क्रिकेटच्या इतिहासात आजही १९७० च्या दशकातील लॉइडचा संघ सर्वोत्तम मानला जातो. कदाचित एकच कमतरता असावी, संघात दर्जेदार मंदगती गोलंदाज नव्हता पण थोडा विचार केला तर या संघाला अपवादस्वरूप सामने वगळता, मंदगती गोलंदाजांची गरजच पडली नाही. या संघातील प्रत्येक खेळाडू समोरच्याच्या छातीत धडकी भरवणाराच होता आणि एकहाती सामना जिंकून देण्याची अलौकिक कुवत बाळगून होता. खेळपट्टी गोलंदाज धार्जिणी आहे, हवा ओलसर ,थंड आहे, खेळपट्टी "पाटा" आहे, वगैरे काहीही बाबी या संघातील खेळाडूंवर परिणाम करीत नसायच्या. फलंदाजाने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला ठेचून काढायचे तर गोलंदाजाने समोरील फलंदाजाला त्राही भगवान करून सोडायचे, इतकेच!! जवळपास, १५ वर्षे या संघाने, क्रिकेट खेळात आपली दहशत बसवली, साम्राज्य उभारले.
अशा अद्वितीय संघात ऑल्विन कालिचरण नामक असामान्य फलंदाजाने, केवळ दहशतवादी फलंदाजीने नव्हे तर कलात्मक फलंदाजीने स्थान मिळवले होते.
बुटकेलासा पोरसवदा चणीचा मुलगा, काळसर वर्ण आणि बघता क्षणी शरीरात किती स्फोटक ताकद भरलेली आहे, याचा सुतराम अंदाज लागू न देणारा. खरेतर लॉईडच्या या संघातील सगळेच खेळाडू धिप्पाड, उंच असे होते, अपवाद कालिचरणचा. परंतु एकदा का बॅट हातात घेतली की हा खेळाडू चमत्कार दाखवायचा. कालिचरणकडे ग्रीनिज, रिचर्ड्स, लॉइड सारखी अमानुष ताकद नव्हती पण फलंदाजीचे तंत्र होते. अर्थात वरील तिन्ही फलंदाजांकडे तंत्र हे होतेच, परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नसायची.
मी कालिचरणला प्रथम बघितला तो १९७४ साली भारतात आलेल्या लॉईडच्या संघात. ती मालिका खऱ्या अर्थाने गाजवली, प्रथम ग्रीनिज, नंतर रिचर्ड्स आणि सर्वाधिकपणे लॉइडने. पुढे याच संघाचे ऑस्ट्रेलियात पानिपत झाले. त्यानंतर मात्र हा संघ सावरला आणि पुढील काही वर्षे खऱ्याअर्थाने जगज्जेता ठरला. कालिचरणचा वाटा तितकाच मोलाचा होता.
मुळात डावखोरे फलंदाज नैसर्गिकरीत्या देखणी फलंदाजी करतात. पायांची लयबद्ध हालचाल, बॅटीचा तोल आणि स्विंग तसेच चेंडू हव्या त्या ठिकाणी मारण्याची अलौकिक देणगी बहुतेक सगळ्याच डावखोऱ्या फलंदाजांना असते. यु-ट्युबवर एक व्हिडीओ आहे, कालिचरण विरुद्ध लिली!! त्यावेळी लिली म्हणजे आग्यावेताळ होता पण कालिचरण देखील तरुणच होता. कालिचरण काय चीज आहे, हे त्या व्हिडिओतून स्पष्टपणे कळते. लिलीची गोलंदाजी अशा प्रकारे कुणी फोडून काढली असेल असे वाटत नाही. त्यातील एक फटका - लिलीने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आहे, चेंडू कालिचरणच्या छातीच्यावर उसळला आहे आणि त्याने क्षणार्धात पाय मागे घेऊन, पॉईंटच्या दिशेने फटकावून चौकार वसूल केला आहे. हा फटका त्याने कसा काय एक्झिक्युट केला, आजही नवल वाटते. ताशी ९० च्या गतीने उसळलेला चेंडू , तो देखील ऑफ स्टम्पच्या रोखाने टाकलेला, लिलीचा इन स्विंग पण कालिचरणला आऊट स्विंग, सर्वसाधारणपणे एकतर बॅटीने नुसता तटवला जातो किंवा सोडून दिला जातो. इथे कालिचरणचे असामान्य रिफ्लेक्सिस दिसतात. बॅटीच्या मधोमध चेंडू घेऊन, पॉईंटपार सीमापार ठोकणे (हाच शब्द योग्य) हे सहज जमण्यासारखे नाही. याच षटकात लिलीचे पुढील २ चेंडू त्याने ज्या बेदरकारपणे हुक फटाक्यांच्या साहाय्याने षटकार मारले, त्याने खुद्द लिली हतबल झाल्याचे चेहऱ्यावरून समजते.
१९७७ मध्ये कालिचरण भारतात, वेस्टइंडीज संघ घेऊन आला होता (पॅकरमुळे सगळा संघच नवोदित होता - मार्शल इथेच प्रथम बघितला). पहिला सामना वानखेडेवर. सुनीलने अप्रतिम द्विशतक ठोकलेले पण पुढे कालिचरणने १८७ धावांची खेळी करून अप्रतिम प्रत्युत्तर दिलेले. ही सगळी खेळी बघताना, आपल्याला समृद्ध कालिचरण बघायला मिळतो. सगळ्या प्रकारचे फटके लीलया मारलेले दिसतात. अर्थात डावखुऱ्या फलंदाजांचा कव्हर ड्राइव्ह बघणे, हा नयनरम्य सोहळा असतो आणि इथे तर या फलंदाजाने महोत्सव घडवला होता! अशीच असामान्य शतकी खेळी त्याने याच मालिकेतील मद्रास इथल्या खेळपट्टीवर साकारली होती. त्यावेळची खेळपट्टी संपूर्णपणे गोलंदाज धर्जिणी होती. आपला धीरज परसाना देखील दाहक वाटत होता. कालिचरण सुरवातीला चाचपडत होता - असे सगळ्याच फलंदाजाच्या बाबतीत घडत असते. धीरज परसानाचा एक चेंडू गुड लेंग्थवर अचानक उसळला. चेंडू किंचित आऊट स्विंग झाला होता आणि कालिचरण निव्वळ नशिबाने वाचला!! क्षणभर कालिचरण सारख्या फलंदाजाला आपला अंदाज कुठे चुकला, याचाच अंदाज आला नाही - डोळ्यांतून स्पष्टपणे दिसले पण बहुदा त्याक्षणी त्याने ठरवले असावे, अटॅक हाच सर्वोत्तम डिफेन्स आहे आणि त्याने तलवारबाजी सुरु केली!! खेळाचा संपूर्ण माहोल बदलला आणि भारतीय संघच एक पाय मागे टाकून खेळायला लागला. शतक कधी पूर्ण झाले ते समजलेच नाही. याला म्हणतात दर्जा, खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत असताना,आपले वर्चस्व गाजवायचे, हे सहज जमण्यासारखे नसते. एका असामान्य शतकी खेळीचा नजराणा त्याने मद्रास सामन्यात पेश केला होता. एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे , भारतातर्फे कपिल देव तरुण होता, अंगात जोम होता आणि त्याच त्वेषात गोलंदाजी करीत होता. पुढे भारताने हा सामना जिंकला कारण कालिचरणचा संघ फार दुय्यम दर्जाचा होता आणि मुख्य म्हणजे कपिलच्या शतकी खेळीने सामना भारताकडे झुकला.
पुढे पॅकर सामने बंद झाले आणि वेस्टइंडीज संघ पुन्हा एकत्र झाला. १९७९/८० ची जगद्विख्यात ऑस्ट्रेलिया/वेस्टइंडीज मालिका वेस्टइंडीजने जिंकून क्रिकेट जगातील आपले स्वामित्व निर्विवादपणे सिद्ध केले. ऍडलेडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, दुसऱ्या इनिंगमध्ये लिली, पास्को आणि डिमॅक तसेच मॅलेट सारखा विख्यात मंदगती गोलंदाज, यांच्या समोर शतक केले. एकतर असला जहाल वेगवान गोलंदाजांचा ताफा आणि ऍडलेडवर चौथ्या दिवशीची खेळपट्टी!! रिचर्ड्ससह कालिचरण, ग्रीनिज आणि रोवे यांची भरात असलेली फलंदाजी बघणे म्हणजे क्रिकेटचा अत्युच्च आनंद उपभोगणे. या शतकी खेळीचा विस्ताराने व्हिडीओ उपलब्ध आहे. पायाची हालचाल, शेवटच्या क्षणी मनगटाच्या साहाय्याने चेंडूला दिशा देण्यात कौशल्य तसेच जर का चेंडू थोडा पुढे पडला तर लगोलग ड्राइव्ह करून चौकार मिळवणे. क्रिकेटमधील फलंदाजीचे सगळे अलंकार या खेळीत बघायला मिळतात आणि कालिचरणचा असामान्य दर्जा.
असे म्हणतात, रोहन कन्हाय हा कालिचरणचा आदर्श होता. मी काही कन्हायची फलंदाजी प्रत्यक्ष बघू शकलो नाही पण सुनील गावस्करने एका लेखात तशी तुलना केली आहे. तसे असेलही पण कालिचरण हा एक असामान्य कलाकार होता यात वादच नाही. प्रसंगी गोलंदाजी फोडून काढण्याचे कौशल्य होते पण त्याचबरोबर "लेट कट" सारखे नाजूक फटके सहजपणे खेळू शकत होता. नजाकत, हीच त्याच्या फलंदाजीची खरी ओळख होती आणि म्हणूनच त्या दशकातील अद्वितीय संघात कालिचरण सहजपणे बसू शकला.

No comments:
Post a Comment