Thursday, 7 January 2021

मनबीना के तार

निरनिराळ्या मान्यवर संस्थेत अभ्यासशाखा म्हणून चित्रपटाला मान्यता मिळून देखील चित्रपट गीतांचा अभ्यास मात्र रोडावलेला आहे आणि ही वस्तुस्थिती त्याच्या सखोल विचारांचे कारण ठरू शकते. अर्थात इतके लिहूनही चित्रपट गीत या विषयाबाबत बौद्धिक, वैचारिक आणि अनेक विद्याशाखाप्रेरित घडामोडीचे परिणाम चित्रपट गीतांचा अधिक सखोल विचार हवा, या मुद्द्याकडे वळते. या संदर्भात २ दृष्टिकोन समोर येऊ शकतात. हिंदी चित्रपट गीतांमुळे पसंत किंवा मान्य ध्वनी आवाज, सादरीकरणाच्या लयी यांविषयी काही सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या. अर्थात हा मुद्दा दोषास्पद मानता येणार नाही परंतु याची दुसरी बाजू अशी, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतीत विचक्षण नसलेल्या श्रोत्यांमुळे चित्रपट गीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे आणि त्याच्या प्रभावाचे सर्वत्र वितरण होणे, हा खरे म्हणजे निकृष्टतेचा प्रसार होय. त्यांना ते आणि तसे आवडते या तत्वानुसार तयार होणारे चित्रपट गीत हा एक लघुतम साधारण विभाजक आहे आणि या विचाराला पूर्णपणे फाटा देणारे आजचे आपले गाणे आहे. ललित संगीतातील कुठल्याही गाण्यात ३ घटक नेहमीच अस्तित्वात असतात आणि त्यातील कुठलाही घटक ठिसूळ असणे परवडणारे नसते. याच विधानाला आधारभूत ठेऊन, कवी न्याय शर्मा यांची कविता बघायला घेऊ. २ अंतरे असलेले गीत आहे आणि प्रत्येक अंतरा प्रत्येकी ३ ओळींचा आहे. मुळात हा कवी रूढार्थाने चित्रपट गीते लिहिणारा कवी नव्हे आणि त्यांच्या बव्हंशी कविता या संगीतकार जयदेव यांनीच संगीतबद्ध केल्या आहेत आणि हा काही योगायोग म्हणता येणार नाही. संगीतकार जयदेव यांचा पिंड हा गीतातील दडलेल्या कवितेकडे विचक्षण दृष्टीने बघणारा होता. मनाला *बीना* उपमा देणे काही नवीन नव्हे परंतु कवितेच्या पहिल्या ओळीशी सांगड घातली की लगेच दिलेली उपमा पूर्ण होते. गीत व्याकुळ मनःस्थितीचे आहे आणि हे गाण्याच्या मुखड्यावरून लगेच ध्यानात येते. वास्तविक प्रस्तुत कविता ही चित्रपटासाठी केलेले लेखन नव्हे तरी देखील काही ठिकाणी त्याची चुणूक दिसते. पहिल्याच कडव्यात *घुमड* शब्द तसेच पुढील ओळीत *घुट* शब्द एकापाठोपाठ आले आहेत. आता प्रश्न असा आहे, या शब्दांची द्विरुक्ती साधून आशय किती संपृक्त झाला आहे? अशी द्विरुक्ती गरजेची होती का? केवळ *गेयता* साधण्यासाठी आणि शाब्दिक लय सांभाळण्यासाठी तर अशी रचना केली आहे का? चित्रपट गीताची नेहमीच पहिली मागणी ही गेयतेची असते जेणेकरून गाण्याची चाल बांधणे सुकर होऊ शकते. मुखड्यामधील ओळीतून कवितेची मुख्य कल्पना मांडल्यावर पुढील ओळीत, त्या कल्पनांचे विस्तारीकरण अपेक्षित असते. त्यासाठी मग निसर्गातील घटना आणि अस्तित्व कामी येते. या दृष्टीने बघायला गेल्यास, दुसरा अंतरा विशेष महत्वाचा आहे. पाण्याचे रूपक हाताशी घेऊन पुढे *माझी के साथ हैं धारा* ही ओळ किंवा *डुबी नैय्या दूर है आशा* या कल्पनेला धरून लगेच *डुबा दूर किनारा* या ओळीने चित्र पूर्ण झाले. चटपटीतपणा हा गीतलेखनाचा एक गुण मानला जातो आणि या मताला *निकष* म्हणून नको तितकी मान्यता मिळाली. यात खरे नुकसान झाले ते रसिकांचे. परिणामी गीतातील *जातिवंत* कविता बरेचवेळा दुर्लक्षित राहिली. एकतर चित्रपटातील प्रसंग हे साचेबद्ध असतात त्यामुळे कवींना कविता लिहायला मर्यादा पडतात. यामुळे काही प्रतिभावंत कवी देखील प्रसंगी *टुकार* कविता लिहितात. हा या माध्यमाचा दोष आहे. या गीताची स्वररचना ही संगीतकार जयदेव यांनी केली आहे. रचना सत्कृदर्शनी तरी *खमाज* रागावर आढळते तरीही रागावर तशीच्या तशी बेतलेली नाही. अर्थात हा या संगीतकाराचा पिंड!! या संगीतकाराच्या एकूण सगळ्या कारकिर्दीवर बारकाईने नजर फिरवली तर असे आढळते, यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांत *काव्य* तितकेच सकस, आशयपूर्ण तर असतेच परंतु प्रसंगी शब्दांसाठी चालीला वेगळे वळण देण्याची धमक दिसते. शब्दांवरील ही अव्यभिचारी निष्ठा!! ललित संगीताच्या आकृतिबंधात संगीतकार शक्यतो स्वररचनेला, शब्दांसाठी बदलायला तयार होत नसतात आणि या पार्श्वभूमीवर जयदेव यांचे वेगळेपण उठून दिसते. याच कारणामुळे असेल पण या संगीतकाराच्या अनेक स्वररचना चित्रपटीय चौकटीशिवाय उभ्या राहू शकतात. या गाण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, *मुखडा* अशा प्रकारे बांधला आहे की त्यावरून पुढील स्वररचनेचे अजिबात सूचन होत नाही. वेगळ्या शब्दात पुढील दोन्ही अंतरे वेगळ्या सुरावटीवर *उठावण* घेतात आणि ऐकणाऱ्याला चकित करून टाकतात. इथे मुखडा मध्य सप्तकात सुरु होतो. यात देखील संगीतकार म्हणून, मुखड्याची दुसरी ओळ *मन बीना के तार* ही सलग ३ वेळा परंतु वेगवेगळ्या ढंगाने आपल्या समोर येते आणि शेवटी येताना *आज अचानक टुटे देखे* या ओळीच्या चालीशी संलग्न होते. इथेच खरंतर या गाण्याचे वेगळेपण दिसून येते. अंतरे सुरवातीला अगदी शांत स्वरांत सुरु होतात परंतु तिसरी ओळ येते आणि चाल एकदम तार सप्तकात प्रवास करायला सुरवात करते!! *अरमानो का जला बसेरा* हे ओळ हळूहळू वरच्या सुरांत प्रवेश करते आणि *बसेरा* शब्दाचा शेवट करताना अतिशय अवघड अशी हरकत घेतली जाते. ही हरकत इतकी अवघड आहे की ऐकणारा थक्क होतो. ऐकणाऱ्याला थक्क करणे, अचानक चालीला वेगळे वळण देणे, या सगळ्या क्लुप्त्या, हा संगीतकार इतक्या सहजतेने आणि कुशाग्रतेने करतो की तिथे आपल्या रसग्रहणाच्या मर्यादा स्पष्ट होतात!! लगेच शेवटची ओळ *आंसू हैं नाशाद* घेताना, आधीच्या स्वरचौकटीला सुसंगत असे गायन केले आहे पण हळूहळू, पायरी पायरीने स्वर खाली आणला आहे. इथे मुखड्याप्रमाणे ही ओळ देखील ३ वेळा घेतली आहे आणि आपला *स्वरवाक्यांश* मुखड्याशी जुळवून घेतला आहे. ही जोड खरोखरच कमालीची तलम आणि तितकीच अवघड आहे. याच प्रकारे शेवटचा अंतरा घेतला आहे पण जरी *पठडी* तशीच असली तरी त्यात विलक्षण स्वरिक गुंतागुंत आहे आणि आपले गाणे त्यांनी एकदम बौद्धिक पातळीवर आणून सोडले आहे. आपल्या रचनांत कुठेतरी वैचारिक भाग असावा, या विषयी हा संगीतकार कायम आग्रही राहिला. अगदी साधी,सरळ प्रणयी थाटाची रचना असली तरी त्यात कुठेतरी या वरील वैशिष्ट्याचा आढळ कायम दिसतो. जयदेव यांनी कधीही भरमसाट वाद्यमेळ वापरला नाही कारण त्यांच्या स्वररचना या *गायकी* अंगाच्या असल्याने, त्यांना तशी जरुरी भासली नाही. या गाण्यातील लताबाईंचे *गायन* हा स्वतंत्र निबंधाचा विषय आहे. मुळात चाल अतिशय गुंतागुंतीची असल्याने, ती चाल पेलण्याचा *वकूब* आवश्यक होता आणि तिथे केवळ लताबाई!! मला कधीकधी प्रश्न पडतो, हाताशी इतका *तालेवार* गळा आहे म्हणून काही संगीतकारांनी अशा कठीण चालींची निर्मिती केली की काय? स्वररचनेत प्रत्येक स्वरिक वाक्यांशामागे फार छोट्या छोट्या हरकती आहेत तसेच काही ठळक हरकती आहेत. या हरकती ठळक आहेत, त्या आपल्याला सहज दृष्टोत्पत्तीस पडतात परंतु जिथे शब्दांगणिक निमुळत्या होत जाणाऱ्या हरकती कमालीच्या अवघड आहेत आणि ते *शिवधनुष्य* लताबाईंनी समर्थपणे पेलले आहे. दुसरे असे, जेंव्हा चाल हळूहळू वरच्या सुरांत जाते आणि तिथून खाली उतरते, ते उतरणे देखील फार जीवघेणे आणि असामान्य झाले आहे. अशी गाणी लताबाईंच्या कारकिर्दीत फार विरळा सापडतात. इथे केवळ तयार गळा असून उपयोगाचे नाही तर गायिकेच्या अचूक नजरेची गरज आहे. जरा जरी ढिलाई झाली असती तर या गाण्याचा सगळा *पोत* विसविशीत झाला असता आणि सगळी स्वररचना फसली असती. इथे स्वरांवर *विसावणे* देखील तितकेच अचूक असायलाच हवे होते. लताबाई इथे श्रेष्ठ ठरतात. चालीतील प्रत्येक स्वराला आपल्या गळ्यातून वेगळे *सौंदर्य* देतात आणि गाण्याला फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. खरे तर या गाण्यात आणखी बरीच सौंदर्यस्थळे आहेत आणि त्याचा प्रत्येकाने आपल्या वकुबाप्रमाणे शोध घ्यावा. ही शोध प्रक्रिया अशी निरंतर चालू राहील, अशा ताकदीचे हे असामान्य गाणे आहे. आज अचानक टुटे देखे, मन बीना के तार घुमड घुमड कर घिर के आयी दुख की घोर घटाये दिल चाहता है मन ही मन में घुट घुट कर मर जाये अरमानो का जला बसेरा आंसू हैं नाशाद लहेरो में पतवार खिंचकर माझी के साथ हैं धारा डुबी नैय्या दूर है आशा डुबा दूर किनारा किस से कहू मैं मेरे खिवैय्या ले चल नदिया पार Aaj Achanak Toote Dekhe Man Beena Ke Taar Lata Mangeshkar Kinare Kinare (1963) - YouTube

1 comment:

  1. वाह, अतिशय सुंदर विश्लेषण, पुन्हा पुन्हा गाणे ऐकावे वाटते

    ReplyDelete