Monday, 25 January 2021

जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले

कलाकृतीची ओळख आणि परिचय तसेच त्यातून होणारी मैत्री ही एखाद्या व्यक्तीशी मैत्री व्हावी तशीच असते. एखाद्या व्यक्तीशी मैत्री आपली कशी होते? प्रथम चैतन्याने भारलेले त्याचे *स्वत्व* आपल्याला जाणवते. ते स्वत्व जर आपले कुतूहल पुरेसे जागृत करू शकले नाही, तर मग आपण त्याची मैत्री व्हावी अशी खटपट करीत नाही. ती ओळख मग फार वरवरची राहते. परंतु जर का त्या *स्वत्वाने* आपण भारून गेलो आणि त्याचवेळेस त्या स्वत्वाची काही भाग आपल्याला बुचकळ्यात टाकू लागले, की ते स्वत्व जाणावे अशी इच्छा आपल्याला होते. त्या सर्वांतून व्यक्त होणारे त्याचे व्यक्तिमत्व आपणास त्याच्याशी होणाऱ्या सहवासातून जाणवू लागते. त्याचे *Bearing* कसे आहे, हे आपल्या लक्षात यायला लागते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा संघटित आकार आपल्या मनात गोळा होतो. मग पुढील सगळ्या नातेसंबंधांची *प्रोसेस* सुरु होते आणि एका क्षणी ती मैत्री आपल्या जिवाभावाची होते. आजचे गाणे *जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले* हे अशाच प्रकारचे आहे. पहिल्या स्तवनात हे गाणे, गाणे म्हणून आपल्या मनात उतरत नाही, किंबहुना *गायकीचा* असा अधिक मनावर होतो परंतु जसे हे गाणे पुन्हा ऐकतो तेंव्हा मग या गाण्यातील इतर धागेदोरे मनात जुळतात आणि मग अखंड आस्वादाची प्रक्रिया सुरु होते. मराठी ललित संगीतात, कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांचे स्थान फार वरच्या श्रेणीत गणले जाते. ललित संगीताला *शब्दजुळारी* चालू शकतो, अशा अत्यंत कोमट काळात, पाडगावकर आपल्या विलक्षण क्षमतेच्या कविता घेऊन दाखल झाले आणि मराठी ललित संगीत एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले. पाडगावकरांची कुठलीही कविता लक्षात घेतली तर त्यात एक प्रकारचे चैतन्य असते, रंगधुंदी असते. त्यातूनच त्यांच्या कवितेला *शाब्दिक लय* मिळते आणि ती गेयता या विशेषणात विसर्जित होते. कविता नायिकेच्या अत्यंत संत्रस्त मनस्थितीची ओळख करून देणारी आहे. अर्थात ही भावना कवितेला कधीच नवीन नाही. वर्षानुवर्षे हीच भावना वेगवेगळ्या तऱ्हेने मराठी कवितेत वावरली आहे. मग, या कवितेत पाडगावकरांनी नेमके काय वेगळे मांडले आहे? मुख्य प्रभाव आपल्यावर पडतो तो, कवितेतील निरनिराळ्या प्रतिमांतून दृग्गोचर होणारा विलक्षण प्रभावी असा आशय. *चांदण्याच्या मोहराने रात्र केंव्हा दाटली* या ओळीने एक निसर्गचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते, त्याचेच *स्फटिकीकरण* पुढील ओळीत *काजळी काळ्या ढगांनी हाक जेंव्हा घातली* अधिक खोलवर होते परंतु त्या चित्राची पूर्तता शेवटची ओळ *मी स्वरांच्या लोचनाने विश्व सारे पाहिले* या ओळीने होते. आता बघा, काळे ढग ही साधी बाब आहे पण त्याला *काजळी काळ्या* शब्दांसह आपल्या समोर आणले आणि वातावरणातील *व्याकुळ* आणि *विखारी* भाव त्या रात्रीसह मनात येऊन राहतो. भावना जुनीच परंतु त्याला नवीन प्रतिमांच्या सहाय्याने झळाळून टाकली. कवितेचा शेवट देखील अशाच प्रकारे अविस्मरणीय केला आहे. *हात तू देशील का?* या प्रश्नाला *तू घरी नेशील का !!* हा विश्वासदर्शक भाव पूर्णत्व आणतो. कवितेची जडणघडण ही अशाच छोट्या वाक्यांनी भरीव केली जाते. इथे ही कविता *भावकविता* होते. संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. त्यादृष्टीने इथे काही संपर्क, सामान्य पातळीवरील संवेदनाविश्व अजिबात आढळत नाही. या कवितेत, अर्थातच निसर्गरूपे आहेत पण ती सहजपणे डोळ्यासमोर दिसणारी नाहीत. आपल्या भाववृत्तीच्या स्पंदनांचे प्रतिबिंबच असे निर्माण केले जाते. अतिशय अरुप अशा भाववृत्तीने जाणवणाऱ्या निसर्गाचे रूप या कवितेत आढळते. अशी समर्थ शब्दांची कविता संगीतकार श्रीनिवास खळ्यांच्या हाती पडली आणि ती कविता अधिक खोलवर रसिकांच्या मनात शिरली. गाण्याची स्वररचना *यमन कल्याण* रागावर आधारित आहे. एकूण कवितेतील सगळं भाव बघता, संध्याकाळच्या काजळी वातावरणाला संध्याकाळचाच राग अधिक मोठ्या प्रमाणात अर्थात प्रदान करतो आणि तिथे हा राग फार विशेष भाव निर्माण करतो. तांत्रिक माहिती द्यायची झाल्यास, *कल्याण* थाटातील महत्वपूर्ण राग - सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात. त्यामुळे असंख्य लयबंध निर्माण होण्याच्या भरपूर शक्यता आहेत. अर्थात संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या स्वररचनेत रागाचे अस्तित्व जितके म्हणून कमी असेल तितके ते ठेवतात. इथे असेच झाले आहे. मुखड्याच्या आधीचा वाद्यमेळ फक्त व्हायोलिनच्या सुरांनी सांगीतिक अवकाश भारून टाकतो. खळेकाकांच्या कुठल्याही रचनेत कुठलेही वाद्य हे कधीही *नाममात्र* स्वरूपात नसते जसे इथे व्हायोलिन आहे. या सुरावटीतून आपल्या समोर *यमन कल्याण* राग समोर येतो पण अस्तित्व निमित्तमात्र असते कारण पुढे *जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले* ही ओळ सुरु होते आणि हळूहळू तिथे *खळे राग* अवतरतो. इथे खळेकाकांची व्यामिश्रता खऱ्या अर्थाने ठळक होते. अतिशय धीम्या लयीत गाणे सुरु होते. इथे गाण्यातील प्रत्येक अंतरा वेगळा आणि स्वतंत्र बांधलेला आहे. हे आणखी खळेकाकांच्या रचनांचे खास वैशिष्ट्य. प्रत्येक अंतरा वेगळ्या *उठावणीवर* सुरु करायचा आणि दुसऱ्या ओळीत त्याच धीम्या गतीने पुन्हा मुखड्याशी आणून जोडून घ्यायचा!! विलक्षण सांगीतिक बुद्धिमत्ता आहे ही. हा संगीतकार इथेच बऱ्याच वेळा बुचकळ्यात टाकतो पण हीच या संगीतकाराची शैली आहे. *चांदण्याच्या मोहराने* या स्वरावलीचा मुखड्याशी दुरान्वये देखील संबंध नाही परंतु *मी स्वरांच्या लोचनाने* घेताना सुरावट ओळखीची होते. मध्य सप्तकातील सूर अचानक तार सप्तकात न्यायचे आणि मग पुन्हा मध्य सप्तकात आणायचे!! आता दुसरा अंतरा बघा. *सौख्य माझे, दु:ख माझे* हे शब्द पूर्णपणे शांत स्वरांत घेतले आहेत. एक बाब लक्षात ठेवण्यासारखी -*दु:ख माझे* हे ज्या सुरांत विणले आहे, ते तसेच यायला हवेत. ही जी *अपरिहार्यता* आहे ती खळेकाका एखाद्या कुशल सर्जकाप्रमाणे करतात. हे शब्द देखील इतक्या बारीक स्वरिक वाक्यांशातून आपल्या समोर येतात की ऐकताना सरळ, सपाट वाटतात पण बारकाईने ऐकताना त्यातील *कंगोरे* ध्यानात येतात आणि एकदम हे गाणे लयीला अतिशय अवघड होऊन बसते. अशी स्वररचना जेंव्हा लताबाईंकडे येते तेंव्हा बाईंची गायकी विलक्षण खुलून येते. स्वररचना जेंव्हा अवघड असते तेंव्हा लताबाईंची गायकी देखील तितकीच आव्हानात्मक होते. रचनाइट कुठेही *ठळक* ताना नाहीत, लांबलचक हरकती नाहीत आणि ज्या हरकती आहेत, त्या ललित संगीताच्या आदर्शभूत म्हणवल्या जाणाऱ्या पठडीतील आहेत परंतु *आदर्श* हा शब्द फक्त लताबाईंच्या गायकीलाच योग्य आहे. क्षणात वरच्या सुरांत जाणे आणि वरच्या सुरांच्या अवकाशात अंतऱ्यातील २ ओळी घेऊन मग तीच स्वरिक लय कायम ठेऊन, एकेक स्वर खाली उतरवीत आणणे, ही गायकी निव्वळ अवघड नसून आपली सांगीतिक समज अतिशय समृद्ध करणारी आहे. इथे प्रत्येक शब्दामागे नसून काहीवेळा अक्षरामागे छोट्या हरकती आहेत. एखादा भरजरी शालू प्रत्येक टाक्याने विणत जावा आणि एका विविक्षित क्षणी संपूर्ण शालू आपल्या समोरसादर व्हावा, त्या कुशलतेने लताबाई आपली गायकी *पेश* करतात. या गाण्यातील काही काही हरकती तर निव्वळ अजोड आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास, शेवटच्या अंतऱ्यातील पहिली ओळ - *संपता पूजा स्वरांची हात तू देशील का? दाटुनी काळोख येता, तू घरी नेशील का?* दोन्ही ओळी प्रश्नार्थक आहेत आणि स्वरांतून ते प्रश्न उभे केले आहेत. आणि असे करताना *काळोख* शब्द गाताना स्वर कसा *दाट* ठेवला आहे, हे खास ऐकण्यासारखे आहे. अशाच छोट्या छोट्या गोष्टींनी हे गाणे अतिशय समृद्ध झाले आहे. ललित संगीत कालच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले. जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले चांदण्याच्या मोहराने रात्र केंव्हा दाटली काजळी काळ्या ढगांनी हाक जेंव्हा घातली मी स्वरांच्या लोचनाने विश्व सारे पाहिले सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना मोर स्वप्नांचे निळे अन विंधणाऱ्या वेदना मी असे गीतांतून सर्वस्व सारे वाहिले संपता पूजा स्वरांची हात तू देशील का? दाटुनी काळोख येता, तू घरी नेशील का? पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले Jahalya Kahin Chuka - YouTube

3 comments:

  1. Sundar parikshan

    ReplyDelete
  2. यमन कल्याणची out line दिसत नाही.या मध्ये कोमल ग, नी, तीव्र मध्यम याच वापर आहे.

    ReplyDelete
  3. मी जाणकार नाही, परंतु स्वर बोलके आहेत.

    ReplyDelete