Wednesday, 27 January 2021

सुमन कल्याणपूर

एका कोकणी भाषिक सारस्वत कुटुंबात जन्मलेल्या सुमन हेमाडी, संगीतप्रिय वातावरणात मोठ्या झाल्या. सुरवात आकाशवाणीवर झाली आणि तिथे मराठी भावगीते आणि काही मराठी चित्रपटातून गायला सुरवात केली. सुरवातीचे संगीताचे पद्धतशीर शिक्षण त्यांनी सुप्रसिद्ध संगीतकार केशवराव भोळे यांच्या कडे घेतले. परिणामी गायनाचा पाया पक्का झाला. सुप्रसिद्ध संगीतकार वसंत प्रभूंकडे त्यांनी सुरवातीच्या काळात गायला सुरवात केली. *पसंत आहे मुलगी* या मराठी चित्रपटातील *भातुकलीचा खेळ मांडीला* या गाण्याने त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. संगीतकार वसंत प्रभूंकडे त्यांनी पुढे *उगवली शुक्राची चांदणी* गायलेल्या गाण्याने त्यांचे नाव, विशेषतः मराठी घराघरात पोहोचले असे म्हणता येईल. हिंदी चित्रपटात *मंगू* चित्रपटासाठी त्यांनी काही गाणी गायली होती परंतु त्यातील शेवटी एकाच गाणे राहिले!! सुरवातीला मोहमद शफी हे संगीतकार होते पण पुढे हा चित्रपट ओ.पी. नैय्यर यांच्याकडे गेला आणि गाण्यांमध्ये काटछाट झाली. पुढील कारकीर्द लक्षात घेता, सुमन कल्याणपूर यांनी हा संगीतकार वगळता इतर संगीतकारांकडे गाणी गाऊन, आपली गुणवत्ता सिद्ध केली. एक गायिका म्हणून विश्लेषण करायचे झाल्यास, त्यांचा आवाज सुरेल,हलका ,पल्लेदार आणि पारदर्शक आहे.अजिबात भडक नसलेले स्वनरंग आणि त्यासारख्या सूक्ष्म छटा या आवाजात विपुलतेने आढळतात. परिणामतः त्यांना आपल्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. या आवाजावर शास्त्रोक्त संगीताचे गाढ संस्कार आहे वा गायिकेस शास्त्रोक्त संगीत येते याला त्यांनी गायलेल्या गीतांत फारसा पुरावा मिळत नाही. पण संबंधित शैली त्यांना कंठगत करणे शक्य होते याची खात्री पटवणारी गीते आहेत. उदाहरणार्थ *मेरे संग गा* (जानवर - शंकर/जयकिशन) या नृत्यगीतातील शास्त्रोक्त ढंग त्यांनी चांगला पेलला आहे. परंतु नाईट क्लब गीते त्यांच्या फार आवडीची होती असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ *पानी में जले मोरा अंग* (मुनीमजी -१९७२ -उषा खन्ना) यासारखे गीत त्यांनी मादक आणि मोहक केले आहे परंतु त्यात नाईट क्लब गेटची उच्छृंखलता आढळत नाही, या गीतात काही सुचक शब्दांचेही उच्चार त्यांनी सपाट केलेले ऐकायला मिळतात. एकूणचशी गाणी हा त्यांचा प्रांत नव्हता हेच खरे. आता हिंदी चित्रपट गीते हाच विषय चालला आहे तेंव्हा तो धागा घेऊन पुढे लिहायचे झाल्यास, त्यांनी गायलेली काही प्रणयगीते स्मरणीय आहेत. *ना तुम हमे जानो* (बात एक रात की - सचिन देव बर्मन) या गीतात अपेक्षा निर्मिती चांगली होते. *युंही दिल ने चाहा* (दिल ही तो है - रोशन) या गीतात एरवी विलंबित लयीबरोबर ज्या भावनेची सांगड घातली जाते, तीच भावना द्रुत लयीच्या चालींत उत्पन्न करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. *मेरे महेबूब न जा* (नूर महल -जानी बाबू) हे गीत त्यांनी भावस्पर्शी केले आहे आणि वाद्यवृंद किरकोळ असून कुठेही अतिपणा न करता!! युगुलगीतांत देखील त्यांनी उच्च दर्जाची आविष्कार क्षमता दाखवली आहे. *ये मौसम रंगीन* (मॉडर्न गर्ल - रवी - मुकेश) या गीतात त्यांनी शांत पण विश्वासभरल्या प्रेमभावाची निर्मिती केली आहे. या उलट *ना ना करते प्यार* या गीतात खळखळाट, निरागसपणा आणि उत्साह जाणवतो. या रचनेत संभाषणात्मक शैलीचाही समयोचित आणि कौशल्यपूर्ण वापर आहे. आणखी एक वेधक उदाहरण देता येईल. *ठहरीये होश में आऊ तो* (मोहब्बत इसको कहेते है - खैय्याम - रफींसह) या गीताचे. इथे नायिका-प्रेमिका आविष्कारात जराशी लाजाळू तर प्रियकर जरा स्व-तंत्र असा आकर्षक विरोध सुरेख व्यक्त झाला आहे. सुमन कल्याणपूर यांची खरी कारकीर्द गाजली ती मराठी भावगीतांच्या प्रांगणात. मराठी संस्कृतीला आधारभूत अशी बरीच गाणी या गायिकेने भरपूर गायली आहेत. वर उल्लेख केलेल्या संगीतकार वसंत प्रभूंनी संगीतबद्ध केल्या गीताने त्यांची मराठीत कारकीर्द सुरु झाली. पुढे याच संगीतकाराने सुमन कल्याणपूर यांचा अतिशय विपुल असा वापर केला - ज्यात भक्तिगीते, प्रणयगीते, विरह गीते, अवखळ गीते, भूपाळी गीते अशी सहज सामावता येतात. *देव माझा विठू सावळा* (दशरथ पुजारी) सारखे भक्तीगीत, *चल उठ रे मुकुंदा* (दशरथ पुजारी) सारखी भूपाळी, *केतकीच्या बनी तिथे* (अशोक पत्की) सारखे प्रणयगीत, आणि अशी असंख्य गीते गौण सुमन कल्याणपूर यांनी मराठीत आपला दर्जा सिद्ध केला. अर्थात यात *शब्द शब्द जपून ठेव* (विश्वनाथ मोरे) सारखे लयीला अवघड असे गीत गाऊन त्यांनी आपल्या गळ्याची सिद्धता सिद्ध केली. मराठीत त्यांनी बहुसंख्य संगीतकारांकडे गीते गायली आणि जवळपास २० वर्षे आपला ठसा उमटवला. मराठी मध्ये आशा भोसले आपला जम बसवीत असताना, त्यांनी ते वळण बाजूला सारून, स्वतःची नवीन पायवाट चोखाळली, हे विशेष. चित्रपट गीते देखील त्यांनी सुरेख गायली आहेत. *देवा दया तुझी ही* (श्रीनिवास खळे) यासारखे लयीला अनेक कंगोरे असलेले गीत अतिशय मोहकपणे गायले आहे. *अरे संसार संसार* (वसंत पवार - मानिनी) सारखे अर्थपूर्ण गीत फारच सुंदर गायले आहे. एका अत्यंत संत्रस्त मनस्थितीची व्याकुळ जाणीव तितक्याच ऋजू भावनेने गायली आहे. ilचित्रपटसंन्यास खूप लवकर घेऊन देखील बरेच चित्रपट, तसेच चित्रपटबाह्य पण अतिशय गुणवत्तापूर्ण भरपूर गीते सुमन कल्याणपूर यांची जमा आहे. लताबाईंनी आवाज आणि लगाव या बाबतींत जे कौशल्य आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळ जवळ पोहोचल्या त्या फक्त सुमन कल्याणपूर!! त्यांना अधिक सिनेमा संधी मिळाल्या,त्यांच्या वाट्याला टिकाऊ चित्रपट अधिक येते तर लताबाईंच्या कर्तृत्वास पर्यायी केंद्र उभारण्याची क्षमता त्यांच्या कलाकारीत निश्चित आढळते. काहीगीत प्रकारांबाबतचे लताबाईंच्या एकाधिकारास आव्हान देण्यासाठी आवश्यक ती सामग्री त्यांच्यात असून देखील ते होऊ शकले नाही, हे त्यांचे आणि पर्यायाने रसिकांचे देखील दुर्दैव म्हटले पाहिजे.

No comments:

Post a Comment