Monday, 20 July 2015

शब्द शब्द जपून ठेव!!

गाण्याची चाल बांधताना, बरेचवेळा एक मुद्दा ठामपणे ,मांडला जातो. गाण्याची चाल "ओरिजिनल" आहे का? निर्मिती किती "स्व"तंत्र आहे?  संगीताच्या बाबतीत असा शोध  घेणे,बरेचवेळा व्यर्थ ठरते. एकतर कुठलेही गाणे घेतले तर त्याच्या चालीचा संबंध कुठे ना कुठेतरी रागदारी संगीताशी जुळलेला आढळतो. याचाच वेगळा  अर्थ,चाल त्या रागाशी संबंधित असते. मग, संगीतकाराची सर्जनशीलता कितपत सृजनाशी जवळीक साधते? हा उपप्रश्न उद्भवतो. तेंव्हा, एकूणच असे एक ढोबळ विधान करता येईल, "नव निर्मिती" याला अतिशय मर्यादित अर्थ असतो. खरेतर, मला नेहमी असेच वाटते, गाण्याची चाल, ही शब्दांशी किती संवाद साधते यावर त्या चालीचे स्वरूप आणि दर्जा जोखावा. कुठल्या रागावर, चाल आधारित आहे आणि त्या रागाचे "मूळ" स्वरूप गाण्यात कितपत राखले गेले आहे, हे प्रश्न काहीप्रमाणात गैरलागू ठरतात.  प्रस्तुत गाण्यात हाच प्रकार बरेचवेळा घडलेला आहे. वास्तविक, या गाण्यात, १ नाही तर चक्क ४  छटा दिसतात. १]  पुरिया,२]पुरिया धनाश्री, ३] मारवा आणि ४] सोहनी!! असे असून देखील, गाण्याची चाल म्हणून स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य अधोरेखित होते, ते वेगळेच. मुळात, केवळ एखाद्या रागावर गाण्याची चाल आहे, म्हणून ते गाणे चांगले, हा विचारच अर्धवट आणि पर्यायाने गाण्यावर अन्याय करणारा आहे. 
तसेच, कुठलेही गाणे, कवितेच्या अंगाने बघणे जरुरीचे आहे. मंगेश पाडगावकर, हे नाव निदान मराठी वाचकांना अजिबात अपरिचित असू नये. थोडा विचार केला तर, पाडगावकरांच्या गाण्यातील "गीतमयता" आणि त्याचे नाते अगदी भाऱा. तांब्यांच्या कवितेशी पोहोचते. तांब्यांची कविता, त्याचा पुढील विस्तार, बा.भ. बोरकरांच्या कवितेत आढळतो आणि त्याचेच आधुनिक स्वरूप पाडगावकरांच्या कवितेत दिसून येते!! अर्थात काळानुरुप, विषय, प्रतिमा इत्यादी बाबींत फरक पडणे, साहजिक आहे. तांब्यांच्या कवितेत, त्या काळातील इंदूरच्या सरंजामी संस्कृतीचा आणि काहीशा संस्कृतप्रचुर भाषेचा प्रभाव दिसतो, तर बोरकरांच्या कवितेत पोर्तुगीज संस्कृतीचा आढळ येतो आणि यातूनच पाडगावकरांची कविता सिद्ध होत गेल्याचे दिसून येते. 
कविता वाचताना, कवितेतील आशय सहज समजून घेता येतो तरीही काही प्रतिमा पटकन मनात चमकून जातात.
शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी
इथे आपण शेवटच्या ओळी उदाहरणादाखल बघूया. 
"साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची 
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी" 
वास्तविक, हा कवितेतील शेवटचा चरण आहे पण, इथे ज्योतीची प्रतिमा कशी एकूणच कवितेच्या आशयाशी चपखल नाते जुळवून आली आहे.  चांगले गाणे  बघताना,गाण्याच्या चालीत शब्द किती सहजतेने बसले आहेत, हे बघणे अत्यावश्यक ठरते. 
भावगीतात कविता असणे जितके अत्यावश्यक तितकेच ती कविता, आशय, घाट, प्रतिमा इत्यादी घटकांनी समृद्ध असणे महत्वाचे ठरते. गाण्यातील शब्दात दुर्बोधता असावी का? हा एक उपप्रश्न इथे येऊ शकतो पण त्याबाबत फार विचार न करता, कवीच्या अभिव्यक्तीला मान देऊन, आपण पुढे जाऊया. एखादा वैय्यक्तिक अनुभव जेंव्हा काव्यरूप घेतो, तेंव्हा तो कवीच्या जाणीवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वत:चे रूप घेऊन,स्वत्वाने उभा राहणे अशक्य !! याच  दृष्टीकोनातून, "कवीची स्वत:ची भाषा" निर्माण होऊन अभिव्यक्तीवरही परिणाम होतो. कविता ही एका पातळीवर संवादच असतो आणि या संवादाचे वाहन भाषेतून निर्माण झालेले मान्य सामाजिक संकेत हेच आहेत. याच बाबींतून, कवीला संवाद घडविता येतो. या संदर्भात, या बघितले तर, कवितेतील भावनाशय हा सर्वस्वी पाडगावकरांचा आहे. पण अभिव्यक्त होताना, संवादाच्या वर उल्लेखिलेल्या अपरिहार्य स्थितीतून तो साकार होत असल्यामुळे रसिकांपर्यंत पोहोचतो आणि याच अर्थाने शब्दरूप घेऊ शकणार नाहीत, असे वाटणाऱ्या भावनाशयाच्या छटाही, आपल्याला निकटतेने जाणवाव्यात अशा रीतीने कवितेत शब्दरूप होतात. 
आता आपण गाण्याकडे वळूया. कवितेतील हळवी, आर्त अभिव्यक्ती लक्षात  ठेऊन,संगीतकार विश्वनाथ मोऱ्यांनी, सुरवातीलाच बासरीचे सूर घेतले आहेत. मारवा रागाची छटा दाखवत, कोमल निषाद स्वरावर, स्वररचनेची सम घेतली आहे आणि ती देखील, तबल्यावर मात्रेचे पूर्ण वर्तुळ घेऊन!! तिथेच चालीचे स्वरूप आणि गती दृष्टीस येते.  
"शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलांपरी" 
शब्दातील बकुळीच्या फुलांची प्रतिमा आणि तो नाजुकपणा, नेमका स्वरांतून व्यक्त व्हावा, हीच जाणीव दिसून येते. अत्यंत ठाय लयीत सुरवात आहे पण संथ नाही. सुगम संगीतात चाल अति संथ असून देखील चालत नाही. सुरवातीचे शांत स्वर आणि पुढे एकदम, "बकुळीच्या फुलांपरी" इथे वरचे स्वर, जे मारवा रागात येत नाहीत म्हणजे सुरवात जरी या रागाच्या  तरी क्षणात चालीचा मार्ग बदलतो आणि तालाच्या समेवरील मात्रेत विसर्जित होतो. साधी बाब आहे, "शब्द शब्द" हे शब्द ज्या सुरांवर सुरु होतात, त्याच सुरांवर ओळ संपते पण, रागाला बाजूला सारून!! 
संपूर्ण गाण्यात विषण्ण भाव पसरलेला आहे आणि तोच भाव शेवटपर्यंत रहातो. इथे गाण्यात, रूढ अर्थाने २ ओळीचे ध्रुव पद नाही त्यामुळे चालीचा जो "मीटर" आहे, त्यात सुरवातीची पहिली ओळ  दोनदा घ्यावीच लागते. त्यातून आणखी एक गोष्ट साध्य होते, चालीचा आराखडा रसिकांच्या मनात पक्का ठसतो. पहिल्या अंतरा घेताना परत बासरीचे सूर येतात आणि सोबत पुन्हा वेगळ्या रागाचे रूप घेऊन येतात पण कसे येतात, हे ऐकण्यासारखे आहे. गाण्यात अनेक राग वापरणे, हे काही नवीन नाही पण, दुसऱ्या रागाचे स्वर आधाराला घेताना, पहिल्या सुरांशी तितकेच तलम नाते, जोडावेच लागते अन्यथा चाल सगळीच फसण्याचा संभाव असतो. संगीतकार इथे समजून घेता येतो. स्वरांची जोडणी करताना, स्वरांचा  पोत, त्याचा आकार आणि  वजन,सगळे ध्यानात ठेउनच, रचना तयार करायची असते आणि त्याचा पुढे विस्तार करायचा असतो.
"काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे;
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी"
"काय" या शब्दावरील किंचित साधलेली "हरकत" आणि लगेच "बोलले न कळे" या सुरांशी जुळलेले नाते!! चालीतील स्वर कसे फिरतात आणि पुन्हा मूळ चालीशी कसे नाते जुळवतात, ते इथे बघण्यासारखे आहे. "लाविलीस ज्योत तूच " यातील, "लाविलीस" शब्द परत वरच्या सुरांत घेतले आहेत - म्हणजे "बकुळीच्या" म्हणताना घेतलेला वरचा स्वर आणि "लाविलीस" म्हणताना घेतलेला वरचा स्वर, यात सत्कृतद्दर्शनी साम्य दिसते पण तसे अजिबात नाही आणि इथे स्वरांचे वजन, हा गुळगुळीत झालेला शब्द अवतरतो. अर्थात, इथे सुमन कल्याणपूर यांनाच "मार्क्स" द्यायला हवेत कारण स्वर कसे, किती प्रकारे घ्यायचे, हे गायकाचे स्वातंत्र्य. संगीतकार फक्त, कुठला स्वर कुठे घ्यायचा इतपत दिग्दर्शन करीत असतो पण पुढे त्याचे प्रकटीकरण अर्थात गायकाच्या गळ्यातून !! "लाविलीस" या शब्दावरील वरचा स्वर पुढे हळूहळू कसा खर्जात येतो आणि मूळ चालीशी जुळवून घेतो, हे  ऐकणे, म्हणजे स्वरांचा अननुभूत आनंद घेणे होय. "उदास अंतरी" इथे स्वर "उतरी" आहे आणि  हा जो स्वर आहे, तो "शब्द" इथे जुळतो.
"दु:ख नको सुटताना, अश्रू नको वळताना; 
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी " 

दुसरा अंतरा सतारीच्या सुरांनी सजवलेला आहे. पहिलाच सूर थोडासा तीव्र मध्यम आहे पण ती सुरावट संपते ती, कोमल निषादावर!! (परत मारवा) त्याच सुरांवर बासरी सुरु होते, ते स्वरांचे "वळण" किती देखणे झाले आहे. हलकीशी फिरत आहे पण, सामेच्या मात्रेशी नाते दाखवत संपणारी!! "दु:ख नको सुटताना" मधली विखारी भावना पण हताशता व्यक्त होणारी. हे सांगताना, स्वर थोडा मंद्र सप्तकातला आहे आणि तो आशयाच्या दृष्टीने तसाच हवा. हे दु:ख उरस्फोडी, धाय मोकलून रडणारे नसून, अंतर्यामी उन्मळून पडणारे आहे, त्यामुळे त्याची अभिव्यक्ती ही अशीच व्हायला हवी. नंतरच्या ओळीतील "उमलशील तू उरी" हे  जरा वरच्या स्वरात आहे कारण चालीचा "मीटर"!! अन्यथा चाल परत आपल्या घरी कशी परतणार!! 
साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची;
ज्योत बनून जळले रे मी तुझ्या पथावरी"
पाडगावकर, आपल्या कवितेत नैसर्गिक घटकांचा वापर कसा नेमका करतात, हे खरच अभ्यासावे. रात्रीच्या वेळी, शांत आसमंत असताना, सोबत ही आकाशातील ताऱ्यांची आणि शांत वाऱ्याचीच असणार पण कवीने इथे "शांत" शब्द न वापरता "स्तब्ध" वापरून, वातावरणातील  गडद केली आहे.  तिसरा अंतरा बांधताना, मोऱ्यांनी पहिल्या अंतरा मदतीला घेतलेला आहे म्हणजे बासरीचे सूर घेतले आहेत पण, गंमत अशी आहे, जरी सूर सारखे वाटले तरी त्यात श्रुतिमय फरक आहे. भारतीय संगीतात, श्रुती हा विषय अति अगम्य, किचकट विषय आहे पण, त्याला डावलून पुढे जाणे अशक्य!! अर्थात, या श्रुतींमुळे(च) प्रत्येक रागात फरक पडतो. बासरीचे सूर ऐकताना, याचाच आपल्याला पडताळा येतो. परिचित सूर वाटत असताना, एखाद्या सुराचा किंचित बदल तसा आपल्या ध्यानी येत नाही पण, पुढे स्वरविस्तार त्या बदलाला अनुलक्षून होत असल्याने, नंतर तो बदल जाणवतो. हे अति सूक्ष्म बदल लगेच जाणवत नाहीत आणि आपले अक्षम्य असे दुर्लक्ष होते. इथे तोच प्रकार घडतो. 
तसे बघितले तर मध्येच सोहनी रागाची छटा दिसते पण किती? एखाद, दुसऱ्या स्वरांच्या वळणांतून!! रागदारी संगीतावर प्रभुत्व असल्याशिवाय असली सांगीतिक वाक्ये सुचणे केवळ अशक्य!! वरवर ऐकले तर  आणि पहिले कडवे आणि या चालीत फारसा फरक दिसत नाही पण तो आहे. आपण फार बारकाईने ऐकत नाही!! 
या गाण्यात सुरांमधील फरक, हा अतिशय बुद्धीगम्य आहे आणि म्हणून हे गाणे तसे सरळ, साधे आणि श्रवणीय वाटते पण ते फार भासमान आहे. इथे मला, मराठीतील श्रीनिवास खळे आणि विश्वनाथ मोरे, यांचे साम्य दिसते. ऐकताना, सहज गुणगुणता येईल, अशी चाल असते पण प्रत्यक्ष गाताना गळ्याची परीक्षा घेणारी रचना असते. अर्थात खळ्यांच्या चाली अधिक गुंतागुंतीच्या असतात. संगीतात कधीही दोन गाण्याची तुलना  करू नये, असे मला नेहमी वाटते तरीही हे गाणे ऐकताना, मला खळ्यांच्या "या चिमण्यांनो परत फिरा रे" या गाण्याची फार आठवण आली.  कदाचित,दोन्ही गाण्यांत "पुरिया धनाश्री" आणि "मारवा" रागचचा वापर असल्याने असेल!! वास्तविक दोन्ही चाली फार वेगवेगळ्या आहेत तरी देखील!!  
अगदी संथ लय, मोजकी वाद्ये, गायकी ढंगाची चाल आणि अत्यंत गुंतागुंतीची रचना, यामुळे हे गाणे मला अतिशय आवडते. 
https://www.youtube.com/watch?v=fUxZ4HbDo_I

1 comment:

  1. When I tried to sing this song, it was very difficult to search the composition based on specific one raag, but I didn't succeed...so while surfing on google, I got this valuable description...thanks to Mr. Govilkar...

    ReplyDelete