एक सनातन वादाचा विषय आहे - गाण्यांमध्ये कविता असावी का नसावी? आणि त्यामागोमाग प्रश्न असा येतो, "गीतकार" हा "कवी" असतो का? आपल्याकडे गीतकाराची वेगळी पंगत मांडलेली असते म्हणून हा प्रश्न उद्भवला. आता जर का गाण्यांत कविता असावी, हे मान्य केले तर मग हाताशी येणारी कविता, मग त्यात गीतात्मकता असली तरी तिला कविता म्हणणे का जड जाते? आणि अर्थात तद्नुषंगाने कवितेचा आस्वाद त्यानुरुपच ठरवला जातो!! खरतर, प्रत्येक नवी कविताच नव्हे तर पूर्वी वाचलेली कविता पुन्हा वाचताना, सतत नवे आव्हान देत असते. याही अर्थाने कवितेचा आस्वाद हा नित्यनूतन असा शोध असतो. कवितेतून व्यक्त होणारा आशय आणि भाषा, या दोन्ही अंगाने कवी हा शोध घेत असतो. या दुहेरी शोधाचा परिपाक म्हणजेच कवितेचा घाट, कवितेचा आकार आणि हे सर्वमान्य आहे. जर का हेच तत्व तथाकथित गीताच्या बाबतीत पाळले गेले असेल तर मग गीतकार, या पायरीला वेगळी मान्यता का द्यायची?
आजचे आपले गाणे, याच दृष्टिकोनातून बघितले कवितेच्या पातळीवर निश्चितच एक सुंदर कविता म्हणून वाचनानंद देते आणि प्रत्येकवेळी आस्वादाच्या नवीन खुणा दाखवते. कवी मंगेश पाडगावकर, यांची ओळख कवी म्हणून तर ख्यातकीर्त आहेच पण हल्लीच्या मानदंडाच्या हिशेबात गीतकार म्हणून फार वरच्या दर्जाचा कवी असे मान्य करावेच लागेल. पाडगांवकरांनी पहिल्याच दोन ओळीत कवितेचा भावार्थ सांगितलेला आहे आणि पुढील ओळींतून याच भावार्थाचा निरनिराळ्या प्रतिमांतून विस्तार केलेला आहे. खरतर, विराणी ही मराठीत ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली आहे तेंव्ती भावना, भावना म्हणून अजिबात नवीन नाही परंतु खरा कवी, तीच भावना मांडताना, आशय, घाट, प्रतिके आणि भाषा यांद्वारे नव्याने जाणीव करून देतो. पाडगांवकरांनी नेमके तेच केले आहे.
डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
संगीतकार यशवंत देव, हे कवी स्वभावाचे संगीतकार, स्वतः: त्यांनी काही सक्षम गाणी लिहून, आपला अधिकार सिद्ध केलेला आहे. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे - चाल ही कवितेतच दडलेली असते, संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो. अर्थात याचा परिणाम, देवांच्या चाली या नेहमीच शब्दानुकूल तर असतातच पण बरेचवेळा शब्दांमधील दडलेला अर्थ, ते स्वरांच्याद्वारे व्यक्त करतात. गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ, स्वरमंडळ, सतार आणि व्हायोलिनच्या सुरांनी सजवला आहे आणि त्यातून लगोलग मारवा रागाचीच आठवण येते. खरतर, ललित संगीताबद्दल लिहिताना रागदारी संगीताचा उपयोग करण्यात तसा फारसा अर्थ नसतो कारण बहुतेकवेळा सुरवातीचा राग बाजूला सारून, स्वररचना वेगळ्याच रागाश्रयाने विस्तार करते. इथे देखील चाल पुढे पूर्वी कल्याण रागात शिरते. दुसरे म्हणजे इथे कवीचे शब्द महत्वाचे म्हटल्यावर त्या अनुषंगानेच स्वररचना तयार होणे क्रमप्राप्तच ठरते.
कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेंव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी
पहिल्या अंतऱ्याआधीचा वाद्यमेळ जरा बारकाईने ऐकला तर वाद्ये तीच आहेत आणि अस्ताईच्याच सुरांचा विस्तार केला आहे. वेगवेगळे अंतरे बांधणे बरेचवेळा बुद्धीगामी असू शकते परंतु जर चाल तितकीच सक्षम (चाल सक्षम आहे, इथे संगीतकाराचेच मत अखेरचे) असेल तर त्याची फारशी गरज नसते. पहिला अंतरा संगीतबद्ध करताना, पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द "दोन्ही" याच्यावर किंचित जोर दिला आहे. गाणे तयार करताना, कुठल्या शब्दाला महत्व द्यायचे जेणेकरून आशयावृद्धी होते, इथेच संगीतकाराची काव्याबद्दलची सखोल जाण व्यक्त होते. अर्थात त्यामुळे गाण्याला देखील वेगळेच परिमाण लाभते.
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
गायक म्हणून अरुण दात्यांचे विश्लेषण करायचे झाल्यास, सुरवातीच्या काळात त्यांच्या आवाजावर हिंदीतील तलत मेहमूद यांचा फार प्रभाव होता परंतु सुदैवाने त्या प्रभावातून त्यांनी लगेच सुटका करून घेतली. गमतीचा भाग म्हणजे बालपण इंदूरसारख्या सरंजामी, हिंदी भाषिक शहरात जाऊन देखील मराठी शब्दोच्चाराबाबत त्यांनी अचूक दक्षता घेतली. आपला गळा कसा आहे आणि आपण कुठल्या प्रकारची गाणी गाऊ शकतो,याचा त्यांना योग्य अंदाज होता तसेच गाण्यातील कवितेबाबत ते आग्रही होते. थोडे बारकाईने ऐकले तर आवाजाचा पल्ला फार विस्तृत नव्हता परंतु वरच्या सुरांत गायन करणे जरादेखील अवघड होत नव्हते. छोट्या हरकती, अर्ध ताना घेणे सहज जमत होते. " ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी " ही ओळ हळूहळू तार स्वरांत जाते आणि तसे गाताना आवाज कुठेही पिचत नसून, सहजपणे जातो. अर्थातच जेंव्हा "आपली आवड" याला महत्व दिले जाते तेंव्हा तुम्हाला गायनाच्या संधी भाराभार मिळत नाहीत. ललित संगीतात, प्रत्येक वेळेस,उत्तम चाल तसेच सक्षम कविता मिळत नसते आणि याचा परिणाम, अरुण दात्यांना चित्रपटासारख्या विस्तृत क्षेत्रापासून पारखे व्हावे लागले. अर्थात हा तोटा आपल्या मराठी रसिकांचा झाला.
कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकीली विराणी
हे गाणे ऐकताना आपल्याला एक श्रीमंत आणि आपल्या रसिकत्वाची पायरी विस्तारल्याची जाणीव होते. कलेचे मुलतत्व तर हेच म्हणायला हवे. असे म्हणतात,जी गाणी हळूहळू मनाच्या गाभ्यात शिरतात, तीच गाणी इतिहासात चिरंतनत्व पावतात. प्रस्तुत गाणे हे असेच शांतपणे मनात रचले जाते.
No comments:
Post a Comment