Sunday 13 August 2023

नॅशनल क्रुगर पार्क - भाग २

खरंतर संपूर्ण क्रुगर पार्क बघायचे असेल तर हाताशी निवांतपणा मनाचा निग्रह असणे जरुरीचे आहे. आम्ही सगळे नोकरी करणारे मित्र, तेंव्हा वार्षिक सुटीच्या हिशेबात आनंद घेणार. पहिल्या रात्री सुदैवाने आम्हाला लांबून का होईना "हिप्पो" सारखे अजस्त्र जनावर बघायला मिळाले. अर्थात जवळ कोण जाणार म्हणा? रात्री उशिराने हॉटेलमध्ये परतल्याने, सकाळी लवकर उठायचा प्रश्नच नव्हता. उठल्यानंतर ब्रेकफास्ट म्हणून टिपिकल पाश्चात्य डिशेस मिळाल्या. अर्थात एव्हाना अशा पदार्थांची सवय झाली होती तरी "कोल्ड मीट" खाण्याचे धाडस शेवटपर्यंत झाले नाही!! इथले लोकं अत्यंत आनंदाने आणि चवीने खातात. वास्तविक त्याला चव अशी फारशी नसते. मी १,२ वेळा खाण्याचा प्रयत्न केला होता पण घशाखाली अक्षरश: घास ढकलावा लागला! त्यामुळे आम्लेट पाव तसेच वेगवेगळी सॅलड्स, हाच आमच्यासारख्यांचा नाश्ता असायचा. हॉटेल पारंपरिक गोऱ्या लोकांसाठीचे (एकेकाळी तसेच होते) असल्याने आणि आजही तिथल्या मेन्यूत फारसा बदल नसल्याने, निवडीला फारसा वाव नव्हता. क्रुगर पार्कमध्ये जनावरांचे अरण्य वगळता, फारसे काही बघण्यासारखे नाही आणि दिवसाउजेडी जनावरे देखील आपल्या घरात विश्रांती घेत असतात. त्यामुळे आता अंगावर आलेल्या दिवसाचे काय करायचे? हा प्रश्नच पडला होता परंतु तिथल्या एका वेटरने, तिथे जनावरांच्या छायाचित्रांचे म्युझियम असल्याचे सांगतले अनिअमचा मोर्चा तिकडे वळवला. बऱ्याच व्हिजिटर्सनी, त्यांनी बघितलेल्या जनावरांचे नैसर्गिक अवस्थेतले फोटो ठेवले होते. अर्थात जनावरांचा देखणा जिवंतपणा फोटोमध्ये पकडणे तसे अवघडच असते म्हणा. सर्पांचे फोटो मात्र दिसले नाहीत. परंतु सिंह, वाघ,चित्ते, बिबळे यांचे फोटो बघायला मिळाले. अर्थात म्युझियम झाले तरी किती वेळ घालवणार!! शेवटी पुन्हा जनावरांच्या राज्यात हिंडायचे ठरवले आणि गाडी तिकडे वळवली. फार अपेक्षा नव्हती, त्यामुळे आरामात गाडी चालवत असताना, एकेठिकाणी माणसांचे घोळका दिसला. कसली गर्दी म्हणून गाडी जवळ नेली तर तिथे अवाढव्य आकाराचे सिंह विश्रांती घेत जमिनीवर पहुडला होता. त्याचे आकारमान स्पष्ट दिसत होते तसेच त्याची नजर देखील बघता येत होती. इतका राजस आणि राजबिंडा दिसत होता की डोळ्यांना भुरळ पडली. आमच्यापासून जवळपास ३०० ते ४०० मीटर्सवर तरी नक्कीच होता. आम्ही तर सोडाच तिथल्या तथाकथित धैर्यवान गोऱ्या लोकांचे देखील, सिंहाच्या जवळ जाऊन, बघण्याचे धैर्य झाले नव्हते. एक इच्छा अपुरी राहिली, सिंहाची गगनभेदी डरकाळी ऐकायला मिळाली नाही. असो, दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवता आली. त्याची विख्यात आयाळ, पंजा आणि समजा तोंडात भक्ष पकडले तर सुटका होण्याची शक्यता निव्वळ अशक्य, हेच समजून घेतले. जवळपास अर्धा तास तरी त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघून घेतले. इथे प्रथमच एक सूचना स्पष्टपणे लिहिलेली असते, जनावरांना खायला काहीही देऊ नये आणि जर का दिलेत आणि अनावस्था प्रसंग ओढवला तर क्रुगर पार्क अजिबात जबाबदार नाही. आता इतके स्पष्ट लिहिल्यावर कुणीही काहीही खायला देण्याच्या फंदात पडत नव्हते. जरा वेळाने गाडी घोळक्यातून बाहेर काढली आणि इतरत्र फिरायला सुरवात केली. अर्थात इथे झेब्रे, हरणे प्रचंड प्रमाणात आढळतात आणि सगळे घोळक्याने एकत्र राहतात. कालच मन:पूत ही जनावरे बघितल्याने, आज परत तिचे जनावरे बघण्यात फारसा रस नव्हता. अर्थात धावणारे हरीण बघायला मात्र अतिशय देखणे असते. पुढे अशीच गाडी दामटत असताना, कालच्या हिशेबात आज, अचानक जरा जवळून धिप्पाड हत्तीचा कळप, आपल्या मस्तीत डौलदार चालीत हिंडताना बघायला मिळाला. या जनावराबाबत आम्हाला हॉटेलमध्येच सूचना मिळाली होती, त्यांना डिवचू किंवा चुचकारु नका, जर का हत्ती डिवचला गेला तर मात्र धडगत नसते. अर्थात इतके धिप्पाड जनावर, बघता क्षणीच छातीत धडकी भरते. एक वैशिष्ट्य मात्र बघता आले. कळपातील छोटे हत्ती हे नेहमी कळपाच्या आत असतात आणि त्यांना कळपातील मोठे हत्ती संरक्षण देत असतात. खरतर हरणे देखील वेगवेगळ्या रंगाची होती आणि आमचे तथाकथित ज्ञान इतकेच सीमित होते!! एव्हाना उन्हाची तलखी भाजायला लागली असल्याने, हॉटेलमधील गारवा अधिक सुखाचा, असे मानून हॉटेलमध्ये परतलो. अर्थात अशा उकाड्यात अति थंड बियर हा उतारा भलताच सुखाचा वाटला. संध्याकाळपर्यंत हॉटेलच्या पोर्चमध्ये बसून आत येणारे देखणे सौंदर्य न्याहाळणे, हाच उद्योग उरला होता. त्या रात्री २५ डिसेम्बरची पार्टी होती, आम्हाला जरा उशिरानेच समजले. अर्थात पार्टीचे देय होते. ते देणे चुकवले आणि रात्रीची वाट बघायला लागलो. गोऱ्या मुली वागायला सढळ असल्या तरी अंतर राखून वागत असतात. परिणामी त्यांच्या जवळ फारसे जाता येत नाही. अर्थात ओळख झाल्यावर प्रश्नच उद्भवत नाही. इथे तर सगळेच नवीन, म्हणजे कुणाची ओळख निघणे दुरापास्त. असे असले तरी आम्ही पार्टी एन्जॉय केली, कारण तिथे असलेला अवाढव्य केक आणि कॉकटेल्स!! शेवटी ११च्या सुमारास, बरेचजण पुन्हा अरण्यात जायला निघाले तशी आम्ही मित्रांनी पाय काढता घेतला. जनावरांच्या राज्यात जमेल तितके वावरायचे, हेच ध्येय ठेऊन, आम्ही इथे आलो होतो आणि तिसरी रात्र उंडारायला बाहेर पडलो. यावेळेस जरा वेगळा रस्ता पकडला आणि वातावरणातील बदल किंचित जाणवला,निदान आम्हा सगळ्यांना तरी त्यावेळी तसे भासले. कारण यावेळेस अनेक जिराफांच्या टोळ्या हिंडताना दिसल्या. जिराफ आम्ही कधीही जवळून बघितला नव्हता आणि त्यांच्या उंचीने आम्हा सगळयांची नजर दिपून गेली. वास्तविक जिराफ प्राणी शाकाहारी - शक्यतो झाडांची पाने, गवत इत्यादी त्यांचे अन्नतरी एकूणच अचाट उंची उगीचच माणसाला त्यांच्यापासून दूर ठेवते. एक बाब लक्षात आली, हे सगळे प्राणी सतत कळपात राहतात, संरक्षणाची सिद्धता म्हणून असेल. तसेच रात्रीच्या वेळी त्यांचे डोळे फारच चमकदार दिसतात. पार्कमध्ये जागोजागी तलाव तसेच पाणथळे बांधलेली आहेत जेणेकरून, विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरांना तहाण भागवणे सहजप्राप्य होईल. अशाच एका तलावात, त्या रात्री अवाढव्य मगर बघितली. पाण्यामधील तिचे साम्राज्य कधीही उध्वस्त न होणारे परंतु पाण्याबाहेर मात्र मगर बरीचशी असहाय होते. जवळपास ४,५ फुटी लांब होती. काळीकभीन्न मगर पाण्यात असताना, अति हिंस्र असते. आमचे एक दुर्दैव, शिकार करतानाचे जनावर बघायला मिळाले नाही तसेच केलेल्या शिकारीचा फडशा पाडणारे जनावर बघायला मिळाले नाही. काही जणांना मिळाले असेलही पण त्यासाठी मोठा मुक्काम करणे गरजेचे असावे. दुसऱ्या दिवशी परतायचे असल्याने, झाले त्या दर्शनावर समाधान मानून हॉटेलचा रस्ता पकडला आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करून घराच्या वाटेवर निघालो.

No comments:

Post a Comment