१९७८ साली, पाकिस्तान इंग्लंडशी कसोटी सामान्यांची मालिका खेळण्यासाठी आली होती. एजबॅस्टन कसोटी सामन्यात एक कुरळ्या केसांचा पोरसवदा वाटणारा, काहीसा संथ चालणारा परंतु आत्मविश्वासाने भारलेला तरुण नव्याने प्रवेश करीत होता. इंग्लंडमधील काऊंटी सामने बरेच गाजवले होते पण यापूर्वी देखील अनेक खेळाडू अनेक काऊंटी सामने गाजवून दिमाखात कसोटी सामन्यात प्रवेश करतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशाचे धनी होतात. पाकिस्तान संघातील बरेचसे खेळाडू तेंव्हापासून इंग्लंडमध्ये वारंवार खेळत असल्याने, (दुसरा संघ वेस्टइंडीज) त्यांना या खेळाडूंची माहिती होती. गोलंदाज लियाकत अलीने पहिलाच चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा टाकला आणि या खेळाडूने इतक्या सहजतेने पूलच्या फटक्याने चौकार वसूल केला की बघणारे अचंबितच झाले. कसोटी सामन्यातील पहिलाच चेंडू ज्या आत्मविश्वासाने तडकावला होता, तो आत्मविश्वास या खेळाडूंबरोबर कायम स्वरूपी वास करून होता. डेव्हिड गॉवरचे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील पदार्पण हे असे दणक्यात साजरे झाले. गॉवर काउंटी सामन्यात खोऱ्याने धावा करत होता पण भारतात त्यावेळी तशी फारशी माहिती कळायची नाही. सटीसामासी "विस्डेन"चा अंक वाचायला मिळायचा आणि त्यातून बऱ्याच क्रिकेट सामन्यांचे वृत्त वाचायला मिळायचे.
अशा पदार्पणाचे तेंव्हा बरेच कौतुकही झाले होते. मला वाटते, त्यावेळी स्पोर्ट्स स्टार मासिकाच्या मुखपृष्ठावर याची छबी झळकली होती. काहीसे सुस्तावलेले डोळे, चक्क आळशी वाटावा अशा हालचाली पण हातात बॅट आली की संपूर्ण अवतार बदलायचा. डावखुरे फलंदाज निसर्गत:च शैलीदार, देखणे असतात, त्यातून गॉवरला जन्मजात कवच-कुंडले लाभावित अशी शैली लाभली होती. वर मी त्याच्या पूल या फटक्याविषयी लिहिले पण फलंदाजीच्या भात्यामधील जवळपास सगळेच स्ट्रोक्स हा खेळाडू अतिशय सहजपणे खेळत असे. फटका मारताना, त्याने कधी जोर लावला आहे, इम्प्रोवाईज करण्याचा प्रयत्न केला आहे असे कधीच वाटले नाही. पेळूतून हळुवारपणे सूत निघावे त्या धर्तीवर हा फलंदाजी करायचा. गॉवरच्या खेळात एकाच गोष्टीचा अभाव होता - एखाद, दुसरी मालिका वगळल्यास, कामगिरीत सातत्याचा कायम अभाव राहिला. कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळून १८ शतके, हे काही असामान्यत्वाचे लक्षण नव्हे पण सांख्यिकी शास्त्र इथेच अपुरे पडते. ५० धावा काढल्या पण शतक नाही, असा एक मानदंड निर्माण झाला आहे पण यातून, सामना कुठल्या स्थितीत होता? त्या ५० धावांचे नेमके मोल कसे करायचे? इत्यादी प्रश्न उद्भवतात.
त्यातून गॉवर जेंव्हा इंग्लंडचा कप्तान होता, तेंव्हा इंग्लंडला ५-० असा लागोपाठ दोन मालिकेत वेस्टइंडीजकडून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आणि त्याहून वाईट म्हणजे त्याची वैय्यक्तिक कामगिरी देखील बरीच खालावली. अर्थात अपयशी माणसाला नेहमीच टीकेचे धनी व्हावेच लागते. वेस्टइंडीजचा संघ याच काळात जगज्जेता होता आणि केवळ इंग्लंडच नव्हे तर इतर कुठलाच संघ टिकाव धरू शकत नव्हता. इंग्लंड संघातील Alan Lamb वगळता एकही खेळाडू समाधानकारक धावा काढू शकला नव्हता. गॉवर अति वेगवान गोलंदाजी खेळू शकतो का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि दुर्दैवाने या प्रश्नाला कधीच समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
अर्थात इंग्लंडचे पारंपरिक शत्रू - ऑस्ट्रेलिया विरुद्ध मात्र गॉवर भलताच चमकला. १९८५ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका ही निव्वळ गॉवरची मालिका म्हणून गणली जाईल. टेन्टब्रिज इथे १६६, एजबॅस्टनला २१५ तर ओव्हल इथे १५७!! या मालिकेत फलंदाज खऱ्या अर्थी चमकला - तब्बल ७३२ धावा मालिकेत काढून करंडक इंग्लंडकडे ठेवला. १९८६ मध्ये नेमेचि येतो पावसाळा प्रमाणे धावांचा रतीब आटला!! युट्युब वर २१५ धावांची इनिंग बघायला मिळते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजांचा ताफा भरात होता. थॉमसन (उतरणीला लागलेला!!), मॅकडरमॉट, लॉसन सारखे गोलंदाज होते पण ज्याप्रकारे ३१४ चेंडूत ही इनिंग सजवली होती, ते निव्वळ निखळ सौंदर्य होते. त्यात पारंपरिक पद्धतीचे कव्हर ड्राईव्ह, मिडविकेटला फ्लिक, नाजूक लेट कट तर होतेच पण त्यापलीकडील फटके देखील बघण्यासारखे होते आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे फटका खेळताना शरीराची होणारी लयबद्ध लय!! कुठेही ओढून ताणून खेळण्याचा प्रयत्न नाही, अकारण जोर लावल्याचा आविर्भाव नाही. सगळी इनिंग ही रेशमी धाग्याने गुंफलेली होती. या खेळाडूला "कलाकार" का म्हणायचे याचा हा अनुभव आहे. खरा फलंदाज हा नेहमी कुठे क्षेत्ररक्षक आहे, याची फारशी फिकीर करत नाही. किंबहुना ज्याप्रकारे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ज्या प्रकारे मारतो, तिथे निव्वळ कौशल्यच नव्हे तर खरे सौंदर्य दिसून येते.
वास्तविक फक्त इंग्लंडचाच विचार केला तर कितीतरी अलौकिक फलंदाजांची नावे घेता येतील पण तरीही गॉवर या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि म्हणूनच उठून दिसायचा. याची फलंदाजी म्हणजे सुंदर अदाकारी असायची. चेंडू नुसता तटवला तरी हाताची हालचाल देखणी असायची, मग एखादा कव्हर ड्राइव्ह बघणे म्हणजे एखादे नयनरम्य नैसर्गिक चित्र जिवंत व्हावे,या असेच असायचे. कुठेही बेंगरूळपणा नावालाही दिसायचा नाही. यांच्या फलंदाजीला मर्यादा नव्हत्या का? असा प्रश्न विचारला तर काही दोष दाखवता येतील पण मग निर्दोष फलंदाज फक्त पुस्तकातूनच अवलोकिता येईल. इथे कुणीही खेळाडू champion नाही. प्रत्येक फलंदाजात काही ना काहीतरी कमतरता ही असतेच. अशा वेळी, या सगळ्या मर्यादा समजून घेऊन, जर का एखादा फलंदाज आपल्याला फलंदाजीचे अननुभूत सौंदर्य दाखवत असेल तर त्याला रुक्ष अशा आकडेवारीत अडकवणे योग्यच नाव्हे आणि आकडेवारीत न अडकता, फलंदाजीचे अलौकिक सौंदर्य दाखवून देणाऱ्या मोजक्या आणि अतिशय दुर्मिळ झालेल्या फलंदाजांच्या नामावळीत डेव्हिड गॉवर आपले नाणे खणखणीतपणे वाजवून घेतो.
No comments:
Post a Comment