Monday, 20 July 2015

पैस दाखवणारा मालकंस



रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण परिसर इतका अप्रतिम आणि मन गुंगावणारा असतो की क्षणभर, आपण समाधिस्त व्हावे, अशीच जाणीव मनाला चाटून जाते. नजरेच्या आवाक्यात न सामावणारा असा तो परिसर आणि त्या परिसराने मनावर पसरवलेली विलक्षण धुंदी, हे सगळे मालकंस राग ऐकताना अनुभवता येते. खरतर हा राग इतक्या प्रचंड आवाक्याचा आहे की यात काहीवेळा "वर्जित" स्वर घेऊन देखील, "संपूर्ण मालकंस" असा आगळावेगळा राग ऐकायला मिळतो.
"पंचम" आणि "रिषभ" स्वरांना इथे आरोही/अवरोही सप्तकात स्थान नाही. परंतु "षडज" आणि "मध्यम" स्वरांचा प्रभाव इतका आहे, की बाकीचे स्वर मवाळ वाटतात. अर्थात, वरती मी म्हटल्याप्रमाणे, काही कलाकार "वर्जित" स्वरांना किंचित स्थान देतात. इथे मला मारवा रागाची आठवण आली. मारवा रागात देखील, "षडज" स्वराचे अस्तित्व जवळपास नसल्यातच जमा असते किंवा नाममात्र असते आणि त्याचा वापर जितका कमी होईल, तितका मारवा राग अधिक खुलतो. "संपूर्ण मालकंस" माश्ये, "रिषभ" आणि "पंचम" या वर्जित स्वरांचा वावर अशाच प्रकारे होत असतो. असो,
सा" आणि "म" या वादी/संवादी स्वरांनी हा राग भारलेला आहे. शास्त्रकारांच्या मतांनुसार, रात्रीचा दुसरा प्रहर, या रागासाठी योग्य आहे. 

मुळातला भीमसेन जोशी यांचा धीरगंभीर, खर्जातला आवाज, प्रत्येक स्वराला फुलवून मांडायची सवय आणि स्वरविस्तारला भरपूर वाव, यामुळे ही रचना कशी अप्रतिम रंगली आहें. अगदी सुरवातीपासून, मंद्र सप्तकात, या गायकाचा आवाज भलताच विलक्षण लागलेला आहे. गमक, मिंड, बोलताना, क्वचित एखादी मूर्च्छना या आगळ्या अलंकाराने विभूषित, अशी ही समृद्ध रचना, मालकंस राग, त्याचे चलन, वजन, त्यातील स्वरांचे अलौकिक सौंदर्य, या सगळ्याचे यथोचित दर्शन घडवते. जवळपास ४३ मिनिटांची रचना असल्याने, रागविस्तार कसा करावा, रागाची बढत कशी करायची आणि हळूहळू द्रुत लयीत कसे शिरायचे, या सगळ्या बाबी इथे दृग्गोचर होतात. 


मघाशी मी, ज्या "संपूर्ण मालकंस" या रागाचा उल्लेख केला, तो राग आता आपण, इथे किशोरी आमोणकर यांच्या आवाजात ऐकुया. किशोरीताईंचा स्वच्छ, नितळ आणि सगळ्या सप्तकात सहज विहार करणारा आवाज, त्यामुळे ही रचना भलतीच खुमारेदार झाली आहे. तसे ऐकायला गेलो तर, दोन्ही रागांचा तोंडावळा जवळपास सारखा आहे, म्हणजे रागाची बढत, स्वरविस्ताराच्या जागा यात फारसा फरक दिसत नाही पण, समेवर येण्याच्यावेळी फरक स्पष्ट होतो आणि त्याच जागेवरून उमटणाऱ्या ताना, बदलत जातात, बदल तसा सूक्ष्म आहे, पण आहे.रागदारी संगीत बुद्धीगामी मानले जाते, ते असे. स्वरांच्या थोड्याशा फरकाने रागाचा चेहराच बदलून जातो. वास्तविक, हे दोन्ही राग, म्हणजे जुळी भावंडे, असे म्हणता येईल परंतु तरी देखील, चेहऱ्याच्या ठेवणीत अतिशय सूक्ष्म फरक असतो आणि तोच फरक, दोन चेहऱ्याची खूण ठरते. इथे असेच घडते. समेवर उतरताना, वर्जित स्वराचा उपयोग केला जातो पण तो इतका अस्पष्ट आहे की बारकाईने ऐकला तरच ध्यानात येतो पण ध्यानात घ्यावाच लागतो कारण त्याच्याच अनुषंगाने पुढील स्वरविस्तार होत आहे. 


"निजल्या तान्ह्यावरी माउली" हे प्रसिद्ध भावगीत याच रागावर आधारित आहे. वसंत प्रभू, आता काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला संगीतकार पण एकेकाळी आपल्या सहज, साध्या आणि गुणगुणता येतील अशा अवीट गोडीच्या चालींचा जनक. भा. रा. तांब्यांची कविता म्हणजे काव्यात गेयता कशी असावी, याचे उत्तम उदाहरण. कविता वाचत असताना, शब्दात दडलेली अनुस्यूत अशी लय, सहज उलगडत जाते आणि त्या योगे कवितेत दडलेला आशय. तसे बघितले तर तांब्यांनी, कवितेत तसे फार काही प्रयोग केले नाहीत. विषय समयोचित, संस्कृत साहित्याच्या आधाराने वाढत गेलेली आहे. त्यामुळे त्यांची कबिता वाचताना, एक प्रकारचा "राजस" अनुभव येतो. प्रस्तुत गाण्यात हाच अनुभव येतो. 
या गाण्यात, या रागातील सूरांचा आढळ बऱ्याच प्रमाणात ऐकायला मिळतो. अगदी पहिलीच ओळ ऐकली तरी. "निजल्या तान्ह्यावरी माउली" हीच ओळ मालकंस रागाची ओळख पटवते. गाण्याची चाल तशी फारशी आडवळणी नाही परंतु लताबाईंनी घेतलेले "खटके","मुरक्या" मात्र गाण्याला विलक्षण सौंदर्य प्राप्त करून देतात. 


या रागात तशा गझला कमी ऐकायला मिळतात. "लोग कहेते है अजनबी तुम हो" ही गायक हरिहरनने गायलेली अप्रतिम रचना आहे. बऱ्याचशा गझल गायनात, पहिला शेर गायच्या आधी बरीच आलापी असते आणि त्यातून पुढील चालीचे सूचन असते. एकदा रचनेत शायरी अवतरली की मग, काव्याच्या अनुषंगाने गायन करायचे, असा एकूण पायंडा दिसतो. इथेही याच अंगाने गझल गायली गेली आहे. हरिहरनचे वैशिष्ट्य असे, गाण्याचे सुरवातीचे शिक्षण कर्नाटकी संगीताने झाले पण पुढे उत्तर भारतीय संगीत देखील तितक्याच अधिकाराने आत्मसात करून, त्यात प्राविण्य मिळवले. गमतीचा भाग म्हणजे इथे ही गझल गाताना. कुठेही कर्नाटकी संगीताचा लवलेश देखील आढळत नाही. कर्नाटकी गायकी शिकलेल्या बहुतेक गायकांना असा फरक करून गाणे जमत नाही. 
इथे पहिल्याच आलापित मालकंस रागाची ओळख पटते आणि पुढील सगळी रचना, बहुतांशी याच अंगाने विस्तारित होत जाते. 


"अखियन संग अखिया लागी" हे मोहम्मद रफीच्या आवाजातील गाणे असेच या रागातील उत्तम रचना म्हणून निर्देशित करता येईल. तालाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, गाण्यात सरळ, सरळ दोन ताल दिसतात आणि त्यात तसे फारसे प्रयोग दिसत नाहीत. नेहमीचा त्रिताल आणि केरवा ताल ऐकायला मिळतो. गाण्याच्या सुरवातीला. "मन तरपत हरी दर्शन" या प्रसिद्ध गाण्याची झाक दिसते परंतु नंतर मात्र गाणे वेगळे होते. एकाच रागातील ही दोन्ही गाणी असल्याचा हा परिणाम. 
गाणे जसे द्रुत लयीत जाते, तशी गाण्यात सरगमचा सुंदर उपयोग केला आहे. हे गाणे त्या दृष्टीने रागाचे लक्षण गीत म्हणून म्हणता येईल. 


"तू छुपी ही कहा" हे गाणे तसे मालकंस रागावर आहे पण बऱ्याचवेळा रागाची बंधने सोडून चाल सुटी होते, पण एक गाणे म्हणून मला फार आवडते. या गाण्याची गंमत म्हणजे इथे केरवा ताल वापरला आहे पण, तरीही ऐकताना पारंपारिक ताल ऐकायला मिळत नाही आणि ही किमया सी. रामचंद्र यांची. चित्रपटातील गाणे कशाप्रकारे सजवता येते, यासाठी हे गाणे अभ्यासावे, इतक्या तोलामोलाचे आहे. गंमत म्हणजे जरी गाणे रागाची बंधने सोडून जात असले तरी प्रांत समेवर येताना, मालकंस ऐकायला मिळतो. सुगम संगीतात, रागाचे नियम तोडून रचना केली तरी अखेर त्या रागाशी नाते जुळवून घ्यावेच लागते. गाण्यातील वाद्यांचा अनोखा वापर, हे या गाण्याचे आणखी वैशिष्ट्य सांगता येईल. खरतर गाण्याची सुरवातीची चाल आणि पुढे विस्तारित झालेली चाल, यात बरेच अंतर आहे पण, ज्या हिशेबात चाल आणि लय बदलत जाते, ते सगळेच अनुभवण्यासारखे आहे. 

इथे मी आणखी काही गाण्याच्या लिंक्स देत आहे. 

१] मन तरपत हरी दर्शन को आज 

२] मुझे ना बुला 

३] उगवला चंद्र पुनवेचा 

No comments:

Post a Comment