आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीला एखाद्या साच्यात बसविणे किंवा त्याच्यावर एखादे "लेबल" चिकटवणे, ही आवश्यक मानसिक गरज वाटते, जणू त्याशिवाय त्या व्यक्तीची पूर्तता होणे कठीण!! अर्थात, असला प्रकार काही प्रमाणात जागतिक स्तरावर देखील आढळतो आणि मग त्यातून एकमेकांची तुलना ही आत्यंतिक गरज होऊन बसते!! एकदा अशा साच्यात त्या व्यक्तीला बसविले म्हणजे म्हणजे ते व्यक्तित्व पूर्ण होते. याची खरी गरज असते का? असला प्रश्न कुणी विचारत नाही आणि काहीवेळाने, त्या व्यक्तीला देखील, याची गरज भासायला लागते आणि बहुदा तिथेच ते व्यक्तिमत्व खुरटायला लागते. बऱ्याच उमलणाऱ्या कळ्या अशाच उखडलेल्या दिसतात.
"रैना बीती जाये" हे गाणे प्रकाशात येईपर्यंत, या गाण्याचा संगीतकार, "आर.डी.बर्मन" अशाच सावलीत वावरत होता!! त्याच्यावर, पाश्चात्य चालीवरून रचना करणारा संगीतकार, हे लेबल चिकटले होते, जणू काही या संगीतकाराने वेगळ्या प्रकारची गाणी कधीच दिली नाहीत!! वास्तविक, "घर आजा
" किंवा "शर्म आती है" सारख्या अनुपम रचना त्याने दिल्या होत्या, हा जणू "इतिहास" झाला होता. "तिसरी मंझील" या चित्रपटाची आणि अशाच प्रकारची गाणी देणारा संगीतकार, हीच ओळख झाली होती. त्यातून, वडील, प्रसिद्ध संगीतकार, एस. डी. बर्मन यांच्या सावलीत वावरल्याने, "स्वयंप्रकाशित्व" थोडे परकेच झाले होते.
"रैना बीती जाये, शाम ना आये, निंदिया ना आये" या धृवपदाने गाण्याची सुरवात होते. सुरवातीला, सारंगीचे सूर जवळपास ७ सेकंद आहेत पण ते सूर पुढील असामान्य आलापीला जणू बोलावत आहेत, असे वाजलेले आहेत. हा जो सुरवातीचा आलाप आहे, हा इतका जीवघेणा आहे, मंद्र सूर लागतो आणि क्षणात (अर्थ शब्दश: घेणे) तो सूर वरच्या पट्टीत जातो आणि तसाच परत खाली उतरतो!! हा जो आलाप आहे, हीच रचनेच्या अवघडतेची "खूण" आहे, जी खूण, पुढील रचना किती अधिक गुंतागुंतीची होते, त्याचे निदर्शक आहे. आलाप चालू असताना, त्याच्या पार्श्वभागी संतूरचे सूर छेडलेले आहेत आणि आलाप संपल्यावर त्या सुरांची ओळख होते. सुगम संगीताची बंदिस्त वीण, ही अशीच थोड्या थोड्या स्वरांनी बनत जात असते. हा जो जवळपास ३० सेकंदाचा आलाप आहे, हा आलाप जणू लताबाईंच्या गायकीचे अन्वर्थक लक्षण म्हणावे इतका समृद्ध आहे. बाईंची गायकी, कुठे श्रेष्ठ आहे, त्याचे, हा आलाप, हे निदर्शक आहे. आलाप खर्ज सुरांतून तीव्र सुरत जातो आणि त्याच लयीत खाली उतरतो, फार "मुश्किल" गायकी आहे!!
आलाप संपल्यावर, लगेच संतूर आणि त्यामागोमाग गिटार व बासरीचे सूर ऐकायला येतात. सुगम संगीतात, वाद्यमेळ स्वत:चे "अस्तित्व" कसे दाखवतो आणि रचनेसोबत लय कशी निर्माण करतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. हे संपते, तिथे अत्यंत "ठाय" लयीत, लताबाईंचे शब्द कानावर येतात, "रैना बीती जाये, शाम ना आये, निंदिया ना आये"!! वास्तविक , कोठीवरील गाणे आहे, ज्याकाळी कोठीवर दादरा, ठुमरी, गझल सारख्या गायकीचे सहज अस्तित्व होते!! इथे, "निंदिया ना आये" जेंव्हा दुसऱ्यांदा गायले जाते, त्यावेळची लताबाईंची "मुरकी" ऐकण्यासारखी आहे, स्वरात आर्जव तर आहेच पण त्याचबरोबर संयत आवाहन देखील आहे, जे जाणकार व्यक्तीला कोठीवर येण्याचे आमंत्रण देत आहे!! संगीत रचना,आणि गायकी कुठे समृद्ध होते, याचे हे एक उदाहरण म्हणून दाखवता येईल. "निंदिया ना आये" हे गाताना, "दि" आणि "या" या दोन शब्दांच्यात एक अत्यंत हलक्या सुरात हरकत आहे, ती ऐकावी.
लताबाईंची गायकी आणि इतरांची गायकी, यातील फरक स्पष्ट होण्यासाठी ही हरकत ऐकावी. इतकी हलकी तरीही शब्दांच्या आशयाला धरून आणि लय अधिक गुंतागुंतीची करून कशी टाकता येईल, हे अनुभवण्यासारखे आहे. दुसरी बाब, संगीतकार म्हणून, इथे नक्कीच मांडवी लागेल. राहुल कधीही गाण्याचा ताल, सरळ रेषेत मांडत नाही. बहुतेक गाणी केहरवा किंवा खेमटा या तालात असतात पण त्याचे सादरीकरण नेहमीच फार वेगळ्या अंगाने रचलेले असते. संगीताचे कालिक परिमाण धुंडाळण्यासाठी तालाची रूढ पद्धत वापरत नाही. समजा गाण्यात, तबला असेल तर तालाची पहिली मात्रा "धा" वाजवताना, उजव्या बोटाने चाटीवर आघात केला जाईल पण त्याचबरोबर डाव्या हाताने डग्ग्यावरील आघात हा गिटार वाद्यातून काढला जाईल!! त्यामुळे तालाचे सादरीकरण पार वेगळे होते, अभारतीय होते. सुगम संगीतात, तालाचे असे विविध प्रयोग या संगीतकाराने अशा पद्धतीने केले असल्याने, चित्रपट संगीतात जी अपूर्व विविधता आली, त्याला दुसरी तोड नाही!! त्यासाठी या संगीतकाराने, पारंपारिक तालवाद्ये न वापरता, धातू त्रिकोण, झायालोफोन, खुळखुळे अशी वाद्ये वापरून, गाण्याचा परिणाम नेहमीच खुलवलेला दिसतो.
इथे जरी रागावर आधारित गाणे असले तरी, विशिष्ट रागचौकटीपासून दूर सरकूनही रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती. म्हणजे, इथे या गाण्यात, राग जणू सारा वेळ पार्श्वभूमीवर तरळत राहतो, पण त्याला राग म्हणून वावरण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही!! इथे संगीतकाराची संगीताबद्दलची जाणकारी दिसून येते.
"शाम को भुला, शाम का वादा ये, रंग दिये के जागे राधा, निंदिया ना आये, रैना बीती जाये" हे पहिले कडवे. इथे बघा, "शाम को भुला, शाम का वादा ये" ही ओळ दोनदा गायली गेली आहे. परंतु दुसऱ्यांदा गायली जाताना, "भुला" या शब्दावर अशीच स्वरांची लहान नक्षी आहे आणि तसेच क्षणभर विसावणे आहे!! या विसावण्यानंतर "शाम का वादा' यावर हलकीशी हरकत आहे. लताबाईंच्या गायकीचे हेच खरे वैशिष्ट्य आहे, इथे पूर्ण सप्तकी तान, मूर्च्छना वागैते शास्त्रोक्त अलंकार अजिबात वापरलेले नसतात, एखादा "अर्धा" सूर, गायनाची अपूर्व किमया करून जातो आणि ही किमया, इतरांच्या गळ्यातून येणे अवघड जाते. शब्दांचे सौष्ठव तर सांभाळायचे पण त्याचबरोबर लयीच्या अंगाने मध्येच स्वरांत "तिरपागडेपणा" आणायचा!! हे अजिबात सहज आणि सोपे नाही.
या गाण्यात तसा वाद्यमेळ फारसा नाही. संतूर, गिटार आणि बासरी, हीच प्रमुख वाद्ये आहेत पण तरीही या वाद्यांचे एकत्रीकरण इतके घट्ट आहे की त्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल. एकदा गाण्याची लय ठरली, तो सूर मिळाला की त्याला जोडून सगळी स्वररचना बांधायची, हे तर सुगम संगीताचे मुलतत्व म्हणायला हवे परंतु त्या पहिल्या सुरापासून, पुढे त्याचा विस्तार कसा करायचा, इथेच तर संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसून येते.
"बिरहा की मारी प्रेमदिवानी, तनमन जागा, अन्खियो में पानी, निंदिया ना आये" हे दुसरे कडवे आहे. "बिरहा की मारी" ही ओळ दुसऱ्यांदा गाताना, "मारी" या शब्दावर एक हलकासा "खटका" आहे, जो, या शब्दाचे महत्व अधोरेखीत करतो. सुगम संगीतातील हे खरे अलंकार!!! छोटासा खटका, परंतु त्या शब्दातून व्यक्त होणारा आशय द्विगुणीत करणारा, ही गायिकेची नजर!! हे गाणे संपताना, "शाम ना आये" वरील हरकत मुद्दाम ऐकावीच लागेल. ही हरकत, इतकी अवघड आहे की, या लयीत ती बसलीच कशी, याचा संभ्रम पडावा. पण, ही खरी गायकी!! गाण्याचा इतका अप्रतिम "समारोप" दुसऱ्या कुठल्याच स्वराने होऊ शकणार नाही.
No comments:
Post a Comment