Tuesday, 19 April 2022

५०० लेख लिहून झाल्याचे निमित्त

वास्तविक हा आकडा गाठून २,३ आठवडे उलटले परंतु त्यावेळी डोक्यात अनेक विचार घोळत होते आणि त्याचा योग्य तो निचरा करण्यापायी, हे टिपण लिहायला उशीर झाला. मनात नेहमीच बऱ्याच गोष्टी येतात, अनेक विषय घोळत असतात. काही विषय वाचनातून सुचतात तर काही विषय अनुभवातून मनात गठित होतात. वयाच्या १०व्या वर्षांपासून हळूहळू वाचनाची सवय लागली परंतु त्याला वेग आला, तो परदेशात राहायला सुरु झाली तेंव्हापासून. परदेशात *समाज न्याहाळणे* आणि *समजून* घेणे नित्य चालतच होते परंतु एकटाच रहात असल्याने, हाताशी बराच वेळ मिळत असे आणि मग आहे तो वेळ *सत्कारणी* का लावू नये? या प्रश्नातून आधी वाचन आणि मग नंतर लिहायला सुरवात झाली. लिहीण्याचे स्वप्न तसे फार नंतर पडायला लागले. मुळात लिहायचे काय? हाच मुद्दा महत्वाचा होता. परंतु मराठी कविता वाचायला सुरवात झाली आणि मनात बरेच विचार घोळायला लागले!! त्यातूनच २००९ च्या सुमारास आधी फेसबुक आणि नंतर ब्लॉग सुरु झाला. तेंव्हा देखील मी इथे इतका रमून जाईन याची सुतराम शक्यता नव्हती. तसे बघितल्यास,  घरी आणि काही ठराविक मित्रांना पत्रे लिहिणे हा मुख्य आनंदाचा भाग होता, अगदी नंतर इ मेल सुरु झाले आणि त्या द्वाराने दणदणीत लांबीची पत्रे जात होती. सगळेच फार सहनशील होते. तरीही *वाचन* हा छंद खरा आणि सुदैवाने आजही त्यात खंड पडलेला नाही. अर्थात विषय आणि आवड, वयानुरूप बदलत गेली. परिणामी मन *वठले* नाही. आज जेंव्हा मी किंचित मागे वळून बघतो तेंव्हा सुरवातीची शैली आणि आजची शैली यात महदंतर पडल्याचे स्पष्ट जाणवते आणि ते योग्यच झाले अन्यथा माझा रस निघून गेला असता. आज जेंव्हा पूर्वीचे वाचतो तेंव्हा तर परखडपणे त्यातील *अधिरी* वृत्ती, विषयाचे *अपुरे आकलन* इत्यादी कमतरता स्पष्टपणे दिसून येते. अगदी संगीत विषयक लिहिलेल्या लेखांत देखील आणि असे असून देखील काही मित्रांनी दिलेले उत्तेजन मला आजही महत्वाचे वाटते. एक उदाहरण देतो, ८,९ वर्षांपूर्वी काश्मीर इथे झुबीन मेहतांचा सिम्फनी कार्यक्रम झाला होता. अतिशय सुंदर आणि त्यांच्या लौकिकाला साजेसा असा झाला होता. अर्थातच मी लगोलग (हे लगोलग लिहिणे, हा अधिरेपणा) आधी फेसबुकवर आणि नंतर काही जाणकार मित्रांना पाठवला. आज जेंव्हा मी पुन्हा वाचतो तेंव्हा त्यातील असंख्य त्रुटी दिसतात. असे असून देखील *आनंद मोडक* सारख्या जाणकार व्यक्तीने माझे कौतुक करून, माझा हुरूप वाढवला होता. त्यावेळी असे उत्तेजन बऱ्याच जणांनी वेळोवेळी दिले होते, आजही देतात. आज मी जेंव्हा माझ्याच  रागरंग* या पुस्तकातील लेख वाचतो तेंव्हा असेच मनात येते, काही लेखांच्या बाबतीत थोडी घाई केली. थोडा विचार केला असता तर हेच लेख आणखी छान आणि वैचारिक झाले असते. आपले लेखन *वैचारिक* व्हावे ही माझी मनापासूनची इच्छा आणि त्यातूनच मग इतरांना *अगम्य* असे लिहिले जाते पण मला तसे अजिबात वाटत नाही. या उलट असेच वाटते, प्रत्येकवेळेस, लेखकाने (इथे मी स्वतःला *लेखक* म्हणवून घेत आहे पण सगळेच मित्र असल्याने समजून घेतील....) वाचकाला काय आवडेल? याचा विचार करून का लिहावे? तसे केल्याने, जे लिहिले जाईल, ती त्याची खरी *अभिव्यक्ती* असेल का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, कधीतरी वाचकांनी वरची पायरी चढावी की!! प्रत्येकवेळी लेखकानेच खालची पायरी का उतरावी? हे अहंकारी आहे, हे मान्यच  आहे. माझे लिखाण *अवघड* भाषेत असते, हा आता सर्वमान्य आक्षेप आहे आणि मी तर माझी शैली बदलणे अवघड आहे - वास्तविक विषयानुरुप शैली बदलते, उदाहरणार्थ माझे साऊथ आफ्रिकेतील अनुभव. याचा वेगळा अर्थ, जसा विषय असेल तसे लेखन होणार. मी काहीवेळा समीक्षापर लेखन करतो. आता असा विषय जेंव्हा घेतो तेंव्हा तिथे तशीच भाषा येणे अनिवार्य नव्हे का? कवितेसारखा अति लवचिक साहित्य प्रकार हाताळताना, त्याचे *सौंदर्य* मांडताना, भाषा सांकेतिक होणारच. काही तांत्रिक शब्द येणारच. तसेच संगीताविषयी लिहिताना घडते. आता *संगीत* या विषयावर सरळ, साधे आणि सोपे, निदान मराठीत बरेच सापडते आणि जर मी तीच वाट धरली तर माझी *ओळख* ती कुठली? मळलेल्या वाटेने जाण्यात काय हशील आहे आणि मग या विचाराने, लेखाची शैली ठरली जाते. बरे, लेखन करून भरपूर पैसा मिळवावा, अशी माझी कधीच महत्वाकांक्षा नाही  मग जर का पैसा नाही तर मग निदान मानसिक समाधान तरी मिळवावे!! यात काय चूक. आता जवळपास १२ वर्षे मी अथकपणे लिहीत आहे पण इतक्या वर्षांत मी कधीही *वाचक* डोळ्यासमोर ठेऊन, एक अक्षर देखील लिहिले नाही, मला ते जमणारच नाही. माझा तसा *पिंड* नाही. माझी इथे *अतोनात चेष्टा* केली जाते आणि याची मला याची पूर्ण कल्पना आहे. सगळे मित्रच आहेत तेंव्हा मित्राची चेष्टा होणे, क्रमप्राप्तच आहे. असे असून देखील, आजमितीस एकही लेख असा लिहून झाला नाही जिथे मला १००% समाधान मिळाले!! लेखन हा छंदच असा आहे, इथे *संपूर्ण समाधान* हे फक्त कागदावर(च) असते, प्रत्येक्षात कधीही मिळणारे नसते, जे दिसते ते कायमस्वरूपी *मृगजळ* असते आणि हेच मृगजळ तुम्हाला प्रत्येकवेळी लिहायला प्रवृत्त करते. 

No comments:

Post a Comment