Tuesday, 12 April 2022

साहित्यातील (सत्य) - भाग ३

हा या मालिकेतील शेवटचा लेख परंतु सुरवात करण्याआधी एक स्पष्टीकरण. इथे *निर्मिती* जेंव्हा म्हटले तेंव्हा त्यात सगळ्या कृती अंतर्भूत आहेत. *नवनिर्मिती* ही फक्त कलांच्या संदर्भात असते, हे म्हणणे चुकीचे ठरेल कारण लेखक जे लिहीत असतो, ती देखील *निर्मिती* असते आणि ती इतर कलांप्रमाणे सृजनाच्या वाटा धुंडाळत असते. अगदी एखादा *खेळ* देखील *सर्जनशील* असतो आणि त्यात काहीही वावगे नसते. कलेचे प्रांगण हे असे विस्तीर्ण असते. केवळ संगीत, चित्र ,शिल्प किंवा अभिनय, ही माध्यमे म्हणजेच नवनिर्मिती नव्हे. मुळात लेखक जे एका प्रकारचे सत्य सांगत असतो त्याची पातळी आणि हे प्रश्न ज्या पातळीवरून विचारले जातात ती पातळी नेहमीच सर्वस्वी भिन्न असते. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाच्या काही किंवा सगळ्या लेखनातून वावरणारी माणसे अगतिक किंवा हीन मानाची असलीबसतील, असे अजिबात नव्हे आणि तसे त्यांना बसवू पाहणे हे अप्रस्तुत आहे. तरी त्यावरून तो, जंतुवादाचा पुरस्कार करतो असे म्हणणे म्हणजे साहित्याच्य्या स्वरूपाविषयी अज्ञान दाखवण्यासारखे होय. अगतिकतेचा अनुभव किंवा माणसाच्या हीनतेचा अनुभव सगळ्यांना केंव्हा ना केंव्हातरी येतच असतो. असे असता, हा अनुभव साहित्यात व्यक्त झाला तर तो जंतुवादी आहे, असा निष्कर्ष काढणे तर्कशास्त्राच्या कुठल्या नियमांना धरून आहे? मनुष्य अमुक एक अनुभव अनुभव आपल्या कलाकृतीतून का व्यक्त करतो? हे त्याच्या सुसंगत अशा जीवितविषयक तत्वज्ञानावरून ठरत नसते. ते बरेचवेळा मानसिक घडामोडीमुळे ठरते आणि परिस्थितीमुळेही ठरते. उदाहरणार्थ, लेखकाने आपल्या कलाकृतीत गुंफलेले अनुभव हे अनुभव घेण्याच्या घेण्याच्या एखाद्या लकबीच्या चौकटीत बसतीलच असे नाही आणि त्यांना तसे बसवू पाहणे हे अप्रस्तुत आहे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे, नीती आणि अनीती, बरेपणा आणि वाईटपणा, माणसाचे विचार आगर त्याचा आशावाद ही साहित्यात येऊच शकत नाहीत. ह्या गोष्टी ज्या अर्थी जीवनात असतात त्या अर्थी साहित्यात येणारच परंतु एखादी गोष्ट साहित्याचा विषय असणे वेगळे आणि साहित्याचा आशय असणे वेगळे, हे ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे. साहित्याच्या स्वरूपाविषयीच्या अज्ञानामुळे आपल्यालादे साहित्यिकांकडून अतिरेकी अपेक्षा केल्या जातात. समाजसुधारक, क्रांतिकारक,तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ, या सर्वांचे कार्य त्याने केले पाहिजे असा केला जातो. तास वारंवार आग्रह धरला जातो. वास्तविक शास्त्रज्ञांवर असा कुणी *जुलूम* करीत नाही. तत्त्वज्ञाने तलवार घेऊन साम्राज्य स्थापन केली नाहीत तर तो तत्वज्ञच नव्हे* असे सुदैवाने कुणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. पण *साहित्यिकाने समाजसुधारणेचे कंकण बांधले तरच तो खरा साहित्यिक* असे आपल्याकडे वारंवार म्हटले जाते आणि त्यातूनच *समाजप्रबोधन* सारखा अत्यंत भोंगळ शब्द जन्माला आला आणि अजूनही दुर्दैवाने *निकष* म्हणून प्रस्थापित झाला!! असे म्हणण्याने आपण कलेचा अपमान करीत आहोत, हे त्यांच्या गावी देखील नसते. एखादी सुधारणा योग्य कि अयोग्य, हे तर्काने सिद्ध होऊ शकते. कलाकृती हे स्वभावतः शुद्ध करू शकत नाही. तेंव्हा या सगळ्या घडामोडीत साहित्यिकाची भूमिका दुय्यम स्वरूपाची असते हे ध्यानात घेतले पाहिजे. आणि जर का असे असेल तर कुठलाही मनुष्य साहित्यिक होण्यापेक्षा विचारवंत अधिक होणेच पसंत करील. शास्त्रज्ञ, क्रांतिकारक, समाजसुधारक वगैरे लोकं जे करतात, त्याहून काही वेगळे पण तितकेच मूल्यवान असे काहीतरी कलावंत करीत असतात आणि याच मुद्द्यावर कलेचे मोठेपण सामावलेले आहे. तिला समाजसुधारणेची *बटीक* करून मोठेपणा मिळवून द्यायची अजिबात गरज नाही. *अर्थात हा विषय अतिशय मोठा आहे आणि असा २,३ लेखांत संपण्यासारखा नाही. इथे माझ्या मर्यादा अधिक स्पष्ट होतात. हे वाचून तुम्हाला आणखी काही वेगळे सुचू शकते. कदाचित मी हे सगळे चुकीचे लिहिले, असे देखील मांडता येऊ शकते. असे जर घडले तर मला त्याचा आनंद अधिक होईल, हे नक्की.* *समाप्त*

No comments:

Post a Comment