Tuesday, 12 January 2021

पवन दिवानी

जनसंगीत तसेच हिंदी चित्रपट संगीत या दोहोंबाबत २ शब्द वारंवार उपयोगात आणले जातात. अर्थात त्याचे अर्थ थोडे तांत्रिक असतात. लोकप्रिय म्हणजे *पॉप्युलर* या अर्थी आणि जनता म्हणजे *पब्लिक* या अर्थी. या दोहींचे आशय जरा ध्यानात घेण्याइतका वेगळेपणा आपल्या चर्चेत भूमिका बजावत असतात. मुख्यतः त्याची ३ अंगे किंवा त्यांच्या अर्थक्षेत्रांचे ३ विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे. एक तर कुठल्या लोकांना प्रिय? असे विचारल्यास, एका अनिश्चित इतस्ततः पसरलेल्या आणि संमिश्र पातळ्यांच्या श्रोते-प्रेक्षक समूहांना एरव्ही अगदी तळागाळातील म्हणण्यासारखे गट समाविष्ट असतात. तिसरे असे की, जनसंगीतात सर्वसामान्य प्रश्नांना जागा असते. याच मुद्द्यावर आपण आजचे लोकप्रिय गीत अभ्यासणार आहोत. *पवन दिवानी* हे चित्रपट गीत आज इतकी वर्षे लोकांच्या मनावर आपले गारुड पसरवून आहे आणि ते का आहे? याचाच पडताळा बघणार आहोत. सुरवातीला आपण गाण्यातील कविता कशी आहे, याचा उहापोह करू. शायर मजरुह सुलतानपुरी यांची शायरी आहे. सिनेमात, रंगमंचावरील नृत्यप्रसंग आहे. त्यामुळे गाण्यातील काव्य हे संगीताधारित असणार हे उघड आहे. सगळी कविता वाचताना एक बाब प्रकर्षाने ध्यानात येते, सगळी कविता ही २,३,४ (खरतर *चौथा* शब्द हा फक्त *एकाक्षर* स्वरूपात लिहिला आहे) शब्दांच्या वाक्यात लिहिली गेली आहे. गाणे अतिशय द्रुत लयीत असल्याने, शब्दांची फार अडचण होऊ नये, याच दृष्टीने कवितेची रचना केली आहे. फरक फक्त मुखड्याची दुसरी ओळ किंवा अंतऱ्याची शेवटची ओळ. तिथे अधिक शब्दसंख्या आहे आणि त्याचे कारण म्हणजे मुखडा किंवा अंतरा संपवताना *गायकी* करायला वाव मिळावा. एखाद्या बंदिशींप्रमाणे शब्दकळा आहे. नृत्यगीत असल्याने, जरी मजरुह, शायर म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी काहीसे *खटकेबाज* शब्द लिहिले आहेत जसे *लट*, *लिपटी*, *डगरी* किंवा *गोरी* !! *ट* ,*ड* ही अक्षरे जिभेवर घेताना आपसूक *वजन* प्राप्त होते आणि ही कवीची खासियत असे म्हणता येईल. अन्यथा कविता म्हणून आणखी काही लिहिणे जरुरीचे वाटत नाही. संगीतकार सचिन देव बर्मन यांनी चाल बांधताना स्वररचनेची *उडती छक्कड* असावी, अशी बांधली आहे. स्वररचना *बागेश्री बहार* अशा मिश्र रागावर आधारित असली तरी एकूण चालीवर *बहार* रागाची छाया अधिक जाणवते. सचिन देव बर्मन यांची स्वररचना ही नेहमीच वाद्यमेळाच्या भरीवपणाने अधिक श्रीमंत असते. वेगळ्या शब्दात, वाद्यमेळाची रचना एकाबाजूने गाण्याच्या चालीशी सुसंगत तर असतेच परंतु बरेचवेळा वाद्यमेळातून नवीन स्वरबंध तयार करून चालीला वेगळे परिमाण देत असते. इथे बघा, *बंगाली ढोल* या तालवाद्याच्या बोलांनी रचनेला भरीव सुरवात होते लगोलग सतारीचे ध्वनी कानावर येतात परंतु *मूळ* चाल प्रतीत होत नसते!! एकदम व्हायोलिनवर द्रुत गत सुरु होते आणि तबल्याच्या बोलासहीत *हाय* असा अवर्णनीय सूर ऐकायला मिळतो. तबल्याचे बोल ठुमरीच्या अंगाने ठाशीव आणि उडत्या अंगाने ठेवले आहेत. त्यामुळे तबल्याच्या मात्रेगणिक मुखड्याचे बोल ऐकायला मिळतात. वरच्या सुरांत मुखडा बांधला असल्या कारणाने ऐकणारा आपले कान टवकारून ऐकतो. परंतु अंतरे मात्र वेगळ्या अंगाने उचलले आहेत. कालिक लय तशीच ठेवली आहे पण *उलझी लट हमारी, लिपटी मोरी सारी* या दोन्ही ओळी जरा बारकाईने ऐकाव्यात. मध्य सप्तकात सूर ठेवले आहेत पण तबल्याचे बोल पूर्वीप्रमाणे *टिपेचा* सूर लावून आहेत. अर्थात हे गीत म्हणजे सुंदर नृत्यगीत असल्याने तालाला महत्व मिळणे क्रमप्राप्तच ठरते. पुढे मात्र *पथ पे कोई जैसे* इथे स्वररचना मुखड्याच्या स्वरांकडे हळूहळू प्रवास करायला घेते आणि तो प्रवास *छेड छेड जाये चंचल मस्तानी* पर्यंत कसा संपतो आणि लयीचे संपूर्ण आवर्तन पूर्ण कसे होते, याचे अवलोकन करणे, हाच खरा मनोहर सांगीतिक खेळ आहे. शेवटचा अंतरा याचा अंदाजाने बांधलेला आहे. संगीतकार नौशाद यांनी हिंदी चित्रपट गीतांचा एक नवीन साचा तयार केला आणि सचिन देव बर्मन यांनी त्याचा आवाका आणि आशय वाढवण्यास हातभार लावला. विशेष म्हणजे तसे पाहता दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या प्रवृत्तींचा पाठपुरावा करत त्यांनी ही किमया साधली. दुसरी सर्वसाधारण कामगिरी अशी म्हणता येईल, सांगीत परिणामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो सुसंस्कृत संयम दाखवला. प्रस्तुत गीतात हे अवश्य दाखवता येईल. दुसरा अंतरा सुरु होण्याआधी *सरगम* आहे पण ती अगदी थोडक्यात घेतली आहे तसेच गीतातील हरकती या मूळ स्वररचनेचे सौंदर्य कसे खुलवतील याच अंदाजाने बांधल्या आहेत. त्यांचे संगीत हे गुणगुणण्यासारखे, लक्षात राहणारे संगीत आणि त्याच अंगाने वाद्यवृंदाची रचना करणे परंतु भरून टाकणारे नव्हे, असे बहुदा त्यांचे ध्येय असावे. याचा परिणाम असा झाला, त्यांचे रसिकांशी नाते नेहमी जुळलेले राहिले. खरं सांगायचे झाल्यास, या गाण्याचे खरे श्रेय लताबाईंच्या गायकीचे. गाण्याचा मूड अचूक पकडून पहिल्या सुरापासून लताबाईंनी जी गायकी दाखवली आहे तिला तोड नाही. रागदारीत चाल झाली तरी त्यात किती मर्यादेपर्यंत हरकती घ्यायच्या, मघाशी मी जो सरगमचा उल्लेख केला ती सरगम देखील किती वजनाने घ्यायची तसेच नेहमीप्रमाणे, शब्दागणिक नव्हे तर अक्षरागणिक श्रुतींचे उपयोजन करायचे, याचा सुंदर नमुना लताबाईंनी या गाण्यातून दर्शविला आहे. सुरवातीलाच *हाय* शब्द ज्या पद्धतीने उच्चारला आहे आणि क्षणात मुखडा घेतला आहे, काही क्षणांचे कालिक अंतर असेल पण त्यातून लताबाईंची सांगीतिक *नजर* दिसते. आपल्या गायनाने त्यांनी हे गाणे *भरजरी* केले आहे. खरंतर सगले गाणे हा अप्रतिम आनंद सोहळा आहे आणि त्यातील शब्दागणिक असलेली सौंदर्यस्थळे टिपणे, हे श्रम न वाटता, आपली अभिरुची संपन्न करणारी सांगीतिक कलाकृती आहे. असे गाणे वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात ठाण मांडून बसले तर त्यात वेगळे ते नवल का! पवन दिवानी ना माने उडाये मोरा घुंगटा पवन दिवानी उलझी लट हमारी लिपटी मोरी सारी पथ पे कोई जैसे मारे पिचकारी छेड छेड जाये चंचल मस्तानी अंखिया तरसे मोरी डगरी नाहीं सुझे कित चली मैं गोरी बैरन सब बुझे झूम झूम रोके, फिर भी मरजानी Pawan Diwani Na Mane | Lata Mangeshkar @ Manoj Kumar, Vyjayanthimala - YouTube

No comments:

Post a Comment