Sunday, 2 April 2023

सुनो सजना पपिहे ने

गाण्याची चाल तयार करताना, बहुतेक रचनाकार मुखड्याच्या स्वररचनेची अतिशय बारकाईने बांधणी करतात आणि ती बांधणी अधिकाधिक वेधक, पटकन ऐकणाऱ्याच्या मनात ठसेल, अशा प्रकारची रचना, गाण्याचा मुखडा बांधताना करतात. अर्थात गाण्याचा मुखडा आणि बरेचवेळा मुखडा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ आणि त्याची रचना, ही अतिशय बारकाईने केली जाते. या गाण्याची सुरवातच फार अवघड आहे. गाण्याच्या बाबतीत एक वैशिष्ट्य नेहमी सांगितले जाते, गाण्याचा "मुखडा" मन खेचून घेणारा हवा म्हणजे पुढील रचना आणि बांधकाम सहज आणि सोपे होऊन जाते. इथे सुरवातीला स्वरमंडळाचे स्वर गुंजत असताना,क्षणात व्हायोलीनच्या स्वरांचे आवर्तन कानावर येते. हे आवर्तन देखील किती गुंतागुंतीचे आहे!! "नि सा ग म" या सुरांनी बिहाग रागाची ओळख पटते पण गंमत अशी आहे हे सूर सुरवातीलाच तार सप्तकात जातात आणि हळूहळू शुद्ध स्वरांना स्पर्श करून खर्जात स्थिरावतात. लगेच, याच लयीत लताबाईंचा "आलाप" सुरु होतो आणि मानवी गळा सर्वश्रेष्ठ याची अप्रतिम साक्ष मिळते. हा आलापच गाण्याचा मुखडा आपल्या समोर ठेवतो. हा आलाप किती जीवघेणा आहे. या आलापीचा शेवट थोड्या बारकाईने ऐकला तर तिथे शेवटाला स्वरांना वळण देताना, किंचितसा "खटका" आहे. फार कठीण आहे, ही गायक. जेंव्हा लय, एका मार्गाने चालत असताना, त्याच मार्गात किंचित वेगळे वळण देणे, ही गळ्याची परीक्षा आहे. "सुनो सजना, पपिहे ने कहा सब से पुकार के साप-- ममप --पप सा'ध पपप म गग गग मरे सासा नि' प नि--सा' निध प संभल जाओ चमन वालो, के आये दिन बहार के" सा पss म' म' प पपसा ध पमग ग ग म रे सा सा रे प नि रे सा नि ध प या सुरावटीतून गाण्याच्या स्वररचनेची सिद्धता होते. अर्थात हा सगळा तांत्रिक भाग झाला. या धृवपदाच्या ओळी. सुरवातीला आलापीद्वारे संपूर्ण स्वरावकाश ताब्यात घेऊन, पहिल्या ओळीवर पुन्हा, "पुकार के" हे शब्द गाताना, तोच स्वराविष्कार दाखवणे, कमालीचे मुश्किल आहे, म्हणजे गाण्याचे गाताना, लय मंद्र सप्तकात आहे पण, अचानक, तार सप्तकात "पुकार के" हे गायचे, म्हणजे लय कुठही खंडित न होता त्याच लयीत वरचा स्वर लावायला सुचणे आणि ते क्षणात प्रत्यक्षात आणून दाखवणे, केवळ अचाट!! पुढील ओळीत देखील, लयीचा असाच अप्रतिम आविष्कार दाखवला आहे. "के आये दिन बहार के" या इथे देखील पहिल्या ओळीसारखेच "बहार के" या शब्दावर स्वरांची करामत दाखवली आहे. गाणे गायला अवघड होते, ते अशा ठिकाणी. ऐकताना, आपल्याला ही सहज प्रक्रिया वाटते पण प्रत्यक्षात गाताना, अवघडलेपण समजते. पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाची तबल्याने साधलेली लय आणि त्याला, संतूर, बासरीच्या स्वरांची साथ कशी एकजीव झालेली आहे. सुरवातीला तबल्याची धीमी गत आहे आणि त्याला संतूरच्या सुरांची जोड आहे, पुढे लगेच बासरी येते आणि स्वनरंग बदलतो. त्याच बासरीत व्हायोलिनचे स्वर मिसळतात आणि हा सगळा वाद्यरंग, मूळ लयीला येउन मिळतो. संगीतकाराला प्रयोग करायला ज्या संधी उपलब्ध असतात, त्यात अंतऱ्याचे संगीत प्रामुख्याने येते. "फुलों की डालिया भी यही गीत गा रही है, घडिया पिया मिलन की नजदीक आ रही है, हवाओ ने जो छेडे है, फसाने है वो प्यार के" आता इथे संगीतकाराने एक गंमत केली आहे. ध्रुवपदाची स्वररचना आणि आता इथे सुरु होणारी चाल, यात फरक आहे. पहिलीच ओळ तार स्वरात सुरु होते आणि ती हळूहळू खाली येते. हे जे खाली येणे आहे, हाच लयीचा बिकट प्रवास असतो. इथे एका श्रुतीची जरी फारकत झाली तरी सगळी रचना बेडौल होऊ शकते आणि तीन मिनिटांच्या गाण्यात याला तर अतिशय महत्व असते. आता, बघा, "घडिया पिया मिलन की नजदीक आ रही है" या ओळीत प्रणयाची असोशी आहे आणि ती प्रणयोत्सुक अवस्था स्वरांतून दाखवणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने, लताबाईंनी "मिलन की" इथे घेतलेली हरकत ऐकावी. गाणे शब्दप्रधान कसे असू शकते, याचा उत्तम नमुना. शब्दातून मांडलेला आशय, स्वरांतून किती अप्रतिमरित्या अधोरेखित केला जातो, याचा हा आदीनमुना म्हणता येईल. "हवाओ ने जो छेडे है, फसाने है वो प्यार के" ही या अंतऱ्याची शेवटची ओळ. इथे, "हवाओ ने" यातील "ने" शब्दावर तालाच्या मात्रेची सम ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे किंचित वर उचलले जाते आणि हे जे वर उचलले गेले आहे, ते पुढे "वो प्यार के" म्हणताना, मुळातल्या तार स्वरावर आणून जोडलेली आहे. याचाच अर्थ, इथे रचनेचे संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाले. सांगीतिक करामत म्हणतात ती अशी. दुसरा अंतरा सुरु होतो, तिथे सतारीची छोटीशी "गत" आहे आणि सतारीचे ते स्वरबंध देखील फारच मनोवेधक आहेत. सतारीचे स्वर आंदोलित होत असताना, त्यात बासरीचे स्वर असे बेमालूम मिसळेले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे स्वर संपत असताना, परत सतार अवतरते पण तिथे स्वर मात्र अधिक सूक्ष्म आंदोलन घेतात. पाण्यावरील हेलकाव्यागणिक स्वरांचे हिंदकळणे केवळ अफाट आहे. "देखो ना ऐसे देखो, मर्जी है क्या तुम्हारी, बेचैन कर ना देना, तुमको कसम हमारी, हमी दुश्मन ना बन जाये, कही अपने करार के" मघाशी एका वैशिष्ट्याचा उल्लेख करायचा राहून गेला आणि त्याचा इथे उल्लेख करतो. कडव्यातील पहिली ओळ एका संथ लयीत चालत आहे पण, दुसरी ओळ मात्र, किंचित द्रुत लयीत शिरते, क्षणमात्र सगळे आहे पण त्यामुळे जरी मुळातली चाल संथ असली तरी गाण्याला असा "वेग" मिळाल्याने, चाल कुठेही रेंगाळत नाही. "बेचैन कर ना देना, तुमको कसम हमारी," हीच ती ओळ, आत्ता मी म्हणत होतो. लताबाईंची कमाल अशी आहे, दुसऱ्या ओळीत गाणे किंचित जलद होते तशी त्यांनी घेतलेल्या हरकती, मुरक्या ( या केवळ याच बाईंच्या गळ्यातून येऊ शकतात) त्याच अनुरोधाने येतात आणि सगळे गाणे अधिक बांधीव होते. खरतर, या गाण्यातील ज्या प्रत्येक शब्दाप्रती हरकती, मुरक्या आणि खटके आहेत, त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास व्हायला हवा. त्यातली कुठलीही हरकत, "उगीच" म्हणून घेतलेली नाही तर जे शब्द आपल्या हाताशी आहेत, त्यातील दडलेला नेमका अर्थ अधिक खोलवर दाखविण्याकडे सगळा भर आहे. "बागो मे पड गये है, सावन के मस्त झुले, ऐसा समा जो देखा, राही भी राह भुले, के जी चाहा यही रख दे, उमर सारी गुजर के" कुठल्याही उत्तम गाण्याचे वैशिष्ट्य सांगताना, काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात पण त्यामुळे त्यातील सौंदर्य फारसे ध्यानात येत नाही. उदाहरणार्थ, गाण्यातील तालाचे महत्व. गाणे नृत्यावर आधारित असेल तर तिथे ताल, एक प्रमुख घटक म्हणून वावरतो परंतु प्रणयी किंवा शोकात्म गाण्यात तालाचे महत्व फारसे जाणवत नाही किंवा आपण जाणवून घेत नाही. या गाण्यात, मघाशी मी दुसरी ओळ (प्रत्येक कडव्यात तोच बंध आहे) गाताना, सुरवातीला फक्त लताबाईंचा आवाज आहे - म्हणजे दुसरी ओळ जलद गतीतून परत मूळ गतीत आल्यावर, "के जी चाहा यही रख दे" यातील सुरवातीला फक्त लताबाईंच्या आवाजात शब्द येतात पण, दुसऱ्यांदा हे शब्द गाताना, परत "जी" शब्दावर समेची मात्र आहे आणि मात्र घेतल्यावर तालाचे वर्तुळ पूर्ण करून, "चाहा" या शब्दावर परत, तालाची पहिली मात्रा येते. लय आणि मात्रा याचा अनोखा संगम ऐकायला मिळतो. काही क्षणांचा हा आविष्कार आहे पण विलोभनीय आहे. आता संगीतकार म्हणून काही महत्वाच्या बाबी नोंदवणे आवश्यक वाटते. जेंव्हा या जोडीने चित्रपट क्षेत्रात स्वतंत्रपणे यायचे ठरविले तेंव्हा इथे शंकर/जयकिशन यांचा प्रभाव प्रचंड होता आणि या जोडीच्या सुरवातीच्या रचनांवर तसा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. त्यादृष्टीने सपाट, अनलंकृत थेटपणे गाण्याची शैली व्यवस्थित पचवली. रागाचा आधार घेऊन, रागापासून गाण्याचे अस्तित्व दूर ठेवण्यात, त्यांच्या काही रचना निश्चितपणे प्रशंसेला पात्र ठरतात. प्रस्तुत गाणे "बिहाग" रागावर आधारित असं म्हणता येईल. वेगळ्या शब्दात, मुखड्यापुरता रागाधार घेऊन पुढे स्वतंत्र वाटचाल करायची. अर्थात वादच घालायचा झाल्यास, राग, ताल व इतर रूढ प्रकारापासून दूर सरकण्याचा कल दाखवला पण हे तर कुणाही रचनाकारांना जमू शकेल. मग मुद्दा असा येतो, असे साधून या जोडीने नेमके काय साधले? याच गाण्याचा थोडा वेगळा विचार केल्यास, कलासंगीताशी संबंधित असा ठराविक साचा योजलेला नाही आणि वाद्यवृंद देखील अतिशय मर्यादित स्तरावर ठेवलेलाआहे. पूर्ण प्रयत्नांती फारशी गुणगुणणारी चलने रेंगाळत नाहीत पण त्यापलीकडील एक सांगीत गुंतागुंत अस्वस्थ करून जाते आणि हे यश नक्कीच मानायला हवे. असे कितीतरी अप्रतिम सांगीतिक क्षण या गाण्यात अनुभवायला मिळतात आणि ते क्षण अनुभवाने, हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. (39) Suno sajna papihe ne Lata Mangeshkar - YouTube

No comments:

Post a Comment