भारतीय रागसंगीतात असे बरेच राग सापडतात, जे "ख्याल" म्हणून अधिक प्रचलित न होता, उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात बरेच लोकप्रिय असतात. पूर्वी आपण, असे काही राग बघितले आहेत, जसे पिलू या रागाचे असेच नाव अग्रभागी येते. याचे मुख्य कारण, बहुदा या रागाचा उगम लोकसंगीतातून झाला असावा. याबाबत असे देखील विधान करता येईल, "ख्याल" म्हणून या रागात "भरणा" करणे जरा अधिक अवघड होत असणार. तसे बघितले तर, शास्त्रीय वादकांत, हे राग बरेच प्रसिद्ध आहेत आणि वादनातून, अशा रागांच्या भरपूर रचना आणि त्या देखील विविध भावनांशी संलग्न अशा, रचना ऐकायला मिळतात. असे असले तरी देखील, ज्या हिशेबात सुगम संगीतात आणि उपशास्त्रीय संगीतात, अशा रागांचे जे दर्शन घडते, ते केवळ अपूर्व असते.
देस रागाबाबत असेच काहीसे म्हणता येईल. थोडे खोलात शिरलो तर, देस रागाच्या अनेक छटा, भारतातील विविध राज्यांच्या लोकसंगीतातून आढळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, देस रागाच्या, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब इथल्या लोकसंगीतात या रागाच्या प्रसंगानुरूप छटा ऐकायला मिळतात. अर्थात, प्रसिद्ध गायक कुमार गंधर्वांनी याबाबत भरपूर संशोधन करून, चक्क नवीन रागांची निर्मिती केली आहे.
देस रागाबाबत म्हणायचे झाल्यास, या रागावर लोकसंगीताचा बराच पगडा दिसतो तरीही, शास्त्रीय संगीताच्या कलाकारांनी त्याला "संपूर्ण" रागाचे स्वरूप देण्यात यश मिळवले आहे. आरोही सप्तकात "गंधार" आणि "धैवत" स्वर वर्जित तर अवरोही सप्तकात सगळे स्वर उपयोगात आणले जातात, म्हणजे औडव-संपूर्ण जातीचा हा राग आहे. स्वरावलीत, दोन्ही निषाद आणि त्यातल्या त्यात कोमल निषाद स्वराला या रागात अतिशय महत्व आहे. दोन्ही निषाद सांभाळून, या रागाची बढत करायची, यातच या रागाचे खरे कौशल्य आहे. या रागाची "मींड" बघायला गेलो तर मात्र, रिषभ स्वर आणि त्याच्या जोडीने मध्यम आणि गंधार स्वर घेऊन, जे स्वरमाला तयार होते, ती अपूर्व अशी असते.
आता आपण, उस्ताद अमजद अली खानसाहेबांनी वाजवलेला राग देस ऐकू. उस्ताद अली अकबर खान साहेबांनी सरोदवर प्रस्थापित केलेले "गायकी" अंग आणखी वेगळ्या पायरीवर नेण्याचे काम, उस्ताद अमजद अली खान, यांनी फार समर्थपणे केले आहे. विशेषत: वाजत्या तारेवर, बोटातील नखीच्या सहाय्याने, मींड काढण्याची करामत तर विशेष ऐकण्यासारखी असते. तसेच तान घेताना, एखादा स्वर लांबवत, त्यातून "गमक" या अलंकाराचे यथार्थ दर्शन, त्यांच्या वादनातून आपल्याला ऐकायला मिळते.
इथल्या या वादनात, आलापीपासून सुरवात करीत, हळूहळू रागाची "बढत" घेत, राग सर्वांगाने खुलवला आहे. गत वाजवताना, एखादी जीवघेणी हरकत घेऊन, ऐकणाऱ्याला चकित करण्याची खासियत तर खासच आहे.
वास्तविक, मेहदी हसन हे नाव गझल गायकीतील अत्यंत आदराने घ्यायचे नाव, परंतु त्यांनी देस रागात गायलेली ठुमरी देखील अप्रतिम आहे. या ठुमरी गायनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, खान साहेबांनी "गझल" गाताना ज्याप्रकारे "गायकी" पेश करतात, त्यापेक्षा इथे संपूर्ण वेगळा आविष्कार, त्यांच्या गायकीत दिसतो आणि मजेचा भाग म्हणजे, ठुमरी गायनाची सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. हे तर खरेच आहे, गझल गायकी आणि ठुमरी गायकी, यांचा गायकी "अंदाज" हा वेगळा असतो आणि तसा तो आविष्कृत होणे गरजेचे असते.
शब्दार्थाने ही ठुमरी वाचल्यास, या ठुमरीमध्ये ढग, पाउस, याचेच वर्णन आहे पण तरीही, देस रागात "तर्ज" बांधली आहे. अर्थात, रचनेत, पुढे "बदरा" हा शब्द येतो, तिथे उस्तादांनी काही क्षणात "मल्हार" रागाची झलक दाखवली आहे!! हा भाग खरच असामान्य वकुबाचा आहे. रचनेत, निषाद स्वरावर केलेली "आंदोलीत" कामगत तर थक्क करणारी आहे. अर्थात, इथे परत मध्यम स्वरातून, गंधार स्वराचा आधार घेऊन, निषाद स्वरावरील ठेहराव जो, मिंडेद्वारे घेतला आहे, ते देखील खास अनुभवण्यासारखे आहे.
आशा भोसल्यांनी हिंदीत गायलेल्या अजरामर गाण्यांच्यात या गाण्याचा समावेश नक्की करता येईल. "बेकसी हद पे" हेच ते अप्रतिम गाणे. आवाजाचा विस्तृत पल्ला, तारता मर्यादा सहज,वेगाने आणि अगदी गीताच्या प्रारंभी देखील घेणे, यात कुणाही गायिकेला बरोबरी करणे अशक्य!! या गाण्यात देखील याच विशेषाचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. अर्थात, केवळ स्वरांच्या फेकीचा पल्ला, हेच भूषण नसून, प्रसंगी वाद्यांचा स्वनगुण तंतोतंतपणे गळ्यातून काढून, चकित करण्याचे अलौकिक सामर्थ्य या गळ्यात आहे.
या गाण्याच्या दुसऱ्या ओळीत, ज्या प्रकाराने लय आणि स्वरांची उंची, आशाबाईंनी गाठली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. देस रागाचे ओळख म्हणून हे गाणे घेता येईल पण तरीही, गाण्यात अनेक ठिकाणी, इतर रागांचे स्वर देखील आढळतात!! खरतर, सुगम संगीतात ज्या सर्जनशीलतेच्या शक्यता असतात, त्या सगळ्या शक्यता, आशा भोसल्यांच्या गळ्यातून शक्य होतात.आवाजावरील नियंत्रण आणि ध्वनीवैशिष्ट्ये याचा अचूक वापर,यामुळे ऐकणाऱ्याला एक समृद्ध गायन ऐकल्याचा आनंद मिळतो.या आवाजाचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठ्संगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, सांगीत शक्यतांची नवी परिमाणे सादर केली. जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या, गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला आहे.
वसंत देसाई, हे बहुदा एकमेव संगीतकार असावेत, ज्यांनी हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमी इथे लीलया वावर केला आणि तसे करताना, त्या ठिकाणी, स्वत:ची स्वतंत्र मुद्रा उमटवली. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास, चाल निर्माण करताना त्यात पुरेशी लवचिकता ठेवणे, जेणेकरून गाताना विस्तारशक्यता सहज निर्माण करता येणे शक्य. गायकी ढंगाच्या चाली करण्यात वाकबगार परंतु त्याचबरोबर, आपण कुठल्या माध्यमासाठी संगीत रचना करीत आहोत, याचे नेमके भान राखून, चाली निर्माण करण्याचा असामान्य ताकदीचा वकूब. मराठी रंगभूमीवर, संगीतकार म्हणून त्यांचा वावर प्रामुख्याने "ललित कलादर्श" या संस्थेपुरता अधिक करून होता. वसंतरावांनी तयार केलेली अशीच एक मनोरम रचना इथे ऐकुया. "देह देवाचे मंदिर" ही, उदयराज गोडबोले यांनी गायलेली रचना, देस रागाशी नाते सांगणारी आहे.
उदयराज गोडबोले यांचा थोडा "खडा" आवाज म्हणजे तार सप्तकात अधिक रमणारा आणि हे ध्यानात ठेऊन, वसंतरावांनी या गाण्याचे "तर्ज" बांधली आहे. "प्रीतीसंगम" नाटकातील हे गाणे, देस रागाची ओळख करून देते. पहिल्या सुरांपासून तार स्वरांत गाणे सुरु होते. गाण्याची चाल मात्र, ज्याला "उडती छक्कड" म्हणता येईल अशा धर्तीची आहे आणि त्याला ढोलकीची साथ देखील अतिशय सुरेख आहे. अर्थात, पारंपारिक नाट्यगीताचा बाज नसून, थोडा भावगीताचा बाज वापरलेला आहे.
आता आपण, सरदारी बेगम चित्रपटातील ठुमरी सदृश, चित्रपट गीत ऐकुया. "सांवरिया देख जरा इस ओर" हेच ते गाणे आहे. आरती अंकलीकर आणि शुभा जोशी यांनी एकत्रितपणे ही रचना गायलेली आहे. देस रागाशी या रचनेचे खूप जवळचे नाते सांगता येते. वनराज भाटीया, या संगीतकाराने ही रचना बांधली आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा संगीतकार परंतु व्यावसायिकदृष्ट्या काहीसा मागे पडलेला.
वास्तविक या दोघी शास्त्रीय संगीतातील गायिका पण तरीही ठुमरीसदृश रचना असूनही सादरीकरण अतिशय सुंदर झाले आहे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून देस रागाची आठवण येते. एखाद्या उपशास्त्रीय रचनेचे, चित्रपट गीतात रुपांतर करताना, बरेचवेळा अनावश्यक काटछाट केली जाते आणि मूळ सौंदर्याला बाधा आणली जाते. तासाला कुठलाच प्रकार इथे नाही. अत्यंत सुंदर लयीत गाणे पुढे सरकत जाते आणि गाताना, हरकती, अर्धताना वगैरे अलंकार सहज येतात. यात, सहज येतात, हे फार महत्वाचे!!
आता आपण अशीच काही गाणी बघू, ज्यायोगे देस राग आपल्या आठवणीत कायमचा राहील.
गोरी तोरे नैन कजर बिना कारे
आपको प्यार छुपाने की बुरी आदत है