Monday, 20 July 2015

सौंदर्यासक्त ललत

हिंवाळ्यातील थंडगार पहाटे, घराच्या बाहेर दंवारलेल्या पाकळ्यांतून डेरेदार मोगरा फुललेला दिसावा आणि त्या दर्शनाने पुढ्यातली सकाळ सुगंधित व्हावी त्याप्रमाणे कानावर ललत रागाचे सूर पडले मनाची तरल, काव्यमय अवस्था होते. पहाटेचे स्वागत अशा सुरांनी व्हावे, यापरते दुसरी सौन्दर्यासक्ती दुसरी नसेल. मनावर साचलेले सगळे मळभ दूर करण्याची अपरिमित शक्ती या रागाच्या सुरांमध्ये आहे.
या रागाचे सूर बघितले तर आणखी एक विशेष आपल्या ध्यानात येईल. "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" हे या रागातील स्वर जर घ्यानात घेतले तर, आपल्याला लगेच आठवेल, दोन आठवड्यांपूर्वी, आपण आस्वादलेला "पुरिया धनाश्री" रागात देखील हेच स्वर आपल्याला आढळले होते. त्या रागात देखील, "गंधार" आणि "निषाद" हे शुद्ध स्वरुपात अवतरतात!! सुरांच्या मांडणीत किती साम्य तरी देखील "ललत" राग, पहाट शुचिर्भूत करणारा तर "पुरिया धनाश्री", वाट्याला आलेली संध्याकाळ अंतर्मुख करणारा!! 
या रागात "तीव्र मध्यम" जरी असला तरी तो स्वर, बरेच कलाकार "आंदोलित" स्वरूपात घेतात, म्हणजे कधी कधी "शुद्ध मध्यम" या स्वराच्या साथीने घेतात आणि रागाचे स्वरूप बऱ्याचअंशी वेगळे करतात. भारतीय रागदारी संगीत किती श्रीमंत आहे, याचा हा एक पुरावा म्हणून दाखवता येईल आणि याचे मुख्य कारण, प्रत्येक रागातील "षडज" वेगळा असतो आणि एकदा या स्वराची स्थापना झाली की मग या स्वराला अनुसरून इतर स्वर सांगाती येतात. आणि इथेच प्रत्येक राग स्वत:चा "चेहरा" घेऊन अवतरतो. यापुढे आणखी साद्धर्म्य दाखवायचे झाल्यास, दोन्ही रागात "पंचम" स्वर अस्तित्वात नाही, म्हणजे बघा, सगळे स्वर तेच आहेत पण, स्वभाव मात्र संपूर्ण वेगळा!!
या रागाची प्रकृती जरी खेळकर, आनंददायी अशी असली तरी आपल्या संगीतकारांनी त्यात, ज्याला विरही, व्याकूळ म्हणाव्यात अशा अप्रतिम रचना बांधलेल्या आहेत. आपण इथे जगजीत सिंगची एक प्रसिद्ध गझल बघूया. "कोई पास आये, सवेरे, सवेरे" या अतिशय ठाय लयीतील आणि तालाला देखील थोडी अवघड अशी रचना ऐकुया. 


या गझलेचा पहिला आलापच ललत रागाची ओळख करून देतो आणि त्याचबरोबर रचनेतील व्याकुळता. रागाच्या चेहऱ्याशी संपूर्ण फटकून वागणारी ही रचना आहे. अर्थात, पहाट म्हटली की नेहमीच शुचिर्भूत वातावरण असतेच असे नसून, त्याच पहाटेला अशी व्याकूळ करणारी विरहणीची व्यथामग्न सकाळ देखील असू शकते. अर्थात ही एक गझल आहे, त्यामुळे प्रत्येक कडव्यात तोच शब्दार्थ असेलच, असे नाही. किंबहुना गझलेचे हे एक अन्वर्थक लक्षण म्हणता येईल. गझलेतील, प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असू शकते आणि त्याच्या अन्वयार्थ गझलेच्या धृवपदाशी असेलच, असा अजिबात नियम नाही. 
जरा नीट ऐकले तर सहज ध्यानात येईल, या सुरवातीच्या पहिल्या आलापीमध्ये, जगजीत सिंगने संपूर्ण रागाचे चलन पेश केले आहे.  तसेच रचनेच्या मध्यंतरात घेतलेली सरगम - ग म ध नि सा रे अशी  घेताना,त्याचा शेवट ग आणि म या स्वरांवर कसा घेतला आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. अर्थात पुढे हीच सरगम, गिटारच्या सुरांत कशी बेमालूम मिसळली आहे, हा आणखी आनंदाचा भाग आहे. मुळात, जगजीत सिंगच्या बहुतेक सगळ्या गझला या अतिशय संयत, शांत आणि ठाय लयीत असतात. एकदा एक लय सुरवातीला घेतली की शक्यतो त्या लयीतच पुढली रचना बांधायची. असा या संगीतकाराचा विचार असायचा पण तरीही जरा बारकाईने ऐकले तर, त्या लयीतच कितीतरी वेळा अनपेक्षित हरकती, बोलताना घेऊन, तीच रचना श्रीमंत कशी करायची, याचा ही गझल म्हणजे एक सुंदर वस्तुपाठ ठरावा. 
अशीच एक सुंदर रचना संगीतकार मदन मोहनने "चाचा झिंदाबाद" या चित्रपटासाठी केली आहे. "प्रीतम दरस दिखाओ" हे गाणे आपण ऐकू. 


एखादे युगुलगीत कसे सादर करावे आणि गाताना, दोघेही गायक कसे एकमेकांचा सूर "उचलून" गातात आणि गाण्यात वेगळीच खुमारी आणतात, हे या गाण्यात ऐकण्यासारखे. मन्नाडे आणि लताबाई, दोघेही तालेवार गायक आणि अशावेळी जर का त्यांना अशी "गायकी" ढंगाची रचना गायला मिळाली,की कसे असामान्य गाणे जन्माला येते, याचा हा अनिर्वचनीय श्रवणानुभव आहे.  सुरवातीचा "आकार" युक्त आलाप आणि पुढे त्याचा स्वरांचे. सतारीच्या सुरांतून प्रात्यक्षिक ऐकायला मिळते. ललत रागावर आधारित गाणे आणि पण, ललत रागाची प्रतिकृती नव्हे. सुगम संगीतात, अशा प्रकारचे स्वातंत्र्य नेहमीच संगीतकार घेत असतात आणि त्यायोगे, गाण्यातील सौंदर्य अधिक खुलवतात. "तुम बीन रो रो रैन बिताये" ही ओळ लताबाई वरच्या पट्टीत गटात आणि तोच स्वर पकडून मन्नाडे , लताबाई ज्या "रो" शब्दाचा सूर घेतात, तोच सूर पकडतात आणि गाणे पुढे नेतात. युगुलगीत कसे गावे, याचा हा सुंदर धडा आहे. या गाण्यातील, लताबाईच्या हरकती ऐकाव्यात. संपूर्ण सप्तक आवाक्यात घेऊन, चकित करण्याचा अजिबात हव्यास नसून, गाण्याच्या सौदर्याच्या दृष्टीने कितपत हरकत घ्यायची, याची नेमकी जाण ठेऊन, ती हरकत घेतली आहे. केवळ अप्रतिम. प्रत्येक सूर कसा स्वच्छ, नितळ लागला आहे. 
भारतीय संगीतकारांनी काहीवेळा अशी गाणे बनवली आहेत, त्या रचना, त्या रागाचे लक्षण गीत म्हणून मानता येईल. प्रत्येक रागाचे स्वत:चे असे "चलन" असते आणि त्यानुसार त्या रागाचा "तोंडावळा" ठरत असतो. त्यामुळे, एखादी रचना, हेच त्या रागाचे "चलन" तसेच ओळख ठरून जाते. "एक शहेनशाह ने बनवाके हंसी ताजमहल" हे संगीतकार नौशाद यांनी बनवलेले गाणे, ललत रागाची प्राथमिक ओळख म्हणून नक्की ओळखले जावे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून ते अखेरच्या सुरापर्यंत, नखशिखांत ललत राग. 


गाण्याची सुरवात सारंगीच्या सुराने होते पण त्यात संतूरचे स्वर मिसळले आहेत. अर्थात पार्श्वभागी नितांत रमणीय ताजमहाल आणि तिथली बाग!! हेच सूर, ललत रागाची "तोंडओळख" करून देत असताना, एकदम, सतारीचे सूर झमझमत येतात पण येताना, आपल्याबरोबर जलतरंग वाद्याला घेऊन येतात आणि तिथे ललत रागाचा चेहरा समोर येतो, तो अवर्णनीय आहे. गाण्यातून, रागाचे सादरीकरण करताना, रागदारी संगीतातील क्लिष्टता बाजूला सारून, त्यातील "ललित" भाग निवडून सादर केला म्हणजे मग सगळ्या रसिकांना तोच राग "आपला" वाटायला लागतो आणि त्या रागाबद्दल ममत्व वाटायला लागते. या गाण्याने नेमकी हीच किमया केली आहे. 
वाद्यमेळ संपत असताना, रफीचा छोटासा आलाप कानावर येतो आणि त्या "आकारा" मध्ये त्याच तोडीचा समृद्ध "आकार" लताबाईंच्या आवाजात ऐकायला मिळतो.रफीचा बुलंद आवाज आणि त्याला मिळालेली लताबाईंची असामान्य गायकी, याचा अतिशय सुंदर मिलाफ या गाण्यात ऐकायला मिळतो. खरतर शकील बदायुनीच्या शब्दांनी तरुण मनाच्या प्रणयी भावनेचा अनोखा आविष्कार केला आहे. केवळ कविता म्हणून देखील, हे गाणे वाचण्यासारखे आहे.  

अशाच प्रणयी रंगाचे अत्यंत "अनोखे" रूप, काही वर्षांपूर्वी आलेल्या "ईश्किया" या चित्रपटात विशाल भारद्वाज या संगीतकाराने पेश केले आहे. रेखा भारद्वाज या गायिकेने हा अनोखा आविष्कार सादर केला आहे. तंबोऱ्याच्या सुरांत सुरवातीला रेखा भारद्वाज, नि ग नि रे सा या सुरांने सुरवात करते. इथे जो "निषाद" लागला आहे, ते खास ऐकण्यासारखा आहे. थोडे वेगळे मांडायचे झाल्यास, हा जो सुरवातीचा आलाप आहे, त्यावर किंचित किशोरी आमोणकरांच्या गायकीचा असर दिसतो पण, तितकाच. पुढे सगळे गायन वेगळ्या थाटात सुरु होते. 


गाण्याची चाल "बंदिश" असल्याचा भास होतो पण, तालाचे वळण बघितले तर लगेच फरक कळून येतो. या गाण्याची आणखी गंमत म्हणजे, गाण्यात "केहरवा" ताल आहे पण तो अशा पद्धतीने आपल्या समोर येतो की पारंपारिक मात्रांचे वजन लक्षात घेता, इथे ताल, वेगवेगळ्या वाद्यांतून ऐकायला मिळतो आणि तेच सादरीकरण लगेच आधुनिक स्वरूप घेते. 
आपण वरती बघितलेल्या "कोई पास आया सवेरे सवेरे" या रचनेतील शब्दभावाशी जुळणारी भावना इथे दृग्गोचर होते आणि तशीच व्याकुळता, या गाण्यात प्रतिबिंबित होते पण, तरीही चालीतील फरक आणि वाद्यमेळातील गुंतागुंतीची रचना ऐकताना, साम्य बाजूला पडून, संपूर्ण नवीन रूप आपल्यासमोर येते. 
ललत राग आहेच असा, सकाळ सकाळी सूर कानावर पडावेत आणि उगवलेली पहाट मनातील सगळे किल्मिष बाजूला सारून, नव्याने सामोऱ्या येणाऱ्या दिवसाचे स्वागत उत्साहाने तयार व्हावे, असेच प्रत्येकवेळी वाटत रहाते आणि हेच रागाचे खरे वैशिष्ट्य मानावे लागेल. 

Attachments area

No comments:

Post a Comment