पंत गोडबोले यांचा असा उल्लेख आढळतो कि विष्णुदास नामा हे प्रतिभावान कवी होता त्यामानाने त्यांची उपेक्षा झाली. ते तितकेसे पुढे आले नाहीत. त्यांचे चरित्र उपलब्ध नाही. तरी आपण वरील संदर्भ तपासून पाहावे.

    ReplyDelete
  2. https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE

    ReplyDelete
  3. https://wikisource.org/wiki/Page:Konkani_Vishwakosh_-_Volume_4_Released.pdf/660

    ReplyDelete
  4. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10579-2013-03-05-07-33-50

    ReplyDelete
  5. "एका किर्र रात्री, एक अभिसारिका किंवा गोपी, कालिंदीच्या काठावर घागर घेऊन पाणी भरायला निघाली अर्थात पाणी भरणे हे एक निमित्त परंतु त्या निमित्ताने कृष्णाचे दर्शन घेण्याचा ध्यास. आता ती निघाली, त्यानिमित्ताने तिची वस्त्रप्रावरणे, स्पंदने आणि विष्णुदासांचा लटका विरोध इत्यादी घटना यात येतात." - मी मुद्दामून सगळे वाक्य संदर्भासाठी परत लिहिले आहे. यात "विष्णुदास" म्हणजेच "नामदेव" असा आपला समज कसा झाला काही कळले नाही. मला एकच व्यक्ती अजिबात अभिप्रेत नव्हती. तुमचा समज तसा झाला असेल तर मात्र माझ्या लिखाणाचा दोष,असे म्हणायला लागेल.
    एक आनंद झाला - माझे लेख आवर्जून तुम्ही वाचता, याचा आनंद झाला. पुढे देखील अशाच सूचना आल्या तर मला खूपच आवडेल.

    ReplyDelete
  6. परंतु झी मराठी दिशा या सप्ताहिकामध्ये (दि 23 ते 29 मार्च) तुमचा जो लेख आला आहे त्यात शीर्षकाच्या वर काळ्या गडद अक्षरांमध्ये "आजची संगीत रचना संत नामदेवांच्या अभंगावर आधारलेली आहे. संत नामदेवांचे अभंग साधी सरळ अभिव्यक्ती यामुळे अतिशय लोकप्रिय झाले. त्याचे प्रत्यंतर या अभंगातील ओळी वाचताना त्यातील शाब्दिक लय आपल्याला सापडते " असे लिहिले आहे. आणि त्या लेखात पूढे विष्णुदास नाम्याचा उल्लेख संत नामदेव ग अर्थी आलेला दिसतो.

    ReplyDelete
  7. मराठी प्रेमगीतांच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायला आवडेल

    ReplyDelete
  8. खूपच छान रसग्रहण.मराठीतील ळ अक्षरांचा उपयोग करुन लिहिलेली सुंदर गवळण .मराठीबद्दल चे प्रेम नक्कीच वाढते. हा उपक्रम चालू ठेवण्याचा मी पण प्रयत्न करते आहे माझ्या आस्वाद कवितांचा या व्हीडीओ मधून..धन्यवाद.

    ReplyDelete
  9. Nicely explained

    ReplyDelete