Friday, 18 August 2023
कलाकारांचे अध:पतन
इथे "कलाकार" म्हणजे केवळ कलाक्षेत्रातील कलावंत, इतकाच मर्यादित अर्थ नसून त्यात खेळ देखील अंतर्भूत केलेला आहे. कुठलाही लोकप्रिय कलावंत मुलत: सर्जनशील असतो. त्याशिवाय सशक्त निर्मिती होणे अशक्य. परंतु सर्जनशीलता ही काही कायम टिकणारी अवस्था नसते. तिचाही बहराचा आणि नंतर पतझडीचा काळ आलटूनपालटून येताच असतो. जेंचा बहराचा काळ असतो तेंव्हा अप्रतिम निर्मितीने तो रसिकांना आपल्या प्रतिभेचे आविष्कार सादर करून, आपल्या क्षमतेची प्रचिती तसेच रसिकांना भारावून टाकण्याची शक्ती दाखवत असतो. परिणामी कलेच्या अस्तित्वात असलेल्या परिघाची व्याप्ती अधिक रुंद करीत असतो. कलेची प्रगती ही अशीच होत असते. हा बहराचा काळ मात्र असतो अद्भुत आणि दिपवून टाकणारा. अर्थात यातून मिळणारी लोकप्रियता आणि तद्नुषंगाने मिळणारे आर्थिक फायदे, कलावंतांच्या अभ्युदयासाठी उपयोगी पडतात, आयुष्याची मार्गक्रमण सुखनैव होऊ शकते. कुणी कितीही नावे ठेवली तरी "सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते" या उक्तीतच बरेच काही सामावलेले आहे. अर्थात याचा अतिरेक झाला की पतझड सुरु होते.
कलावंत होणे ही काही सहज जमण्यासारखी प्रक्रिया नसते. शारीरिक तसेच बौद्धिक परिश्रमाची अथक मागणी सातत्याने होत असते. परंतु एकदा का तुमची कलावंत म्हणून प्रतिष्ठापना झाली की केलेल्या त्यागाचे साफल्य मिळायला लागते. हीच वेळ असते, कलावंताने "विवेकबुद्धी" आचरणात आणायची. मिळणाऱ्या लोकप्रियतेत स्वतःला झोकून दिले जाणे, सहज होते. त्यासाठी वेगळ्या परिश्रमाची आवश्यकता नसते.
आपण काही लोकप्रिय उदाहरणे बघूया आणि वरील मुद्दे अधिक स्पष्ट करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडील गायक/गायिका नेहमीच प्रकाशाच्या झोतात असतात. त्या झोताने, रसिक देखील भारावल्या अवस्थेत असतात. परिणामी सादर होणारी कलाकृती काय दर्जाची आहे? असले फडतूस प्रश्न अजिबात पडत नाही. कलावंताने काहीही गायले तरी त्याला "वाहवा" देणारा फार मोठा गट समाजात असतो आणि तो अशा अशक्त निर्मितीलाही भरभरून दाद देतो परिणामी कलेत भोंगळपणा शिरतो आणि अध:पतन सुरु होते. बरेचवेळा तर आपण नि:सत्व कडबा रसिकांसमोर सादर करीत आहोत, याचे भान देखील नसते. वास्तविक किशोरी आमोणकर हे नाव अतिशय तालेवार नाव आणि त्याला साजेशी अशीच त्यांची गायकी. मी स्वतः याचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे, पार्ल्याला पहाटेची मैफिल होती, पहाटे ६ वाजता सुरु होणार होती. मी देखील गिरगावातून त्या मैफिलीला जायचे म्हणून ५ वाजताच पहाटेचे प्रातर्विधी आटोपून पार्ल्याला अक्षरश: धावत पळत पोहोचलो. मित्राने माझे तिकीट आधीच आरक्षित केले असल्याने, कुठे बसायचे,हा प्रश्नच नव्हता, गाणे सुरु होण्याआधी, मित्राला बोललो, "बाईंचे गाणे म्हणजे डर्बीचा घोडा आहे, जिंकला तर लाखो रुपये मिळतील पाण्यात पैसे पाण्यात"! मित्र हसला. त्यादिवशी असेच झाले, बाईंचे गाणे अजिबात रंगले नाही. बाई काहीशा चिडचिड्या देखील झाल्या. मध्यंतराला काहीसा निराश होऊन, चहा पिट असताना, मी थोडे टीकात्मक बोललो तर एक रसिक तावातावाने, "अरे आणि, बाई आता ८० पार झाल्यात, हे समजून घे"! हे ऐकल्यावर मी अवाक. जर का बाईंचे वय ८० पार आहे, तर वेळीच चंबूगबाळे आवरण्यात अधिक शान आहे. आज जसे बाई गायल्या, त्याने पूर्वीच्या असामान्य क्षणांवर काळिमा पसरणार. दुसरे असे, इथे रसिकांच्या मर्जीचा प्रश्नच उद्भवत नाही. मैफिलीच्या उत्तररंगात खुद्द बाईच बोलल्या, "असे गाणे तुम्हाला कोण ऐकवून दाखवेल!" ही म्हणजे अहंकाराची हद्द झाली. आपण रसिकांकडे पुरेपूर माप टाकले नाही तरी देखील आपल्या सादरीकरणाची मर्दुमकी गायची!! कलावंताचे अध:पतन हे असे स्पष्ट होते.
काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. एके ठिकाणी कुमार गंधर्वांचे गायन ठरले होते. त्यादिवशी मुंबईत जोरदार पाऊस असल्याने, कार्यक्रमस्थळी फारसे कुणी रसिकजन जमले नव्हते. परिणामी संयोजक काहीसे अवाक झाले होते. इतक्या जगन्मान्य कलाकाराच्या कार्यक्रमाला तुरळक गर्दी!! त्यांनी कुमार गंधर्वांना विचारले, "कुमारजी, कार्यक्रमाला कुणी आले नाही, तर कार्यक्रम पुढे ढकलूया का?" वास्तविक सुज्ञ प्रश्न होता पण कुमार गंधर्व उत्तरले, "अरे मी रसिकांसाठी थोडाच गातो, मी तर माझ्या समाधानासाठी गातो!" मग प्रश्न असा उद्भवतो, जर स्वतःच्या समाधानासाठी गायचे असते, तर मग जाहीर कार्यक्रम कशासाठी करायचे? देवासच्या घरात बसून, हवे तितके समाधान मिळवा. अर्थात या उत्तराला देखील रसिकांनी प्रचंड दाद दिली. आता हा प्रचंड अहंकार नव्हता का? आपणच आपली पूजा आरंभ करण्यासारखा हा प्रकार होता.
हाच प्रकार पंडित जसराज यांच्या बाबतीत मी अनुभवला होता, वास्तविक हा गायक माझ्या खूप आवडीचा आणि यांच्या कितीतरी संस्मरणीय मैफिलींना हजार राहण्याचे भाग्य मला मिळाले होते परंतु वयाच्या ७५ नंतर निसर्गक्रमाने शरीर थकत चालले असताना, अत्यंत बेगुमानपणे गायला बसायचे . बरेचवेळा तर त्यांच्या शिष्यगण त्यांच्या सोबत असायचा आणि तेच गायला सुरवात करायचे आणि अधूनमधून पंडितजी सूर लावायचे!! मी पंडितजींचे गाणे ऐकायला आलो असताना, हे असले सरधोपट गाणे ऐकायला मिळाले. वास्तविक पंडितजींना कल्पना आली होती, आपला आता आवाज लागत नाही पण लोकप्रियता ही चीज अशी आहे, भल्याभल्या कलावंतांना भ्रांतचित्त करते. लोकं अजूनही आपल्याला नावावर, आपल्या मैफिलीला येतात, हा विचारच, त्यांना निवृत्त होण्यापासून परावृत्त करतो आणि ढासळलेल्या गळ्याकडे दुर्लक्ष करायला लावतो. ही खरे तर रसिकांची निव्वळ फसवणूक असते पण आपल्याकडील तथाकथित रसिक देखील, असल्या भोंगळ सादरीकरणाला दाद देतात, परिणामी कलाकार आणखी वाहवत जातो.
अर्थात केवळ शास्त्रीय संगीतात(च) असे घडते असे नाही. सुगम संगीतात फार वेगळे घडत नसते. लता मंगेशकर ही नाव जगभर पसरलेले आणि भारतात तर पूजनीय ठरलेले. परंतु चित्रपट "वीर झारा" मधील गाण्यांतून बाईंचा खालावलेला आवाज स्पष्ट ऐकायला मिळतो. त्यावेळी बाईंवर टीका झाली. "बाईंच्या आवाजात १९७५ सालची गायकी दिसते नाही" असे बोलले गेले. बाईंनी तात्काळ उत्तर दिले, "Is it not absurd to compare my present voice with 1975 songs?" परंतु वेगळ्या शब्दात, बाईंना आपल्या खराब आवाजाची कल्पना आली होती तरीही गाणी गाण्याचा मोह आवरला नाही. वस्तुस्थिती अशी होती, १९७५ साली देखील, बाईंच्या आवाजातील कोवळीक, ताजगी लोप पावली होती आणि तरीही बाईंनीं पुढे ३० वर्षे आपली गायकी रसिकांच्या समोर रेटली!! यात आपण रसिकांना आपल्या दावणीला बांधून फरफटवत आहोत, याचा सुतराम विचार आढळत नाही. आणि रसिक देखील त्या आवाजावर आत्यंतिक आंधळे प्रेम करण्यात धन्यता मानतात.
हाच प्रकार मोहमद रफींच्या बाबतीत घडलेला आहे.वास्तविक इथे मी लताबाई आणि रफी, ही २च नावे प्रातिनिधिक म्हणून घेणार आहे. एकतर या दोघांनी भारतीय मनावर कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. रफींचा मर्दानगी आवाज, ही त्यांची खासियत आणि पहिल्यापासून त्यांनी आपल्या या वैशिष्ट्याची जपणूक केलेली आहे. यातून त्यांच्या "अष्टपैलू" गायकीची प्रतिष्ठापना केली आणि रसिकांना भारावून टाकले. परंतु याच गायकीने त्यांच्या "नाट्यात्म" गायकीचा पाया घातला, हे कसे विसरता येईल. १९६० च्या सुमारास गाण्यांच्या स्वररचनेचा ढाचा बदलायला लागला आणि कदाचित स्पर्धेत टिकण्यासाठी असेल पण रफींनी आपल्या गायकीत "नाट्यात्म" शैली आणली. परिणामी गायकी अत्यंत "ढोबळ" झाली. परंतु या वस्तुस्थितीकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. "बाबूल की दुआयें लेती जा" सारखे अत्यंत ओबडधोबड गाणे रसिकांच्या माथी मारले आणि रसिकांनी त्याचे कमालीचे कौतुक केले. तसाच प्रकार, रफींनी गायलेल्या मराठी गाण्यांबाबत म्हणता येईल. मराठी भाषेचा लहेजा तसेच आशय लक्षात न घेता गाणी रसिकांच्या डोक्यावर आपटली. आजही या मराठी गाण्याचे वारेमाप कौतुक होते आणि त्यामागे निव्वळ रफी या नावाची पूजा, इतकाच अर्थ निघतो.
इतकावेळ आपण संगीत कलेबद्दल लिहिले पण भारतात अमाप लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट खेळात देखील असाच प्रकार आढळतो. १९६०/७० हे दशक भारतीय स्पिनर्स लोकांचे दशक म्हणून ओळखले जाते. ज्यांना "दरारा"म्हणावा, असे बेदी, चंद्रशेखर, प्रसन्न आणि वेंकट अशी चौकडी होती आणि एकहाती सामना जिंकवून देण्याची ताकद होती. पुढे ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज संघांची "वेगवान चौकडी" जशी प्रतिस्पर्धी संघावर दहशत ठेऊन असायची तसाच या चौकडीचा वावर होता. अगदी व्हिव रिचर्ड्स सारखा असामान्य फलंदाज शेवटपर्यत चंद्रशेखरच्या गोलंदाजी बद्दल अनभिज्ञ होता आणि त्याने ते प्रांजळपणे मान्य केले आहे. परंतु निसर्गक्रम कुणालाही चुकत नाही आणि हळूहळू वाढते वय, त्यांच्या जादूवर परिणाम करायला लागले होते. तरीही त्यांनी रेटून आपली गोलंदाजी सुरु ठेवली होती. अखेरीस १९७७ साली झालेल्या भारत/पाकिस्तान मालिकेत, त्यांच्या गोलंदाजीची पिसे निघाली आणि अत्यंत मानहानीकारक अवस्थेत त्यांनी खेळाचा निरोप घ्यावा लागला.
असाच प्रकार अनेक फलंदाजांच्या बाबतीत घडलेला आहे. आपल्या शारीरिक हालचाली पूर्वीसारख्या होत नाहीत, ही जाणीव जर का त्या फलंदाजालाच होत नसेल तर आणखील कुणाला होणार? आपल्यासारखे बाहेरून बघणारे देखील म्हणतात, आता हा फलंदाज थकला आहे. असे असून देखील निवृत्ती लांबणीवर टाकतात, त्यामागे प्रचंड आर्थिक फायदा आणि लोकप्रियता न सोडण्याचा हव्यास, इतकेच कारण संभवते. अगदी सचिन पासून असंख्य खेळाडू या सापळ्यात अडकले आहेत. परिणामी निर्माण झालेली प्रतिमा भंग पावणे, हेच त्यांच्या नशिबात उरलेले असते.
आता प्रश्न इतकाच उरतो, आपण लोकप्रियतेच्या आहारी न जात तटस्थपणे लोकप्रियता स्वीकारावी, हे अशक्य आहे का? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत आणि मुख्य म्हणून नेमके कधी थांबायचे, याचे अचूक भान हवे. सुनील गावस्करसारखा एखादाच कलाकार असतो, त्याला याचे नेमके भान होते आणि म्हणून आजही त्याची निवृत्ती चटका लावते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment