Friday, 18 August 2023
कलाकारांचे अध:पतन
इथे "कलाकार" म्हणजे केवळ कलाक्षेत्रातील कलावंत, इतकाच मर्यादित अर्थ नसून त्यात खेळ देखील अंतर्भूत केलेला आहे. कुठलाही लोकप्रिय कलावंत मुलत: सर्जनशील असतो. त्याशिवाय सशक्त निर्मिती होणे अशक्य. परंतु सर्जनशीलता ही काही कायम टिकणारी अवस्था नसते. तिचाही बहराचा आणि नंतर पतझडीचा काळ आलटूनपालटून येताच असतो. जेंचा बहराचा काळ असतो तेंव्हा अप्रतिम निर्मितीने तो रसिकांना आपल्या प्रतिभेचे आविष्कार सादर करून, आपल्या क्षमतेची प्रचिती तसेच रसिकांना भारावून टाकण्याची शक्ती दाखवत असतो. परिणामी कलेच्या अस्तित्वात असलेल्या परिघाची व्याप्ती अधिक रुंद करीत असतो. कलेची प्रगती ही अशीच होत असते. हा बहराचा काळ मात्र असतो अद्भुत आणि दिपवून टाकणारा. अर्थात यातून मिळणारी लोकप्रियता आणि तद्नुषंगाने मिळणारे आर्थिक फायदे, कलावंतांच्या अभ्युदयासाठी उपयोगी पडतात, आयुष्याची मार्गक्रमण सुखनैव होऊ शकते. कुणी कितीही नावे ठेवली तरी "सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते" या उक्तीतच बरेच काही सामावलेले आहे. अर्थात याचा अतिरेक झाला की पतझड सुरु होते.
कलावंत होणे ही काही सहज जमण्यासारखी प्रक्रिया नसते. शारीरिक तसेच बौद्धिक परिश्रमाची अथक मागणी सातत्याने होत असते. परंतु एकदा का तुमची कलावंत म्हणून प्रतिष्ठापना झाली की केलेल्या त्यागाचे साफल्य मिळायला लागते. हीच वेळ असते, कलावंताने "विवेकबुद्धी" आचरणात आणायची. मिळणाऱ्या लोकप्रियतेत स्वतःला झोकून दिले जाणे, सहज होते. त्यासाठी वेगळ्या परिश्रमाची आवश्यकता नसते.
आपण काही लोकप्रिय उदाहरणे बघूया आणि वरील मुद्दे अधिक स्पष्ट करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडील गायक/गायिका नेहमीच प्रकाशाच्या झोतात असतात. त्या झोताने, रसिक देखील भारावल्या अवस्थेत असतात. परिणामी सादर होणारी कलाकृती काय दर्जाची आहे? असले फडतूस प्रश्न अजिबात पडत नाही. कलावंताने काहीही गायले तरी त्याला "वाहवा" देणारा फार मोठा गट समाजात असतो आणि तो अशा अशक्त निर्मितीलाही भरभरून दाद देतो परिणामी कलेत भोंगळपणा शिरतो आणि अध:पतन सुरु होते. बरेचवेळा तर आपण नि:सत्व कडबा रसिकांसमोर सादर करीत आहोत, याचे भान देखील नसते. वास्तविक किशोरी आमोणकर हे नाव अतिशय तालेवार नाव आणि त्याला साजेशी अशीच त्यांची गायकी. मी स्वतः याचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे, पार्ल्याला पहाटेची मैफिल होती, पहाटे ६ वाजता सुरु होणार होती. मी देखील गिरगावातून त्या मैफिलीला जायचे म्हणून ५ वाजताच पहाटेचे प्रातर्विधी आटोपून पार्ल्याला अक्षरश: धावत पळत पोहोचलो. मित्राने माझे तिकीट आधीच आरक्षित केले असल्याने, कुठे बसायचे,हा प्रश्नच नव्हता, गाणे सुरु होण्याआधी, मित्राला बोललो, "बाईंचे गाणे म्हणजे डर्बीचा घोडा आहे, जिंकला तर लाखो रुपये मिळतील पाण्यात पैसे पाण्यात"! मित्र हसला. त्यादिवशी असेच झाले, बाईंचे गाणे अजिबात रंगले नाही. बाई काहीशा चिडचिड्या देखील झाल्या. मध्यंतराला काहीसा निराश होऊन, चहा पिट असताना, मी थोडे टीकात्मक बोललो तर एक रसिक तावातावाने, "अरे आणि, बाई आता ८० पार झाल्यात, हे समजून घे"! हे ऐकल्यावर मी अवाक. जर का बाईंचे वय ८० पार आहे, तर वेळीच चंबूगबाळे आवरण्यात अधिक शान आहे. आज जसे बाई गायल्या, त्याने पूर्वीच्या असामान्य क्षणांवर काळिमा पसरणार. दुसरे असे, इथे रसिकांच्या मर्जीचा प्रश्नच उद्भवत नाही. मैफिलीच्या उत्तररंगात खुद्द बाईच बोलल्या, "असे गाणे तुम्हाला कोण ऐकवून दाखवेल!" ही म्हणजे अहंकाराची हद्द झाली. आपण रसिकांकडे पुरेपूर माप टाकले नाही तरी देखील आपल्या सादरीकरणाची मर्दुमकी गायची!! कलावंताचे अध:पतन हे असे स्पष्ट होते.
काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. एके ठिकाणी कुमार गंधर्वांचे गायन ठरले होते. त्यादिवशी मुंबईत जोरदार पाऊस असल्याने, कार्यक्रमस्थळी फारसे कुणी रसिकजन जमले नव्हते. परिणामी संयोजक काहीसे अवाक झाले होते. इतक्या जगन्मान्य कलाकाराच्या कार्यक्रमाला तुरळक गर्दी!! त्यांनी कुमार गंधर्वांना विचारले, "कुमारजी, कार्यक्रमाला कुणी आले नाही, तर कार्यक्रम पुढे ढकलूया का?" वास्तविक सुज्ञ प्रश्न होता पण कुमार गंधर्व उत्तरले, "अरे मी रसिकांसाठी थोडाच गातो, मी तर माझ्या समाधानासाठी गातो!" मग प्रश्न असा उद्भवतो, जर स्वतःच्या समाधानासाठी गायचे असते, तर मग जाहीर कार्यक्रम कशासाठी करायचे? देवासच्या घरात बसून, हवे तितके समाधान मिळवा. अर्थात या उत्तराला देखील रसिकांनी प्रचंड दाद दिली. आता हा प्रचंड अहंकार नव्हता का? आपणच आपली पूजा आरंभ करण्यासारखा हा प्रकार होता.
हाच प्रकार पंडित जसराज यांच्या बाबतीत मी अनुभवला होता, वास्तविक हा गायक माझ्या खूप आवडीचा आणि यांच्या कितीतरी संस्मरणीय मैफिलींना हजार राहण्याचे भाग्य मला मिळाले होते परंतु वयाच्या ७५ नंतर निसर्गक्रमाने शरीर थकत चालले असताना, अत्यंत बेगुमानपणे गायला बसायचे . बरेचवेळा तर त्यांच्या शिष्यगण त्यांच्या सोबत असायचा आणि तेच गायला सुरवात करायचे आणि अधूनमधून पंडितजी सूर लावायचे!! मी पंडितजींचे गाणे ऐकायला आलो असताना, हे असले सरधोपट गाणे ऐकायला मिळाले. वास्तविक पंडितजींना कल्पना आली होती, आपला आता आवाज लागत नाही पण लोकप्रियता ही चीज अशी आहे, भल्याभल्या कलावंतांना भ्रांतचित्त करते. लोकं अजूनही आपल्याला नावावर, आपल्या मैफिलीला येतात, हा विचारच, त्यांना निवृत्त होण्यापासून परावृत्त करतो आणि ढासळलेल्या गळ्याकडे दुर्लक्ष करायला लावतो. ही खरे तर रसिकांची निव्वळ फसवणूक असते पण आपल्याकडील तथाकथित रसिक देखील, असल्या भोंगळ सादरीकरणाला दाद देतात, परिणामी कलाकार आणखी वाहवत जातो.
अर्थात केवळ शास्त्रीय संगीतात(च) असे घडते असे नाही. सुगम संगीतात फार वेगळे घडत नसते. लता मंगेशकर ही नाव जगभर पसरलेले आणि भारतात तर पूजनीय ठरलेले. परंतु चित्रपट "वीर झारा" मधील गाण्यांतून बाईंचा खालावलेला आवाज स्पष्ट ऐकायला मिळतो. त्यावेळी बाईंवर टीका झाली. "बाईंच्या आवाजात १९७५ सालची गायकी दिसते नाही" असे बोलले गेले. बाईंनी तात्काळ उत्तर दिले, "Is it not absurd to compare my present voice with 1975 songs?" परंतु वेगळ्या शब्दात, बाईंना आपल्या खराब आवाजाची कल्पना आली होती तरीही गाणी गाण्याचा मोह आवरला नाही. वस्तुस्थिती अशी होती, १९७५ साली देखील, बाईंच्या आवाजातील कोवळीक, ताजगी लोप पावली होती आणि तरीही बाईंनीं पुढे ३० वर्षे आपली गायकी रसिकांच्या समोर रेटली!! यात आपण रसिकांना आपल्या दावणीला बांधून फरफटवत आहोत, याचा सुतराम विचार आढळत नाही. आणि रसिक देखील त्या आवाजावर आत्यंतिक आंधळे प्रेम करण्यात धन्यता मानतात.
हाच प्रकार मोहमद रफींच्या बाबतीत घडलेला आहे.वास्तविक इथे मी लताबाई आणि रफी, ही २च नावे प्रातिनिधिक म्हणून घेणार आहे. एकतर या दोघांनी भारतीय मनावर कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. रफींचा मर्दानगी आवाज, ही त्यांची खासियत आणि पहिल्यापासून त्यांनी आपल्या या वैशिष्ट्याची जपणूक केलेली आहे. यातून त्यांच्या "अष्टपैलू" गायकीची प्रतिष्ठापना केली आणि रसिकांना भारावून टाकले. परंतु याच गायकीने त्यांच्या "नाट्यात्म" गायकीचा पाया घातला, हे कसे विसरता येईल. १९६० च्या सुमारास गाण्यांच्या स्वररचनेचा ढाचा बदलायला लागला आणि कदाचित स्पर्धेत टिकण्यासाठी असेल पण रफींनी आपल्या गायकीत "नाट्यात्म" शैली आणली. परिणामी गायकी अत्यंत "ढोबळ" झाली. परंतु या वस्तुस्थितीकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. "बाबूल की दुआयें लेती जा" सारखे अत्यंत ओबडधोबड गाणे रसिकांच्या माथी मारले आणि रसिकांनी त्याचे कमालीचे कौतुक केले. तसाच प्रकार, रफींनी गायलेल्या मराठी गाण्यांबाबत म्हणता येईल. मराठी भाषेचा लहेजा तसेच आशय लक्षात न घेता गाणी रसिकांच्या डोक्यावर आपटली. आजही या मराठी गाण्याचे वारेमाप कौतुक होते आणि त्यामागे निव्वळ रफी या नावाची पूजा, इतकाच अर्थ निघतो.
इतकावेळ आपण संगीत कलेबद्दल लिहिले पण भारतात अमाप लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट खेळात देखील असाच प्रकार आढळतो. १९६०/७० हे दशक भारतीय स्पिनर्स लोकांचे दशक म्हणून ओळखले जाते. ज्यांना "दरारा"म्हणावा, असे बेदी, चंद्रशेखर, प्रसन्न आणि वेंकट अशी चौकडी होती आणि एकहाती सामना जिंकवून देण्याची ताकद होती. पुढे ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज संघांची "वेगवान चौकडी" जशी प्रतिस्पर्धी संघावर दहशत ठेऊन असायची तसाच या चौकडीचा वावर होता. अगदी व्हिव रिचर्ड्स सारखा असामान्य फलंदाज शेवटपर्यत चंद्रशेखरच्या गोलंदाजी बद्दल अनभिज्ञ होता आणि त्याने ते प्रांजळपणे मान्य केले आहे. परंतु निसर्गक्रम कुणालाही चुकत नाही आणि हळूहळू वाढते वय, त्यांच्या जादूवर परिणाम करायला लागले होते. तरीही त्यांनी रेटून आपली गोलंदाजी सुरु ठेवली होती. अखेरीस १९७७ साली झालेल्या भारत/पाकिस्तान मालिकेत, त्यांच्या गोलंदाजीची पिसे निघाली आणि अत्यंत मानहानीकारक अवस्थेत त्यांनी खेळाचा निरोप घ्यावा लागला.
असाच प्रकार अनेक फलंदाजांच्या बाबतीत घडलेला आहे. आपल्या शारीरिक हालचाली पूर्वीसारख्या होत नाहीत, ही जाणीव जर का त्या फलंदाजालाच होत नसेल तर आणखील कुणाला होणार? आपल्यासारखे बाहेरून बघणारे देखील म्हणतात, आता हा फलंदाज थकला आहे. असे असून देखील निवृत्ती लांबणीवर टाकतात, त्यामागे प्रचंड आर्थिक फायदा आणि लोकप्रियता न सोडण्याचा हव्यास, इतकेच कारण संभवते. अगदी सचिन पासून असंख्य खेळाडू या सापळ्यात अडकले आहेत. परिणामी निर्माण झालेली प्रतिमा भंग पावणे, हेच त्यांच्या नशिबात उरलेले असते.
आता प्रश्न इतकाच उरतो, आपण लोकप्रियतेच्या आहारी न जात तटस्थपणे लोकप्रियता स्वीकारावी, हे अशक्य आहे का? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत आणि मुख्य म्हणून नेमके कधी थांबायचे, याचे अचूक भान हवे. सुनील गावस्करसारखा एखादाच कलाकार असतो, त्याला याचे नेमके भान होते आणि म्हणून आजही त्याची निवृत्ती चटका लावते.
Sunday, 13 August 2023
नॅशनल क्रुगर पार्क - भाग २
खरंतर संपूर्ण क्रुगर पार्क बघायचे असेल तर हाताशी निवांतपणा मनाचा निग्रह असणे जरुरीचे आहे. आम्ही सगळे नोकरी करणारे मित्र, तेंव्हा वार्षिक सुटीच्या हिशेबात आनंद घेणार. पहिल्या रात्री सुदैवाने आम्हाला लांबून का होईना "हिप्पो" सारखे अजस्त्र जनावर बघायला मिळाले. अर्थात जवळ कोण जाणार म्हणा? रात्री उशिराने हॉटेलमध्ये परतल्याने, सकाळी लवकर उठायचा प्रश्नच नव्हता. उठल्यानंतर ब्रेकफास्ट म्हणून टिपिकल पाश्चात्य डिशेस मिळाल्या. अर्थात एव्हाना अशा पदार्थांची सवय झाली होती तरी "कोल्ड मीट" खाण्याचे धाडस शेवटपर्यंत झाले नाही!! इथले लोकं अत्यंत आनंदाने आणि चवीने खातात. वास्तविक त्याला चव अशी फारशी नसते. मी १,२ वेळा खाण्याचा प्रयत्न केला होता पण घशाखाली अक्षरश: घास ढकलावा लागला! त्यामुळे आम्लेट पाव तसेच वेगवेगळी सॅलड्स, हाच आमच्यासारख्यांचा नाश्ता असायचा. हॉटेल पारंपरिक गोऱ्या लोकांसाठीचे (एकेकाळी तसेच होते) असल्याने आणि आजही तिथल्या मेन्यूत फारसा बदल नसल्याने, निवडीला फारसा वाव नव्हता.
क्रुगर पार्कमध्ये जनावरांचे अरण्य वगळता, फारसे काही बघण्यासारखे नाही आणि दिवसाउजेडी जनावरे देखील आपल्या घरात विश्रांती घेत असतात. त्यामुळे आता अंगावर आलेल्या दिवसाचे काय करायचे? हा प्रश्नच पडला होता परंतु तिथल्या एका वेटरने, तिथे जनावरांच्या छायाचित्रांचे म्युझियम असल्याचे सांगतले अनिअमचा मोर्चा तिकडे वळवला. बऱ्याच व्हिजिटर्सनी, त्यांनी बघितलेल्या जनावरांचे नैसर्गिक अवस्थेतले फोटो ठेवले होते. अर्थात जनावरांचा देखणा जिवंतपणा फोटोमध्ये पकडणे तसे अवघडच असते म्हणा. सर्पांचे फोटो मात्र दिसले नाहीत. परंतु सिंह, वाघ,चित्ते, बिबळे यांचे फोटो बघायला मिळाले. अर्थात म्युझियम झाले तरी किती वेळ घालवणार!!
शेवटी पुन्हा जनावरांच्या राज्यात हिंडायचे ठरवले आणि गाडी तिकडे वळवली. फार अपेक्षा नव्हती, त्यामुळे आरामात गाडी चालवत असताना, एकेठिकाणी माणसांचे घोळका दिसला. कसली गर्दी म्हणून गाडी जवळ नेली तर तिथे अवाढव्य आकाराचे सिंह विश्रांती घेत जमिनीवर पहुडला होता. त्याचे आकारमान स्पष्ट दिसत होते तसेच त्याची नजर देखील बघता येत होती. इतका राजस आणि राजबिंडा दिसत होता की डोळ्यांना भुरळ पडली. आमच्यापासून जवळपास ३०० ते ४०० मीटर्सवर तरी नक्कीच होता. आम्ही तर सोडाच तिथल्या तथाकथित धैर्यवान गोऱ्या लोकांचे देखील, सिंहाच्या जवळ जाऊन, बघण्याचे धैर्य झाले नव्हते. एक इच्छा अपुरी राहिली, सिंहाची गगनभेदी डरकाळी ऐकायला मिळाली नाही. असो, दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवता आली. त्याची विख्यात आयाळ, पंजा आणि समजा तोंडात भक्ष पकडले तर सुटका होण्याची शक्यता निव्वळ अशक्य, हेच समजून घेतले. जवळपास अर्धा तास तरी त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघून घेतले. इथे प्रथमच एक सूचना स्पष्टपणे लिहिलेली असते, जनावरांना खायला काहीही देऊ नये आणि जर का दिलेत आणि अनावस्था प्रसंग ओढवला तर क्रुगर पार्क अजिबात जबाबदार नाही. आता इतके स्पष्ट लिहिल्यावर कुणीही काहीही खायला देण्याच्या फंदात पडत नव्हते.
जरा वेळाने गाडी घोळक्यातून बाहेर काढली आणि इतरत्र फिरायला सुरवात केली. अर्थात इथे झेब्रे, हरणे प्रचंड प्रमाणात आढळतात आणि सगळे घोळक्याने एकत्र राहतात. कालच मन:पूत ही जनावरे बघितल्याने, आज परत तिचे जनावरे बघण्यात फारसा रस नव्हता. अर्थात धावणारे हरीण बघायला मात्र अतिशय देखणे असते. पुढे अशीच गाडी दामटत असताना, कालच्या हिशेबात आज, अचानक जरा जवळून धिप्पाड हत्तीचा कळप, आपल्या मस्तीत डौलदार चालीत हिंडताना बघायला मिळाला. या जनावराबाबत आम्हाला हॉटेलमध्येच सूचना मिळाली होती, त्यांना डिवचू किंवा चुचकारु नका, जर का हत्ती डिवचला गेला तर मात्र धडगत नसते. अर्थात इतके धिप्पाड जनावर, बघता क्षणीच छातीत धडकी भरते. एक वैशिष्ट्य मात्र बघता आले. कळपातील छोटे हत्ती हे नेहमी कळपाच्या आत असतात आणि त्यांना कळपातील मोठे हत्ती संरक्षण देत असतात. खरतर हरणे देखील वेगवेगळ्या रंगाची होती आणि आमचे तथाकथित ज्ञान इतकेच सीमित होते!!
एव्हाना उन्हाची तलखी भाजायला लागली असल्याने, हॉटेलमधील गारवा अधिक सुखाचा, असे मानून हॉटेलमध्ये परतलो. अर्थात अशा उकाड्यात अति थंड बियर हा उतारा भलताच सुखाचा वाटला.
संध्याकाळपर्यंत हॉटेलच्या पोर्चमध्ये बसून आत येणारे देखणे सौंदर्य न्याहाळणे, हाच उद्योग उरला होता. त्या रात्री २५ डिसेम्बरची पार्टी होती, आम्हाला जरा उशिरानेच समजले. अर्थात पार्टीचे देय होते. ते देणे चुकवले आणि रात्रीची वाट बघायला लागलो. गोऱ्या मुली वागायला सढळ असल्या तरी अंतर राखून वागत असतात. परिणामी त्यांच्या जवळ फारसे जाता येत नाही. अर्थात ओळख झाल्यावर प्रश्नच उद्भवत नाही. इथे तर सगळेच नवीन, म्हणजे कुणाची ओळख निघणे दुरापास्त. असे असले तरी आम्ही पार्टी एन्जॉय केली, कारण तिथे असलेला अवाढव्य केक आणि कॉकटेल्स!! शेवटी ११च्या सुमारास, बरेचजण पुन्हा अरण्यात जायला निघाले तशी आम्ही मित्रांनी पाय काढता घेतला. जनावरांच्या राज्यात जमेल तितके वावरायचे, हेच ध्येय ठेऊन, आम्ही इथे आलो होतो आणि तिसरी रात्र उंडारायला बाहेर पडलो.
यावेळेस जरा वेगळा रस्ता पकडला आणि वातावरणातील बदल किंचित जाणवला,निदान आम्हा सगळ्यांना तरी त्यावेळी तसे भासले. कारण यावेळेस अनेक जिराफांच्या टोळ्या हिंडताना दिसल्या. जिराफ आम्ही कधीही जवळून बघितला नव्हता आणि त्यांच्या उंचीने आम्हा सगळयांची नजर दिपून गेली. वास्तविक जिराफ प्राणी शाकाहारी - शक्यतो झाडांची पाने, गवत इत्यादी त्यांचे अन्नतरी एकूणच अचाट उंची उगीचच माणसाला त्यांच्यापासून दूर ठेवते. एक बाब लक्षात आली, हे सगळे प्राणी सतत कळपात राहतात, संरक्षणाची सिद्धता म्हणून असेल. तसेच रात्रीच्या वेळी त्यांचे डोळे फारच चमकदार दिसतात. पार्कमध्ये जागोजागी तलाव तसेच पाणथळे बांधलेली आहेत जेणेकरून, विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरांना तहाण भागवणे सहजप्राप्य होईल. अशाच एका तलावात, त्या रात्री अवाढव्य मगर बघितली. पाण्यामधील तिचे साम्राज्य कधीही उध्वस्त न होणारे परंतु पाण्याबाहेर मात्र मगर बरीचशी असहाय होते. जवळपास ४,५ फुटी लांब होती. काळीकभीन्न मगर पाण्यात असताना, अति हिंस्र असते. आमचे एक दुर्दैव, शिकार करतानाचे जनावर बघायला मिळाले नाही तसेच केलेल्या शिकारीचा फडशा पाडणारे जनावर बघायला मिळाले नाही. काही जणांना मिळाले असेलही पण त्यासाठी मोठा मुक्काम करणे गरजेचे असावे.
दुसऱ्या दिवशी परतायचे असल्याने, झाले त्या दर्शनावर समाधान मानून हॉटेलचा रस्ता पकडला आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करून घराच्या वाटेवर निघालो.
Friday, 21 July 2023
मिडोज हाऊस
वास्तविक आता त्या इमारतीचे नाव "गणेश स्मृती" आहे परंतु मी जन्माला आलो, तेंव्हा त्याचे नाव मिडोज हाऊस असे होते. इथे जवळपास सलग १० वर्षे तरी नक्कीच काढली. माझ्या आई वडिलांनी अर्थात त्यापेक्षा अधिक काळ व्यतीत केला. खरतर, अचानक हा विषय डोक्यात आला आणि बऱ्याच आठवणी डोक्यात घुसळायला लागल्या. अर्थात जन्माला आल्यापासूनची पहिला ३,४ वर्षे तरी काहीच लक्षात रहात नाही म्हणा. परंतु मी जसा चिकित्सक शाळेत - त्यावेळी मॉंटेसरी होती, जायला लागलो आणि बाहेरचे जाग आणि हे घरातले जग, अशा स्वतंत्र आठवणी मनात राहिल्या, हे नक्की.
आता आठवते, माझ्या आजूबाजूला तेंव्हा इतर जी कुटुंबे होती, ती जवळपास सगळी पारशी होती आणि सुरवातीला तरी माझे मित्र पारशी होते. अर्थात बाजूच्या हेमराजवाडीतील मराठी मित्र त्यावेळी होतेच. अजूनही ही पारशी कुटुंबे आठवणीत राहिली आहेत. आमच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर माझ्याच वयाचा असावा पण गोरागोमटा "बर्जेस"' नावाचा मुलगा राहात असे. तसे बव्हंशी पारशी लोकं गोऱ्या वर्णाचे. या बर्जेसला एक धाकटा भाऊ असल्याचे अंधुकसे स्मरणात आहे. वास्तविक आता वाडीत औषधाला देखील पारशी राहात नाहीत पण तेंव्हा आमच्या करेलवाडीत ५०% पारशी तर ५०% महाराष्ट्रीयन राहात होते. मी वर म्हटल्याप्रमाणे, माझ्या आजूबाजूला तर सगळी पारशी कुटुंबे होती. आमच्या वाडीच्या टोकाला ४ मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील "'यझदी"' नावाचा माझ्याच वयाचा मुलगा रहात होता. बरेच वर्षे तो आणी मी मित्र म्हणून एकत्र भेटत होतो आणि माझ्या त्याच्याशी गप्पा व्हायच्या. त्याच्याकडून पारशी समाजाशी माझी जवळीक झाली.
आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्या इमारतीत २ऱ्या मजल्यावर "जेम्स आणि त्याची बायको ''केटी" आपल्या मुलाबाळांसह रहायचे. ही केटी दिसायला भलतीच देखणी आणि आमच्या मित्रांची "'क्रश"' होती.आम्ही सगळे मराठी मित्र जवळपास एकाच वयाचे, फारतर १,२ वर्षांचा फरक. आम्ही सगळे वागायला ""टगे"' असेच होतो. महा व्रात्य, जरा म्हणून स्वस्थ बसणे स्वभावातच नव्हते. त्यातून ही केटी म्हणजे आमच्या वाडीचे सौंदर्य स्थान!! केसांचा डौलदार बॉब केलेला (माझ्या लहानपणी बाईने केसांचा "बॉब" करणे म्हणजे फॅशनची परमावधी!) गोरापान वर्ण, ओठांवर बहुतेकवेळा लालचुटुक लिपस्टिक लावलेली, अंगात बऱ्याचवेळा मिडी अथवा मॅक्सि घातलेली, बाहेर पडताना, अंगावर सुगंधी स्प्रे मारलेला(त्याकाळी स्प्रे वगैरे चैनीच्या गोष्टी आम्हा मित्रांच्या खिजगणतीत देखील नव्हत्या) आणि ती ठुमकतच वाडीतून बाहेर पडायची. ती घरातून बाहेर पडल्याचे, मला आणि माझ्या मित्रांना (त्यावेळी माझे मित्र आमच्याच घरी बरेचवेळा असायचे कारण तळमजल्यावरील घर) दिसली की आमची ""गॅंग"" जरा अंतर राखून तिचा पाठलाग (तिला कसे कळणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन) करत असू. तिच्या आरस्पानी सौंदर्याचा,आमच्या डोळ्यांनी "'आस्वाद" घेत असू. अतिशय प्रमाणबद्ध बांधा,किंचित निळसर डोळे आणि एकूणच चालीतून ओसंडून जाणारा आत्मविश्वास, या सगळ्याचे आम्हा शाळकरी मुलांना कमालीचे आकर्षण होते. आता ती आमची वाडी सोडूनच जवळपास ४० वर्षे झाली आणि आता समोर आली तर ओळख पटेल का? कारण आता आम्ही सगळेच साठी पार म्हणजे केटी कमीतकमी सत्तरीपार असणारच. आता तिचे देखणेपण लयाला नक्कीच गेले असणार. तेंव्हा जरी ओळख झाली/पातळी तरी ते आकर्षण नक्कीच नसणार. ती तेंव्हा "विप्रो" कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टरची सेक्रेटरी म्हणून नोकरीला होती.
त्याकाळी काय किंवा आजही, घरातले पाणी भरायला मिळण्याची वेळ म्हणजे पहाटे ५ वाजता नळाला पाणी येणार आणि फक्त ६ ते फारतर ६.१५ पर्यंत पाणी भरायला मिळणार. आजही यात काही फरक नाही. आम्ही तळमजल्याला रहात असल्याने पहिल्यांदा आम्हाला पाणी मिळायचे. तेंव्हा घरात त्याकाळच्या तथाकथित बाथरूम - मोरीच्या बाजूला माझ्या वडिलांनी मोठे पिंप ठेवले होते, पिंपात पाण्याचा पाईप सोडून पिंप भरायचे, नंतर घरासाठी पिण्याचे पाणी भरायचे. हा पहाटेचा कार्यक्रम कितीतरी वर्षे नाना एकट्याने करत होते. जिथे माझेच वय ५,६ इतपतच तेंव्हा मी कसली बोडक्याची मदत करणार! मी पुढे होऊन मदत करावी,असे कधी सुचल्याचे देखील आठवत नाही. मोरीच्या बाजूच्या आमचे छोटेसे स्वयंपाकघर आणि तिथे पहाटेपासून आईची वर्दळ सुरु असायची कारण, स्वयंपाक करून तिला नोकरीची वेळ गाठायची निकड होती. आई १९७४ पर्यंत, क्रॉफर्ड मार्केट जवळील पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये नोकरी करीत होती.
कधीकधी, आमच्याकडे काका, मावशी, मामा आणि त्यांची मुले रहायला यायची. ती आली म्हणजे मग घरात जास्तीचे पाणी भरून ठेवायला लागायचे. परिणामी आम्हाला पाणी भरायला वेळ लागायचा. जरा जास्तीचा वेळ लागला कि वरच्या मजल्यांवरून पारशांचा आवाज यायचा - ए तल माला, नल बंद करो!!. पहाटे पहाटे थोडा वेळ तरी नक्कीच ही आरडाओरड चालायची. आता समजते, त्यांची तरी काय चूक म्हणा, पाणी फक्त १. ३० तास मिळणार आणि आमचे झाल्यावर मग पहिला, नंतर दुसरा, नंतर तिसरा आणि मग शेवटी चौथा मजला यांना पाणी भरायची संधी मिळणार. यावरून अधूनमधून आमच्याशी भांडणे व्हायची. अगदी बर्जेसचे आई/वडील आमच्या दाराशी भांडायला यायचे.मग नाना आणि आई विरुद्ध ते दोघे, अशी शाब्दिक चकमक व्हायची. पारशी "गरम" होताना,असे दुर्मिळ दर्शन व्हायचे. अन्यथा पारशी जमात अतिशय थंड डोक्याची आणि कधीही कुणाच्या आयुष्यात डोकावून बघणार नाही. आपण बरे आणि आपले आयुष्य बरे, असाच एकूण खाक्या.
दुसरी भांडणाची वेळ म्हणजे, बरेचवेळा वरील मजल्यावरील पारशी, माशांचे धुतलेले पाणी, खालच्या गटारात टाकायचे. इमारतीचे गटार इमारतीला लगटूनच आहे. त्यामुळे मग त्या पाण्याचे काही थेंब आमच्या स्वयंपाकघरात पडायचे. मग आई खवळायची आणि मग पुन्हा शाब्दिक चकमक जुंपायची. असे असले तरी कुणाच्याही सणासुदीला खास डिशेस घरी केल्या असल्या की मोकळ्या मनाने आदानप्रदान व्हायचे. आजही पारशांचा शेवयांचा गोड शिरा, अगदी चारोळी तसेच काजू वगैरेची पखरण केलेला शिरा घरात आला म्हणजे आम्हा भावांचा गोविंदा!! त्याकाळी पदार्थात, "ड्रायफ्रूट्स" टाकून तो पदार्थ अधिक स्वादिष्ट करायचा, ही चैनीची परमावधी असायची. माझी आई देखील दिवाळीचे घरगुती पदार्थ त्यांच्याकडे मी किंवा माझ्या भावांकरवी पाठवत असे. त्यानिमित्ताने केटीच्या घरी जायची संधी मिळायची!! का कुणास ठाऊक, मी तरी तिच्या घरी मोकळ्या मनाने गेलो नाही, सारखे छातीत धडधडायचे. केटी कशी बोलेल,कशी वागेल इत्यादींचा मनाशी खेळ चालायचा. प्रत्यक्षात काहीही कधी घडले नाही, माझ्याच मनाचा नाचरेपणा.
दुसरे निरीक्षण म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्येच नव्हे तर इतर बिल्डिंग मधील पारशी अत्यंत टिपटॉप रहात असत, कपडे कधीही गबाळे, विना इस्त्री केलेले अजिबात नसायचे. अगदी ४,५ वर्षाचा मुलगा असला तरी. ही पारशी जमात कधीही वाडीतल्या लोकांच्यात फारशी मिसळली नाही. सतत आपण निर्माण केलेल्या कोषात रहात असत. कधी रस्त्यात भेटले तरी जेव्हड्यास तेव्हडे बोलायचे, अर्थात काही काम असेल तर अन्यथा ओठावरील स्मित, त्यांना पुरेसे असायचे. दुसरे म्हणजे बहुतेक सगळे पारशी अतिशय मोठ्या म्हणजे "टाटा", "गोदरेज" "वाडिया'' असल्या फाउंटन भागातल्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी जात असत. पारशी म्युनिसिपालिटी किंवा सरकारी ऑफिसमध्ये काम करत असल्याचे दृश्य फारच दुर्मिळ असायचे. अगदी बँक म्हटली तरी परदेशी बँकेत नोकरी करायचे. परिणामी त्यांच्या वागण्या,बोलण्यात एक प्रकारचा "पॉलिशनेस"' असायचा. आम्हा मित्रांना त्याचे देखील नवल वाटायचे. त्याकाळी आम्हाला इस्त्रीचे कपडे घालायला मिळणे, ते बव्हंशी सणासुदीला किंवा कुणाकडे भेटायला जायचे असेल तरच मिळायचे.
बहुतेक पारशांकडे स्कुटर असायची गाड्यांचे दिवस फार उशिराने आले. पहाटे हवेत कितीही गारवा असला तरी, पारशी पाण्याची बालदी घेणार आणि आपली स्कुटर धुणार!! हा सोहळा जवळपास तासभर चालायचा. इतक्या निगुतीने स्कुटरची काळजी घेणारे नंतरही फारसे पाहण्यात आले नाही.
आमच्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीत,तळ मजल्यालाच एक म्हातारी पारशी एकटीच रहायची. नवरा बहुदा पूर्वीच निर्वतला असावा. तिच्या मुलीचे लग्न होऊन, ती सासरी गेलेली. त्यामुळे असेल पण तिचे आमच्या कुटुंबावर, विशेषतः आईवर फार प्रेम होते. तिच्या घराच्या बाजूला बुजलेली विहीर होती. बुजलेली कारण तिचे झाकण उघडल्याचे स्मरत नाही आणि पारशांच्या दृष्टीने विहीर म्हणजे त्यांचा देव. दर संध्याकाळी ही म्हातारी, विहिरीला चक्क आंघोळ घालायची, मग विहीर पुसायची. त्यानंतर रांगोळी (रांगोळीचे भोके असलेले भांडे असायचे, त्यातून छापा मारावा तशी रांगोळी तयार होत असे) रांगोळी काढून झाली कि मग त्याच्यावर फुलांची चादर चढवली जायची आणि शेवटी एका पाण्याच्या ग्लासमध्ये तरंगता दिव्याची ज्योत पेटवली जायची. हा पूजा सोहळा जवळपास तासभर चालायचा. तेंव्हा जरावेळाने आम्ही व्रात्यपणे ते दिवे फुंकर मारून विझवत तरी असू किंवा उडी मारून घरी जात असू कारण बाजूच्या हेमराज वाडीत जायचे म्हणजे एकतर बाजूच्या गटाराच्या भिंतीवर चढून जायचे किंवा या विहिरीवरून उडी मारून जायचे. त्यावेळी पायाने फुले कुस्करून जाण्यात एक विचीत्र आनंद मिळवत असू. कधीतरी मग त्या पारशी म्हातारीला आमचा खोडकरपणा कळायचा. मग तिचे वाक्ताडन सुरु व्हायचे. अर्थात तिच्या बोलण्याकडे कसे दुर्लक्ष करायचे, हे माहीत होते. इतके असूनही आम्हा भावांवर तिचे निरपेक्ष प्रेम होते. तिच्या घरात नेहमी २ कुत्रे असायचे त्यामुळे आम्ही तिच्या घरी फार वेळा गेल्याचे आठवत नाही.
असाच एक पारशी कायमचा स्मरणात राहिला. "मिनू" त्याचे नाव. ठाकूरद्वारच्या चौकात त्याचे "सनशाईन" नावाचे इराणी हॉटेल होते.(आता भूतकाळ वापरायला हवा कारण आता redevelopment मध्ये ती सगळी इमारत पडली) आणि हा त्याच्या गल्ल्यावर बसलेला असायचा. अवाढव्य दणकट शरीरयष्टी, अत्यंत भेदक निळे,घारे डोळे, बहुतेकवेळा हाफ शर्ट अंगात घातलेला. प्रथमक्षणी बघायला भीतीच वाटायची. पण मनाने अत्यंत मवाळ आणि मनमिळाऊ होता. मोडके तोकडे मराठी बोलत असे पण प्राय: पारशी (मिश्र गुजराती भाषा) बोलत असे. आता हॉटेलचा गल्ल्यावर बसायचा म्हटल्यावर तोंडाची टकळी सतत चालू असायची आणि अर्थात तोंडातून मंत्रपुष्पांजली प्रमाणे शिव्यांचा उच्चार व्हायचा. आजूबाजूला स्त्रिया आहेत, हे बघून देखील तोंड आवरून बोलायचे, हा संकेत यथेच्छ नाकारायचा. आता चौकात हॉटेल असल्याने, गर्दी कायमची. पूर्वी तिथे बियर बार नव्हता पण नंतर आला. आम्हा मित्रांचा तिथे तळ ठोकलेला असायचा आणि आमचा घरातला वावर वगळता, बहुशः इथेच भेटत असू. प्रत्येकवेळी चहा (तेंव्हा खिशाला इतकेच परवडायचे) घेतलाच पाहिजे असले फालतू बंधन नसायचे. हॉटेलमधून रस्त्यावरील देखणे सौंदर्य न्याहाळणे, प्रसंगी आकंठ रसपान करणे, आणि त्याचे अत्यंत चविष्ट शब्दात वर्णन करणे, हा तर आमचा नेहमीचा उद्योग असायचा. अर्थात तोंडात तेंव्हा सिगारेट कायम असायची. बाहेर रस्त्यावर सिगारेट ओढण्याची प्राज्ञा नसायची. त्यामुळे हॉटेल हे नेहमीच सुरक्षित!!
तसे आमचे घर ३ खोल्यांचे होते. त्यात आम्ही ३ भाऊ आणि आई,नाना राहात होतो. तेंव्हा आमच्या गरजा देखील मर्यादित होत्या. घरातच Toilet facility ही सुखाची परमावधी होती कारण आजूबाजूला चाळ संस्कृती आणि common toilet!! पुढे कधीतरी घरात डायनिंग टेबल आले तसेच मला वाटते, आजूबाजूचा परिसरात कुठेही नसलेला आणि आमच्या घरी असलेला असा फोन आला!! डायनिंग टेबल आणि खुर्च्या!! त्या खुर्च्यांवर बसून जेवण घ्यायचे, हा ऐषाराम होता तर घरात फोन येणे म्हणजे आपले समाजातील स्थान थोडे उंचावर गेल्याची भावना झाली होती. आज हे सगळे बालिश वाटते कारण आयुष्य प्रचंड प्रमाणात बदलले. मला आठवत आहे त्याप्रमाणे नानांनी नॅशनल कंपनीचा टेप रेकॉर्डर घरी, विकत आणला तेंव्हा सगळ्या नातेवाईकांत प्रचंड औत्सुक्य पसरले होते. यंत्रात कॅसेट टाकायची आणि रेकॉर्ड बटन दाबले की बोलणे रेकॉर्ड व्हायचे. पहिल्यांदा नातेवाईकांना याची कल्पना नसायची आणि त्यामुळे बरेचसे नातेवाईक, यंत्रातून आपलाच आवाज ऐकायला येत आहे, हे बघून आश्चर्यचकित व्हायचे. कुठलाही मानवी आवाज, कधीही, केंव्हाही ऐकायला मिळायचा. त्या टेप रेकॉर्डर सह एक इंग्रजी वाद्यसंगीताची टेप मिळाली होते. त्या वयात ती टेप ऐकणे, म्हणजे फुशारकी मारायला मिळालेले एक कारण होते. पुढे मी काही पाश्चात्य संगीताच्या मैफिली परदेशी असताना ऐकल्या, तेंव्हा ही अर्थात ही आठवण नेहमी यायची.
त्या काळात आमच्याकडे "नारायण" नावाचा एक नोकर कमला होता, घरातच राहायचा. घरातील चौथ्या खोलीत पारशांची विहीर असल्याने (त्या विहिरींची देखील सटीसामासी पूजा व्हायची) ती खोली वापरण्यासाठी फारच अयोग्य होती. आम्हा भावांच्या कपड्यांचे कपाट त्या खोलीत होते आणि त्याच खोलीत नारायण झोपायचा. कला चेहरा, बुटकी उंची आणि स्थूल म्हणावा अशीच शरीरयष्टी. सतत अर्धी पॅन्ट आणि हाफ शर्ट, या अवतारात असायचा. आमचे घर पूर्ण शाकाहारी तरी त्याच्या हाताला चव होती. एक आठवण, घरात लोखंडाचे भांडे होते, आता इडल्या बनवताना वापरतात तसे आणि एकदा त्याने "आप्पे" म्हणून पदार्थ केला होता. पुढे बरेच वेळा खाल्ला. त्यावेळी नवीन पदार्थाची नवलाई होती. चवीला गोड आणि चमचमीत असा होता. जेवण मात्र सुंदर बनवायचा पण कर्माने अतिशय हलका होता. बाहेरच्या जागेत नानांचा वर्कशॉप होता आणि तिथे मशीन वाईंडिंग वगैरे कामे सतत चालायची. परिणामी घरात बऱ्याचवेळा तांब्याच्या कॉइल्स असायच्या. त्या नारायण चोरायचा आणि आपल्या गादीत लपवून ठेवायचा!! नानांना संशय होता आणि एकदा नानांनी त्याला विचारले. अर्थात नारायण कडून नकारघंटा. तरी एकेरात्री नानांनी त्याला गादी दाखवायला आणि सगळं "ऐवज" बाहेर आला!! अर्थात घरात भांडण सुरु झाले, इतके की बाहेर बहुदा आवाज गेला असावा. कारण दुसऱ्या दिवशी बाजूच्या पारशांनी विचारणा केली होती. इतके होऊनही आई/नानांनी त्याला घरात सांभाळला होता कारण आम्ही तिघेही वयाने फारच लहान होतो, आईची नोकरी चालू होती. पुढे असे प्रकार वाढत गेले तशी नानांनी त्याला काढून टाकला. वाडीत तो "धैर्यवान" कुटुंबात कामाला गेला पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्याप्रमाणे त्या घरातही त्याने चोरी केली. मग मात्र तो वाडी सोडून गेला. आमचा काहीच संपर्क उरला नाही.
या सगळ्यांच्या आधी, घरात नानांनी पाणी गरम करायचा हीटर आणला होता. धातूची वर्तुळाकार आतून पोकळ अशी नळी होत. ती पाण्यात टाकायची आणि इलेक्ट्रिक बटन ऑन करायचे! हळूहळू ती नळी तापत जायची आणि पाणी गरम व्हायचे. अर्थात पाणीपुरेसे गरम झाल्यावर स्विच बंद करायचा आणि हीटर थंड होईपर्यंत पाण्यात ठेवायचा आणि मगच काढायचा. मी एकदा भयानक अगोचरपणा केला होता. पाणी गरम झाले, स्विच ऑफ झाला होता पण हीटर थंड झाला नव्हता आणि मी हीटर बाहेर काढला. कुठेतरी हलगर्जीपणा झाला आणि त्या हीटरचा पोटाला स्पर्श झाला!! अजूनही त्यावेळी अंगातून उठलेला वेदनेचा लोळ आठवत आहे. अर्थात जिथे तप्त हीटरचा स्पर्श झाला, ती जागा पोळून सुजली होती. माझे वय बहुदा ६,७ वर्षे असावे.
माझा थयथयाट तर सुरु झाला पण प्रथम आईने मला गप्प केले आणि नानांनी घरातील एक मलम की औषध लावले. थोड्या वेळाने वेदना कमी व्हायला लागल्या पण भाजलेला व्रण मात्र पुढे काही महिने अंगावर बाळगून होतो. हळूहळू आमची वये वाढत होती. घरात नवीन घर घ्यायचे विचार सुरु झाले आणि १९६९ मध्ये आमच्या समोरील एक इमारत पूर्ण दुरुस्त होत होती. त्याचा मालक, नानाच्या ओळखीचा झाला आणि त्याच्याकडून आम्हाला चौथा-शेवटचा मजला मिळाला. अर्थात हळूहळू घरातले सामान वरच्या घरात गेले आणि माझा त्या घराशी असलेला संबंध तुटला. माझी जवळपास १० वर्षे या घरात गेली होती.
खरंतर आणखी देखील आठवणी असतील पण आत्ता तरी इतक्याच आठवत आहेत पण त्याने माझे बालपण ढवळून काढले, हे नक्की.
Monday, 10 July 2023
स्थलांतरित नागरिकत्व
दुसऱ्या देशात स्थलांतर करणे आता जवळपास सगळ्या देशात मान्य झाले आहे. स्थलांतरीत व्यक्ती या साधारणपणे, आर्थिक,भौतिक सुख डोळ्यासमोर ठेऊन इतर(मुख्यतः प्रगत देशात) देशात जात असतात. आता प्रगत देशाचे काही प्रश्न असतात. प्रगत देशात शक्यतो मजुरी करणारे फार महाग असतात कारण तिथले कडक कायदे. स्थलांतरित व्यक्ती या, आपल्या देशातील एकूणच परिस्थिती बघून, राहणीमान, वेतन इत्यादी बाबींत, त्यामानाने "स्वस्त"उपलब्ध होतात. स्थलांतरितांना नवीन देशात, स्थायिक व्हायचे असते आणि त्यासाठी त्यांची मेहनत करायची तयारी असते. याचाच फायदा स्थानिक लोकं घेतात आणि त्यांना स्वस्तात पडून घेतात.
काही उदाहरणे देतो. मी बरीच वर्षे साऊथ आफ्रिकेत काढली असल्याने, तिथल्या स्थलांतरित लोकांचे प्रश्न किती गहाण आहेत, याची कल्पना आली. इतिहासात फार मागे जायचे झाल्यास, १८५० साली, भारतातून साऊथ आफ्रिकेत, तिथल्या उसाच्या शेतात काम करण्यासाठी, प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि आताचे तामिळनाडू, इथून असंख्य मजूर कामाला नेले आणि त्यांच्याकडून वेठबिगारी कामे करवून घेतली.त्यावेळी भारताची स्थिती ब्रिटिशांनी हलाखीची केली होती, विशेषतः वर निर्देशित राज्यांची परिस्थिती तेंव्हाही हलाखीची असल्याने, तिथले मजूर, ब्रिटिशांना खूपच स्वस्तात मिळाले. डर्बन, पीटरमेरित्झबर्ग सारख्या शहरातील भारतीय लोकवस्तीचे मूळ हे इथे आढळते. अर्थात त्यावेळी आणि आजही, भारतापेक्षा तिथे परिस्थिती केंव्हाही चांगलीच आहे.
असाच प्रकार ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे देखील केला. यात एक मेख आहे. मुख्यतः आर्थिक बाब आहे. भारतीय माणसे, स्थानिक लोकांपेक्षा स्वस्तात काम करायला तयार असतात कारण आपण भारतीय, कुठेही गेलो तरी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याइतके लवचिक असतो. अगदी पांढरपेशे भारतीय घेतले तरी, आपली वागणूक तशीच राहते. वास्तविक ऑफिसमध्ये काम करणारे भारतीय उच्च शिक्षित तसेच प्रचंड मेहनत करणारे असतात , प्रसंगी ऑफिसवेळ संपली तरी ऑफिसमध्ये काम करायला तयार असतात पण साऊथ आफ्रिकेतील गोरे, त्याबाबत अतिशय ताठर असतात. घड्याळात संध्याकाळचे ४.३० किंवा ५.०० वाजले की लगेच ऑफिस सोडणार. आपण भारतीय प्रसंगी रात्री उशिरापर्यंत काम करीत बसणार!! त्यातून एकुणात वेतनाचा मुद्दा बघितला तर गोऱ्या माणसापेक्षा आपण भारतीय स्वस्तात नोकरी करायला तयार असतो. पुढे एकदा का "नागरिकत्व" मिळाले की मग हळूहळू आपण, आपली नखे बाहेर काढतो. परंतु तोपर्यंत कंपनीचा मालक देईल ते काम स्वीकारत असतो. प्रगत देशात कामगार कायदे अतिशय कडक असतात आणि सहसा कायद्याची पायमल्ली करायला फारसे कुणी धजावत नाही.
याचा परिणाम असा झाला, साऊथ आफ्रिकेत, इतर गरीब आफ्रिकन देशातून प्रचंड प्रमाणात स्थलांतरित आले, विशेषतः नायजेरियन तर लाखोंच्या हिशेबात आले. नायजेरिया कायदा पालनाबाबतीत भयानक आहे. कायदा मोडणे, हे आपले "ब्रीद"असल्याप्रमाणे सगळे वागत असतात. अशा प्रवृत्तीची माणसे साऊथ आफ्रिकेत आली, बहुतांशी बेकायदेशीर स्थलांतरित आहे. बनावट कागदपत्रे सादर करून तर कधी काही आफ्रिकन देशातील माणसे "निर्वासित" म्हणून देशात प्रवेश करतात आणि इथल्या समाजात मिसळून जातात. याच नायजेरिन माणसांनी साऊथ आफ्रिका देश आतून पोखरला आहे, इतका की आता तर रस्त्यावर देखील "ड्रग्ज" मिळतात!! प्रसंगी हिंस्र होतात, मुडदेफराशी तर वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. आता तर त्या देशाने "असुक्षितता" कायमची स्वीकारली आहे, इतकी पराकोटीची परिस्थिती झाली आहे. असेच चित्र आता बऱ्याच युरोपियन देशात दिसत आहे.
स्थलांतर करताना, एक प्रश्न वारंवार भेडसावतो आणि तो म्हणजे तिथली संस्कृती किती प्रमाणात आणि कशी स्वीकारायची? अर्थात हा प्रश्न प्रामुख्याने पांढरपेशा समाजाला भेडसावतो. जे स्वीकारतात ते पुढे सुखाने राहतात पण अन्यथा फार त्रांगड अवस्था होते. हे जे इतर आफ्रिकन देशातून आले, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही कारण त्यांना लपूनछपून राहण्याची सवय असते आणि बेकायदेशीर राहात असल्याने, घर नावाची वस्तू कधीच स्थिर नसते, कुटुंबकबिला नसतो. भणंग अवस्थेत राहण्याची तयारी असते. त्यातुन मग, कधीतरी एखादी स्थानिक मुलगी गटवायची आणि तिच्या सोबत "Contract Marriage" करून, नागरिकत्व पदरी पाडून घ्यायचे. एकदा का तुम्ही "Legal Citizen" झालात की मग उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळे!! बहुतेक देशात असेच चालू असते आणि असे घडत असल्याने अशा लोकांचा धीर चेपला जातो आणि गुन्हेगारी करायला मोकाट सुटतात.
आज फ्रांस सारख्या अत्यंत प्रगत देशात हेच झाले आहे. फ्रांस देश हा तास मवाळ, सहानुभूती दर्शवणारा म्हणून ख्यातकीर्त आहे. शक्यतो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावयाचे नाही की त्याच्या फंदात पडायचे नाही, अशी वृत्ती. अर्थात अशी वृत्ती बहुदा सर्वत्र आढळते आणि याचा फायदा बेकायदेशीर स्थलांतरित असतात, ते उठवतात. आज फ्रान्समध्ये प्रचंड जाळपोळ चालू आहे, कारणे असंख्य देता येतील, अगदी हिंसा करणारे आणि ती हिंसा भोगणारे. परंतु केवळ फ्रांस कशाला, बेल्जीयम मध्ये फार वेगळे चालू नाही. जर्मनीत मध्यंतरी सीरियामधील निर्वासितांनी असाच गोंधळ घातला होता.
मागील वर्षी साऊथ आफ्रिकेत, डर्बन इथल्या प्रचंड मॉल मध्ये असाच धुडगूस घातला, कित्येकांचे प्राण गेले, भयानक नासधूस झाली.अगदी आगीचे लोळ उठले होते. पुढे चौकशी केली असता, बेकायदेशीर निर्वासितांचा हात होता, हे बाहेर आले. आता त्यांना शोधणे पण अतिशय जिकिरीचे असते. इतका अवाढव्य देश, किती आणि कुठले कानेकोपरे शोधायचे? त्यातून स्थानिक लोकांची देखील त्यांना साथ असते, अर्थात त्याशिवाय असा हिंसाचार अवघड म्हणा. आता हा प्रश्न जागतिक झाला आहे. त्यातून त्या देशाची घटना अशी असते, सरसकट अटकसत्र राबवता येत नाही कारण सुक्याबरोबर ओले जळण्याची भीती. ओले जळले की लगेच मीडिया कान टवकारून टीका करायला मोकळे!
दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय जटील होत चाललेला आहे. आज शेजारचा देश जळत आहे म्हणून दुर्लक्ष करणे, परवडणारे नाही. उद्या आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू शकते. मुळात, "Easy Money" चा हव्यास प्रत्येक पावलावर नडतो आणि त्यातून गुन्हेगारी बोकाळत जाते. प्रत्येक देशाची घटना स्वतंत्र असते आणि घटना बदल करायला, कुठलेच सरकार शक्यतो धजावत नाही कारण राजकारणात त्यांना देखील स्थिर व्हायचे असते. स्थलांतरितांच्या प्रश्नांचे असंख्य कंगोरे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडथळे आहेत., हेच खरे.
Tuesday, 16 May 2023
(विस्कळीत) झिम्मा - विजया मेहता
मुळात केवळ मराठी भाषेतच नव्हे तर इतर भाषेत देखील, कलावंतांनी लिहिलेली आत्मचरित्रे तशी विरळाच वाचायला मिळतात (इथे लेखक/कवी यांना वगळले आहे कारण त्यांचा लेखन हाच धर्म असतो!!) त्यामुळे, एकंदर कलेबाबत आणि त्या कलेच्या सादरीकरणाबाबत जे मुळातले अस्पर्शी गोंधळी समज असतात, ते आणखी दृढावत जातात, उदाहरणार्थ सी. रामचंद्र यांचे "माझ्या जीवनाची सरगम" अत्यंत टुकार लेखन!! या पार्श्वभूमीवर विजय मेहता यांचे आत्मचरित्र वाचायला घेतले आणि वाचन संपल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले.
वास्तविक, मराठी नाट्यसृष्टीत विजयाबाईंचे नाव प्रतिष्ठीत, पुढे चित्रपट क्षेत्र जरी गाजवले नाही तरी कामगिरी उल्लेखनीय, मराठी नाटक परदेशी नेण्यात - विशेषत: पूर्व जर्मनी इथे नेण्यात त्यांचा मोठा हातभार, रंगायन सारखी अभिनव चळवळ आणि त्यातील प्रयोग, मराठी साहित्यावर आधारित नाट्यप्रयोग (यात जयवंत दळवींचा देखील तितकाच सहभाग!!) एक अजोड अभिनेत्री आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक अभिनय शैली मोडून नवीन शैली निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टी त्यांच्या नावावर मांडता येतात. अशा समृध्द पार्श्वभूमीवर "झिम्मा" वाचायला घेतले. आयुष्याचा आवाका प्रचंड असल्याने, लिखाण देखील तितकेच समृद्ध असणार, आपण वाचायला घेतो.
आपण, आत्मचरित्र का लिहितो? तितकी आपली योग्यता असते का? तसे पहिले तर समाजातील प्रत्येक व्यक्ती आत्मचरित्राचा विषय ठरू शकते पण तरीही, तसे कुणी फारसे धाडस करीत नाही. याचे प्रमुख कारण असे दिसते, सामान्य माणूस मुळात बुजरा असतो आणि आत्मचरित्र लिहायचे म्हणजे हातून तशी काहीतरी कामगिरी होणे आवश्यक!! दुसरा भाग असा, जे कुणी असामान्य कामगिरी करतात, त्यांच्या आयुष्याबद्दल सामान्यांना बरेच कुतूहल वाटत असते आणि त्या कुतुहलाचे उत्तर, ते आत्मचरित्रातून शोधण्याचा प्रयत्न करतात. या दृष्टीने बघायला गेल्यास विजयाबाईंचे बहुतेक सगळे आयुष्य चकचकाटी प्रकाशात गेले!! सामान्य लोकांना झगझगाट लगेच मोहून टाकतो.
या आत्मचरित्रात, प्रमुख दोष आढळतो, सगळ्या पुस्तकभर घटनांची जंत्री मांडलेली आहे. आता, आयुष्याचा पट शब्दबद्ध करायचा म्हणजे घटना येणारच परंतु बऱ्याचवेळा घटनांचा फक्त उल्लेख वाचायला मिळतो. उदाहरणार्थ, रंगायन हि मराठी रंगभूमीवरील अभिनव चळवळ होती. रंगायनने अनेक, नव्या गोष्टी/प्रघात मराठी रंगभूमीवर आणले. नव्या जाणीवा, नवे सादरीकरण, विषयात वैविध्य, समाजात घडत असणाऱ्या प्रवृत्तींचे थेट रंगावृत्ती दर्शन इत्यादी. या चळवळीचे म्होरकेपण विजया बाईंनी घेतले पण पुढे त्यात मतभेद झाले आणि रंगायनचे तारू फुटले, हा इतिहास झाला. आता, या इतिहासाचे विश्लेषण कुठेच वाचायला मिळत नाही!! केवळ काही परिच्छेदात आणि ते देखील, काही प्रमाणात अरविंद देशपांडे, विजय तेंडूलकर यांच्यावर दोषारोप करून प्रकरण संपविले आहे!! जणू काही त्यात स्वत:चा काहीही दोष नव्हता!! असे समजून चालू, त्यांचा काहीच दोष नव्हता, पण जर का इतरांचा संपूर्ण दोष होता, तर त्याचे व्यवस्थित विवरण नको का? इथेच आत्मचरित्र हे आत्मसमर्थनाच्या अंगाने जायला लागते.
पुस्तकात, पुढे अनेक ठिकाणी रंगायनचा उल्लेख आणि त्याचे योगदान,याबद्दल विवेचन आहे. म्हणजे रंगायन चळवळीचा प्रभाव पुढील आयुष्यावर देखील पडला होता, हे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे. असे असताना, ही चळवळ का अस्तंगत झाली? या प्रश्नाचे कुठेच समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याआधी, त्यांनी अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडे अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले, पण नक्की कशाप्रकारचे प्रशिक्षण घेतले, याचा संगतवार धांडोळा घेतलेला नाही. केवळ, हे माझे गुरु, असेच उल्लेख वाचायला मिळतात!! वास्तविक पाहता, अल्काझींचे योगदान केवळ विजयाबाई(च) नव्हे तर पुढील अनेक पिढ्या मोकळेपणाने मान्य करतात. असे असताना, तुम्ही तर कारकिर्दीच्या प्राथमिक काळात अल्काझी यांच्याकडे गेला असताना, त्यांचे कुठले संस्कार तुमच्यावर घडले, याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. ते सविस्तर येण्याची गरज होती कारण त्या संस्कारांना धरूनच, विजयाबाईंनी पुढील उभारणी केली.
आत्मचरित्र लिहिताना, सगळा व्यापार हा पाठीला डोळे लावून अवलोकायचा प्रकार असतो आणि आपण आज जिथे आहोत, तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला, याचा मागोवा घेण्याचा असतो, मग तिथे चिकित्सक वृत्ती, अभ्यासू मनोवृत्ती आणि वस्तुनिष्ठता आवश्यक असते. बऱ्याच ठिकाणी वस्तुनिष्ठतेचा "आव"आणला आहे परंतु अखेर निराशाच हाती येते. वास्तविक पहाता, आत्मचरित्र हे नेहमीच मागील आयुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून, केवळ कौतुक नव्हे तर दोषांचा उहापोह करण्याची सुंदर संधी असते. बरे असे नाव्हे, आज बाईंनी काही चुका कबूल केल्या तर त्यांच्यावर काही लांच्छन येईल!! मुळात बाईंचे कर्तृत्व इतके व्यापक आहे की काही चुका दर्शविल्या तर त्यांच्या आयुष्यात काही कमतरता येऊ शकते.
हे केवळ रंगायन बाबत आहे, अशातला भाग नाही. पुढे व्यावसायिक झाल्यावर, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक नाटकांचे उल्लेख आणि प्रसंगी विस्तारपूर्वक प्रकरणे आहेत. म्हणजे, "जास्वंदी", "महासागर", "पुरुष","संध्याछाया" इत्यादी सगळ्या नाटकांबद्दल माहिती मिळते, पण ती सगळी जंत्रीच्या स्वरुपात!! कुठेही, दिग्दर्शक म्हणून नेमके काय फेरफार केले, त्यामागे कुठली वैचारिक भूमिका होती, याबद्दल फारसे काही वाचायला मिळत नाही. वास्तविक नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे कलाकृतीचा कप्तान!! जे लेखकाने लिहिले आहे, त्यातील नेमके नाट्य जाणून, त्याची रंगावृत्ती तयार करणे, हा प्रचंड व्यामिश्रतेचा भाग आहे, त्यामागे कितीतरी वैचारिक संघटन असते, आणि तेच नेमके वाचायला मिळत नाही. वाचायला मिळते ती, त्या नाटकानिमित्ताने झालेल्या घटनाची जंत्री!! इथे एक किस्सा आठवला. जयवंत दळवींनी, एका पुस्तकात विजयाबाईंवर लेख लिहिला आहे. त्यात लिहिताना, विजयबाईनी "संध्याछाया" नाटक बसवताना, त्यातील "बयो" व्यक्तिरेखा बसवताना, त्यांची (विजयाबाईंची) आजी कशी मिसळली, हे दळवींना सांगितल्याचे, विस्तारपूर्वक लिहिले आहे. खरंतर हे आणि असे किस्से, आत्मचरित्रात येणे गरजेचे होते. आता तर घटनांच्या जंत्री, कुणालाही गुगलवरून प्राप्त होऊ शकतात, अशी परिस्थिती असताना, त्याच घटना सलग मांडून नक्की काय साधले?
दोन तीन ठिकाणी, दिग्दर्शक म्हणून लेखकाकडून आवश्यक ते बदल करवून घेतले, असे उल्लेख!! पण ते बदल का करून घेतले, त्याची काय आवश्यकता होती, त्याने सादरीकरणात काय आणि किती फरक पडला, हे प्रश्न तसेच मनात राहतात!!
पुढे, पाश्चात्य लोकांशी गाठीभेटी झाल्या, त्या निमित्ताने सांस्कृतिक आदानप्रदान झाले, या सगळ्या घटनांचे विस्तारपूर्वक उल्लेख आहेत. एक इतिहास म्हणून योग्यच आहे पण मग पुढे प्रश्न असा उद्भवतो, या गाठीभेटीतून नेमका काय फायदा झाला तसेच विशेषत: जर्मनी, नंतर अमेरिका देखील, यांच्या जाणीवा, सादरीकरण आणि आपल्या संकल्पना यात नेमका काय फरक? याचे उत्तर मिळत नाही. इथे विजयाबाईंना एक संधी होती, पाश्चत्य रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची. तसा त्यांनी अभ्यास नक्कीच केला असणार पण मग त्या अभ्यासाचे प्रतिबिंब आत्मचरित्रात पडत नाही. सगळे उल्लेख जंत्रीवजा येतात. आता विजयाबाई जर्मनी, अमेरिका इथे गेल्या होत्या, ही घटना जगजाहीर आहे. असे धरून चालू, त्यांच्या तुलनेत भारतीय रंगभूमी मागासलेली आहे किंवा कमअस्सल आहे. असे असेल तर मग सुधारणा करण्याची कितीतरी मोठी संधी प्राप्त झाली होती. असेही असू शकेल, त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळाली नसेल. कारणे अनेक असू शकतात, जसे आर्थिक पाठिंब्याचा अभाव असणे, तुलनेने कम सक्षम अभिनेते असणे, इत्यादी. त्यांचा उल्लेख करायला काय हरकत होती. बाईंचा रंगभूमीवर इतका दबदबा आहे की त्यांनी मराठी रंगभूमीवरील त्रुटींचा उल्लेख केला तर त्याचा फार मोठा नकारार्थी गवगवा होईलच असे नाही आणि समजा झाला तर रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगलाच झाला असता. बाईंनी इथे फार मोठी संधी गमावली, असे वाटते.
तसेच, पूर्वीच्या अभिनेत्यांबरोबर काम करताना, (म्हणजे नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, केशवराव दाते इत्यादी!!) आपल्याला कसे जुळवून घ्यावे लागले, किंवा त्यांच्या अभिनयातील बारकावे, कच्चे दुवे याबद्दल अवाक्षर देखील नाही!! खरे पाहता, अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडून आधुनिक तंत्र शिकून, मराठी रंगभूमीवर पाऊल टाकले. तेंव्हा अभिनय शैलीत फरक असणारच, तसा पुढे थोडाफार उल्लेख देखील आहे पण तितकाच. त्यावर वैचारिक काहीही नाही!! पूर्वीच्या नटांना कुचेष्टेने "आवाजी" अभिनेते म्हणून खिजवले जाते पण त्यात किती अर्थ आहे? एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून काही स्पष्ट विश्लेषण यायला काही हरकत नव्हती. बरे आता मागील पिढीतील कुणीही जिवंत नाहीत तेंव्हा त्यांच्याकडून वादग्रस्त टीका होण्याचा अजिबात संभव नव्हता.
नंतर, NCPA प्रकरण!! त्यामागची टाटांची मनोभूमिका, त्यानुसार झालेले बांधकाम आणि मुळात त्या निर्मितामागील विचार, याचे सुसंगत वर्णन वाचायला मिळते. त्यांच्याआधी तिथे पु.ल. देशपांडे अध्यक्ष होते, त्याआधी भाभा!! परंतु त्यांच्या कार्याबद्दल फारसे काहीही वाचायला मिळत नाही. एकेठिकाणी पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली आहे पण पुढे तसे कार्यक्रम खंडित झालें, हे पूर्णसत्य आहे. का खंडित झाले? आपली मनोभूमिका वेगळी होती म्हणून तसे कार्यक्रम खंडित झाले तर तसे स्पष्टपणे लिहायला हवे होते. त्यात काहीही वावगे नाही. पुढे NCPA संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना, स्वतःचे म्हणून काही निर्माण करताना, काय विचार केला होता? निर्मिती ही नेहमीच विचारांची मागणी करते आणि बाई तर सतत विचारांच्या कोंडाळ्यात वावरणाऱ्या!! असे असताना, आपला वैचारिक प्रवास कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर कुठेही मिळत नाही.
हे आणि असे अनेक प्रश्न वाचताना मनात येतात आणि शेवटी, पुस्तक वाचून मनात असमाधानच येते. हे सगळे सविस्तर लिहावेसे वाटले कारण, बाईंचे कर्तृत्व तितक्या तोलामोलाचे आहे म्हणून. सगळ्याच कलाकारांबाबत अशी अपेक्षा ठेवता येत नाही.
इतिहास म्हणून पुस्तक चांगले आहे परंतु आत्मचरित्र म्हणून निराशा करणारे आहे.
Saturday, 6 May 2023
Standerton - Church
नोकरीसाठी गाव तसे छोटेखानी मिळाले तर वैय्यक्तिक मैत्री फार चटकन जुळून येतात तसेच राहायला बरेच सुरक्षित वाटते. परदेशी राहताना हा अनुभव फार थोड्या वेळा अनुभवायला मिळाला. Standerton इथल्या नोकरीच्या अनुभवाबद्दल पूर्वीच लिहिलेअसल्याने त्यात आता नवीन काही लिहिण्यासारखे नाही. गाव तेंव्हा तरी फार तर १०,०० ते १२,००० वस्तीचे होते. गावात जून,जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी तसेच गावात नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने लोकवस्ती विरळ. अर्थात प्रचंड शहरात असणारी प्रचंड मॉल्स, वर्दळ आणि एकूणच अंगावर येणारे जीवन, असला प्रकार आढळत नसतो. एकूणच थंड, शांत जीवन. या गावात एक चर्च आहे, चॅपलपेक्षा आकाराने बरेच मोठे परंतु एकूणच चर्च म्हटल्यावर जो अवाढव्य आकार समोर येतो, त्यामानाने छोटेखानी. अर्थात गावात एकूणच लोकवस्ती विरळ म्हटल्यावर कशाला कोण, महाकाय चर्च बांधणार!!
मी इथे राहायचे ठरवल्यावर, एके संध्याकाळी, शनिवारी चर्चकडे गाडी वळवली. चर्च संस्कृतीत बहुदा इतर धर्मियांना मुक्त प्रवेश असावा. अर्थात मी नास्तिक असल्याने, असल्या विषयांना माझ्याकडे स्थान नाही. संध्याकाळचे ५.३० वाजले होते आणि शनिवार असल्याने, चर्चमध्ये फारशी वर्दळ नव्हती. मला काही येशूकडे मागणे मागायचे नव्हते पण एकूणच चर्च विषयी मनात आकर्षण होते आणि त्यापोटीच मी आत शिरलो. वास्तविक मुंबईत मी गिरगावात राहणार माणूस, आणि गिरगावात पोर्तुगीज चर्च म्हणून वास्तू आहे पण तिथे एकूणच वाहनांची सतत असलेली वर्दळ असल्याने कधीही आत जाऊन बघावे, असे वाटलेच नाही. इथे निवांत संध्याकाळ पुढ्यात पसरली होती. आता शिरलो आणि चर्चचा अंतर्भाग प्रथमच नजरेत भरला. आता ख्रिश्चनांचे मांडीत म्हटल्यावर प्रवेशद्वाराच्या समोर आत मध्ये येशूची मूर्ती असणे क्रमप्राप्तच. मूर्तीच्या खाली पायऱ्यांवर अनेक आकाराच्या मेणबत्त्या लावलेल्या, त्याच्या पुढे लाकडाच्या आकाराचे बंदिस्त फर्निचर जसे कोर्टात न्यायाधीशाच्या पुढे असते. त्यानंतर मग भक्तांना बसण्यासाठी लाकडाच्या रांगा. तिथे शांतपणे भक्तांनी यायचे आणि येशूला आपली service अर्पण करायची. मी आता शिरलो तेंव्हा एक कुटुंब तिथे बसले होते. बहुदा त्यांची पूजा संपली असावी कारण लाकडाच्या रांगेत, खाली मान घालून बसले होते. अर्थात मी तसे अंतर राखून बसलो. मला कसलीच प्रार्थना माहीत नव्हती आणि जरी झाली असती तरी केली नसती. माझा उद्देश वेगळा होता. चर्चमधील शांतता अनुभवणे आणि एकूणच स्थापत्य बघून घेणे, इतकाच उद्देश होता.
चर्चच्या भिंतींवर वेगवेगळी चित्रे रंगवली होती. मला त्या चित्रांचे मर्म जाणून घेण्यापेक्षा रंगसंगती मध्ये अधिक रस. एकतर जिथे हिंदू संस्कृतीबद्दल सखोल माहिती नाही तिथे परकीय धर्माबद्दल काय माहिती असणार. चर्चमधील शांतता मात्र अंगावर येते. जवळपास १५,२० मिनिटे झाली असतील पण अचानक एक वादक पाठीमागून कुठूनतरी आला आणि त्याने चर्चमधील पियानो वाजवायला घेतला. इथे माझे नाते जडले. वास्तविक पियानी वाद्य मला नवलाईचे नव्हते परंतु चर्चमधील धर्मसंगीत ऐकण्यात विशेष रस होता आणि ती इच्छा अचानक पूर्ण झाली. जवळपास २० मिनिटे वादन केले. वादक कदाचित फार मोठा वाकबगार नसेल देखील पण ते सूर मात्र कानात ठसले. आजही ती अनुभूती कायम आहे. फक्त पियानो वाजत होता आणि त्या स्वरांनी सगळे चर्च भरून गेले होते. स्वरांची अशी अनुभूती पुढे मला Andre Rui च्या कार्यक्रमात ऐकायला मिळाली. पाश्चत्य संगीताची आवड निर्माण होऊन बरीच वर्षे झाल्याने, सूर म्हणून फार अलौकिक वाटते नाही पण त्या वास्तुतील शांततेचा एक गडद परिणाम मात्र जाणवला.
वादन संपले तशी तो वादक निघून गेला. चर्चचा पाद्री मात्र दिसला नाही. घरी परतलो, ते सूर डोक्यात घेऊनच. लगेच YouTube वर काही व्हिडीओज ऐकल्या आणि ते सूर मनात साठवून ठेवले. अर्थात तिथली शांतता मात्र मनात साठवून ठेवली होती. पुढे मी अनेक शनिवार संध्याकाळ तिथे जात असे, आता शिरण्याची गरज भासली नाही पण त्या अत्यंत स्वच्छ परिसराच्या पायऱ्यांवर निवांत बसण्यात खूप आनंद मिळायला लागला. चर्चमध्ये गर्दी होणार ती रविवारी सकाळी. मला खरंच विचार करावासा वाटतो, गाव अगदी छोटे आणि तिथले चर्च देखील टुमदार परंतु तिथली शांतता आणि स्वच्छता निव्वळ वाखाणली जावी. आपल्याकडे अपवाद स्वरूपात असे का घडत नाही?
माझे लग्न झाले त्या पहिल्या दिवाळीला, रितीनुसार मी सासरी - राजापूर इथे गेलो होतो.आज या घटनेला ३६ वर्षे झाली असतील पण एका संध्याकाळी राजापूर इथल्या नदीकाठी गेलो होतो. तिथे एक छोटे देऊळ होते. तिथे मिणमिणता दिवा कुणीतरी लावला होता. परिसर स्वच्छ होता आणि आसमंतात सुंदर शांतता होती. मला तर तिथून हलूच नये, असे फार वाटत होते पण हळूहळू अंधार पसरायला लागला आणि नदी काळोखात हरवून गेली. आजही ते दृश्य माझ्या मनावर ठसलेले आहे आणि त्यावेळची आठवण, मला भारतापासून हजारो किलोमीटरवर राहताना मनात सारखी यायची. अर्थात असे वातावरण मुंबईसारख्या शहरात मिळणे जवळपास अशक्य आणि म्हणून त्याचे अप्रूप वाटले असणार. इथे देखील चर्चच्या मागील बाजूला Vaal नावाची नदी आहे. गावाप्रमाणे छोटीशीच आहे. पाण्याचा फारसा खळाळणारा आवाज येत नाही, एक मंद स्वरांत पाणी वाहत असते.
पुढे मी साऊथ आफ्रिकेत बरीच चर्चेस बघितली पण असा अनुभव कधी मिळाला नाही कारण ती सगळी चर्चेस अवाढव्य शहरातली आणि म्हणून शहरी संस्कृती स्वीकारलेली.
Tuesday, 25 April 2023
सचिनची पन्नाशी - एक आढावा
कुठल्याही कलाकार, खेळाडूच्या निर्मितीचे विश्लेषण करायचे झाल्यास, ती व्यक्ती निवृत्त झाल्यावर किंवा उत्तर वयाला लागल्यावर केल्यास, तुमच्या लिखाणात वस्तुनिष्ठ दृष्टीचा प्रभाव दिसून येऊ शकतो. ती व्यक्ती जेंव्हा भरात असते तेंव्हा लोकमानस तसेच एकूणच त्याच्या निर्मितीचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो/पडतो. परिणामी तुमचा विचार एकांगी ठरण्याची शक्यता अधिक. विशेषतः ती व्यक्ती जर का खेळाडू असेल तर खूप सुकर होते. खेळातून निवृत्त झालेली असते, आणि आता नवीन निर्मिती अशक्य असते, त्यामुळे विचक्षण दृष्टीने तुम्ही एकूण कारकिर्दीचे अवलोकन करू शकता. आज हे लिहायचे कारण म्हणजे कालच सचिनची पन्नाशी देशभर साजरी झाली. आजमितीस कुना खेळाडूच्या वाट्याला असे भाग्य फार क्वचित आले असावे, विशेषतः भारतीय खेळाडूच्या संदर्भात तर अधिक जाणवते.
सचिनची कारकीर्द २४ वर्षांची झाली . इतकी लांबलचक कारकीर्द खचित कुणा खेळाडूच्या वाट्याला आली असेल. अर्थात इतकी कारकीर्द लांबवण्यासाठी, तुमच्याकडे दृढनिश्चय तसेच आत्मविश्वास असावाच लागतो. आता इतकी दीर्घ कारकीर्द म्हटल्यावर त्या कारकिर्दीत चढ-उतार असणे क्रमप्राप्तच ठरते. खरंतर कुणाही कलाकाराचे श्रेष्ठत्व ठरवताना, त्याने आयुष्यात कितीवेळा शिखरे गाठली? हा निकष ठेवावा. एक तर नक्कीच, कुठलाही खेळाडू हा सातत्याने अत्युत्तम खेळ करूच शकत नाही. मानवी प्रयत्नांना नेहमीच मर्यादा असतात परंतु आपल्या मर्यादा जाणून घेऊन, आपल्या खेळात सतत सुधारणा करण्याचा ध्यास घेऊन,कारकीर्द सजवणे, हा एक खेळाडू म्हणून अवलोकनाचा भाग असतो. प्रत्येक खेळाडूला या चक्रातून जावेच लागते आणि इथे मग कधीतरी त्या खेळाडूवर Bad Patch येतो. खेळाडूची कसोटी इथेच लागते कारण अशा परिस्थितीत तुमच्या कडून आवश्यक असा खेळ होत नसतो आणि मानसिक कुचंबणा वाढू शकते. निर्धार अशाच वेळी उपयोगी पडतो.
आता सचिनच्या कारकिर्दीकडे जवळून बघितल्यास, वयाच्या १६व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण म्हणजे स्वप्नावस्था म्हणता येईल. त्यातून त्याला इम्रान, वकार आणि अक्रम,असा तेजतर्रार माऱ्याला सामोरे जावे लागले. लोकांना याचेच औत्स्युक्य कायम वाटत आले. खरतर एकदा का तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरलात की वयाचा मुद्दा गौण ठरतो. तुम्ही १६ वर्षाचे आहेत म्हणून कुणीही तुमच्याशी लुटुपुटुचा खेळ खेळत नाही. तिथे संहारक गोलंदाजीचा सामना करावाच लागतो. त्यातून त्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत, वकारचा एक चेंडू अचानक उसळून, सचिनचे नाक फुटले!! वास्तविक आत्मविश्वास खच्ची व्हायचा हा क्षण पण इथेच सचिनचा मनोनिग्रह दिसला आणि पुढे खेळ चालू ठेवला. एक खेळाडू म्हणून हे स्फूर्तिप्रद होते आणि त्याचे कौतुक होणे रास्त होते. प्रश्न असा, कितीवेळा हा प्रसंग उगाळून सांगायचा? क्रिकेटमध्ये चेंडू लागून जखमी होणे, ही नित्याची बाब असते.
सचिनच्या कारकिर्दीचे जवळून निरीक्षण केल्यावर, मला स्पष्टपणे, २००३ पर्यंतचा सचिन आणि पुढे १० वर्षांची कारकीर्द असे २ भाग पाडावेसे वाटतात. २००३ पर्यंतचा सचिन हा बेडर, साहसी नि आक्रमक फलंदाज होता. पुढे त्याने आपली शैली बदलली आणि वाढत्या वयानुसार नव्या शैलीचा अवलंब केला. १९९८ मधील शारजातील त्याच्या २ खेळी आजही अंगावर काटा आणतात. हाच मुद्दा पुढे खोलवर आणायचा झाल्यास, विशेषतः कसोटी सामन्यात सचिनकडून, त्याच्याच समकालीन ब्रायन लारा किंवा Steve Waugh खेळाडूंनी ज्याप्रकारे कसोटी सामन्यावर सातत्याने छाप उठवली आणि आपल्या संघाला पराभवाच्या खाईतून विजयाकडे नेले, अशा खेळी, विशेषतः २००३ नंतर फारशा आढळत नाहीत. बार्बाडोस इथे लाराने दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद १५३ काढून, संघाला अक्षरश: ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला आणि आपली खेळी क्रिकेट इतिहासात अजरामर केली. एक दिवसीय सामन्यात देखील काहीसा असा प्रकार दिसतो. २००६ साली, ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय Common Wealth मालिकेतील अजरामर १०३ आणि ९७ या खेळी वगळता, बहुतेक अंतिम सामन्यात सचिनला आपला प्रभाव पडत आला नाही. २००३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात, रिकी पॉंटिंगने अफलातून १३८ धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या ३५० पार नेली. त्यावेळी ही धावसंख्या अशक्यप्राय वाटायची परंतु त्याच सामन्यात सचिनने थोडेफार तरी प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते पण सचिन लगेच बाद झाला.
तसेच आपल्या घरच्या विश्वचषक सामन्याच्या अंतिम फेरीत, समोर श्रीलंकेने फक्त २९० धावसंख्येचे आव्हान ठेवले होते परंतु तेंव्हा सचिनने अपेक्षाभंग केला. दुसरे आणखी उदाहरण आठवले. लॉर्ड्स वरील गाजलेला अंतिम फेरीतील सामना आणि गांगुलीने अवघड विजयानंतर काढलेला शर्ट - या सामन्यात सेहवागने घणाघाती ८०+ धावा करून संघाचा पाय रचला होता. पुढे मात्र भारतीय संघाची पडझड झाली आणि त्यात सचिनचा सहभाग होता. पुढे युवराज आणि कैफ, यांनी दैदिप्यमान खेळी करून भारतीय संघाला सामना आणि कप जिंकवून दिला होता. त्याआधी आपला भारतीय संघ काहीवेळा अंतिम फेरीत दाखल व्हायचा पण अंतिम फेरी ओलांडायची करामत करणे अशक्य झाले होते. त्यावेळेस सचिनचे नाव त्रिखंडात दुमदुमत होते पण शेवटचा वार करण्यात सचिन अपयशी झाला होता.
२००३ नंतर सचिन फलंदाज पेक्षा जास्त करून Run Accumulator म्हणून अधिक काळ खेळला. विशेषतः कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षांत तर त्याचे रिफ्लेक्सिस खूपच मंद झाले होते. अर्थात ही वेळ सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत येत असते आणि इथेच खेळाडूने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते पण बहुदा सचिन २०० कसोटी सामने खेळायचे, या जिद्दीपोटी खेळत राहिला. २०११ चा विश्वचषक संपल्यानंतरची २ वर्षे (निवृत्त होईपर्यंत) अगदीच केविलवाणी झाली आणि १०० व्या शतकाची वेस ओलांडायला त्याला बांगला देशाच्या सामन्याची वाट बघावी लागली. त्या शतकात शान तर नव्हतीच पण एक प्रकारची मजबुरी दिसत होती.
१९९२ च्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत, त्याने पर्थ इथल्या कसोटी सामन्यात निव्वळ अजोड शतक लावले आणि चक्क रिची बेनॉचे मनापासूनचे कौतुक प्राप्त करून घेतले. तशा अद्वितीय खेळी २००३ नंतर फार अपवादस्वरूप दिसल्या. आता असे कारण देता येईल, त्यावेळे त्याला टेनिस एल्बोने ग्रासले होते. विचार करा, हाच सचिन इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये असता, तर त्याला खेळायला मिळाले असते का? Steve Waugh २००१ साली निवृत्त झाला तेंव्हा देखील त्याने नाबाद ८५ धावा करून भारताविरुद्ध संघाला सुस्थितीत आणले होते.म्हणजेच त्याचा खेळ विकलांग झाला नव्हता. सचिनने स्वतःच्या बळावर सामना जिंकवून दिला, असे चित्र जितक्या वेळा दिसणे अपेक्षित होते, तितक्या वेळा दिसले नाही, हे महत्वाचे. कारणे अनेक देता येतील. सचिन तर नेहमीच बोलायचं, मला प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे जाणवत नाही आणि जर का ते खरे असेल तर मग कुठल्या दडपणाखाली, बव्हंशी अंतिम फेरीत लवकर बाद होत असे? १०० वे शतक लागले आणि त्याने प्रथमच कबुल केले, प्रेक्षकांच्या अपेक्षांचे दडपण असल्याने, मी मोकळेपणाने खेळू शकलो नाही. सचिन "माणूस" असल्याचा हा क्षण होता.
मला तर असेच वाटते, सुनील गावस्कर वगळता,एकाही भारतीय खेळाडूला निवृत्त कधी व्हावे, हे समजून घेताच आले नाही आणि सन्मानाने निवृत्ती स्विकारता आली नाही. शेवटच्या २ वर्षांत, सचिन विरुद्ध अस्पष्ट का होईना पण निवृत्तीचे सूर ऐकायला येत होते पण अस्पष्ट अशासाठी कारण तोपर्यंत सचिन "देव" झाला होता आणि देव कसा निवृत्त होईल? ही आजारी भारतीय समाजाची मानसिक स्थिती आहे. खेळाडूची इच्छा असो वा नसो, आपला समाज त्याच्या नावाने देवघर तयार करून, त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात!! असे करण्यात, या समाजाला कसलीच लाज वाटत नाही. मग जगप्रसिद्ध सचिन कसा अपवाद ठरणार!!
सचिन खेळायला आला आणि त्याने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली. अगदी लहान वयात देखील तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरू शकता आणि आपली निर्विवाद छाप सोडू शकता. तसेच भारतीय मुलांना "स्वप्न" बघायला शिकवले. अर्थात स्वप्न बघताना, सचिनने आपले बालपण आणि तारुण्य या खेळासाठी सोडून दिले, हा भाग कुणीच लक्षात घेत नाही. तसेच त्याने किती मेहनत घेतली (निव्वळ दैवी देणगी म्हणून स्वस्थ बसला नाही आणि कुणीही तसे बसत नसते) याचा लेखाजोखा घेतला जात नाही. आपल्याला फक्त सचिनचे लखलखीत यश दिसते पण भारतीय समाज असाच आहे. जितके सहज, सोप्या पद्धतीने मिळेल, ते ओरबाडून घ्यायचे, त्याला कोण काय करणार.
Tuesday, 18 April 2023
चटका लावणारा शेवट
क्रिकेटसारख्या क्षणभंगुर खेळात, कधीही, कसेही घडू शकते. एका चेंडूवर चौकार मारला तरी पुढील चेंडूवर तोच फलंदाज बाद होऊ शकतो, तसे कित्येकवेळा घडले देखील आहे. परंतु हीच तर या खेळाची खरी लज्जत आहे. It's one ball game. त्यामुळे एखाद्या खेळीत, खेळाडू "स्थिरावला" आहे, याला फार मर्यादित अर्थ आहे. याच अर्थ असा नव्हे, स्थिरावलेला खेळाडू, खेळावर वर्चस्व गाजवू शकत नाही. परंतु असे ठामपणे सांगणे अवघड आहे. अशा कित्येक खेळी मला पाहायला मिळाल्या आहेत, जिथे पूर्णपणे फलंदाजाचे खेळावर वर्चस्व आहे आणि गोलंदाज हताश झाले आहेत. अर्थात हा खेळाचा एकांगी भाग झाला. जिथे गोलंदाज आणि फलंदाज, दोघांनाही आपले कौशल्य दाखवायची संधी मिळत असते, तिथे घडणारे द्वंद्व हे या खेळाचे खरे सौंदर्य होय. अर्थात जिथे खेळपट्टी गोलंदाज धार्जिणी असते तिथे फलंदाजांची खरी कसोटी असते. कारण तिथे कुठल्याही क्षणी तुम्ही बाद होण्याची शक्यता असते आणि अशा खेळपट्टीवर अगदी "पन्नाशी" गाठणे देखील फार जिकिरीचे असते आणि तिथे फलंदाजांचा खरा कस लागgood length तो. हे सगळे फक्त कसोटी सामन्यात बघायला मिळते. तिथे फलंदाज आणि गोलंदाज, दोघांचीही खरी कसोटी लागत असते. दोघांना समसमान संधी उपलब्ध असते. म्हणूनच कसोटी क्रिकेट हाच खेळाडूंचा अंतिम मानदंड असतो. इथे खऱ्याअर्थी "घाम" गाळावा लागतो तसेच तुमच्या कौशल्याची इतिश्री घडत असते. अशीच एक खेळी १९८७ साली मला बंगळुरू इथल्या कसोटी सामन्यात बघायला मिळाली. आजही ती खेळी कसोटी सामन्यांच्या इतिहासात अजरामर म्हणून गणली गेली आहे आणि याचे मुख्य कारण खेळपट्टी पूर्णपणे मंदगती गोलंदाजीला पोषक होती. खेळावा लागणारा चेंडू हा किंग कोब्राच्या आवेशात येत होता आणि कधीही मरणोन्मुख डंख करू शकेल, असे वाटत होते.
भारताला दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी २२१ धावा करण्याचे आव्हान होते. पाकिस्तानचा इम्रान खान, मालिका जिंकण्याच्या इर्षेने भारतात आला होता आणि पहिल्या चारी कसूरी सामने अनिर्णित अवस्थेत संपले होते. ही कसोटी १००% निर्णायक होणार आणि इथे पाकिस्तानला विजयाची संधी प्राप्त झाली होती. अडसर होता तो फक्त सुनील गावस्करचा!! या खेळपट्टीवर प्रत्येक धाव शब्दाश: लाखमोलाची होती. इथे प्रत्येक धाव "कमवावी" लागत होती. कुठला चेंडू उसळेल, लिटी वळेल, याचा अंदाज खुद्द गोलंदाजांना अचूकपणे येत नव्हता. खेळपट्टीवर चेंडू पडला की धुळीचा लोट उठायचा आणि त्यात चेंडू अचानक गिरकी घ्यायचा. अक्षरश: शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला, चेंडूकडे "टक" लावून बघायला लागायचे. अगदी, good length वर पडलेला चेंडू छातीपर्यंत उसळत होता. इथे निव्वळ तंत्र उपयोगी नव्हते तर तुमच्या मन:शांतीची प्रखर कसोटी होती. फक्त एकाग्रता असून उपयोगी नसून, त्याच्या जोडीला "आयत्या" वेळी तंत्रात बदल करायला लागण्याचे अजोड कौशल्य आवश्यक होते. सुनील इथेच असामान्य ठरला. "इक्बाल कासीम"अशक्य गोलंदाजी करत होता. बहरात २२१ धावांचा पाठलाग करताना, १४७ धावसंख्येवर अर्धा संघ परतला होता. सुनील एका बाजूने खिंड लढवत होता.
सुनीलने, या खेळीत, आपण काय दर्जाचे फलंदाज आहोत, याची जगाला जाणीव करून दिली. जर का चेंडू short pitch पडला तर मागे सारून चेंडूचा सामना करायचा, हे सर्वमान्य तंत्र पण इथे चेंडूचा टप्पा थोडा पुढे पडतो आणि चेंडू छातीपर्यंत उसळतो!! बरे, नुसताच उसळत नाही तर चेंडू अवास्तवरीत्या गिरकी घेतो!! सुनील ज्या प्रकारेक्रश चेंडूचा सामना करायचा, हे नुसते बघण्यासारखे नव्हते तर शिकण्यासारखे होते. असेच काही चेंडू त्याने सरळ सोडून दिले!! विकेटकीपर चकित व्हायचा. मिडल स्टंपवरील चेंडू, केवळ अंदाजाने सुनील सोडून देतो!! याचे कारण तो चेंडू स्टम्पवरून जाणार, याची खात्री सुनीलला होती. इतकी खात्री कुठून येते? इथेच अंदाज आणि कौशल्य याचा खरा मिलाफ दिसतो.
चेंडू छातीपर्यंत अचानक उसळला आणि सुनीलने मागील पायावर जाऊन, हातातील बॅटीची पकड हलकी करून, तो चेंडू, आपल्या पायाशीच थांबवला!! कितीजणांना हे जमू शकेल? असा चेंडू खेळताना, बॅटीची कड घेतली जाते आणि झेल उडू शकतो. हे क्रिकेटमधील सर्वमान्य दृश्य. जिथे चेंडू खेळणे, हीच कसोटी असताना, सुनीलने एक चेंडू फारसा फिरला नाही आणि आयत्या वेळेस half volley असल्याचे समजल्यावर. त्याच इक्बाल कासिमच्या बाजूने स्ट्रेट ड्राइव्ह मारून, चौकार वसूल केला. निव्वळ अशक्यप्राय घटना होती. पाकिस्तानी समालोचक देखील अवाक झाले होते आणि इथे मैदानावर इम्रान चिंताक्रांत. इम्रानला पूर्ण माहीत होते, जोपर्यंत सुनील मैदानावर आहे, तोपर्यंत विजय अशक्य. सुनील सत्तरीत आला आणि इम्रानने defensive fielding लावली. इम्रानला असे क्षेत्ररक्षण लावावे लागले, हीच सुनीलच्या त्या खेळीला मानवंदना होती.
अशा खेळपट्टीवर फलंदाजांचा अंदाज फसणे, हा अजिबात दोष नव्हता कारण तो अंदाज येणे अशक्य होते. काहीवेळा सुनीलचा देखील अंदाज चुकला आणि इथे नशिबाची साथ मिळते. परंतु त्यामुळे नाउमेद न होता, पुन्हा मन एकाग्र करणे, हीच फलंदाजाच्या कौशल्याची पावती असते. मध्येच एक चेंडू short pitch आला पण सरळ आला!! सुनीलने आयत्यावेळी मागे सरकून मिडविकेटला ड्राइव्ह मारून चौकार मिळवला. आयत्यावेळी तंत्रात बदल करून, कशा धावा मिळवता येतात, याचे हे असामान्य उदाहरण. आलेला चेंडू वळणार नाही याची खात्री केली आणि मिडविकेटला ड्राइव्ह केला. वर्षानुवर्षे जो अनुभव गोळा केला, त्या अनुभवाची प्रचिती होती. सुनीलची अतुल्य एकाग्रता, कायम सोबत असायची पण इथे निव्वळ एकाग्रता असून भागणार नव्हते तर एकाग्रतेसोबत धावा "गोळा" करणे जरुरीचे होये अन्यथा २२१ धावांचे शिखर गाठणे अशक्य. ९६ धावांच्या खेळीत फक्त ८ चौकार होते, म्हणजे ६४ धावा त्याने पळून काढल्या!! ही खेळी म्हणजे सुनीलच्या असामान्यत्वाची शिखर खूण होय. सुनील ९६ धावांवर पोहचला आणि इक्बाल कासीमचा चेंडू अचानक भयानक उसळला आणि सुनीलचा अंदाज लवणमात्र चुकला! चेंडू बॅटीच्या पट्टीतून निसटला आणि खरंतर ग्लोव्ह्ज देखील निसटले पण मनगटाला निसटता स्पर्श झाला.
एका अजरामर खेळीचा अंत झाला. इम्रान तिथेच समजून गेला, सामना आपल्या खिशात आला आणि तसेच झाले. गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर कसे खेळावे, याचा अप्रतिम मानदंड या खेळीतून सुनीलने घालून दिला. आजही सुनीलची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील अजोड खेळी मानली जाते. अगदी इम्रान सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याने खिलाडू वृत्तीने या खेळीचे कौतुक केले आहे. जिथे संपूर्ण सामन्यात, पहिल्या इनिंग मध्ये दिलीप वेंगसरकरची ५० हीच खेळी, सर्वात मोठी खेळी झालेली असताना, (पाकिस्तानच्या कुठल्याच खेळाडूने पन्नाशी गाठली नाही. अर्थात ३०, ४० अशा धावा करून त्यांनी भारताला २२१ धावांचे आव्हान दिले) त्याच खेळपट्टीवर ९६ धावांची खेळी करणे, यातच सुनीलचे अलौकिकत्व दिसून येते.
अर्थात सुनील बाद झाला तेंव्हा कुणालाच सुतराम कल्पना नव्हती, हीच सुनीलची शेवटची खेळी असेल परंतु पुढे त्याने निवृत्ती जाहीर केली आणि सन्मानाने निवृत्ती कशी घ्यावी, याचा असामान्य मानदंड प्रस्थापित केला आणि म्हणूनच या खेळीचा चटका मनाला लागला.
Tuesday, 4 April 2023
सांज ये गोकुळी
साधारणपणे मागील शतकात, ८०च्या दशकात, मराठी भावगीतांमध्ये एकप्रकारची "पोकळी" निर्माण झाली होती. काहीच नवीन घडत नव्हते आणि जी नवीन गाणी येत होती, त्यात फारसे नावीन्य नव्हते. वाद्यमेळात देखील तेच जुने "साचे" वापरले जात होते. एकूणच मरगळ आल्यासारखी स्थिती होती. वास्तविक संगीताचा नेहमीच स्वतःचा असा स्वतंत्र प्रवाह असतो आणि प्रवाह जसा पुढे सरकत असतो त्याप्रमाणे रचनेत बदल घडत असतात आणि त्याचीच वानवा होती. अशा वेळेस, "ऋतू हिरवा" हा नवीन गाण्यांचा संच बाजारात आला आणि त्या गाण्याचा बराच बोलबाला व्हायला लागला. गाण्यांत अप्रतिम कविता होत्या (ज्यांना कवितेच्या अंगाने आस्वाद घ्यायचा आहे, त्यांना तर पर्वणी होती) चालींमध्ये आधुनिकपणा तर होताच परंतु वाद्यमेळ, स्वररचना आणि गायन, सगळेच टवटवीत होते. बोरकरांपासून ते नवागत कवी नितिन आखवे, सगळ्या प्रकारच्या कवींना स्थान मिळाले होते. प्रत्येक गाणे, एक कविता म्हणून देखील स्वतंत्रपणे अभ्यासता येत होती. एकूणच हा संच लोकांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाला. प्रत्येक गाण्याचा आशय वेगळा होता तसेच त्याच्याच अनुषंगाने स्वररचना केली गेली होती.
संगीतकार श्रीधर फडक्यांनी आपले नाणे खणखणीतपणे सिद्ध केले. "ऋतू हिरवा" मधील गाण्यांनी श्रीधर फडक्यांना मानमरातब, लोकप्रियता मिळाली आणि संगीतकार म्हणून त्यांचे नाव प्रस्थापित झाले. मला वाटते, हृदयनाथ मंगेशकरांच्या नंतर मराठी भावगीतांच्या क्षेत्रात प्रथमच ज्यांना "कवी" म्हणतात ( जे शक्यतो चित्रपट संगीताच्या वाटेला फारसे जात नाहीत!!) अशांच्या कविता स्वरबद्ध झाल्या. याच संचातील "सांज ये गोकुळी" हे गाणे आज ऐकणार आहोत. या गाण्याची एक गंमत खुद्द संगीतकार श्रीधर फडक्यांनीच सांगितली आहे. त्यांच्या मनात प्रथम या गाण्याच्या चालीचा "आराखडा" तयार झाला आणि त्यांनी ती स्वरलिपी कवी सुधीर मोघ्यांकडे पाठवून दिली. कवी म्हणून सुधीर मोघे हे सिद्धहस्त होतेच. चालीचे "वजन" लक्षात घेऊन त्यांनी शब्दरचना लिहिली. आपल्याकडे चालीवर कविता बेतणाऱ्यांची शेलक्या शब्दात संभावना केली जाते, जणू काही तसे करणे, हा अधर्म झाला किंवा गुन्हा झाला!! कोत्या मनोवृत्तीचा हा परिपाक आहे. वास्तविक आपल्यासारख्या रसिकांकडे गाणे येते ते नेहमीच संपूर्णपणे रेकॉर्ड झाल्यावर आणि त्यावेळी अशी चर्चा करणे, हा वृथा खेळ आहे. आपल्या समोर असलेले गाणे काय प्रतीचे आहे, याचीच प्रतवारी लावणे, हेच योग्य.
सुधीर मोघे हे प्रासादिक. लालित्यपूर्ण कवी म्हणून ज्ञात आहेत. मुखडाच बघा, संध्याकाळ सावळी असणे आणि त्यात सावळ्या रंगाची सावली दिसणे, हेच काव्यमय आहे. आता मुखडाच संध्याकाळ विषयी आल्यावर पुढील कविता त्याचाच विस्तार असणार, हे ओघानेच आले. दूर असलेली पर्वत शिखरे आणि त्यातून दिसणारी काजळाची रेघ, ही खास प्रतिमा मनावर रेंगाळते. किंबहुना "सावळ्या" शब्दाला अनुलक्षून कवितेत बऱ्याच प्रतिमा आहेत. मग, डोहांतले सावळे चांदणे किंवा श्यामरंगात बुडालेल्या पायवाटा इत्यादी प्रतिमा "सावळ्या" शब्दाशीच निगडित आहेत. कविता वाचताना निसर्गचित्र तर उभे राहतेच परंतु कवितेच्या शेवटी, "अंधाराला फुटलेला पान्हा" आणि त्याच्या जोडीने "सगळे विश्व कान्हारुपात समोर येणे" !! इथे संध्याकाळचे चित्र पूर्ण होते. एक कवी म्हणून सुधीर मोघ्यांचा विचार करायचा झाल्यास, कविता शक्यतो छंदात लिहिलेली आढळते मागतो छंद कुठलाही असू दे. हल्लीच्या मुक्त छंदाच्या वाटेल ते फारसे गेले नाहीत आणि याचे मुख्य कारण, त्यांच्या रचना प्राय: गीतधर्मी असल्याने, स्वरांचे बंधन पाळून केलेल्या वाचायला मिळतात. अर्थात आपल्याकडे अजूनही गीतकार नामक खालची पातळी तयार केली जाते आणि गीतकाराला तद्नुषंगाने, खालच्या पातळीत ठेवले जाते. याची अजिबात गरज नसते आणि याचा वैचारिक उहापोह होणे आवश्यक आहे. उर्दूतील बहुतेक रचना गीताच्या अंगाने लिहिलेल्या आहेत, अगदी गालिब,इक्बाल सारखे मान्यवर कवी घेतले तरी त्यांच्या रचनांतून गेयता हाच प्रधान गुण आढळतो पण तिथे त्यांना *शायर* असेच संबोधले जाते, त्यांना कुणी *गीतकार* अशा शेलक्या शब्दात सांभवना करत नाहीत.
संगीतकार श्रीधर फडक्यांनी "पूर्वी" थाटातील राग (पुरियाकल्याण/पुरिया धनाश्री) समोर ठेऊन चालीचा आकृतिबंध तयार केला. खरतर ललित संगीतात रागाचे शुद्ध स्वरूप शोधावे का? हा मूलभूत प्रश्नच आहे म्हणा. मुळात संध्याकाळचे राग हे आपल्या मनाची लगेच पकड घेतात आणि इथे या गाण्याचा मुखडाच अतिशय लोभसवाण्या आलापीने सुरु होतो आणि आपण त्यातच गुंगून जातो.
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
गम' ग गरेसासा, निनिम' म'रेग
अंतरे मात्र त्याच सुरावटीत बांधले आहेत. गाण्याची लय मध्य लयीत ठेवल्याने आणि ताल सर्वव्यापी असा "दादरा" योजला असल्याने, कविता देखील गाणे ऐकता, ऐकता आस्वादता येते. वाद्यमेळ प्रामुख्याने संतूर/बासरीने तोलला आहे. एकूणच मनात चाल रुंजी घालते. वाद्यांचा माफक वापर असल्याने आशय गुदमरत नाही. एकूणच मराठीत भावसंगीतात फार पूर्वीपासून वाद्यांचा नेहमीच माफक वापर आढळतो. मराठी स्वररचनाकारांच्या मते, गाण्याची चाल महत्वाची!! चाल उत्कृष्ट असेल तर मग वाद्यमेळाचे इतके स्तोम माजवण्याचेकाहीच कारण नाही, असे मत बहुतेक रचनाकारांकडून ऐकायला मिळते. त्यातून *ऋतू हिरवा* मधील सगळीच गाणी खाजगी स्तरावरची म्हटल्यावर वाद्यांच्या वापरावर बंधने येणे क्रमप्राप्तच ठरते. अर्थात याची दुसरी बाजू देखील बाजूला टाकता येत नाही पण एकूणच हा विषय फार मोठ्या चर्चेचा होतो.
वास्तविक वडील प्रख्यात गायक/संगीतकार तरीही या संगीतकाराने स्वतःची अशी स्वतंत्र वाट चोखाळली आणि आपले नाणे खणखणीत वाजवले. आपली स्वतःची शैली निर्माण करणे हे आणि संगीतकार म्हणून हे श्रेय श्रीधर फडक्यांचेच. येऱ्यागबाळ्याचे काम नाही. विलक्षण प्रज्ञा लागते आणि ती या संगीतकाराने वारंवार दाखवली आहे. गाणे ऐकताना, आपल्या सतत ध्यानात येते, ते संगीतकाराची काव्यविषयक जाण. असे सांगण्यात आले आहे की, या गाण्याची सुरावट आधी जन्माला आली आणि ती स्वररचना, कवी सुधीर मोघ्यांकडे पाठवली गेली. याचाच अर्थ, "आधी चाल, मग शब्द" अशी आधुनिक प्रथा स्वीकारली गेली. अर्थात आपण रसिकांच्या दृष्टीने "अंतिम परिणाम" महत्वाचा आणि तिथे हे गाणे अगदी चोख आहे.
या रचनेचे गायन हा विषय तर खास वेगळा करावा लागेल. आशा भोसले यांचे परिपूर्ण गायन, अचूक शब्दोच्चार आणि जरूर आहे तिथेच हलके असे खटके, ही सौंदर्यस्थळे म्हणता येईल. सुरवातीलाच घेतलेला हुंकारात्मक आलाप, इतका अवघड आहे की त्याचे यथार्थ शब्दात वर्णन करणे अशक्य. "श्यामरंगात वाटा बुडाल्या" ही ओळ गाताना, "श्यामरंगात" इथे किंचित बारीक असा खटका आहे पण त्यामुळे कवितेतील ती प्रतिमा आपल्या मनावर ठसते. तसेच त्याच अंतऱ्याचा शेवट करताना, "पैल घंटा घुमे राउळी" मधील "घंटा" शब्द जितका स्पष्टपणे गायला जायला हवा, त्याच वजनाने गायला गेला आहे आणि त्या अंतऱ्याचा सगळा "तोल" सांभाळला गेला आहे. ही कामगिरी सहज जमणारी नाही. गाण्याच्या शेवटी "अमृताच्या जणू ओंजळी" गाताना जणू आपल्या ओंजळीतच हा स्वरांचा नजराणा पेश केला आहे, या थाटातच गायले आहे. त्या स्वरांतील आर्जव (आता ओंजळ म्हटल्यावर ते अध्याहृतच आहे) निव्वळ अप्रतिम आहे. आशाबाईंच्या आवाजाचा खूप दिवसांनी ज्याला *भोगवादी गायन* असे सार्थपणे म्हणता येईल, अशा प्रकारचे गायन ऐकायला मिळाले. गायकी ढंगाची स्वररचना आपण कशाप्रकारे खुलवून गाऊ शकतो, याचा एक सिद्धहस्त मानदंड त्यांनी पेश केला आहे.
अर्थात इतके सगळे घटक एकजीव झाल्यावर निर्माण होणारी रचना ही काळावर आरूढ होऊन, आपल्या मनावर गारुड टाकणारी झाली तर त्यात नवल ते कुठले!!
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
माउली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
Sunday, 2 April 2023
सुनो सजना पपिहे ने
गाण्याची चाल तयार करताना, बहुतेक रचनाकार मुखड्याच्या स्वररचनेची अतिशय बारकाईने बांधणी करतात आणि ती बांधणी अधिकाधिक वेधक, पटकन ऐकणाऱ्याच्या मनात ठसेल, अशा प्रकारची रचना, गाण्याचा मुखडा बांधताना करतात. अर्थात गाण्याचा मुखडा आणि बरेचवेळा मुखडा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ आणि त्याची रचना, ही अतिशय बारकाईने केली जाते.
या गाण्याची सुरवातच फार अवघड आहे. गाण्याच्या बाबतीत एक वैशिष्ट्य नेहमी सांगितले जाते, गाण्याचा "मुखडा" मन खेचून घेणारा हवा म्हणजे पुढील रचना आणि बांधकाम सहज आणि सोपे होऊन जाते. इथे सुरवातीला स्वरमंडळाचे स्वर गुंजत असताना,क्षणात व्हायोलीनच्या स्वरांचे आवर्तन कानावर येते. हे आवर्तन देखील किती गुंतागुंतीचे आहे!! "नि सा ग म" या सुरांनी बिहाग रागाची ओळख पटते पण गंमत अशी आहे हे सूर सुरवातीलाच तार सप्तकात जातात आणि हळूहळू शुद्ध स्वरांना स्पर्श करून खर्जात स्थिरावतात. लगेच, याच लयीत लताबाईंचा "आलाप" सुरु होतो आणि मानवी गळा सर्वश्रेष्ठ याची अप्रतिम साक्ष मिळते. हा आलापच गाण्याचा मुखडा आपल्या समोर ठेवतो. हा आलाप किती जीवघेणा आहे. या आलापीचा शेवट थोड्या बारकाईने ऐकला तर तिथे शेवटाला स्वरांना वळण देताना, किंचितसा "खटका" आहे. फार कठीण आहे, ही गायक. जेंव्हा लय, एका मार्गाने चालत असताना, त्याच मार्गात किंचित वेगळे वळण देणे, ही गळ्याची परीक्षा आहे.
"सुनो सजना, पपिहे ने कहा सब से पुकार के
साप-- ममप --पप सा'ध पपप म गग गग मरे सासा नि' प नि--सा' निध प
संभल जाओ चमन वालो, के आये दिन बहार के"
सा पss म' म' प पपसा ध पमग ग ग म रे सा सा रे प नि रे सा नि ध प
या सुरावटीतून गाण्याच्या स्वररचनेची सिद्धता होते. अर्थात हा सगळा तांत्रिक भाग झाला.
या धृवपदाच्या ओळी. सुरवातीला आलापीद्वारे संपूर्ण स्वरावकाश ताब्यात घेऊन, पहिल्या ओळीवर पुन्हा, "पुकार के" हे शब्द गाताना, तोच स्वराविष्कार दाखवणे, कमालीचे मुश्किल आहे, म्हणजे गाण्याचे गाताना, लय मंद्र सप्तकात आहे पण, अचानक, तार सप्तकात "पुकार के" हे गायचे, म्हणजे लय कुठही खंडित न होता त्याच लयीत वरचा स्वर लावायला सुचणे आणि ते क्षणात प्रत्यक्षात आणून दाखवणे, केवळ अचाट!!
पुढील ओळीत देखील, लयीचा असाच अप्रतिम आविष्कार दाखवला आहे. "के आये दिन बहार के" या इथे देखील पहिल्या ओळीसारखेच "बहार के" या शब्दावर स्वरांची करामत दाखवली आहे. गाणे गायला अवघड होते, ते अशा ठिकाणी. ऐकताना, आपल्याला ही सहज प्रक्रिया वाटते पण प्रत्यक्षात गाताना, अवघडलेपण समजते.
पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाची तबल्याने साधलेली लय आणि त्याला, संतूर, बासरीच्या स्वरांची साथ कशी एकजीव झालेली आहे. सुरवातीला तबल्याची धीमी गत आहे आणि त्याला संतूरच्या सुरांची जोड आहे, पुढे लगेच बासरी येते आणि स्वनरंग बदलतो. त्याच बासरीत व्हायोलिनचे स्वर मिसळतात आणि हा सगळा वाद्यरंग, मूळ लयीला येउन मिळतो. संगीतकाराला प्रयोग करायला ज्या संधी उपलब्ध असतात, त्यात अंतऱ्याचे संगीत प्रामुख्याने येते.
"फुलों की डालिया भी यही गीत गा रही है,
घडिया पिया मिलन की नजदीक आ रही है,
हवाओ ने जो छेडे है, फसाने है वो प्यार के"
आता इथे संगीतकाराने एक गंमत केली आहे. ध्रुवपदाची स्वररचना आणि आता इथे सुरु होणारी चाल, यात फरक आहे. पहिलीच ओळ तार स्वरात सुरु होते आणि ती हळूहळू खाली येते. हे जे खाली येणे आहे, हाच लयीचा बिकट प्रवास असतो. इथे एका श्रुतीची जरी फारकत झाली तरी सगळी रचना बेडौल होऊ शकते आणि तीन मिनिटांच्या गाण्यात याला तर अतिशय महत्व असते. आता, बघा, "घडिया पिया मिलन की नजदीक आ रही है" या ओळीत प्रणयाची असोशी आहे आणि ती प्रणयोत्सुक अवस्था स्वरांतून दाखवणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने, लताबाईंनी "मिलन की" इथे घेतलेली हरकत ऐकावी. गाणे शब्दप्रधान कसे असू शकते, याचा उत्तम नमुना. शब्दातून मांडलेला आशय, स्वरांतून किती अप्रतिमरित्या अधोरेखित केला जातो, याचा हा आदीनमुना म्हणता येईल. "हवाओ ने जो छेडे है, फसाने है वो प्यार के" ही या अंतऱ्याची शेवटची ओळ. इथे, "हवाओ ने" यातील "ने" शब्दावर तालाच्या मात्रेची सम ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे किंचित वर उचलले जाते आणि हे जे वर उचलले गेले आहे, ते पुढे "वो प्यार के" म्हणताना, मुळातल्या तार स्वरावर आणून जोडलेली आहे. याचाच अर्थ, इथे रचनेचे संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाले. सांगीतिक करामत म्हणतात ती अशी.
दुसरा अंतरा सुरु होतो, तिथे सतारीची छोटीशी "गत" आहे आणि सतारीचे ते स्वरबंध देखील फारच मनोवेधक आहेत. सतारीचे स्वर आंदोलित होत असताना, त्यात बासरीचे स्वर असे बेमालूम मिसळेले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे स्वर संपत असताना, परत सतार अवतरते पण तिथे स्वर मात्र अधिक सूक्ष्म आंदोलन घेतात. पाण्यावरील हेलकाव्यागणिक स्वरांचे हिंदकळणे केवळ अफाट आहे.
"देखो ना ऐसे देखो, मर्जी है क्या तुम्हारी,
बेचैन कर ना देना, तुमको कसम हमारी,
हमी दुश्मन ना बन जाये, कही अपने करार के"
मघाशी एका वैशिष्ट्याचा उल्लेख करायचा राहून गेला आणि त्याचा इथे उल्लेख करतो. कडव्यातील पहिली ओळ एका संथ लयीत चालत आहे पण, दुसरी ओळ मात्र, किंचित द्रुत लयीत शिरते, क्षणमात्र सगळे आहे पण त्यामुळे जरी मुळातली चाल संथ असली तरी गाण्याला असा "वेग" मिळाल्याने, चाल कुठेही रेंगाळत नाही. "बेचैन कर ना देना, तुमको कसम हमारी," हीच ती ओळ, आत्ता मी म्हणत होतो. लताबाईंची कमाल अशी आहे, दुसऱ्या ओळीत गाणे किंचित जलद होते तशी त्यांनी घेतलेल्या हरकती, मुरक्या ( या केवळ याच बाईंच्या गळ्यातून येऊ शकतात) त्याच अनुरोधाने येतात आणि सगळे गाणे अधिक बांधीव होते. खरतर, या गाण्यातील ज्या प्रत्येक शब्दाप्रती हरकती, मुरक्या आणि खटके आहेत, त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास व्हायला हवा. त्यातली कुठलीही हरकत, "उगीच" म्हणून घेतलेली नाही तर जे शब्द आपल्या हाताशी आहेत, त्यातील दडलेला नेमका अर्थ अधिक खोलवर दाखविण्याकडे सगळा भर आहे.
"बागो मे पड गये है, सावन के मस्त झुले,
ऐसा समा जो देखा, राही भी राह भुले,
के जी चाहा यही रख दे, उमर सारी गुजर के"
कुठल्याही उत्तम गाण्याचे वैशिष्ट्य सांगताना, काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात पण त्यामुळे त्यातील सौंदर्य फारसे ध्यानात येत नाही. उदाहरणार्थ, गाण्यातील तालाचे महत्व. गाणे नृत्यावर आधारित असेल तर तिथे ताल, एक प्रमुख घटक म्हणून वावरतो परंतु प्रणयी किंवा शोकात्म गाण्यात तालाचे महत्व फारसे जाणवत नाही किंवा आपण जाणवून घेत नाही. या गाण्यात, मघाशी मी दुसरी ओळ (प्रत्येक कडव्यात तोच बंध आहे) गाताना, सुरवातीला फक्त लताबाईंचा आवाज आहे - म्हणजे दुसरी ओळ जलद गतीतून परत मूळ गतीत आल्यावर, "के जी चाहा यही रख दे" यातील सुरवातीला फक्त लताबाईंच्या आवाजात शब्द येतात पण, दुसऱ्यांदा हे शब्द गाताना, परत "जी" शब्दावर समेची मात्र आहे आणि मात्र घेतल्यावर तालाचे वर्तुळ पूर्ण करून, "चाहा" या शब्दावर परत, तालाची पहिली मात्रा येते. लय आणि मात्रा याचा अनोखा संगम ऐकायला मिळतो. काही क्षणांचा हा आविष्कार आहे पण विलोभनीय आहे.
आता संगीतकार म्हणून काही महत्वाच्या बाबी नोंदवणे आवश्यक वाटते. जेंव्हा या जोडीने चित्रपट क्षेत्रात स्वतंत्रपणे यायचे ठरविले तेंव्हा इथे शंकर/जयकिशन यांचा प्रभाव प्रचंड होता आणि या जोडीच्या सुरवातीच्या रचनांवर तसा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. त्यादृष्टीने सपाट, अनलंकृत थेटपणे गाण्याची शैली व्यवस्थित पचवली. रागाचा आधार घेऊन, रागापासून गाण्याचे अस्तित्व दूर ठेवण्यात, त्यांच्या काही रचना निश्चितपणे प्रशंसेला पात्र ठरतात. प्रस्तुत गाणे "बिहाग" रागावर आधारित असं म्हणता येईल. वेगळ्या शब्दात, मुखड्यापुरता रागाधार घेऊन पुढे स्वतंत्र वाटचाल करायची. अर्थात वादच घालायचा झाल्यास, राग, ताल व इतर रूढ प्रकारापासून दूर सरकण्याचा कल दाखवला पण हे तर कुणाही रचनाकारांना जमू शकेल. मग मुद्दा असा येतो, असे साधून या जोडीने नेमके काय साधले? याच गाण्याचा थोडा वेगळा विचार केल्यास, कलासंगीताशी संबंधित असा ठराविक साचा योजलेला नाही आणि वाद्यवृंद देखील अतिशय मर्यादित स्तरावर ठेवलेलाआहे. पूर्ण प्रयत्नांती फारशी गुणगुणणारी चलने रेंगाळत नाहीत पण त्यापलीकडील एक सांगीत गुंतागुंत अस्वस्थ करून जाते आणि हे यश नक्कीच मानायला हवे.
असे कितीतरी अप्रतिम सांगीतिक क्षण या गाण्यात अनुभवायला मिळतात आणि ते क्षण अनुभवाने, हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
(39) Suno sajna papihe ne Lata Mangeshkar - YouTube
Saturday, 1 April 2023
आजचे कुमार गंधर्वांवरील लेख
प्रिय संपादक,
आजच्या आपल्या लोकरंग पुरवणीतील प्रस्तुत विषयावरील २ दीर्घ लेख वाचले. बरीच उत्सुकता होती. परंतु काही प्रमाणात निखळ निराशा पदरी पडली, असे माझे मत झाले आहे. मुळात, अतुल देऊळगावकरांनी जागतिक घटनांची जंत्री मांडायचे प्रयोजन काय? हेच कळत नाही. १) कुमार गंधर्वांच्या सांगीतिक कारकिर्दीवर या जागतिक घटनांचा परिणाम झाला, असे सुचवायचे आहे का? तसे असेल तर त्याचे व्यवस्थित विश्लेषण आणि कुमारांच्या सांगीतिक कारकिर्दीवरील परिणामांची मीमांसा होणे गरजेचे होते. २) असे तर नव्हे जागतिक घटनांवर कुमारांच्या संगीताचा प्रभाव पडला,असे सुचवायचे आहे!! हे खूपच अति झाले, असे म्हणायला हवे. तेंव्हा अशा लेखातून नेमके काय सिद्ध करायचे आहे. जागतिक घटना घडतात, त्यावर एखाद्याच व्यक्तीचा प्रभाव असतो, हे फार धाडसी विधान झाले. तसेच सांस्कृतिक बदल - अगदी भारत देशापुरता विचार केला तरी या देशाचे सांस्कृतिक बदल हे काही ठराविक एका कलावंताच्या अस्तित्वाने, विचाराने किंवा कृतीने घडले आहेत, असे अजिबात म्हणवत नाही. मी अतुल देऊळगावकरांचा लेख २,३ वेळा वाचूनही मला त्या लेखाचे प्रयोजन ध्यानात आले नाही. कदाचित माझी आकलनशक्ती तितकी सदृढ नसेलही.
आता मुकुंद संगोराम यांच्या लेखातील उल्लेख. कुमार गंधर्वांच्या रागदारी गायनाबाबत कुणालाही संशय व्यक्त करता येणार नाही, इतकी प्रचंड कामगिरी त्यांनी केली आहे आणि यात अजिबात संशय नाही. परंतु "नाट्यगीत","गीतवर्षा" तसेच "गीतहेमंत" या कार्यक्रमातील सांगीतिक रचनांबाबत. वास्तविक रागदारी संगीत आणि उपशास्त्रीय संगीत, हे दोन्ही स्वतंत्र संगीताचे प्रकार आहेत आणि दोन्ही ठिकाणी गायकी ही वेगळ्या स्तरावर वावरत असते. "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी" ही गाणे उदाहरण म्हणून घेतल्यास, गायन करताना, शब्दांची यथेच्छ मोडतोड करून गायले आहे. जर असेच गायचे होते तर मग कविता कशासाठी घ्यायची? नाट्यगीत म्हणजे बंदिश नव्हे. तिथे शब्दांना योग्य ते महत्व द्यावे लागते. वसंतराव देशपांड्यांनी एका कार्यक्रमात सप्रमाण सिद्ध केले होते.
"गीत वर्ष" आणि "गीत हेमंत" या कार्यक्रमाबाबत हेच म्हणता येईल. हे शब्दप्रधान संगीत आहे तेंव्हा शब्दांना योग्य ते महत्व देणे अगत्याचे ठरते आणि कुमारांचे शब्दोच्चार हे नेहमीच लडबडीत व्हायचे तसेच "गायकी" दाखवण्याच्या नादात शब्दांची "किंमत" हलकी होते, या कडे फारसे लक्ष दिले गेले नाही. आणखी उदाहरण देतो - कवी अनिलांची कविता - "आज अचानक गाठ पडे.हे गीत ऐकावे, ही ललित संगीतातील स्वररचना आहे, हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे. कवितेत "अचानक गाठ" पाडण्यातली मजा, गायनातून कधीच दृग्गोचर होत नाही. ऐकायला मिळते ते बंदिशसदृश गायन!! कुमारांनी आपल्या सांगीतिक कल्पनांसाठी कवी अनिलांच्या कवितांचा बाली दिला,असे खेदाने म्हणावेसे वाटते. परंतु कुमार गंधर्वांचा दबदबा इतका की कुणीही या विषयावर सखोल विश्लेषणाने बोलत नाही. यालाच "व्यक्तिपूजा" म्हणतात. मला, प्रभाकर जठारांचा कुमारचा साईबाबा करू नका!! हा लेख आठवला आणि दुर्दैवाने, तशीच परिस्थिती उद्भवली आहे.
आपल्याकडे व्यक्तिपूजेचा रोग सगळ्या क्षेत्रात पसरलेला आहे. असंख्य उदाहरणे देता येतील. असो, मला जे मनापासून वाटले, ते इथे तुम्हाला लिहून पाठवले आहे.
अनिल गोविलकर
तुम अपना रंज-ओ-गम
हिंदी चित्रपट हा बहुतांशी प्रणयी भावनेशी अधिकाधिक निगडीत असतो आणि त्या भावनेचीच कास धरून, चित्रपट निर्मिती होत असते. अगदी पूर्वापार धांडोळा घेतला तरी हेच सत्य आपल्या हाती येते. त्यामुळे सादरीकरणात देखील बरेचवेळा तोचतोचपणा येतो आणि एकुणातच आविष्कार बेचव होऊन जातो. अर्थात, या अनुभवाला छेद देणारी निर्मिती अनुभवायला मिळते पण त्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणावे इतपतच असते.
या पार्श्वभूमीवर हिंदी गाणी फारच उठून दिसतात. काव्य, संगीत रचना याबाबतीत विलक्षण चोखंदळ वृत्ती दिसते आणि त्यानुरूप आपल्या रसिकतेच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याचे अनन्यसाधारण श्रेय घेऊन जातात. अगदी प्रणयी भावना जरी विचारात घेतली त्यातील अनेक छटांचे विलोभनीय स्तर आपल्याला दिसतात आणि या भावनेतील खोलीची मुक्त, आश्वासक आणि गहिरी परिमाणे जाणवतात.
खरतर प्रणयी भावना म्हणजे त्यात पुरुष आणि स्त्री यांच्या सहभागाचा आविष्कार इतपत जरी स्वरूप ध्यानात घेतले तरी त्या नात्यातील असंख्य विभ्रम शब्दाधारे कवींनी व्यक्त केलेले आहेत आणि आपल्या जाणीवा सजग केल्या आहेत.
१९६४ साली आलेल्या "शगुन" चित्रपटात हेच कथासूत्र कायम ठेऊन निर्मिती केली आहे. वहिदा रेहमान आणि कंवलजीत यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपट तसा यथातथाच आहे - अगदी अभिनय, दिग्दर्शन इत्यादी पातळींवर विचार करता काहीच असामान्य नाही परंतु चित्रपटातील गाणी मात्र नि:संशय अप्रतिम आहेत. प्रसिद्ध कवी साहिर यांच्या काही रचना तर निव्वळ कविता म्हणून दाद देण्याइतपत सुंदर आहेत. " तुम अपना रंज-ओ-गम" हे गाणे याच अनुभवाची निखळ साक्ष देणारे आहे.
दोन तरुण अकल्पित भेटतात, एकमेकांवर अनुरक्त होतात, लग्नाच्या आणाभाका घेतल्या जातात परंतु नेहमीप्रमाणे लग्नात विघ्न येते - मुलीला "मंगळ" असल्याचा साक्षात्कार होतो आणि तिच्या जीवनाची परवड सुरु होते. अशाच एका हुरहूरत्या रात्रीच्या कातर अवस्थेची नेमकी वेदना कवी सुरेश भट यांनी खालील ओळीत मांडलेली आहे.
"वेदनेला अंत नाही आणि कुणाला खंत नाही,
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी;
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे… लोचने आता मिटावी".
जवळपास हीच वेदना साहिरने आपल्या या गाण्यात मांडली आहे. संगीतकार खैय्याम यांनी या गाण्याची चाल बांधताना, पहाडी रागाचा आधार घेतला आहे पण त्याचबरोबर त्यात, पंजाबी ढंग मिसळलेला आहे.त्यामुळे गाण्याचा ढंग बदलला गेला.
गाण्याची स्वररचना स्पष्टपणे "पहाडी" रागावर आधारलेली आहे. लोकसंगीतातून,कलासंगीतात जे थोडेफार राग प्रस्थापित झाले, त्यातील महत्वाचा राग होय.
तुम अप ना रंज ओ गम/ अपनी परेशानी / मुझे दे दो
प-- मम पपप ग/ ग रे ग-----/ गमग रे रे रे---धधसा / सा रेग रेरे सा
अशा धर्तीवरील सुरावट ऐकायला मिळते. वर मी म्हटल्याप्रमाणे लोकसंगीतातून हा राग आला असल्याने, त्यात वारंवार वेगवेगळ्या तऱ्हेने भर पडते गेली जसे इथे पंजाबी ढंग ऐकायला मिळतो.
गाण्याच्या सुरवातीचे पियानोचे स्वर ऐकायला हवेत. तिथे आपल्याला पहाडी रागाचे सूर ऐकायला मिळतात. त्या सुरांनीच गाण्याची लय आणि दिशा ठरवली आहे आणि त्या सुरावटीतून गायिका जगजीत कौर यांचे सूर ऐकायला मिळतात. तालासाठी ढोलक वापरले आहे आणि त्याचा नाद अतिशय हलका ठेवला आहे. गाण्याचा "मुखडा" किती आकर्षक आहे, शब्दांनी आणि सुरांनी देखील मुखडा विलक्षण देखणा बनवला आहे, गझल सदृश रचना आहे पण पारंपारिक गझल थाटाची स्वररचना टाळून, गाण्याला अधिक "गीतधर्मी" केले आहे. परिणाम असा होतो, गाणे पहिल्यापासून आपल्या मनात रुतून बसते. चालीच्या बाजूने विचार केल्यास, जरी पियानोवर पहाडी रागाची सावली निर्माण केली असली तरी गायन मात्र पंजाबी लोकसंगीताच्या स्पर्शाने केले आहे. परिणामस्वरूप रागाला बाजूला ठेवले जाते.
तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम इस दिल की विरानी मुझे दे दो
गाण्याचे शब्द कसे असावेत, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरावे. "रंज-ओ-गम" च्या जोडीला "परेशानी" हा शब्द कसा चपखल बसला आहे.उत्तम भावकवितेची एक गरज असते. तिथे शब्दरचना अशी असावी की तिथे वापरलेल्या शब्दाला प्रतिशब्द वापरावा, असे चुकूनही वाटू नये. हिंदी चित्रपटात, हृदयभंग वगैरे प्रसंगांची रेलचेल असते आणि त्यानिमित्ताने, गाणी देखील प्रचंड प्रमाणात निर्माण होतात. अशा वेळी, तोच भावप्रसंग अत्यंत सशक्त शब्दात मांडणे, ही तारेवरची कसरत असते आणि साहिर या पातळीवर पूरेपुर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो. गाण्याची चाल(च) अशी बांधली आहे की तिथे अकारण हरकती, ताना यांना फाटा देणे आवश्यक होते. याचा अर्थ, गायन सरधोपट आहे, असा अजिबात नव्हे. लयीची वळणे(च) इतकी मोहक आहेत की गाताना, "गायकी" दाखवावी, ही गरजच निर्माण होत नाही.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात पियानोचे स्वर प्रमुख आहेत पण पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर तरळत आहेत. ही स्वररचना मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. पियानो वाजवताना, किंचित पाश्चात्य वादनाची धाटणी स्वीकारली आहे. पियानो वाद्यावर स्वरांची सलगता गाठणे शक्य नसते आणि त्यामुळे आघाती स्वरांतून लयीची भरीवता सादर करायची असते. तंतुवाद्यात किंवा पियानो सारख्या वाद्यात,वादन करताना, हीच पद्धत अवलंबिली जाते. अशा स्वरांमुळे, गाण्याची रचना अधिक समृद्ध होत असते.
ये माना मैं किसी काबिल नहीं हुं इन निगाहो में
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुझे दे दो
हा अंतरा गाताना, पहिली ओळ सरळ, मुखड्याच्या स्वरावलीच्या विरुद्ध अंगाने गायली आहे पण हीच ओळ परत गाताना, "इन निगाहो में" किंचित वरच्या सुरांत गायली आहे आणि तोच सूर पकडून, पुढील ओळ गायली आहे. इथे संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसते. धृवपदाच्या चालीतून, गाण्याचे सूचन नेहमीच होत असते पण पुढे गाण्याची चाल, वेगवेगळी "वळणे" घेत श्रीमंत होत असताना, भारतीय संगीताच्या तत्वानुसार "समेच्या" मात्रेकडे लय विसर्जित होते. हा जो स्वरांचा प्रवास असतो, तो अवलोकणे, व्यामिश्रतेचा भाग असतो.
मैं देखू तो सही दुनिया तुम्हे कैसे सताती हैं
कोई दिन के लिये अपनी निगेबानी मुझे दे दो
हा अंतरा कवितेच्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. इथे दुसऱ्या ओळीत "निगेबानी" हा शब्द आला आहे जो मुळातल्या, "निगेबान" - "निगेहबान" अशा शब्दावरून तयार झाला आहे. कविता लिहिताना, शब्दांची नव्याने मांडणी करणे आवश्यक ठरते आणि त्यानुसार, कवी असे स्वातंत्र्य नेहमी घेत असतात, जेणेकरून आशयाच्या नव्या छटा निर्माण होतात. एका बाजूने, "मैं देखू" - "तुम्हे दुनिया कैसे सताती हैं" असा संत्रस्त सवाल करायचा आणि त्याचा बाजूने दुसऱ्या ओळीत "निगेबानी मुझे दे दो" असा अप्रतिम विरोधाभास देखील दाखवायचा!! साहिर कवी म्हणून इतरांपेक्षा वेगळा होतो, तो असा.
गाण्याची चाल बांधताना, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो. गाण्याच्या सुरवातीला मी पहाडी रागाचा उल्लेख केला होता आणि त्याचबरोबर पंजाबी लोकसंगीताचा. त्याचा इथे सुरेख वापर झालेला दिसतो. मुखडा रागाधारित आहे आणि हा अंतरा देखील त्याच रागाशी तादात्म्य राखून आहे तरीही स्वरांची "उठावण" भिन्न आहे. संगीतकार खैय्याम, एकाच रागाच्या सुरांशी किती भिन्न प्रकारे खेळत आहे.
वो दिल जो मैंने मांगा था मगर गैरो ने पाया था
बडी शय हैं अगर उसकी पशेमानी मुझे दे दो
इथे देखील आपल्याला शायर साहिर भेटतो. दुसऱ्या ओळीत "शय' शब्द आहे ज्याचा नेमका अर्थ, "बक्षीस" किंवा "सौंदर्य" अशा प्रकारे घेतला जातो. वरती मी म्हटल्याप्रमाणे, शब्दांची नव्याने "घडणावळ"करणे, भावकवितेचे अनन्यसाधारण सामर्थ्य आहे आणि साहिर सारखा कवी, आपल्याला अशा मांडणीतून आपल्या नव्या जाणीवा दाखवून देतो.पुढे "पशेमानी" या शब्दाचा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे या ओळीची खासियत समजते. अरेबिक शब्द "पशेमान" वरून हा शब्द आलेला आहे. "शरमिंदा" या भावनेशी जवळीक दाखवणारा हा शब्द आहे. हे एकदा कळल्यावर मग, "शय" आणि "पशेमानी" या शब्दांची संगती लागते आणि कविता म्हणून या गाण्याचा आनंद आपण अधिक घेऊ शकतो.
साहिरच्या कवितेबाबत थोडेसे. मुळात कविता घडते शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे असावेच लागते, पण हे सगळे गृहीत धरावे लागते. याचे महत्वाचे कारण म्हणजे याची जाणीव देखील व्हायची ती अखेर शब्दांच्याच द्वारे!! आशय गृहीत धरल्यावर कवीनं पुढे काय केलं, हेच सर्वार्थाने महत्वाचे ठरते. आणि इथे प्रश्न उभा राहतो तो भाषेचा!! भाषेच्या घटकांचा, घटकांच्या घडणीचा. भाषा-शरीराशी देखील तितकाच महत्वाचा. आणि जोपर्यंत एखाद्या कवितेत आशय हा पूर्णपणे भाषेतून वेढला गेला आहे, केवळ "शब्द" हेच एक अपरिहार्य असे अभिव्यक्तीचे रूप ठरते, असे जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत "कविता" ही पूर्णत्वाने सिद्धच होत नाही. साहिरच्या बऱ्याचशा कविता या पातळीवर सिद्ध होतात.
गायिका म्हणून जगजीत कौरच्या आवाजाला काही मर्यादा आहेत. गायन शक्यतो शुद्ध स्वरी सप्तकात होते, क्वचित एखादा स्वर वरच्या सुरांत लावला जातो पण तिथे देखील नाममात्र "ठेहराव" असतो तसेच अवघड हरकती किंवा ताना कितपत जमतील अशी शंका घ्यायला जागा उरते.
प्रस्तुत गाण्याची चाल बांधताना, खैय्याम यांनी रचनेत जरी स्वरविकासाला जागा ठेवल्या आहेत तरी देखील, मुळातली चालीतली मोहकता इतकी अप्रतिम आहे की तिथे
कुठल्याही प्रकारचा विस्तार अक्षम्य ठरेल आणि मुळात कवितेतील आशयाला बाधक ठरेल. "शब्दकळा","स्वररचना" आणि "गायन" या घटकांचा अत्यंत सुयोग्य समन्वय फारच थोड्या गाण्यांच्या बाबतीत आढळतो. मला वाटते, हेच एकमेव कारण, मला या गाण्याकडे वारंवार ऐकायला भाग पाडते.
हिंदी चित्रपट हा बहुतांशी प्रणयी भावनेशी अधिकाधिक निगडीत असतो आणि त्या भावनेचीच कास धरून, चित्रपट निर्मिती होत असते. अगदी पूर्वापार धांडोळा घेतला तरी हेच सत्य आपल्या हाती येते. त्यामुळे सादरीकरणात देखील बरेचवेळा तोचतोचपणा येतो आणि एकुणातच आविष्कार बेचव होऊन जातो. अर्थात, या अनुभवाला छेद देणारी निर्मिती अनुभवायला मिळते पण त्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणावे इतपतच असते.
या पार्श्वभूमीवर हिंदी गाणी फारच उठून दिसतात. काव्य, संगीत रचना याबाबतीत विलक्षण चोखंदळ वृत्ती दिसते आणि त्यानुरूप आपल्या रसिकतेच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याचे अनन्यसाधारण श्रेय घेऊन जातात. अगदी प्रणयी भावना जरी विचारात घेतली त्यातील अनेक छटांचे विलोभनीय स्तर आपल्याला दिसतात आणि या भावनेतील खोलीची मुक्त, आश्वासक आणि गहिरी परिमाणे जाणवतात.
खरतर प्रणयी भावना म्हणजे त्यात पुरुष आणि स्त्री यांच्या सहभागाचा आविष्कार इतपत जरी स्वरूप ध्यानात घेतले तरी त्या नात्यातील असंख्य विभ्रम शब्दाधारे कवींनी व्यक्त केलेले आहेत आणि आपल्या जाणीवा सजग केल्या आहेत.
१९६४ साली आलेल्या "शगुन" चित्रपटात हेच कथासूत्र कायम ठेऊन निर्मिती केली आहे. वहिदा रेहमान आणि कंवलजीत यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपट तसा यथातथाच आहे - अगदी अभिनय, दिग्दर्शन इत्यादी पातळींवर विचार करता काहीच असामान्य नाही परंतु चित्रपटातील गाणी मात्र नि:संशय अप्रतिम आहेत. प्रसिद्ध कवी साहिर यांच्या काही रचना तर निव्वळ कविता म्हणून दाद देण्याइतपत सुंदर आहेत. " तुम अपना रंज-ओ-गम" हे गाणे याच अनुभवाची निखळ साक्ष देणारे आहे.
दोन तरुण अकल्पित भेटतात, एकमेकांवर अनुरक्त होतात, लग्नाच्या आणाभाका घेतल्या जातात परंतु नेहमीप्रमाणे लग्नात विघ्न येते - मुलीला "मंगळ" असल्याचा साक्षात्कार होतो आणि तिच्या जीवनाची परवड सुरु होते. अशाच एका हुरहूरत्या रात्रीच्या कातर अवस्थेची नेमकी वेदना कवी सुरेश भट यांनी खालील ओळीत मांडलेली आहे.
"वेदनेला अंत नाही आणि कुणाला खंत नाही,
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी;
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे… लोचने आता मिटावी".
जवळपास हीच वेदना साहिरने आपल्या या गाण्यात मांडली आहे. संगीतकार खैय्याम यांनी या गाण्याची चाल बांधताना, पहाडी रागाचा आधार घेतला आहे पण त्याचबरोबर त्यात, पंजाबी ढंग मिसळलेला आहे.त्यामुळे गाण्याचा ढंग बदलला गेला.
गाण्याची स्वररचना स्पष्टपणे "पहाडी" रागावर आधारलेली आहे. लोकसंगीतातून,कलासंगीतात जे थोडेफार राग प्रस्थापित झाले, त्यातील महत्वाचा राग होय.
तुम अप ना रंज ओ गम/ अपनी परेशानी / मुझे दे दो
प-- मम पपप ग/ ग रे ग-----/ गमग रे रे रे---धधसा / सा रेग रेरे सा
अशा धर्तीवरील सुरावट ऐकायला मिळते. वर मी म्हटल्याप्रमाणे लोकसंगीतातून हा राग आला असल्याने, त्यात वारंवार वेगवेगळ्या तऱ्हेने भर पडते गेली जसे इथे पंजाबी ढंग ऐकायला मिळतो.
गाण्याच्या सुरवातीचे पियानोचे स्वर ऐकायला हवेत. तिथे आपल्याला पहाडी रागाचे सूर ऐकायला मिळतात. त्या सुरांनीच गाण्याची लय आणि दिशा ठरवली आहे आणि त्या सुरावटीतून गायिका जगजीत कौर यांचे सूर ऐकायला मिळतात. तालासाठी ढोलक वापरले आहे आणि त्याचा नाद अतिशय हलका ठेवला आहे. गाण्याचा "मुखडा" किती आकर्षक आहे, शब्दांनी आणि सुरांनी देखील मुखडा विलक्षण देखणा बनवला आहे, गझल सदृश रचना आहे पण पारंपारिक गझल थाटाची स्वररचना टाळून, गाण्याला अधिक "गीतधर्मी" केले आहे. परिणाम असा होतो, गाणे पहिल्यापासून आपल्या मनात रुतून बसते. चालीच्या बाजूने विचार केल्यास, जरी पियानोवर पहाडी रागाची सावली निर्माण केली असली तरी गायन मात्र पंजाबी लोकसंगीताच्या स्पर्शाने केले आहे. परिणामस्वरूप रागाला बाजूला ठेवले जाते.
तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम इस दिल की विरानी मुझे दे दो
गाण्याचे शब्द कसे असावेत, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरावे. "रंज-ओ-गम" च्या जोडीला "परेशानी" हा शब्द कसा चपखल बसला आहे.उत्तम भावकवितेची एक गरज असते. तिथे शब्दरचना अशी असावी की तिथे वापरलेल्या शब्दाला प्रतिशब्द वापरावा, असे चुकूनही वाटू नये. हिंदी चित्रपटात, हृदयभंग वगैरे प्रसंगांची रेलचेल असते आणि त्यानिमित्ताने, गाणी देखील प्रचंड प्रमाणात निर्माण होतात. अशा वेळी, तोच भावप्रसंग अत्यंत सशक्त शब्दात मांडणे, ही तारेवरची कसरत असते आणि साहिर या पातळीवर पूरेपुर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो. गाण्याची चाल(च) अशी बांधली आहे की तिथे अकारण हरकती, ताना यांना फाटा देणे आवश्यक होते. याचा अर्थ, गायन सरधोपट आहे, असा अजिबात नव्हे. लयीची वळणे(च) इतकी मोहक आहेत की गाताना, "गायकी" दाखवावी, ही गरजच निर्माण होत नाही.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात पियानोचे स्वर प्रमुख आहेत पण पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर तरळत आहेत. ही स्वररचना मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. पियानो वाजवताना, किंचित पाश्चात्य वादनाची धाटणी स्वीकारली आहे. पियानो वाद्यावर स्वरांची सलगता गाठणे शक्य नसते आणि त्यामुळे आघाती स्वरांतून लयीची भरीवता सादर करायची असते. तंतुवाद्यात किंवा पियानो सारख्या वाद्यात,वादन करताना, हीच पद्धत अवलंबिली जाते. अशा स्वरांमुळे, गाण्याची रचना अधिक समृद्ध होत असते.
ये माना मैं किसी काबिल नहीं हुं इन निगाहो में
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुझे दे दो
हा अंतरा गाताना, पहिली ओळ सरळ, मुखड्याच्या स्वरावलीच्या विरुद्ध अंगाने गायली आहे पण हीच ओळ परत गाताना, "इन निगाहो में" किंचित वरच्या सुरांत गायली आहे आणि तोच सूर पकडून, पुढील ओळ गायली आहे. इथे संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसते. धृवपदाच्या चालीतून, गाण्याचे सूचन नेहमीच होत असते पण पुढे गाण्याची चाल, वेगवेगळी "वळणे" घेत श्रीमंत होत असताना, भारतीय संगीताच्या तत्वानुसार "समेच्या" मात्रेकडे लय विसर्जित होते. हा जो स्वरांचा प्रवास असतो, तो अवलोकणे, व्यामिश्रतेचा भाग असतो.
मैं देखू तो सही दुनिया तुम्हे कैसे सताती हैं
कोई दिन के लिये अपनी निगेबानी मुझे दे दो
हा अंतरा कवितेच्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. इथे दुसऱ्या ओळीत "निगेबानी" हा शब्द आला आहे जो मुळातल्या, "निगेबान" - "निगेहबान" अशा शब्दावरून तयार झाला आहे. कविता लिहिताना, शब्दांची नव्याने मांडणी करणे आवश्यक ठरते आणि त्यानुसार, कवी असे स्वातंत्र्य नेहमी घेत असतात, जेणेकरून आशयाच्या नव्या छटा निर्माण होतात. एका बाजूने, "मैं देखू" - "तुम्हे दुनिया कैसे सताती हैं" असा संत्रस्त सवाल करायचा आणि त्याचा बाजूने दुसऱ्या ओळीत "निगेबानी मुझे दे दो" असा अप्रतिम विरोधाभास देखील दाखवायचा!! साहिर कवी म्हणून इतरांपेक्षा वेगळा होतो, तो असा.
गाण्याची चाल बांधताना, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो. गाण्याच्या सुरवातीला मी पहाडी रागाचा उल्लेख केला होता आणि त्याचबरोबर पंजाबी लोकसंगीताचा. त्याचा इथे सुरेख वापर झालेला दिसतो. मुखडा रागाधारित आहे आणि हा अंतरा देखील त्याच रागाशी तादात्म्य राखून आहे तरीही स्वरांची "उठावण" भिन्न आहे. संगीतकार खैय्याम, एकाच रागाच्या सुरांशी किती भिन्न प्रकारे खेळत आहे.
वो दिल जो मैंने मांगा था मगर गैरो ने पाया था
बडी शय हैं अगर उसकी पशेमानी मुझे दे दो
इथे देखील आपल्याला शायर साहिर भेटतो. दुसऱ्या ओळीत "शय' शब्द आहे ज्याचा नेमका अर्थ, "बक्षीस" किंवा "सौंदर्य" अशा प्रकारे घेतला जातो. वरती मी म्हटल्याप्रमाणे, शब्दांची नव्याने "घडणावळ"करणे, भावकवितेचे अनन्यसाधारण सामर्थ्य आहे आणि साहिर सारखा कवी, आपल्याला अशा मांडणीतून आपल्या नव्या जाणीवा दाखवून देतो.पुढे "पशेमानी" या शब्दाचा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे या ओळीची खासियत समजते. अरेबिक शब्द "पशेमान" वरून हा शब्द आलेला आहे. "शरमिंदा" या भावनेशी जवळीक दाखवणारा हा शब्द आहे. हे एकदा कळल्यावर मग, "शय" आणि "पशेमानी" या शब्दांची संगती लागते आणि कविता म्हणून या गाण्याचा आनंद आपण अधिक घेऊ शकतो.
साहिरच्या कवितेबाबत थोडेसे. मुळात कविता घडते शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे असावेच लागते, पण हे सगळे गृहीत धरावे लागते. याचे महत्वाचे कारण म्हणजे याची जाणीव देखील व्हायची ती अखेर शब्दांच्याच द्वारे!! आशय गृहीत धरल्यावर कवीनं पुढे काय केलं, हेच सर्वार्थाने महत्वाचे ठरते. आणि इथे प्रश्न उभा राहतो तो भाषेचा!! भाषेच्या घटकांचा, घटकांच्या घडणीचा. भाषा-शरीराशी देखील तितकाच महत्वाचा. आणि जोपर्यंत एखाद्या कवितेत आशय हा पूर्णपणे भाषेतून वेढला गेला आहे, केवळ "शब्द" हेच एक अपरिहार्य असे अभिव्यक्तीचे रूप ठरते, असे जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत "कविता" ही पूर्णत्वाने सिद्धच होत नाही. साहिरच्या बऱ्याचशा कविता या पातळीवर सिद्ध होतात.
गायिका म्हणून जगजीत कौरच्या आवाजाला काही मर्यादा आहेत. गायन शक्यतो शुद्ध स्वरी सप्तकात होते, क्वचित एखादा स्वर वरच्या सुरांत लावला जातो पण तिथे देखील नाममात्र "ठेहराव" असतो तसेच अवघड हरकती किंवा ताना कितपत जमतील अशी शंका घ्यायला जागा उरते.
प्रस्तुत गाण्याची चाल बांधताना, खैय्याम यांनी रचनेत जरी स्वरविकासाला जागा ठेवल्या आहेत तरी देखील, मुळातली चालीतली मोहकता इतकी अप्रतिम आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा विस्तार अक्षम्य ठरेल आणि मुळात कवितेतील आशयाला बाधक ठरेल. "शब्दकळा","स्वररचना" आणि "गायन" या घटकांचा अत्यंत सुयोग्य समन्वय फारच थोड्या गाण्यांच्या बाबतीत आढळतो. मला वाटते, हेच एकमेव कारण, मला या गाण्याकडे वारंवार ऐकायला भाग पाडते.
हिंदी चित्रपट हा बहुतांशी प्रणयी भावनेशी अधिकाधिक निगडीत असतो आणि त्या भावनेचीच कास धरून, चित्रपट निर्मिती होत असते. अगदी पूर्वापार धांडोळा घेतला तरी हेच सत्य आपल्या हाती येते. त्यामुळे सादरीकरणात देखील बरेचवेळा तोचतोचपणा येतो आणि एकुणातच आविष्कार बेचव होऊन जातो. अर्थात, या अनुभवाला छेद देणारी निर्मिती अनुभवायला मिळते पण त्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणावे इतपतच असते.
या पार्श्वभूमीवर हिंदी गाणी फारच उठून दिसतात. काव्य, संगीत रचना याबाबतीत विलक्षण चोखंदळ वृत्ती दिसते आणि त्यानुरूप आपल्या रसिकतेच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याचे अनन्यसाधारण श्रेय घेऊन जातात. अगदी प्रणयी भावना जरी विचारात घेतली त्यातील अनेक छटांचे विलोभनीय स्तर आपल्याला दिसतात आणि या भावनेतील खोलीची मुक्त, आश्वासक आणि गहिरी परिमाणे जाणवतात.
खरतर प्रणयी भावना म्हणजे त्यात पुरुष आणि स्त्री यांच्या सहभागाचा आविष्कार इतपत जरी स्वरूप ध्यानात घेतले तरी त्या नात्यातील असंख्य विभ्रम शब्दाधारे कवींनी व्यक्त केलेले आहेत आणि आपल्या जाणीवा सजग केल्या आहेत.
१९६४ साली आलेल्या "शगुन" चित्रपटात हेच कथासूत्र कायम ठेऊन निर्मिती केली आहे. वहिदा रेहमान आणि कंवलजीत यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपट तसा यथातथाच आहे - अगदी अभिनय, दिग्दर्शन इत्यादी पातळींवर विचार करता काहीच असामान्य नाही परंतु चित्रपटातील गाणी मात्र नि:संशय अप्रतिम आहेत. प्रसिद्ध कवी साहिर यांच्या काही रचना तर निव्वळ कविता म्हणून दाद देण्याइतपत सुंदर आहेत. " तुम अपना रंज-ओ-गम" हे गाणे याच अनुभवाची निखळ साक्ष देणारे आहे.
दोन तरुण अकल्पित भेटतात, एकमेकांवर अनुरक्त होतात, लग्नाच्या आणाभाका घेतल्या जातात परंतु नेहमीप्रमाणे लग्नात विघ्न येते - मुलीला "मंगळ" असल्याचा साक्षात्कार होतो आणि तिच्या जीवनाची परवड सुरु होते. अशाच एका हुरहूरत्या रात्रीच्या कातर अवस्थेची नेमकी वेदना कवी सुरेश भट यांनी खालील ओळीत मांडलेली आहे.
"वेदनेला अंत नाही आणि कुणाला खंत नाही,
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी;
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे… लोचने आता मिटावी".
जवळपास हीच वेदना साहिरने आपल्या या गाण्यात मांडली आहे. संगीतकार खैय्याम यांनी या गाण्याची चाल बांधताना, पहाडी रागाचा आधार घेतला आहे पण त्याचबरोबर त्यात, पंजाबी ढंग मिसळलेला आहे.त्यामुळे गाण्याचा ढंग बदलला गेला.
गाण्याची स्वररचना स्पष्टपणे "पहाडी" रागावर आधारलेली आहे. लोकसंगीतातून,कलासंगीतात जे थोडेफार राग प्रस्थापित झाले, त्यातील महत्वाचा राग होय.
तुम अप ना रंज ओ गम/ अपनी परेशानी / मुझे दे दो
प-- मम पपप ग/ ग रे ग-----/ गमग रे रे रे---धधसा / सा रेग रेरे सा
अशा धर्तीवरील सुरावट ऐकायला मिळते. वर मी म्हटल्याप्रमाणे लोकसंगीतातून हा राग आला असल्याने, त्यात वारंवार वेगवेगळ्या तऱ्हेने भर पडते गेली जसे इथे पंजाबी ढंग ऐकायला मिळतो.
गाण्याच्या सुरवातीचे पियानोचे स्वर ऐकायला हवेत. तिथे आपल्याला पहाडी रागाचे सूर ऐकायला मिळतात. त्या सुरांनीच गाण्याची लय आणि दिशा ठरवली आहे आणि त्या सुरावटीतून गायिका जगजीत कौर यांचे सूर ऐकायला मिळतात. तालासाठी ढोलक वापरले आहे आणि त्याचा नाद अतिशय हलका ठेवला आहे. गाण्याचा "मुखडा" किती आकर्षक आहे, शब्दांनी आणि सुरांनी देखील मुखडा विलक्षण देखणा बनवला आहे, गझल सदृश रचना आहे पण पारंपारिक गझल थाटाची स्वररचना टाळून, गाण्याला अधिक "गीतधर्मी" केले आहे. परिणाम असा होतो, गाणे पहिल्यापासून आपल्या मनात रुतून बसते. चालीच्या बाजूने विचार केल्यास, जरी पियानोवर पहाडी रागाची सावली निर्माण केली असली तरी गायन मात्र पंजाबी लोकसंगीताच्या स्पर्शाने केले आहे. परिणामस्वरूप रागाला बाजूला ठेवले जाते.
तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम इस दिल की विरानी मुझे दे दो
गाण्याचे शब्द कसे असावेत, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरावे. "रंज-ओ-गम" च्या जोडीला "परेशानी" हा शब्द कसा चपखल बसला आहे.उत्तम भावकवितेची एक गरज असते. तिथे शब्दरचना अशी असावी की तिथे वापरलेल्या शब्दाला प्रतिशब्द वापरावा, असे चुकूनही वाटू नये. हिंदी चित्रपटात, हृदयभंग वगैरे प्रसंगांची रेलचेल असते आणि त्यानिमित्ताने, गाणी देखील प्रचंड प्रमाणात निर्माण होतात. अशा वेळी, तोच भावप्रसंग अत्यंत सशक्त शब्दात मांडणे, ही तारेवरची कसरत असते आणि साहिर या पातळीवर पूरेपुर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो. गाण्याची चाल(च) अशी बांधली आहे की तिथे अकारण हरकती, ताना यांना फाटा देणे आवश्यक होते. याचा अर्थ, गायन सरधोपट आहे, असा अजिबात नव्हे. लयीची वळणे(च) इतकी मोहक आहेत की गाताना, "गायकी" दाखवावी, ही गरजच निर्माण होत नाही.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात पियानोचे स्वर प्रमुख आहेत पण पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर तरळत आहेत. ही स्वररचना मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. पियानो वाजवताना, किंचित पाश्चात्य वादनाची धाटणी स्वीकारली आहे. पियानो वाद्यावर स्वरांची सलगता गाठणे शक्य नसते आणि त्यामुळे आघाती स्वरांतून लयीची भरीवता सादर करायची असते. तंतुवाद्यात किंवा पियानो सारख्या वाद्यात,वादन करताना, हीच पद्धत अवलंबिली जाते. अशा स्वरांमुळे, गाण्याची रचना अधिक समृद्ध होत असते.
ये माना मैं किसी काबिल नहीं हुं इन निगाहो में
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुझे दे दो
हा अंतरा गाताना, पहिली ओळ सरळ, मुखड्याच्या स्वरावलीच्या विरुद्ध अंगाने गायली आहे पण हीच ओळ परत गाताना, "इन निगाहो में" किंचित वरच्या सुरांत गायली आहे आणि तोच सूर पकडून, पुढील ओळ गायली आहे. इथे संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसते. धृवपदाच्या चालीतून, गाण्याचे सूचन नेहमीच होत असते पण पुढे गाण्याची चाल, वेगवेगळी "वळणे" घेत श्रीमंत होत असताना, भारतीय संगीताच्या तत्वानुसार "समेच्या" मात्रेकडे लय विसर्जित होते. हा जो स्वरांचा प्रवास असतो, तो अवलोकणे, व्यामिश्रतेचा भाग असतो.
मैं देखू तो सही दुनिया तुम्हे कैसे सताती हैं
कोई दिन के लिये अपनी निगेबानी मुझे दे दो
हा अंतरा कवितेच्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. इथे दुसऱ्या ओळीत "निगेबानी" हा शब्द आला आहे जो मुळातल्या, "निगेबान" - "निगेहबान" अशा शब्दावरून तयार झाला आहे. कविता लिहिताना, शब्दांची नव्याने मांडणी करणे आवश्यक ठरते आणि त्यानुसार, कवी असे स्वातंत्र्य नेहमी घेत असतात, जेणेकरून आशयाच्या नव्या छटा निर्माण होतात. एका बाजूने, "मैं देखू" - "तुम्हे दुनिया कैसे सताती हैं" असा संत्रस्त सवाल करायचा आणि त्याचा बाजूने दुसऱ्या ओळीत "निगेबानी मुझे दे दो" असा अप्रतिम विरोधाभास देखील दाखवायचा!! साहिर कवी म्हणून इतरांपेक्षा वेगळा होतो, तो असा.
गाण्याची चाल बांधताना, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो. गाण्याच्या सुरवातीला मी पहाडी रागाचा उल्लेख केला होता आणि त्याचबरोबर पंजाबी लोकसंगीताचा. त्याचा इथे सुरेख वापर झालेला दिसतो. मुखडा रागाधारित आहे आणि हा अंतरा देखील त्याच रागाशी तादात्म्य राखून आहे तरीही स्वरांची "उठावण" भिन्न आहे. संगीतकार खैय्याम, एकाच रागाच्या सुरांशी किती भिन्न प्रकारे खेळत आहे.
वो दिल जो मैंने मांगा था मगर गैरो ने पाया था
बडी शय हैं अगर उसकी पशेमानी मुझे दे दो
इथे देखील आपल्याला शायर साहिर भेटतो. दुसऱ्या ओळीत "शय' शब्द आहे ज्याचा नेमका अर्थ, "बक्षीस" किंवा "सौंदर्य" अशा प्रकारे घेतला जातो. वरती मी म्हटल्याप्रमाणे, शब्दांची नव्याने "घडणावळ"करणे, भावकवितेचे अनन्यसाधारण सामर्थ्य आहे आणि साहिर सारखा कवी, आपल्याला अशा मांडणीतून आपल्या नव्या जाणीवा दाखवून देतो.पुढे "पशेमानी" या शब्दाचा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे या ओळीची खासियत समजते. अरेबिक शब्द "पशेमान" वरून हा शब्द आलेला आहे. "शरमिंदा" या भावनेशी जवळीक दाखवणारा हा शब्द आहे. हे एकदा कळल्यावर मग, "शय" आणि "पशेमानी" या शब्दांची संगती लागते आणि कविता म्हणून या गाण्याचा आनंद आपण अधिक घेऊ शकतो.
साहिरच्या कवितेबाबत थोडेसे. मुळात कविता घडते शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे असावेच लागते, पण हे सगळे गृहीत धरावे लागते. याचे महत्वाचे कारण म्हणजे याची जाणीव देखील व्हायची ती अखेर शब्दांच्याच द्वारे!! आशय गृहीत धरल्यावर कवीनं पुढे काय केलं, हेच सर्वार्थाने महत्वाचे ठरते. आणि इथे प्रश्न उभा राहतो तो भाषेचा!! भाषेच्या घटकांचा, घटकांच्या घडणीचा. भाषा-शरीराशी देखील तितकाच महत्वाचा. आणि जोपर्यंत एखाद्या कवितेत आशय हा पूर्णपणे भाषेतून वेढला गेला आहे, केवळ "शब्द" हेच एक अपरिहार्य असे अभिव्यक्तीचे रूप ठरते, असे जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत "कविता" ही पूर्णत्वाने सिद्धच होत नाही. साहिरच्या बऱ्याचशा कविता या पातळीवर सिद्ध होतात.
गायिका म्हणून जगजीत कौरच्या आवाजाला काही मर्यादा आहेत. गायन शक्यतो शुद्ध स्वरी सप्तकात होते, क्वचित एखादा स्वर वरच्या सुरांत लावला जातो पण तिथे देखील नाममात्र "ठेहराव" असतो तसेच अवघड हरकती किंवा ताना कितपत जमतील अशी शंका घ्यायला जागा उरते.
प्रस्तुत गाण्याची चाल बांधताना, खैय्याम यांनी रचनेत जरी स्वरविकासाला जागा ठेवल्या आहेत तरी देखील, मुळातली चालीतली मोहकता इतकी अप्रतिम आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा विस्तार अक्षम्य ठरेल आणि मुळात कवितेतील आशयाला बाधक ठरेल. "शब्दकळा","स्वररचना" आणि "गायन" या घटकांचा अत्यंत सुयोग्य समन्वय फारच थोड्या गाण्यांच्या बाबतीत आढळतो. मला वाटते, हेच एकमेव कारण, मला या गाण्याकडे वारंवार ऐकायला भाग पाडते.
https://www.youtube.com/watch?v=A8Yr1OOeOT8
तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है
मनोरुग्णांचे हॉस्पिटल. इथे प्रत्येकाचे मानसिक आजार वेगळे आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपचारांची आवश्यकता. खरतर, डॉक्टर्स तसेच त्यांच्याबरोबरीने काम करणाऱ्या नर्सेस यांची देखील क्षणोक्षणी मानसिक तडफड चालू असते. आजाराचे स्वरूप कधीच सहजपणे दृष्टीक्षेपात येत नसल्याने, नेमके उपचार आणि त्याचे स्वरूप निश्चित करणे, ही देखील तारेवरील कसरत. मनोव्यापार किती गूढ असतात आणि त्याचे चलनवलन किती गुंतागुंतीचे असू शकते, हे न्याहाळण्यासाठी ही जागा सर्वोत्तम.
मुळातला बंगाली चित्रपट, "दीप जेले जाई" याचा हिंदीत बनवलेला "खामोशी" चित्रपट. दोन्ही चित्रपट असित सेन यांनी दिग्दर्शित केले आहेत (विनोदी अभिनेता वेगळा). बंगाली चित्रपटात सुचित्रा सेन यांनी जी भूमिका केली आहे तीच हिंदी चित्रपटात वहिदा रेहमान यांनी केली आहे. अर्थात, आपल्याला इथे हिंदी चित्रपट गीताच्या संदर्भात विचार करायचा आहे. हे गाणे जेंव्हा चित्रपटात येते तेंव्हा नायिकेच्या समोर तिचा भूतकाळ जागा झालेला असतो आणि अशाच एका विदीर्ण संध्याकाळी, त्यावेळी नायिका एका रुग्णाची सेवा करता, करता त्याच्या प्रेमात पडते, जे प्रत्यक्षात कधीही वास्तववादी ठरणारे नसते. अशा विकल क्षणाची अनुभूती "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है" या गाण्यातून पडद्यावर सादर होत असते.
"शिल्पांत खंड स्मरणाचा
नि:संग जोडिशी क्षितीज कशाला भगवे
हें जरी मिटे प्राणाने
सांतातून अवघें अस्त घेऊनी उगवे…."
कवी ग्रेसच्या या ओळींतून आपल्याला काहीशी कल्पना करता येऊ शकेल. हे गाणे जेंव्हा चित्रपटात सादर होते तेंव्हा आयुष्यात आणखी एक असाच मानसिक दृष्ट्या आजारी असलेला रुग्ण आलेला असतो आणि तिची मन:स्थिती दोलायमान झालेली असते. मागील आयुष्य कितीही विसरायचे ठरवले तरी त्याच्या सावल्या आयुष्यावर कधी ना कधीतरी पडतातच!!
अशा गाण्याच्या बाबतीत विश्लेषण करताना बरेचवेळा मनाची संत्रस्त अवस्था होत असते. गाण्यातील तिन्हीही घटक तुल्यबळ असतात आणि लिहिताना कुठल्या घटकावर नेमके लिहायचे आणि किती लिहायचे, अशी संभ्रमावस्था होते. चित्रपट गीतांत "काव्य" असावे की नसावे, हा सनातन वाद आहे आणि त्याचे एकाच एक असे उत्तर मिळणे कठीण आहे. हिंदी चित्रपट गीतांत "कविता" असणे ही काही आधुनिक कल्पना नाही. पूर्वापार गाणी बघितली तर असेच आढळेल, उर्दूतील अनेक प्रथितयश शायरांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत.
कवी गुलजार याच परंपरेतील एक अविस्मरणीय नाव. गुलजार यांनी हिंदी चित्रपटांत अनेक भूमिका, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक अशा अनेक भूमिका वठवल्या परंतु या सगळ्यांत, त्यांच्यातील "कवी" हा नेहमीच पुढाकार घेणारा ठरला आणि तीच त्यांची खरी ओळख. शब्दांशी खेळावे तर याच कवीने आणि याची प्रचीती या कवीने आपल्याला वारंवार दिली आहे आणि या गाण्यात देखील तीच ओळख अधिक गडद होते. आता या गाण्यातील "बेकरार" शब्द बघा. ध्रुवपदात - "ख्वाब चून रही है रात 'बेकरार' है" आणि गाण्याच्या शेवटी - "रात ये करार की 'बेकरार' है". इथे बेकरार हा शब्द दोन वेळा आलेला आहे तरीही केवळ शब्दाची पुनरावृत्ती नसून आशयाची सुंदर अभिव्यक्ती आहे आणि असे खेळ गुलजार यांच्या कवितेत वारंवार आढळतात. (असे असून देखील चित्रपटात गाणे लिहिणारे हे "गीतकार" या शेलक्या शब्दात येतात!! उदाहरणार्थ माडगुळकर. चित्रपट गीते लिहिताना बरेचवेळा ज्याला "टुकार" म्हणतात अशी शब्दकळा आढळते पण मग जे स्वत:ला "कवी" म्हणवतात, त्यांची निर्मिती सदासर्वकाळ उत्तमच असते का?) कुठल्याही भावकवितेंत, शब्दांची "अपरिहार्यता" असणे आवश्यक असते. तिथे दुसरा कुठलाही शब्द हा "उपरा" ठरतो. या गाण्यांत तो भाग आढळतो. गाण्यात दोनच कडवी आहेत पण तरीही गाण्यातील प्रत्येक शब्द, "हाच" हवा असे वाटते. तिथे दुसरा कुठलाच शब्द ही अभिव्यक्ती निर्माण करणे अशक्य. "मुख्तसर" सारखा एखादा(च) उर्दू शब्द वगळता, गाण्यात कुठलाच शब्द आकाळायला अवघड नाही. अर्थात मुख्तसर म्हणजे संक्षिप्त. पहिल्या कडव्याच्या शेवटच्या ओळीत - "मुख्तसर की बात है तुम से प्यार है". इथे आता सगळ्या ओळीचा नेमका अर्थ कळतो. असे असून देखील, कविता म्हणून हे गाणे फार वरच्या दर्जाचे ठरते.
गाण्याची स्वररचना "पहाडी" रागावर आहे परंतु राग म्हणून विचार केल्यास, रागाची छाया स्वररचनेवर आहे. वास्तविक हा राग उत्तर भारतातील काश्मीरसारख्या पर्वतमय भागातील लोकसंगीतातून आला आहे. गमतीचा भाग असा, या रागात "ख्याल" गायकी फारशी ऐकायला मिळत नाही परंतु "उपशास्त्रीय" तसेच "ललित संगीतात" या रागावर आधारित अमाप रचना ऐकायला मिळतात तसेच कलासंगीतातील वादक कलाकारांचा हा राग खास आवडीचा दिसतो.आता थोडा तांत्रिक भागाचा विचार केल्यास, साधारणपणे हा राग "मध्यसप्तक" तसेच "मंद्रसप्तक" या सप्तकात सादर केला जातो. अर्थात अपवाद हा नेहमीच असतो आणि तो अध्याहृत धरला आहे. आता पुढील भाग -
तुम / पुकार लो / तुम्हारा /इंतजार है
सा ध प म ग(को)/ सा म ----/ म नि(को)- ध- / पम म प
अशी सुरावट मुखड्याची ऐकायला मिळते.
अर्थात या गाण्याचा लालित्यपूर्ण भाग आता बघूया.
गाण्याची सुरवात, अति गंभीर हुंकाराने होते आणि त्या सोबत एका वाद्यावर छोटीशी धून आहे. ही धून जरा बारकाईने ऐकली तर हेमंतकुमारांनी हीच धून, त्यांच्या पूर्वीच्या एका गाण्यात वापरलेली आढळेल - प्रसिद्ध गाणे "कही दीप जले कही दिल" या गाण्याच्या सुरवातीला हीच धून वापरली आहे पण अर्थात पुढील विस्तार मात्र संपूर्ण वेगळा. हा जो "हुंकार" आहे तो देखील किती अप्रतिम आहे. पडद्यावर विस्तीर्ण असे आवार आणि प्रशस्त जिना. एवढ्या मोठ्या प्रांगणात एकटीच नायिका खिन्नपणे तो जिना चढत आहे. हा खिन्नपणा, या हुंकारातून सुरेखपणे दर्शवला जातो.
"तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है " अशी कवितेची ओळ आहे पण, हुंकारला योग्य म्हणून गायन करताना "पुकार लो" याच शब्दाने केला आहे आणि ते फारच अन्वर्थक आहे. "ख्वाब चून रही है रात 'बेकरार' है" किती तरल अभिव्यक्ती आहे आणि हीच अभिव्यक्ती संगीतकार हेमंतकुमारांनी त्याच असोशीने मांडली आहे.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ दुपदरी आहे म्हणजे एका स्तरावर व्हायोलिन्स वाजत आहेत तसेच दुसऱ्या स्तरावर देखील तीच वाद्ये वाजत आहेत पण स्वरावलीत फरक आहे. याचा परिणाम, चित्रपटातील प्रसंग अधिक बांधीव होणे होय. गाणे शोकात्म तर नक्कीच आहे पण चालीची प्रकृती ओळखून तशाच चालीची निर्मिती करणे, हे तर रचनाकाराचे महत्वाचे कार्य. संगीतकार म्हणून, पुढील कडव्यांची चाल जवळपास तशीच ठेवली आहे. "जवळपास" म्हणजे चाल किंचित वरच्या सुरांत जाते पण तरीही लय कुठेही बदलत नाही तसेच चालीचा आकृतिबंध तसाच कायम राहतो. चालीच्या पुनरावृत्तीचा एक फायदा चित्रपटीय गाण्यांना नेहमी मिळतो आणि तो म्हणजे, सुरवातीची चाल रसिकांच्या मनात उतरते.
"होंठ पे लिये हुए दिल की बात हम
जागते रहेंगे और कितनी रात हम
मुख्तसर की बात है तुम से प्यार है
तुम्हारा इंतजार है …. "
ध्रुवपदातील आशय कायम ठेवला आहे पण तरीही "मुख्तसर" शब्दाने किमया केली आहे. "होंठ पे लिये हुए दिल की बात हम" हे तर खरेच आहे पण ते देखील "मुख्तसर" असल्याने मनाची तडफड आतल्या आत चालू आहे आणि चालीतून हीच भावना दृग्गोचर होते. हे गारुड विलक्षण आहे. इथे एकाच चित्रीकरणात चूक आढळते. नायिकेच्या हातात ग्रंथ - मेघदूत पण तद्दन बाष्कळपणा दिसतो. जर का मेघदूत(च) ठेवायचे होते तर मूळ पुस्तक ठेवावे!! ग्रंथाचे नाव हाताने लिहिलेले समजते!! कशासाठी इतका बालीशपणा. चित्रपट निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च होतात तिथे काही शेकडा रुपये जड व्हावेत!!
"दिल बहल तो जायेगा इस खयाल से
हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से
रात ये करार की बेकरार है
तुम्हारा इंतजार है …. "
गाण्यात वाद्यमेळ अगदी कमीत कमी असावा इतकाच आहे, गानाय्त तालवाद्य अजिबात नसून "बेस गिटार" चे सूर हाच ताल आहे. खरेतर "गिटार" हे केवळ सुरांचे वाद्य नसून असामान्य तालवाद्य देखील आहे. तालवाद्य आहे खरे पण वाद्याचा ध्वनी अतिशय खालच्या सुरांत ठेवलेला आहे आणि अपवादात्मक ठिकाणी (च) याचा ध्वनी ऐकायला येतो. सुगम संगीतात हीच आणखी एक गंमत असते. इथे वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वाद्याला, स्वत:ची अशी एक भूमिका असते आणि त्या भूमिकेनुसार (च) ते वाद्य आपले अस्तित्व दाखवत असते आणि इथेच संगीतकाराचे स्वामित्व दिसून येते.
आता गायक म्हणून विचार करता हेमंतकुमार यांच्या आवाजाला निश्चित काही मर्यादा आहेत पण त्या मर्यादा ध्यानात घेऊन, हा गायक आपल्या विलक्षण खर्ज आवाजात परिणाम साधतो. या गाण्यातच बघा, गायन हे मंद्र सप्तकात बहुतांशी चाललेले आहे पण आवाजात निसर्गत: "घुमारा" असल्याने, गाण्यात सुरेख गंभीर वातावरण तयार होते.
गाण्यातील कविता अप्रतिम नक्कीच आहे पण चाल देखील अशी बांधली आहे जेणेकरून चांगली शब्दकळा चालीला अवजड होत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्धपणे रसिकांच्या समोर येतो आणि आपले भावविश्व अधिक विस्तारून टाकतो. गायनात "गायकी" जरा देखील नसून निव्वळ चालीच्या आधाराने आपल्या मनात रुजणारे असे हे गाणे आहे.
दिग्दर्शक असित सेन यांनी हे गाणे देखील अतिशय संयमित पद्धतीने पडद्यावर दाखवले आहे. "दिल बहल तो जायेगा इस खयाल से
हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से"
या ओळीच्या वेळेस, नायिका खोलीचा दरवाजा परत ओढून घेते आणि नायकाकडे पाठ दाखवून परत आलेल्या वाटेवर चालायला लागते. कवितेतील भावनेशी विरोध दर्शविण्यासाठी हे सुरेख प्रकारे मांडले आहे. गाण्याचा शेवट देखील विलक्षण रितेपणा दाखवते. ज्या जिन्याने नायिका वर चढलेली असते, त्याच जिन्याने ती परत खाली उतरत येते. पार्श्वभागी किंचित हळुवार अशा शिटीचा वापर केला आहे. पडद्यावर परत तेच प्रशस्त आवार आणि तो आलिशान जिना आणि नायिका अत्यंत विषण्णपणे पायऱ्या उतरते. नायिकेची पावले जड होतात आणि आपल्या मनावर मात्र त्याचा अनोखा गडद परिणाम होतो.सुगम संगीताने असा अविस्मरणीय परिणाम घडवावा, हेच तर त्याचे प्राथमिक उद्दिष्ट असते.
Subscribe to:
Posts (Atom)