Monday, 20 July 2015

मियां मल्हार

आपल्या रागदारी संगीतात, परंपरेला अतिशय महत्व आहे आणि त्यानुरूप जे संकेत निर्माण झाले आहेत, त्यांची जीवापाड जपणूक करण्याची तोशीस केली जाते. मग, त्यात रागाचे समय, ऋतूप्रधान राग इत्यादी वर्गीकरणे अंतर्भूत होतात. शास्त्रानुसार अभ्यास करायला गेल्यास, शास्त्रात खरेतर, कुठल्याही रागाचा "समय" असा दिलेला नाही तसेच ऋतूप्रधान राग, असे वर्गीकरण केलेले नाही परंतु सुरांचे साद्धर्म्य जाणून घेऊन, असे अनेक संकेत जन्माला आले आहेत. तसे बघितले तर स्वरांच्या देवता, स्वरांचे रंग इत्यादी वर्णने वाचायला मिळतात पण, या सगळ्यांचा "मूलाधार" अखेर संकेत, या शब्दापाशी येउन ठेपतो. सुरांचे, मानवी भावनांशी अतिशय जवळचे नाते असते आणि याच भावनांची जोड, अशा प्रकारच्या वर्गीकरणात झाली. 
मियां मल्हार राग, याच स्वरूपाचा आहे. या रागाची उत्पत्ती तानसेन पासून सुरु झाली असे मानण्यात येते आणि त्यातूनच तानसेन आणि त्याच्या दंतकथा प्रसृत झाल्या. अर्थात या कुठल्याच गोष्टींना कसलाच शास्त्रीय आधार नसल्याने, त्याबद्दल अधिक लिहिणे योग्य नाही. 
दोन्ही गंधार, दोन्ही  निषाद, आणि दोन्ही मध्यम, हे स्वर या रागाची खरी ओळख पटवून देतात. सगळे सूर या रागात उपयोगात येत असल्याने, रागाचा विस्तार प्रचंड प्रमाणात होतो. दोन्ही मध्यम जितक्या प्रभावी मांडता येतात, तितके या रागाचे रूप खुलून येते. खरतर मध्यम, रिषभ आणि पंचम या स्वरांचे चलन, इथे महत्वाचे ठरते. 

आता आपण, या रागाचे शास्त्रीय स्वरूप समजून घेऊया. उस्ताद अली अकबर साहेबांनी वाजवलेला मियां मल्हार इथे ऐकुया. सगळी रचना, केवळ आलापी आणि जोड इतकीच आहे.एकतर सरोद्सारखे अंतर्मुख करणारे वाद्य त्यात, या रागाचे धीरगंभीर स्वरूप!! वास्तविक आपल्या मनात उगीचच मियां मल्हार म्हटलं की पावसाच्या घनघोर धारा आणि तांडव, असे एक चित्र डोळ्यासमोर येते परंतु, या चित्राच्या नेमकी उलट अवस्था उस्तादांनी काय अप्रतिम वाजवली आहे. सुरवातीपासून, प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट, रेखीव वाजवला आहे. त्यामुळे स्वरांचा "मझा' घेता येतो. ज्यांना, स्वरज्ञान नाही, त्यांना देखील, रागातील कोमल स्वर कुठले, याचा सहज अंदाज घेता येतो.   


सरोद खरेतर तंतूवाद्य, परंतु अशा वाद्यावर उस्तादांनी अशी काही हुकुमत ठेवली आहे की, ऐकताना आपल्याला, वादनातील "गायकी" अंग सहज कळून घेता येते. तंतूवाद्यांवर "गायकी" अंग  वाजवणे,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. वाद्यातून सलगता निर्माण होणे शक्यच नसते परंतु खंडित सुरांतून "मींड" काढायची, हे खरच अति अवघड काम असते आणि इथे उस्ताद अली अकबरांनी हे काम अतिशय लीलया केलेले आहे. जरा बारकाईने ऐकल्यावर, एका सुरावरून दुसऱ्या सुरांवर जो "प्रवास" घडतो, ते ऐकणे खरोखरच चिरस्मरणीय आहे. या वादनात, सूर बोलके होत आहेत. वास्तविक, स्वरांना स्वत:ची अशी भाषा नसते परंतु कलाकार, त्यात दडलेली "भाषा" शोधून काढतो. 

तबलानवाज म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव जगात गाजलेले आहे. परंतु त्यांनी, चित्रपट संगीताच्या क्षेत्रात फारसे योगदान दिलेले नाही. त्यांनी ज्या थोड्या चित्रपटांना संगीत दिले, त्यात "साझ" चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. अर्थात त्यांनी या चित्रपटात काही अप्रतिम गाणी दिली आहेत. त्याच चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे ऐकुया. रागात आपल्याला या रागाची "छटा" ऐकायला मिळेल. 

https://www.youtube.com/watch?v=yQqVtUEMK3E

गाण्याची चाल एका अप्रतिम तानेने होते. अगदी पूर्ण सप्तकी तान आहे. ही तानच इतकी अवघड आहे की, पुढे गाणे कशाप्रकारे विस्तारणार आहे, याची कल्पना येते. तीनतालात बांधलेले गाणे, अतिशय द्रुत लयीत आहे. या गाण्यात, इतर गाण्याच्या वेळेस, सुरेश वाडकर जसा आवाज लावतो, तसा नसून, रियाज करून घोटवलेला आवाज लावलेला आहे. अर्थात, असे सगळे गाताना, गाण्याची बंदिश होण्याचा एक धोका असतो आणि तो इथे पूर्णपणे टाळलेला आहे.  गाण्याच्या शेवटी, गायकाने " चक्री" तान इतकी सहज घेतली आहे की ऐकताना, आपण देखील गाण्यात संपूर्ण गुंगून जातो. अखेर, संगीताचा मुख्य उद्देश तरी काय असतो ?? कलाकाराने मांडलेल्या सांगीतिक कलाकृतीत, रसिकाला हरवून जाण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्या पातळीवर हे गाणे नि:संशय अप्रतिम अनुभव देते. या गाण्यात मात्र, मियां मल्हार रागाचे जे प्रचलित रूप आहे - प्रचंड सोसाट्याचा वारा आणि घनघोर पाउस, याचे मूर्तिमंत दर्शन ऐकायला मिळते.

आता आपण मेहदी हसन साहेबांची अशीच अमूर्त रचना ऐकुया. मेहदी हसन म्हणजे गझल गायकीत स्वत:चे स्वतंत्र घराणे निर्माण करणारी गायकी. गझल गायनाचा तोंडावळा पूर्णपणे बदलून टाकून, रागदारी संगीताची "कास" धरून तरीही, रागदारी गायन बाजूला सारून, संपूर्ण वेगळ्या धाटणीची गायकी इथे रुजवली. अत्यंत मुलायम आवाज, सगळ्या सप्तकात हिंडणारा आवाज. अर्थात, तरीदेखील, मंद्र सप्तकात खानसाहेबांची गायकी खऱ्याअर्थी  खुलून येते. चाल बांधताना, रागाच्या स्वरांचा आधार घ्यायचा, परंतु रागाचे  रसिकांना करून द्यायची, असा या गायकीचा सगळा कारभार असतो. "एक बस तू ही नहीं" हीच ती गझल.  


दादरा तालात बांधलेली रचना, अगदी सुरवातीपासून या रागाची छाप आपल्या कानावर येते. मेहदी हसन, नेहमीच रचनेची सुरवात अतिशय संथ, खर्जाच्या सुरांत करतात पण तो जो खर्ज असतो, तोच अति विलक्षणरीत्या आपल्या मनाचे पकड घेतो. गाण्याच्या  ",जिसे बस खफा हो बैठा" इथे "हो" शब्दावर किंचित "ठेहराव" घेतलेला आहे आणि तो खरोखरच असामान्य आहे. जणू रागाची सगळी वैशिष्ट्ये त्या एका सुरांत एकवटली आहेत!! उत्तम  श्रीखंडात हळूहळू केशर कांडी विरघळत जावी त्याप्रमाणे इथे गायकी, त्या शायरीच्या अनुरोधाने आपल्या मनात उतरत जाते. या गायकीचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे, रचनेच्या बंधात समजा एखादा शब्द बसत नसेल तर तेव्हढ्यापुरते चालीला वेगळे वळण देण्याची किमया, या गायकाने असामान्य प्रकारे साधलेली आहे.

मराठीत अर्थगर्भ गाणी तशी भरपूर सापडतात. याच यादीत "जन पळभर म्हणतील हाय हाय" हे गाणे निश्चित अंतर्भूत करावे लागेल. भा. रा तांब्यांची अप्रतिम कविता आणि त्याला तितकीच अर्थवाही अशी वसंत प्रभूंची चाल आणि लताबाईंचे गायन. यामुळे हे गाणे संस्मरणीय झाले आहे. तांब्यांच्या कवितेत, नेहमीच एकप्रकारचा राजसपणा आणि गेयता आढळते. कवितेतील शब्द आणि त्याची "जोडणी" यात, सहज आणि उस्फुर्त अशी लय असते. शब्दातील अंतर आणि त्यातून  खटके, हे सगळेच फार विलोभनीय असते. वसंत प्रभूंच्या चाली या, बहुतांशी अत्यंत श्रवणीय आणि शब्द्वेधी असतात, त्यामुळे, त्या लगेच रसिकांच्या मनाची पकड घेतात. चाल सहज गुणगुणता येण्यासारखी असते. 
  

या गाण्याची एक गंमत बघण्यासारखी आहे. कवितेचा आशय बघता आणि मियां मल्हारचा स्वभाव बघता, या गाण्यात, या रागाची "पाळेमुळे" सापडण्याची शक्यता सुतराम वाटत नाही. तरीदेखील, हे गाणे याच रागावर आधारीत आहे. अगदी पावसाळा झाला तरी मानवी आयुष्यात अंतर्मुखता, व्याकुळता, विरही भावना अस्तित्वात नेहमीच असतात. अर्थात, रागातून अशी नेमकी भावना अचूक शोधायची, हा संगीतकाराचा अप्रतिम आविष्कार. इथे आणखी एक मजा बघूया. वरती, आपण मेहदी हसन यांच्या रचनेतील " जिसे खफा हो बैठा" या ओळीची चाल बघा आणि या गाण्यातील "पळभर म्हणतील हाय,हाय" या ओळीचे स्वर ऐका आणि या गाण्याची चाल कशी मियां मल्हार रागावर आधारित आहे, हे समजून घेता येईल. 

आता मी इथे खाली या रागावर आधारित अशा काही गाण्यांच्या लिंक्स देत आहे. अर्थात, एकूणच सुगम संगीतात, रागाचे "मूळ" फारसे कधी आढळत नसते. परंतु रागाचे "ठेवण" कशी आहे, याचा नेमका अदमास घेत येतो, हे नक्की आणि मुळात, राग आणि त्याची आवड निर्माण होऊ शकते. 

माना मानव वा परमेश्वर - गायक सुधीर फडके 

घन घन माला नभी दाटल्या - गायक मन्नाडे - वरदक्षिणा - वसंत पवार 

बोले रे पपी हरा - चित्रपट गुड्डी - गायिका वाणी जयराम - ताल केरवा - वसंत देसाई 


No comments:

Post a Comment