Friday, 22 January 2021
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
माणसाने जाणीवपूर्वकतेने, विशिष्ट माध्यमातून, विशिष्ट साधनांद्वारे स्वतःस जाणवलेल्या जीवनरूपाचा केलेला आविष्कार म्हणजे कलाकृती, असे एक विधान करता येईल. विविध प्रकारच्या कलाकृतींपैकी साहित्यकृतींच्या आधाराने या विधानाकडे आपण बघू. मानवी अनुभव हे तिचे माध्यम. या अनुभवातील प्रमुख अशा *भावना* या एका घटकाचा विचार करताना असे आढळते की, मानवी जीवनाच्या इतिहासाच्या संदर्भात तिचा फारसा क्षेत्रविस्तार झालेला नाही. प्रेम, द्वेष, माया असूया, तृप्ती, वात्सल्य हे जे मूळ भावघटक, यांच्या पुरातन काळापासून आजपर्यंत फारशी भर पडलेली नाही. जे भावघटक महाभारतकालीन जीवनाचा भाग होते, तेच भावघटक आजही आपल्या जीवनाचे भाग आहेत. व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे यांच्या भेद असलाच तर गुणवत्तेतील कमी-अधिक पणाचा. मग तेच अनुभवघटक आज असतानाही, अनुभवांना मात्र सतत इतकी नवीनता, संपन्नता कशी येते? इथेच बहुदा भक्तिसंगीताच्या काही मूलभूत भावनांना शब्दरूप देण्याचे नेमके प्रयोजन कळू शकेल असे वाटते. भक्तिसंगीतात सर्वसाधारणपणे ईश्वर शरण भाव कायम आढळतो परंतु अनेक रूपके, प्रतिमा यांच्या साहाय्याने आशयाची श्रीमंती वाढवली जाते. मी वर जे विधान केले - कालपरत्वे गुणवत्तेतील कमी-अधिक पणा अशा रचनांमधून आपल्याला दिसून येतो आणि याच पार्श्वभूमीवर आपण आजचे गाणे *ओंकार प्रधान रूप गणेशाचे* ऐकणार आहोत.
सुप्रसिद्ध संत कवी तुकारामांची रचना आहे आणि त्यांच्या रूढ शैलीनुरूप *अभंग* शैलीत लिहिलेली आहे. तुकारामांची प्रतिभा शक्ती अभंग वृत्तातून संपूर्णपणे *निखरून* आपल्या समोर येते. वास्तविक कविता हेच मुळी *अल्पाक्षरी* माध्यम, त्यातून अभंग वृत्त अधिक अल्पाक्षरत्व दर्शवते. तुकारामांचे वैशिष्ट्य असे, या अल्पाक्षरी वृत्तातून त्यांनी असामान्य कविता सादर केल्या. आता इथे मुखड्याच्या वाचनातून, गणपतीचे स्तवन केल्याचे समजते. एकदा ही कल्पना स्पष्ट झाल्यावर मग आपल्या संस्कृतीमधील गणेश मूर्तीबाबतच्या प्रतिमा आणि त्यातून या देवाचा मोठेपणा मांडला आहे. पहिल्याच कडव्यात दुसरा देव * श्रीदत्त* यांचे प्रतीकस्वरूप वर्णन करताना गणपतीमध्ये त्या तिन्ही देवांचे अर्करूप दाखवले आहे. असे म्हटले जाते महर्षी व्यासांनी महाभारत सांगितले आणि ते गणपतीने, त्यांच्या समोर बसून लिहिले. आता कल्पना गृहीत धरल्यावर मग अभंगाचा शेवट करताना *पहावी पुराणे व्यासाचिया* या वाक्याचा समारोप अधिक अर्थपूर्ण होतो. तुकारामांचे अभंग वाचताना आपल्या संस्कृतीची ओळख जितकी अधिक तितके हे अभंग आपल्याला खोलवर जाणून घेता येतात.
स्वररचना एका अत्यंत हुशार तरीही अप्रकाशित राहिलेल्या संगीतकारांचीआहे - कमलाकर भागवत. बहुतांश कारकीर्द आकाशवाणीवर गेली. त्यामुळे असावे कदाचित पण इतक्या अप्रतिम स्वररचना सादर करून देखील लोकप्रियतेचा वारा त्यांच्याकडे फारसा फिरकला नाही!! गाण्याची म्हटले तर *भूप* रागावर आहे पण मधूनच *शुद्ध कल्याण* रागाचे शिडकावे ऐकायला मिळतात. खरतर *भूप* रागाच्या *अवरोही* चलनात *यमन* (बरेचवेळा *तीव्र मध्यम* वर्जित) रागाचे सूर आले की तिथे *शुद्ध कल्याण* समोर येतो आणि म्हणूनच ललित संगीतात एखादी स्वररचना भूप राग की शुद्ध कल्याण राग असे ठरवायचे झाल्यास, अवघड जाते. अर्थात तांत्रिक दृष्ट्या आणखी फरक सांगता येईल. चाल तशी साधी, सरळ आहे. मुखड्याच्या आधीचा वाद्यमेळ हा बासरीच्या सुरांतून *भूप* रागाच्या सुरांतून ऐकायला मिळतो आणि त्याचा बासरीच्या आर्जवी सुरांच्या मागोमाग मुखडा अवतरतो. मुखडा *भजनी* ठेक्याने भरीव होतो. मध्य लयीत रचना सुरु होते. *ओंकार* शब्दाला आणि त्याच्या उच्चारणाला भारतीय संस्कृतीत फार महत्व आहे, एक औचित्य आहे. आणि त्याला धरूनच मुखड्याची सुरवात होते.
पुढील तिन्ही अंतरे समान बांधणीचे आहेत. आता समान बांधणीचे म्हटले खरे तरी पहिला अंतरा किंचित वेगळ्या अंदाजाने घेतला आहे परंतु मग सगळेच विश्लेषण अति गुंतागुंतीचे आणि तांत्रिक होईल, म्हणून टाळतो. एकूणच त्या काळात मराठी गाण्याचा वाद्यमेळ हा अतिशय मर्यादित वाद्यांचा असायचा (आधुनिक गाणी वगळली आहेत) त्यातून ही स्वररचना, त्यावेळी मराठी आकाशवाणीवर *भावसरगम* नावाचा कार्यक्रम दर आठवड्याला चालत असे आणि त्या कार्यक्रमात या गाण्यासारख्या असंख्य अजरामर रचना, अनेक संगीतकारांनी करून ठेवल्या होत्या. अर्थात सरकारी कार्यक्रम म्हटल्यावर एकूणच वाद्यांवर बंधने असणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे मराठी भावगीतांना *भरजरी वाद्यमेळ* ही स्वप्नावस्था होती. त्यांनी भारतीय शैलीचा मार्मिक वापर करून गीते रचल्याची बरीच उदाहरणे सापडतात. कलासंगीताच्या शास्त्रोक्त विधानावर राग व ताल योजलेली गीते यांत मोडतील. बहुतांश कारकीर्द आकाशवाणीवर गेल्याने बहुदा कायम स्वरूपाची छाप उमटवली गेली नाही, असे म्हणावेसे वाटते. अर्थात असे असले तरी प्रस्तुत भक्तीगीत पारंपरिक स्वररचनेचा बाज सोडून बांधले आहे आणि अगदी पहिल्या सुरापासून हा बदल दिसतो.
सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा स्वर या गाण्याला लाभलेला आहे. अभंगातील शाब्दिक औचित्य आणि चालीत अनुस्यूत असलेली स्वरिक ऋजुता यांनी तितक्याच देखणेपणाने सादर केली आहे. गाण्यात वक्रगतीच्या म्हणाव्यात अशा हरकती नाहीत परंतु घेतलेल्या छोट्या छोट्या हरकतींमधून चालीचा गोडवा कायम ठेवला आहे. *ओंकार* शब्दातील भावना घेताना कुठेही विसाविशीतपणा आलेला नसून पहिल्या सुरापासून गायन अतिशय समृद्ध झाले आहे. वास्तविक भारतीय संगीत शास्त्रानुरूप *ओंकार* शब्द हा *मुर्घ्नी स्वर* घेऊन उच्चारायचा असतो परंतु हे ललित संगीत आहे आणि इथे तितके स्वतंत्र घेणे अपेक्षित असते. हा अभंग लिहिला तो काळ आणि आजचा काळ, यात काही शतके उलटून गेली आणि अर्थात मराठी भाषेत देखील बराच बदल घडत गेला. *जाणियेला* किंवा * व्यासाचिया* सारखे शब्द आता कुठेही प्रचलित नाहीत.असे असून देखील सुमन कल्याणपूर यांनी गाताना, अचूक उच्चार केले आहेत. वास्तविक ललित संगीताचे एक प्रधान अंग आहे, शब्दांचे अचूक उच्चार होणे आणि तसे करताना शब्दांना *ठाशीवपणा* देण्याचे टाळून भावना प्रदान करणे. सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचे हे खास वैशिष्ट्य आहे. अतिशय मोकळा, स्वच्छ आणि सुरेल गळा लाभलेल्या या गायिकेला तसा *न्याय* मिळाला नाही. काही मराठी भावगीते आणि त्याहीपेक्षा कमी हिंदी चित्रपट गीते, हे सुमन कल्याणपूर सारख्या गायिकेच्या लौकिकेला साजेसे निश्चितच नाही. *अकार तो ब्रह्मा* गाताना *अकार* शब्दातील *आकार* घेऊन झाल्यावर लगेच *ब्रह्मा* सारखे जोडाक्षर त्याच वजनाने गायचे, ही सहज जमणारी गायकी नव्हे. इथे गायकीचा खरा कस लागतो. अशीच या गाण्यात बरीच सौंदर्यस्थळे सापडतील.
इतके सौंदर्यपूर्ण गीत ऐकायला मिळाल्यावर, रसिकांना इतकी वर्षे हे गीत मोहिनी घालते, याचे फार नवल वाटायला नको.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणे व्यासाचिया
Omkar Pradhan Roop Ganeshache - New Marathi Ganpati Songs 2015 | Marathi Bhakti Geet - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment