Tuesday, 25 April 2023
सचिनची पन्नाशी - एक आढावा
कुठल्याही कलाकार, खेळाडूच्या निर्मितीचे विश्लेषण करायचे झाल्यास, ती व्यक्ती निवृत्त झाल्यावर किंवा उत्तर वयाला लागल्यावर केल्यास, तुमच्या लिखाणात वस्तुनिष्ठ दृष्टीचा प्रभाव दिसून येऊ शकतो. ती व्यक्ती जेंव्हा भरात असते तेंव्हा लोकमानस तसेच एकूणच त्याच्या निर्मितीचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो/पडतो. परिणामी तुमचा विचार एकांगी ठरण्याची शक्यता अधिक. विशेषतः ती व्यक्ती जर का खेळाडू असेल तर खूप सुकर होते. खेळातून निवृत्त झालेली असते, आणि आता नवीन निर्मिती अशक्य असते, त्यामुळे विचक्षण दृष्टीने तुम्ही एकूण कारकिर्दीचे अवलोकन करू शकता. आज हे लिहायचे कारण म्हणजे कालच सचिनची पन्नाशी देशभर साजरी झाली. आजमितीस कुना खेळाडूच्या वाट्याला असे भाग्य फार क्वचित आले असावे, विशेषतः भारतीय खेळाडूच्या संदर्भात तर अधिक जाणवते.
सचिनची कारकीर्द २४ वर्षांची झाली . इतकी लांबलचक कारकीर्द खचित कुणा खेळाडूच्या वाट्याला आली असेल. अर्थात इतकी कारकीर्द लांबवण्यासाठी, तुमच्याकडे दृढनिश्चय तसेच आत्मविश्वास असावाच लागतो. आता इतकी दीर्घ कारकीर्द म्हटल्यावर त्या कारकिर्दीत चढ-उतार असणे क्रमप्राप्तच ठरते. खरंतर कुणाही कलाकाराचे श्रेष्ठत्व ठरवताना, त्याने आयुष्यात कितीवेळा शिखरे गाठली? हा निकष ठेवावा. एक तर नक्कीच, कुठलाही खेळाडू हा सातत्याने अत्युत्तम खेळ करूच शकत नाही. मानवी प्रयत्नांना नेहमीच मर्यादा असतात परंतु आपल्या मर्यादा जाणून घेऊन, आपल्या खेळात सतत सुधारणा करण्याचा ध्यास घेऊन,कारकीर्द सजवणे, हा एक खेळाडू म्हणून अवलोकनाचा भाग असतो. प्रत्येक खेळाडूला या चक्रातून जावेच लागते आणि इथे मग कधीतरी त्या खेळाडूवर Bad Patch येतो. खेळाडूची कसोटी इथेच लागते कारण अशा परिस्थितीत तुमच्या कडून आवश्यक असा खेळ होत नसतो आणि मानसिक कुचंबणा वाढू शकते. निर्धार अशाच वेळी उपयोगी पडतो.
आता सचिनच्या कारकिर्दीकडे जवळून बघितल्यास, वयाच्या १६व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण म्हणजे स्वप्नावस्था म्हणता येईल. त्यातून त्याला इम्रान, वकार आणि अक्रम,असा तेजतर्रार माऱ्याला सामोरे जावे लागले. लोकांना याचेच औत्स्युक्य कायम वाटत आले. खरतर एकदा का तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरलात की वयाचा मुद्दा गौण ठरतो. तुम्ही १६ वर्षाचे आहेत म्हणून कुणीही तुमच्याशी लुटुपुटुचा खेळ खेळत नाही. तिथे संहारक गोलंदाजीचा सामना करावाच लागतो. त्यातून त्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत, वकारचा एक चेंडू अचानक उसळून, सचिनचे नाक फुटले!! वास्तविक आत्मविश्वास खच्ची व्हायचा हा क्षण पण इथेच सचिनचा मनोनिग्रह दिसला आणि पुढे खेळ चालू ठेवला. एक खेळाडू म्हणून हे स्फूर्तिप्रद होते आणि त्याचे कौतुक होणे रास्त होते. प्रश्न असा, कितीवेळा हा प्रसंग उगाळून सांगायचा? क्रिकेटमध्ये चेंडू लागून जखमी होणे, ही नित्याची बाब असते.
सचिनच्या कारकिर्दीचे जवळून निरीक्षण केल्यावर, मला स्पष्टपणे, २००३ पर्यंतचा सचिन आणि पुढे १० वर्षांची कारकीर्द असे २ भाग पाडावेसे वाटतात. २००३ पर्यंतचा सचिन हा बेडर, साहसी नि आक्रमक फलंदाज होता. पुढे त्याने आपली शैली बदलली आणि वाढत्या वयानुसार नव्या शैलीचा अवलंब केला. १९९८ मधील शारजातील त्याच्या २ खेळी आजही अंगावर काटा आणतात. हाच मुद्दा पुढे खोलवर आणायचा झाल्यास, विशेषतः कसोटी सामन्यात सचिनकडून, त्याच्याच समकालीन ब्रायन लारा किंवा Steve Waugh खेळाडूंनी ज्याप्रकारे कसोटी सामन्यावर सातत्याने छाप उठवली आणि आपल्या संघाला पराभवाच्या खाईतून विजयाकडे नेले, अशा खेळी, विशेषतः २००३ नंतर फारशा आढळत नाहीत. बार्बाडोस इथे लाराने दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद १५३ काढून, संघाला अक्षरश: ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला आणि आपली खेळी क्रिकेट इतिहासात अजरामर केली. एक दिवसीय सामन्यात देखील काहीसा असा प्रकार दिसतो. २००६ साली, ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय Common Wealth मालिकेतील अजरामर १०३ आणि ९७ या खेळी वगळता, बहुतेक अंतिम सामन्यात सचिनला आपला प्रभाव पडत आला नाही. २००३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात, रिकी पॉंटिंगने अफलातून १३८ धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या ३५० पार नेली. त्यावेळी ही धावसंख्या अशक्यप्राय वाटायची परंतु त्याच सामन्यात सचिनने थोडेफार तरी प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते पण सचिन लगेच बाद झाला.
तसेच आपल्या घरच्या विश्वचषक सामन्याच्या अंतिम फेरीत, समोर श्रीलंकेने फक्त २९० धावसंख्येचे आव्हान ठेवले होते परंतु तेंव्हा सचिनने अपेक्षाभंग केला. दुसरे आणखी उदाहरण आठवले. लॉर्ड्स वरील गाजलेला अंतिम फेरीतील सामना आणि गांगुलीने अवघड विजयानंतर काढलेला शर्ट - या सामन्यात सेहवागने घणाघाती ८०+ धावा करून संघाचा पाय रचला होता. पुढे मात्र भारतीय संघाची पडझड झाली आणि त्यात सचिनचा सहभाग होता. पुढे युवराज आणि कैफ, यांनी दैदिप्यमान खेळी करून भारतीय संघाला सामना आणि कप जिंकवून दिला होता. त्याआधी आपला भारतीय संघ काहीवेळा अंतिम फेरीत दाखल व्हायचा पण अंतिम फेरी ओलांडायची करामत करणे अशक्य झाले होते. त्यावेळेस सचिनचे नाव त्रिखंडात दुमदुमत होते पण शेवटचा वार करण्यात सचिन अपयशी झाला होता.
२००३ नंतर सचिन फलंदाज पेक्षा जास्त करून Run Accumulator म्हणून अधिक काळ खेळला. विशेषतः कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षांत तर त्याचे रिफ्लेक्सिस खूपच मंद झाले होते. अर्थात ही वेळ सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत येत असते आणि इथेच खेळाडूने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते पण बहुदा सचिन २०० कसोटी सामने खेळायचे, या जिद्दीपोटी खेळत राहिला. २०११ चा विश्वचषक संपल्यानंतरची २ वर्षे (निवृत्त होईपर्यंत) अगदीच केविलवाणी झाली आणि १०० व्या शतकाची वेस ओलांडायला त्याला बांगला देशाच्या सामन्याची वाट बघावी लागली. त्या शतकात शान तर नव्हतीच पण एक प्रकारची मजबुरी दिसत होती.
१९९२ च्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत, त्याने पर्थ इथल्या कसोटी सामन्यात निव्वळ अजोड शतक लावले आणि चक्क रिची बेनॉचे मनापासूनचे कौतुक प्राप्त करून घेतले. तशा अद्वितीय खेळी २००३ नंतर फार अपवादस्वरूप दिसल्या. आता असे कारण देता येईल, त्यावेळे त्याला टेनिस एल्बोने ग्रासले होते. विचार करा, हाच सचिन इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये असता, तर त्याला खेळायला मिळाले असते का? Steve Waugh २००१ साली निवृत्त झाला तेंव्हा देखील त्याने नाबाद ८५ धावा करून भारताविरुद्ध संघाला सुस्थितीत आणले होते.म्हणजेच त्याचा खेळ विकलांग झाला नव्हता. सचिनने स्वतःच्या बळावर सामना जिंकवून दिला, असे चित्र जितक्या वेळा दिसणे अपेक्षित होते, तितक्या वेळा दिसले नाही, हे महत्वाचे. कारणे अनेक देता येतील. सचिन तर नेहमीच बोलायचं, मला प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे जाणवत नाही आणि जर का ते खरे असेल तर मग कुठल्या दडपणाखाली, बव्हंशी अंतिम फेरीत लवकर बाद होत असे? १०० वे शतक लागले आणि त्याने प्रथमच कबुल केले, प्रेक्षकांच्या अपेक्षांचे दडपण असल्याने, मी मोकळेपणाने खेळू शकलो नाही. सचिन "माणूस" असल्याचा हा क्षण होता.
मला तर असेच वाटते, सुनील गावस्कर वगळता,एकाही भारतीय खेळाडूला निवृत्त कधी व्हावे, हे समजून घेताच आले नाही आणि सन्मानाने निवृत्ती स्विकारता आली नाही. शेवटच्या २ वर्षांत, सचिन विरुद्ध अस्पष्ट का होईना पण निवृत्तीचे सूर ऐकायला येत होते पण अस्पष्ट अशासाठी कारण तोपर्यंत सचिन "देव" झाला होता आणि देव कसा निवृत्त होईल? ही आजारी भारतीय समाजाची मानसिक स्थिती आहे. खेळाडूची इच्छा असो वा नसो, आपला समाज त्याच्या नावाने देवघर तयार करून, त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात!! असे करण्यात, या समाजाला कसलीच लाज वाटत नाही. मग जगप्रसिद्ध सचिन कसा अपवाद ठरणार!!
सचिन खेळायला आला आणि त्याने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली. अगदी लहान वयात देखील तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरू शकता आणि आपली निर्विवाद छाप सोडू शकता. तसेच भारतीय मुलांना "स्वप्न" बघायला शिकवले. अर्थात स्वप्न बघताना, सचिनने आपले बालपण आणि तारुण्य या खेळासाठी सोडून दिले, हा भाग कुणीच लक्षात घेत नाही. तसेच त्याने किती मेहनत घेतली (निव्वळ दैवी देणगी म्हणून स्वस्थ बसला नाही आणि कुणीही तसे बसत नसते) याचा लेखाजोखा घेतला जात नाही. आपल्याला फक्त सचिनचे लखलखीत यश दिसते पण भारतीय समाज असाच आहे. जितके सहज, सोप्या पद्धतीने मिळेल, ते ओरबाडून घ्यायचे, त्याला कोण काय करणार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment