Monday, 11 April 2022

साहित्यातील (सत्य) - भाग २

पहिल्या लेखातून एक प्रश्न उद्भवतो. कलावंत जर कुठल्याही विशिष्ट अनुभवाविषयी लिहीत असेल तर मग कलेतल्या आशयाची विश्वात्मकता (Universality) कशामुळे निर्माण होते? एखादी लघुकथा किंवा एखादी हकीगत ह्यात मग अंतर काय राहिले? या प्रश्नाला उत्तर असे देता येईल, लेखक नुसती हकीगत सांगत नसतो तर अनुभवाची काही एक संगती तसेच आकृती निर्माण करीत असतो. ही जी आकृती तो निर्माण करतो तशीच हुबेहूब आकृती दुसऱ्याच्या अनुभवातून किंवा त्याच्याच इतर अनुभवातून निर्माण होणे अवघड असते. परंतु ती आकृती स्वयंपूर्ण असते. आकृती म्हणून इतरांना प्रतीत होऊ शकते आणि अशाच आकृतीचे अस्तित्व सूचित करण्याचे कलाकृतीचे सामर्थ्य हीच तिच्या आशयाची विश्वात्मकता होय. कलावंताच्या व्यक्तिमत्वाचा म्हणजेच अनुभव घेण्याच्या पद्धतीचा स्पर्श झाला म्हणजे हकीगतीची लघुकथा होते. तेंव्हा कलाकृतीच्या निर्मितीला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लेखकाचे व्यक्तिमत्व, त्याची अनुभव घेण्याची पद्धत!! प्रत्येक कलाकृतीच्या मागे असलेल्या या अनुभव घेण्याच्या पद्धतीमुळे कलाकृतीला व्यापक अर्थ प्राप्त होतो. लेखकाच्या व्यक्तिमत्वाच्या किंवा अनुभव घेण्याच्या पद्धतीच्या संस्कारातून अनुभवांची संगती जुळते, तिचे तार्किक स्वरूप नसते तर ते कलात्मक असते. आता एक उदाहरण बघू. *एकच प्याला* हे नाटक वाचून दारू पिणे वाईट, हे निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. परंतु एका विशिष्ट परिस्थितीत एका विशिष्ट प्रकृतीचा माणूस, दारू प्यायला लागला, तेंव्हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश झाला इतकेच सार (अर्थात असा निष्कर्ष काढायचा हट्टच असेल तर...) हता नाटकातून काढता येईल. ही घटनांची साखळी दारूबंदीचे पुरस्कर्ते आणि विरोधक, ह्या दोघांना पटण्यासारखी आहे आणि म्हणूनच दोघेही या कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतील. परंतु आपल्या नैतिक भूमिकेचे समर्थन जर विरोधक आणि पुरस्कर्ते, ह्या आणि अशा अन्य कलाकृतींच्या आधारे करू पाहतील तर ती समूळ निराशा ठरेल. साहित्याविषयी बोलताना आपल्याकडे *ध्येयवाद*, *आशावाद*, *मांगल्य* किंवा अगदी *जंतूवाद* तसेच *सामाजिक भान* वगैरे शब्दांचा बोभाटा ऐकायला मिळतो. मुळात कुठलीही कलाकृती ही ध्येयवाद हा श्रेष्ठ आहे अगर माणसाने आशावादी असावे, असा संदेश देऊ शकत नाही. मनुष्याने ध्येयवादी असावे की असू नये? हा एक नैतिक प्रश्न आहे. आणि कुठलीही कलाकृती स्वभावतः या प्रश्नाचे *अस्तिपक्षी* किंवा *नास्तिपक्षी* उत्तर देण्यास असमर्थ आहे. *क्रमश:*

No comments:

Post a Comment