Friday, 15 April 2022
साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग २
मुळात आपण *वास्तवता* हा शब्दच अकारण गहन करून ठेवला आहे आणि त्यातून मुळातच संकल्पना गोंधळाची केल्यामुळे पुढे सगळेच फार विसविशीत होऊन बसले. तसे बघायला गेल्यास, कुठल्याही प्रसंगाचे आणि व्यक्तीचे चित्रण केले किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत मुंबईत काय घडले याचे वर्णन केले तर त्या वर्णनाला *कलाकृती* म्हणता येईल का? अगदी ,त्या वर्णनाची भाषा अगर पद्धती जरी कथा-कादंबऱ्यांत जशी आढळते तरी त्यामुळे ती कलाकृती ठरणार नाही. परंतु ललित साहित्य हा वास्तव जीवनाचा आरसा आहे ही भूमिका शब्दश: मान्य केली तर त्या वर्णनाला कलाकृती म्हणता येईल.
वास्तवतेचे पुरस्कर्ते देखील कुठल्याही प्रसंगाच्या किंवा प्रसंगमालिकेच्या वर्णनास कलाकृती म्हणणार नाहीत. प्रत्यक्षात जे पाहायला मिळते त्याचेच केवळ कलाकृतीद्वारे आपल्याला दर्शन घडते असेही ते म्हणतील का? याचाच वेगळा अर्थ, वास्तवतेच्या वर्णनाहून अधिक काहीतरी कलाकृतीत असावे लागते, हे त्यांना मान्य आहे. हे *अधिक काहीतरी* काय असते? कलाकृतीत नुसत्या वास्तवतेचे चित्रण नसते तर त्या वास्तवतेच्या कलावंताने काही तरी संगती निर्माण केलेली असते, तिथे त्याने वास्तवतेचा अर्थ लावलेला असतो. असेच उत्तर या प्रश्नाला वास्तवतेचे पुरस्कर्ते देतील.
त्यांची भूमिका अशी असू शकते, कलावंत हा जीवनाचा अर्थ लावीत असतो (जीवनाचा संपूर्ण अर्थ साहित्याद्वारे लावणे निव्वळ अशक्य आहे). *शेवटी सत्याचा जय होतो* किंवा दलित वर्गाचाच वर्गकलहात अखेर विजय होणार असतो* अशा प्रकारचे सत्य तो सांगत असतो.
पण या बाबतीत २ अडचणी उद्भवतात. एक अशी की, मोठमोठ्या कलाकृतीतून सांगितलेली सत्ये जर आपण तपासून बघितली तर ती सामान्य स्वरूपाची असतात. ती कुठल्याही शहाण्या माणसास माहीत असतात. आणि जर का त्याचेच ज्ञान करून घेण्यासाठी जर साहित्य वाचायचे असेल तर बहुतेक माणसे साहित्याच्या वाटेला जाणार नाहीत. त्या शिवाय, कलाकृतीतून जे सांगितलेले असते त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, अवघड आणि जीवनावर प्रकाश पडणारे सत्य शास्त्रीय किंवा तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांतून सांगितलेले असते. मग साहित्य वाचण्यात वेळ व्यर्थ करण्यापेक्षा हेच ग्रंथ का वाचू नयेत? हा प्रश्न पुढे उभा राहतो.
या प्रश्नावर २ प्रकारची उत्तरे देता येतील. पहिले असे, सर्वसामान्य माणसाच्या अंगी शास्त्रीय किंवा तत्वज्ञानावरील ग्रंथ वाचायला लागणारी बुद्धिमत्ता किंवा चिकाटी नसते. म्हणून त्यांना शास्त्रीय स्वरूपाची सत्ये कलावंत सोप्या आणि आकर्षक स्वरूपात सांगत असतो. याच भूमिकेवरून बहुतेक धर्मात कथा,काव्ये, पुराणे यांना महत्व दिलेले असते. महाराष्ट्रात विद्वान म्हणून गाजलेली अनेक माणसे याच भूमिकेवरून ललित साहित्याकडे बघत असतात. आता यालाच *विद्वत्ता* म्हणावी का? हा दुसरा उपप्रश्न इथे उद्भवतो.
काही लोकांची भूमिका वेगळी असते. त्यांच्या मते, शास्त्रीय स्वरूपाचे सत्य कलावंत देखील सांगत असतो पण तो तेच सत्य कलात्मकपणे सांगत असतो!! त्याची तो वाचकाला *प्रतीती* देत असतो. ज्ञानमार्गाने सत्य आकळता येते परंतु त्याचा कलात्मक आविष्कार झाल्याशिवाय ते प्रतीत होऊ शकत नाही. अर्थात इथे कलावंताला थोडा अधिक मान मिळू शकतो. शास्त्रज्ञाहून इथे काहीतरी वेगळे असे कलावंत करीत असतो. पण कलावंत आणि शास्त्रज्ञ एकच भूमिका मांडत असतात, हे मान्य करता येऊ शकते.
*क्रमश:*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment