तसे बघायला गेल्यास, प्रत्येक कवी हा आत्मकेंद्रित, स्वभावात: आत्ममग्न असतो अन्यथा त्याशिवाय कवितेची प्रक्रिया पुरी होणे अवघड आहे. भावकवितेच्या संदर्भात विचार करता, हे फारच निकटतेने अनुभवायला मिळते. याच दृष्टीने आपण, भावकवितेचे स्वरूप बघण्याचा प्रयत्न करुया.
जीवनात अनेक अनुभव येत असतात, त्यांतील काही संवेदनाद्वारे स्वत:ला आलेले, काही कल्पनेने जाणलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. परंतु यांपैकी एकाच्या किंवा सर्वांच्या मधून मिळालेल्या अनुभवांचा एकात्म आणि अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती निर्माण होते, तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून आपणांस जाणवते आणि हे स्पंदन वर उल्लेखिलेल्या साऱ्या अनुभवात्मक घटकांच्या विशिष्ट गती, दिशा, वजने आणि लय, यांमुळे निर्माण होणारे जे अंतर्गत ताण असतात, त्यांतून जाणवत असते.
एखादा अनुभव हा कोणत्या तऱ्हेने घेतला गेला त्यावर त्याची सारी गुणवत्ता अवलंबून असते, आणि त्यामुळे या भाववृत्तीचे अनुभवाच्या क्षणाशी एक अभेद्य असे नाते असते. या सर्व ताण, अनुभवाचा क्षणासहित जर रसिकाच्या मनात जागृत झाला तर त्या क्षणाच्या जाणीवेतून मग कवीला जाणवलेल्या भाववृत्तीचा अनुभव रसिकाला देऊ शकतो. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट भाववृत्तीने भरलेल्या क्षणांच्या स्पंदनाचा "आभास" निर्माण करणे, हे भावकवितेचे खरे कार्य!! आणि हा जो आभास आहे, जी कविता जीतल्या चांगल्या रीतीने निर्माण करू शकेल तितक्या प्रमाणात तिची गुणवत्ता, असे म्हणता येईल.
आरतीप्रभूंची कविता, वरील विवेचनाशी फार जवळचे नाते सांगते.
सुरवातीला मी जे म्हटले होते, त्याप्रमाणे ही कविता, एका आत्ममग्न क्षणाचे आणि त्याचबरोबर आशय अभिवृद्ध करणाऱ्या अनुभूतीची सुंदर बंदिश आहे, कविता, मुक्तछंदात आहे, हे एका दृष्टीने योग्यच आहे. छंदोबद्ध कवितेत सगळे ताण अनुभवता येत नाहीत, असे म्हणायचे नाही परंतु ज्या कवितेची प्रकृती अति आत्ममग्न आहे, त्या वृत्तीला मुक्तछंदात आवश्यक तितके स्वातंत्र्य मिळते. त्यातच संवेदनाविश्व आणि भाववृत्ती यांच्या एकात्मतेचे सूत्र सापडते. शब्द, शब्दांची विशिष्ट प्रकारे केलेली गुंफण, यांच्यातून आणेल लय त्यांनी सादर केले आहेत.
"या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो - कां?
प्रेम हवय का या कवितेचं?
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला?
खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. "
इथे मी आपल्या सोयीसाठी खंड पाडून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका बाजूने अभंग असा आत्मविश्वास तसेच दुसऱ्या बाजूने थोडीशी दटावणी, अशा संवादी पातळीवर ही कविता सुरु होते.
एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि तो स्थित होत आहे, असे वाटत असताना(च) त्याला किंचित धक्का देऊन, ही स्थिरता भाववृत्तीवर तोललेली आहे, असे दाखवायचे, हेच सूत्र इथे दिसते.
"काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला?
पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?"
हा रसिकांशी साधलेला संवाद खरा पण, त्याचबरोबर ती कविता समजून घेण्यासाठी, जो आत्मविश्वास आणि त्याच्या जोडीने आलेला थोडा मग्रूरपणा, याचे सादरीकरण आहे. परंतु त्याचबरोबर "स्वातीच्या थेंबाची" तरल कल्पना देखील उपयोगात आणली आहे. आरतीप्रभूंच्या कवितेचे हे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल, एका बाजूने कवितेची प्रकृती "अळुमाळू" ठेवायची पण दुसऱ्या बाजूने ती कविता स्वीकारण्यासाठीची मोजावी लागणारी किंमत देखील दाखवावी लागते. विशेषत: "नक्षत्रांचे देणे" या काव्यसंग्रहातील कविता वाचताना, ही जाणीव मनातून बाजूला सारणे सर्वथैव अशक्य!!
एखादी अगदी मंद लयीतील प्रतिमा निर्माण करायची आणि त्याचबरोबर, तिच्यावर जाणीव हेलकावयाला लागली की, तिच्यात अनपेक्षित द्रुत लय मिसळायची आणि या धक्क्यातून परिणाम साधायचा. भावकवितेचे हे देखील आगळे वैशिष्ट्य मानता येईल.
"माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतो
भीत भीत स्पर्श करतो तेंव्हा तिचे डोळे
पाणावल्या सारखे चमकतात.
डहळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटत की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात.
स्पर्श करतांना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा."
इथे देखील प्रतिमा कशा आशयाशी नाते सांगत आहेत. मनातील भावस्पंदने ही नेहमीच तात्कालिक असतात परंतु त्या तात्कालीकतेत देखील किती अर्थपूर्ण आशय मांडता येतो, हे आपल्याला किती अप्रतिमपणे बघायला मिळते. प्रतिमांची एकदम उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसरीने पुसुन टाकायचा. दोघींच्या अशा मिश्रणातून, तिसरीच प्रतिमा निर्माण करायची आणि या बदलत्या घटनांतून, भाववृत्तीचा क्षण साकार करायचा!!
अशा विविध आणि संपन्न तऱ्हांनी घडविलेल्या सौंदर्यात्मक बंदिशीतून आरतीप्रभू संवेदनाविश्व आणि भाववृत्ती यांचा अनोखा संयोग साधतात.
" या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्रचर्म.
आहे तयारी?"
भाववृत्तीतील अनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना आत्मकेंद्रित करणारे जे एक सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन, या स्पंदनाचा लय म्हणजे त्या भाववृत्तीचा लय. हा लयच भावकवितेला भावकविता बनवतो. वरील ओळी जर थांबून, विश्रांती घेत वाचल्या तर आपल्या ध्यानात येईल, इथे अनेक प्रतिमा एकत्रित आल्या आहेत परंतु त्यामागे, एक सूत्र आहे - माझ्या कवितेची किंमत!! मग, त्यासाठी प्रतिमा म्हणून अर्वाचीन काळातील संदर्भ आणून, त्या शब्दांचा केलेला वापर आणि त्यातून साधलेला आशय आणि आशयाच्या घडणीसाठी निर्माण केलेली शब्दांचीच घट्ट वीण. कवितेच्या ओळी वाचताना, वाचकाचे लक्ष सतत केंद्रीभूत करण्याची फार मोठी गरज असते आणि त्यासाठी मग, प्रतिमांचा वापर करून, आशयाची अभिव्यक्ती अधिक संपन्न करायची, हा खेळ आरतीप्रभू फारच बहारीने करतात.
"जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पहा तिच्याकडे डोकें वर उचलून.
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्र वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत."
कवितेची भाषा स्पष्ट, सरळ आणि समजायला सोपी आहे. मुळात भावकाव्य हे स्वभावत:च वैय्यक्तिक अनुभवांची विशिष्टता शोधत जाणारे काव्य असते. असे असले तरी आरतीप्रभूंची कविता वाचकाला, वैय्यक्तिक अनुभवाची अत्यंत निकाताची अशी प्रचीती देऊ शकते. इथे तशी वाच्यार्थाने आढळणारी दुर्बोधता चुकुनही आढळत नाही. एखादा अनुभव काव्यरूप घेतो, तेंव्हा तो कवीच्या जाणीवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वत:चे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वैय्यक्तिक जीवनाशी असलेली नाळ तोडणे गरजेचे असते आणि इथे त्याचाच अनुभव सतत येत आहे.
"मी स्वत: पाहातोय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेऊन."
कुठल्याही कलाकृतीचा शेवट हा नेहमीच थोडा अनपेक्षित असला तर वाचकाला देखील विस्मय वाटून, त्या कलाकृतीबद्दल मनात आकर्षण निर्माण होते. सगळी कविता, कवितेच्याच अंगाने वाचत असताना, शेवट मात्र एकदम अंगावर येतो आणि वाचक स्तिमित होतो - खानोलकरांच्या अगोचर प्रतीमासृष्टीप्रमाणे!!
No comments:
Post a Comment