Friday, 31 January 2020

तुम मुझे भूल भी जाओ

चित्रपट गीतांत अनेक प्रसंग असतात आणि त्यानिमित्ताने, कवींना त्या प्रसंगांना शब्दातून, रसिकांच्या समोर मांडायचे असते. अशावेळेस, कवितेत एखादी राजकीय विचारसरणी किंवा सामाजिक भान असावे का? हा एक कालातीत प्रश्न आहे आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. एकतर चित्रपट हे माध्यम सामान्य माणसांपासून ते बुद्धीवादी समाजाला एकत्रित बाधून ठेवणारे माध्यम असल्याने, तिथे होणारा आविष्कार हा नेहमीचा तौलनिक दृष्टीने सादर होणे गरजेचे असते. एकांतिक विचाराने होणारी आविष्कृती काही ठराविक, मर्यादित स्तरावर यशस्वी ठरू शकते. विचाराबरोबर मनोरंजन, हा घटक देखील विचारात घ्यावाच लागतो अन्यथा सादरीकरणाचा डोलारा कधीही कोसळू शकतो. 
त्या दृष्टीने विचार करता, १९५९ साली आलेल्या "दीदी" चित्रपटातील "तुम मुझे भूल भी जाओ" हे गाणे विचारात घ्यावे लागेल. शायर साहिर हा मुळातला सक्षम कवी, त्याने आपले "कवित्व" चित्रपट गाण्यांसाठी वापरले, असा एक आरोप नेहमी केला जातो. एका दृष्टीने विचार करता, यात तथ्य नक्कीच आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गाण्यात "काव्य" आणले तर नेमके काय बिघडते? सरधोपट शब्दकळा असलेली असंख्य गाणी देखील, कवितेच्या अंगाने फारच थोड्या वेळा ऐकली जातात तेंव्हा "काव्य" असलेली गाणी दुर्लक्षित झाली तर त्यात काय नवल!! गीतात "भावकाव्य" असण्यात निदान मला तरी फार गैर वाटत नाही. 
जीवनात अनेक अनुभव आपल्याला येतात.त्यातील काही संवेदानाद्वारे आलेले, काही कल्पनेने जाणवलेले, काही वैचारिक स्वरूपाचे तर काही संमिश्र स्वरूपाचे असतात. परंतु यातील कोणत्याही एकाच्या किंवा सर्वांच्या अनुभवांचा एकात्म व अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती होते तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून जाणवते. याचअंगाने आपण, आजच्या या गाण्याचा विचार करू शकतो.  
ती माया ममता कृतज्ञता अन प्रीती 
बलिदान समर्पण श्रद्धा निष्ठा भक्ती 
चल विसर शब्द ते भरला बघ हा प्याला 
अर्थशुन्य शब्दांची ही दुनिया असे स्मशानशाळा….!! 

प्रसिद्ध कवी रॉय किणीकरांनी वरील ओळीत, साहीरच्याच विचारांची री ओढली आहे, असे मला वाटते. या गाण्यात साहीरच्या "डाव्या" विचारसरणीचा प्रभाव फार गडद असा जाणवतो. मी सुरवातीला, राजकीय किंवा सामाजिक भान याबद्दल चार शब्द लिहिले आहेत, ते याच संदर्भात आहेत. आता या गाण्यातील काव्याचाच विचार करायचा झाल्यास, 

"जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" 
ही ओळ म्हणजे साहीरच्या मनातील डाव्या विचारसरणीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे. आता प्रश्न असा येतो, चित्रपटातील पात्राच्या दृष्टीने असे विचार कितपत योग्य ठरतात? इथे मात्र वादाचा मुद्दा निश्चित निर्माण होतो. आणखी एक मजेशीर मुद्दा आहे. ही ओळ  - "जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" इथे थोडे गूढ आहे, म्हणजे प्रसिद्ध शायर फैझ-अहमद-फैझ यांच्या अतिशय गाजलेल्या - "मुझसे पहिली सी मुहोब्बत, मेरे महेबूब ना मांग" या रचनेत हीच ओळ "और भी दुख है जमाने में मुहोबत के सिवा" अशी वाचायला मिळते!!  प्रश्न असा, याचे श्रेय नेमके कुणाचे?   अर्थात आणखी एक मजेदार किस्सा, फैझच्या याच रचनेतील, "तेरी आंखो के सिवा दुनिया में रख्खा क्या है' ही ओळ, मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या "चिराग" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याशी साम्य दाखवते. 
गाण्याची चाल यमन रागावर आधारित आहे. चाल अतिशय सुश्राव्य आहे आणि सहज गुणगुणता येईल अशीच आहे. मुळात यमन राग अति गोड राग, त्यामुळे या चालीला सुंदर असा गोडवा प्राप्त झाला आहे. नायिकेच्या भासमान मनस्थितीतून निर्माण झालेली ही रचना आहे आणि तोच धागा पकडून, संगीतकार सुधा मल्होत्राने अतिशय मोजका वाद्यमेळ ठेऊन गाण्याला सुरवात केली आहे. 
तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 
अतिशय मोहक सुरावटीने ही गाणे सुरु होते. नायिकेची स्वप्नावस्था ध्यानात घेऊन, गाण्याची सुरावट बांधली आहे. खरतर सुधा मल्होत्रा, संगीतकार म्हणून फारशी ख्यातकीर्त नाही पण इथे तिने जी "तर्ज" बांधली आहे, केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल. हे गाणे म्हणून बघताना ही एक सुरेख कविता आहे, याचा विचार केलेला आढळतो. अर्थात, गाण्याची चाल बांधताना, ती "कविता पठण" होणार नाही, याची काळजी  घेतली आहे. गाण्यातील तालाची योजना देखील त्याच ढंगाने केलेली आहे. 
मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है 
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है 
मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया 
इन परेशान सवालात की कीमत क्या है 
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

या ओळी म्हणताना, सुधा मल्होत्राने शब्दांचे औचित्य कसे सांभाळले आहे, ते ऐकण्यासारखे आहे. "मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया, इन परेशान सवालात की कीमत क्या है" या ओळी म्हणताना, स्वर किंचित वरच्या पट्टीत घेतला आहे. या ओळीतून प्रकट होणारी मनाची बेचैनी किंवा तडफड, सुरांतून व्यक्त करण्यासाठी. सूर थोडे वरच्या पट्टीत घेतल्याने, शाब्दिक आशय नेमका आपल्या मनाला भिडतो. पुढील ओळीत " तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको" मनाला समजावण्याची धडपड असल्याने, ही आणि पुढील ओळ अतिशय संयत स्वरांत मांडली आहे - परिणाम केवळ सूर(च) नव्हे तर शब्द देखील आपल्या ध्यानात राहतात. 

जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है 
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनिया में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आंख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है 
या ओळी प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या आवाजात आहेत. एक गायक म्हणून मुकेश यांच्या आवाजाला खूप मर्यादा आहेत परंतु त्या मर्यादेत राहून देखील परिणामकारक गायन करण्याचे त्यांचे कौशल्य निश्चित वाखाणण्यासारखे आहे. मी लेखाच्या सुरवातीला, काव्यातील राजकीय विचारसरणी बाबत जे लिहिले होते, ते याच ओळींच्या संदर्भात आहे. इथे साहिर आपली विचारसरणी, चित्रपटातील पात्रावर लादत आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अर्थात, कविता म्हणून इतके स्वातंत्र्य कवीला निश्चितच मिळायला हवे. 

तुमको दुनिया के गम-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हुं यही मेरे लिये क्या कम है 
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

चाल तशी संपूर्ण गाण्यात फारशी कुठे बदलेली नाही किंवा लयीत फार वेडीवाकडी वळणे देखील नाहीत. गाणे ऐकताना मात्र सारखे मनात येत राहते, इथे गाण्यापेक्षा कविता अधिक तुल्यबळ आहे. गाण्याची चाल आणि सादरीकरण अतिशय सुश्राव्य आहे. गाण्याची चाल मनाची पकड सहज घेते आणि हा मुद्दा विशेष मांडायला हवा. गाण्याची चाल ऐकताना, सहज समजू शकली तरच ती लोकांच्या मनात घर करते आणि ते साध्य इथे साधले आहे. 
मुकेश यांच्या आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नव्हता आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरती मर्यादित होती. परंतु आवाजात एक प्रकारचा आश्वासक किंवा सांत्वन करण्याचा धर्म होता. थोडे तांत्रिक बोलायचे झाल्यास, काही स्वरमर्यादांत सुरेल गाणे त्यांना सहज सुलभ जात असे. परिणामत: मुकेश यांचा आवाज छोटे स्वर समूह द्रुत गतीने आणि सफाईने घेऊ शके. वरील गाण्यांतील दुसरा अंतरा, या वाक्यांना पूरक म्हणून दाखवता येईल. आपल्या पट्टीपेक्षा वरच्या सुरांत गायची वेळ आली, तेंव्हा त्यांचा आवाज डळमळीत व्हायचा आणि त्यांच्या आवाजाची प्रमुख मर्यादा. 
सुधा मल्होत्रा यांच्या आवाजाबाबत देखील वरील वर्णन लागू पडेल परंतु यांच्या आवाजात एक प्रकारची फिरत असल्याने, हलक्या  हरकती घेणे सहज जमून जाते आणि त्यामुळे गाण्याला किंचित गायकी अंग प्रदान करणे शक्य होत असे. 
असे असून देखील, ही गाणे आपल्या मनाचा ठाव घेते, कारण चालीमधील असामान्य गोडवा आणि सहज सुंदर गायन. ललित संगीतासाठी खरेतर याच मुलभुत बाबी ध्यानात घेणे जरुरीचे असते. 

 

https://www.youtube.com/watch?v=xs1h-inHU4U

Monday, 27 January 2020

सीने में सुलगते हैं अरमान

कुठल्याही गाण्यात प्राथमिक स्तरावर ३ घटक येतात आणि यातील एक जरी घटक सक्षम नसला तर सादर होणारा आविष्कार फसतो. अर्थात, यात शब्दकळा, संगीतरचना आणि गायन हेच ते मुलभूत घटक. असे फारच तुरळकपणे घडते, गाण्यात तीनही घटक तुल्यबळ आहेत आणि नेमके कुठल्या घटकाचा आस्वाद आपल्यावर असर करतो याबाबत आपली संभ्रमावस्था व्हावी. एक तर नक्की, सुगम संगीत हा अभिजात आविष्कार नव्हे. तो मान रागदारी संगीताकडे जातो. त्यामुळे, सुगम संगीत (यात चित्रपट संगीत येते) सादर होताना, एकतर शब्दांची मोडतोड होणे, किंवा संगीत रचना तकलादू होणे किंवा गायन फसणे, या गोष्टी बरेचवेळा घडतात. बहुतेक गाण्यांत, संगीत रचनेचा आणि गायनाचा प्रभाव हा अवश्यमेव होतो, विशेषत: वाद्यसंगीताचा प्रभाव लक्षणीय असतो. चित्रपट गीतांत हा विशेष अधिक दिसून येतो आणि याचे मुख्य कारण, पडद्यावर सादर होणारा प्रसंग. प्रसंगानुरूप संगीतरचना करणे, हे संगीतकाराचे प्राथमिक कर्तव्य ठरते. 
हिंदी चित्रपट गीतांचा विचार केल्यास, दर दहा, बारा वर्षांनी, गाण्यांच्या रचनेचा ढाचा बदलत गेला आहे आणि त्यामागे संगीतरचनेतील बदल हाच विशेष राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना, मला, "तराना" चित्रपटातील "सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे फार वेगळी रचना वाटते. 
१९५१ साली आलेला तराना चित्रपट तसा अगदी साधा, ढोबळ विषयावर आधारित आहे. परंतु चित्रपटात, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा अभिनय हे खास वैशिष्ट्य होते. अर्थात, आज विचार करायला बसलो तर, या दोघांपेक्षा या चित्रपटातील गाणी, हाच विशेष मनाला अधिक भावतो. त्या काळाचा थोडा त्रयस्थतेने विचार केला तर त्यावेळी चित्रपटात गाण्यांना प्राधान्य होते आणि असे कितीतरी चित्रपट सांगता येतील ज्यांनी चित्रपटातील केवळ असामान्य गाण्यांमुळे भरपूर धंदा केला आहे. अर्थात हा विषय वेगळा आहे. 
"सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे खऱ्याअर्थाने युगुलगीत म्हणता येईल. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांनी, लताबाई आणि तलत यांच्या गायकीचा नेमका विचार करून त्यांच्याकडून आपल्या संगीतरचनेचा अप्रतिम आविष्कार सादर केलेला आहे. अनिल बिस्वास यांचे अगदी थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास,  पाश्चिमात्य संगीतातील काही तत्वे जाणून घेऊन, त्याचा भारतीय तत्वांशी सांधा जोडला. विशेषत: "पियानो", "गिटार" इत्यादी वाद्यांचा रचनांत केलेला सढळ वापर. अर्थात, एकूणच त्यांचा आग्रह भारतीयत्वाचाच राहिला. गीताला रागाधार घ्यायचा परंतु पुढे रचना स्वतंत्र करायची, या पद्धतीचा त्यांनी प्रामुख्याने अवलंब केला, जे  संगीतकारांच्या पुढील पिढ्यांचे वैशिष्ट्य ठरले. तसेच नवीन आवाजांना पुढे आणणे - तलत आणि मुकेश हे आवाज अनिल बिस्वास यांनी लोकांच्या पुढे आणले तसेच लताबाईंना, नूरजहानच्या प्रभावातून मोकळे केले. हा विशेष चित्रपट संगीताच्या दृष्टीने दूरगामी ठरला. 

याचेच रडू आले की जमले मला न रडणेही 
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते! 

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो 
मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते! 

कवी सुरेश भटांच्या या ओळी, या गाण्यातील भावनेशी बऱ्याच प्रमाणात नाते सांगतात. चित्रपटातील गाण्याची शब्दकळा, प्रेम धवन यांची आहे.मी लेखाची सुरवात या वेळेस, थोडी तांत्रिक अंगाने केली यामागे मुख्य कारण, संगीतकार अनिल बिस्वास. या संगीतकाराची सगळी कारकीर्द जरा बारकाईने न्याहाळली तर एक वैशिष्ट्य लगेच जाणवते. गाण्यात गायकी अंग असून देखील, गाणे ही गीताच्या अंगाने फुलवले आहे आणि तसे करताना, शब्दांना फारसे कुठे दुखावलेले नाही. अर्थात अपवाद हे सर्वत्र असतातच. रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, लयीच्या अंगाने गाणे कसे फुलवावे, यासाठी प्रस्तुत गाणे हे अप्रतिम उदाहरण आहे. गाण्याची चाल यमन/यमन कल्याण रागावर आहे पण गाण्याच्या चालीवर रागाची केवळ सावली आहे. 
अनिल बिस्वास जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत आले, तेंव्हा चित्रपट संगीतावर मराठी रंगभूमी आणि पारशी रंगभूमी, या दोघांचा प्रभाव होता परंतु अनिल बिस्वास यांनी, गीताला खऱ्याअर्थाने "गीतधर्मी" बनविले. बंगाली लोकसंगीताबरोबर, स्वरलिपी आणि वाद्यमेळ या संकल्पना त्यानी ठामपणे रुजवल्या. प्रस्तुत गाण्यात याच सगळ्या बाबींचा आढळ सापडतो. 
या गाण्यात "चमत्कृती" अजिबात नाही किंवा अवघड हरकती तसेच ताना नाहीत पण चालीत जो काही अश्रुत गोडवा आहे, तो असामान्य आहे. गाण्याची चाल आणि वाद्यमेळ एकमेकांशी संपूर्णपणे तादात्म्य पावले आहेत. वाद्यमेळातील कुठलाही सूर इतका बांधीव,घट्ट आहे की  कुठे स्वरांची लांबी वाढवली तर सगळ्या आविष्काराचा डौल बिघडेल. हाच प्रकार गायनातून दिसून येतो. युगुलगान कसे गावे, याचा हे  आदिनमुना आहे. लताबाईंचा प्रत्येक स्वर हा तलतच्या पट्टीशी  जुळलेला आहे. गाण्यात कुठेही जरासा देखील सवंगपणा आही किंवा बेसुरेपण तर औषधाला देखील नाही. 
सर्वसाधारणपणे गाणे गाताना, गाण्यातील पहिल्या दोन ओळी नेहमी अचूक शब्दोच्चाराने गायल्या जातात परंतु गाण्यात परत त्या ओळी गाताना, कुठेतरी किंचित ढिसाळ वृत्ती अवतरते. कुठे एखाद्या अक्षराचे वजन घसरते किंवा शब्द तोडला जातो इत्यादी. या गाण्यात असले काहीही घडत नाही. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांचे हे लक्षणीय यश. गायकाकडून कशा प्रकारे गावून घ्यायचे जेणेकरून, रचना अधिकाधिक समृद्ध होत जाईल, याकडे अनिल बिस्वास यांनी कायम लक्ष दिले.  

सीने में सुलगते हैं अरमान 
आंखो में उदासी छायी है 
ये आज तेरी दुनिया से हमें 
तकदीर कहां ले आई हैं 

या ओळी ऐकताना आपल्याला सतत जाणवत राहते, शब्दांचे सूर आणि वाद्यमेळाचे एकमेकांशी संपूर्णपणे संवादी आहेत, लय तर सारखीच आहे पण स्वरांचे वजन देखील त्याचप्रमाणात तोलले गेले आहे. बरेचवेळा असे घडते, गाण्यात प्रयोग करायचे म्हणून गाण्याची चाल आणि वाद्यमेळ यांच्यात फरक केला जातो परंतु अंतिमत: दोन्ही सूर एकत्र आणून सम गाठली जाते. आणि बिस्वास यांच्या रचनेत असले प्रयोग आढळत नाहीत, असतो तो सगळा भर मेलडी आणी त्याला अनुषंगून राहणाऱ्या स्वररचनेवर. इथे व्हायोलीन वाद्याचे स्वर आहेत पण त्या स्वरांची जातकुळी शाब्दिक रचनेशी नेमकेपणाने सांधून घेतलेली आहे. परिणाम असा होतो, ओळीतील आशय अधिक खोल जाणवतो. 
मुळात तलत मेहमूद यांचा मृदू स्वर असल्याने, गाण्याची ठेवण देखील त्याच अंगाने केली आहे. गाण्यात आणखी एक बाब सांगण्यासारखी आहे. गायन सुरेल असणे, हे तर फार प्राथमिक झाले परंतु गाताना, एकमेकांच्या गळ्याची "जात" ओळखून गायन करणे, याला देखील अतिशय महत्व असते. लताबाईंचा तारता पल्ला जरी विस्तृत असला तरी इथे त्याच्यावर योग्य संयम घालून, तलतच्या गायकीशी अतिशय सुंदररीत्या जुळवून घेतला आहे. म्हणूनच मघाशी मी म्हटले, युगुलगायन कसे असावे, यासाठी हे गाणे सुंदर उदाहरण ठरते. 

कुछ आंख में आंसू बाकी हैं 
जो मेरे गम के साथी हैं 
अब दिल हैं ना दिल के अरमां हैं 
बस मैं हुं मेरी तनहाई है 

या ओळी ऐकण्याआधी, मधल्या स्वरिक वाक्यांशात व्हायोलीनचे स्वर किंचित वरच्या पट्टीत गेले आहेत आणि तोच स्वर लता बाईंनी उचलून घेतला आहे. स्वर उचलून घेताना, तो स्वर ताणला जाणार नाही याची काळजी घेतली असल्याने, "मूळ" स्वररचनेशी संवाद साधला जातो. गाण्यांमध्ये अशीच छोटी सौंदर्यस्थळे असतात, जेणेकरून रचना अर्थपूर्ण होत जाते. संगीतकाराचे "कुलशील" इथे समजून घेता येते. गाण्यात स्वरांचे "वर-खाली" होणे क्रमप्राप्तच असते परंतु स्वरांतील ही "अटळ" बाब "टाळून" गायन करणे, खरे कौशल्याचे असते आणि फार अवघड असते. 

ना तुझ से गिला कोई हमको 
ना कोई शिकायत दुनिया से 
दो चार कदम जब मंझील थी 
किस्मत ने ठोकर खाई है 

गाण्यात धृवपद धरून चार, चारओळींचे चार खंड आहेत आणि प्रत्येकी दोन खंड प्रत्येकाला गायला मिळाले आहेत. इथे शब्दांतील आशय जाणून घेऊन, त्याप्रमाणे गायकांना गायला दिले गेले आहेत. अर्थात, हे देखील फार प्राथमिक झाले कारण बहुतेक सुंदर गाण्यात हा विचार नेहमीच दिसतो. मग या गाण्यात आणखी काय वेगळे आहे? या गाण्यातील दु:खाची प्रत काही जगावेगळी नाही किंवा शब्दकळा देखील अत्युच्च दर्जाची नाही. खरतर चित्रपट गीतात त्याची फारशी गरज देखील नसते. रचनेच्या लयीत शब्द चपखल बसणे, ही स्वररचनेच्या दृष्टीने आणि गायनाच्या दृष्टीने देखील अत्यावश्यक असते आणि ती गरज, ही शब्दकळा व्यवस्थित पुरवते. 

कुछ ऐसी आग लगी मन में 
जीने भी ना दे मरने भी ना दे 
चूप हुं तो कलेजा जलता है 
बोलुं तो तेरी रूसवाई है. 

मी वरती जो प्रश्न विचारला आहे, याचे उत्तर गाण्याचे शेवटाला मिळते. गाण्याच्या शेवट करताना, गाण्याचे ध्रुवपद लताबाईंच्या आवाजात आहे. गाण्याच्या सुरवातीला याच ओळी आपल्याला तलत मेहमूदच्या आवाजात ऐकायला मिळतात. दोन्ही वेळेस, लय तीच आहे पण स्वररचनेत किंचित फरक आहे. अर्थात, स्वररचना बदलली तरी देखील आशयाच्या अभिवृद्धीत काहीही फरक पडला नाही आणि, किंबहुना लताबाईंच्या आवाजात याच ओळी अधिक गहिऱ्या होतात आणि गाण्यातील दु:खाची प्रत एकदम वेगळी होते. हे असे करताना, परत एकदा, शब्दांची कुठेही ओढाताण नाही, हे लगेच जाणवते. "चूप हुं तो कलेजा जलता है, बोलुं तो तेरी रूसवाई है. " या ओळी ऐकताना आपल्याला केवळ गायकी(च) दिसते असे नसून त्यामागे असलेला संगीतकारचा विचार देखील जाणवतो. भारतीय रागसंगीत आणि लोकसंगीत याचा अनिल बिस्वास यांचा गाढा अभ्यास होता. एकूण सगळी कारकीर्द बघितली सैगल  काळात आरंभ करून देखील सैगल यांचा वापर केला तर नाहीच पण सैगल शैली झुगारून स्वतः:ची स्वतंत्र शैली निर्माण केली. ही शैली इतकी प्रभावी होती  की,पुढील काळातील, "सी. रामचंद्र", "मदन मोहन" आणि "रोशन" यांसारख्या प्रतिभावंत रचनाकारांवर सुरवातीला घट्ट पगडा दिसून येतो. . ढाक, ढोल, खोळ, तबला यांसारख्या लायवाद्यांच्या वादनात ते आरंभापासून कुशल होते. परिणामस्वरूप, स्वररचनांवर कला, लोक तसेच धर्म या संगीतकोटींशी त्यांची जवळीक दिसून येते. आणखी विशेष सांगायचा झाल्यास, एरव्ही हिंदी चित्रपट संगीतात निरपवादपणे वावरणाऱ्या "खेमटा" या अर्धतालाऐवजी इतर ताल वापरण्याचा त्यांनी कसोशीने वापर केला.
या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे, मला वाटते हे गाणे हिंदी चित्रपट गीताच्या नामावळीत अढळ स्थान प्राप्त करून राहिले आहे.



सपना बन साजन आये

माझ्या तरुणपणी, मला अचानक, दुर्मिळ हिंदी गाणी जमविण्याचे "खूळ" मला लागले होते. "खूळ" अशा साठी म्हटले कारण नंतर काही वर्षांनी मला समजले की "दुर्मिळतेच्या" नावाखाली काही साधारण स्वरुपाची गाणी गोळा केली गेली. अर्थात, ही समज यायला काही वर्षे जावी लागली. अशाच काळात मला हे गाणे अवचित सापडले, वास्तविक जमालसेन हे नाव आता कितीजणांना ठाऊक असेल मला शंका आहे. त्यावेळी, १]शामसुंदर, २] विनोद,, ३] जगमोहन आणि असे अनेक संगीतकार माझी श्रवणयात्रा श्रवणीय करून गेले.  
"शोखिया"चित्रपटातील हे गाणे. सुरैय्या आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा, चित्रपट, चित्रपट म्हणून काही खास नव्हता, जवळपास सरधोपट म्हणावा, इतपतच हा चित्रपट होता परंतु या चित्रपटाला जी काही थोडीफार लोकप्रियता लाभली ती केवळ श्रवणीय गाण्यांमुळे. खरतर केदार शर्मांसारखा जाणता दिग्दर्शक असून, चित्रपट सर्वसाधारण प्रकृतीचा निघाला. या चित्रपटात इतकी सुंदर गाणी असून देखील हा चित्रपट काळाच्या ओघात विसरला जावा!! याच काळात, केवळ गाण्यांवर तरलेले असंख्य चित्रपट निघत होते आणि त्यांनी अमाप लोकप्रियता प्राप्त केली. असे देखील असू शकेल, अत्यंत ढोबळ कथानक, प्राथमिक दर्जाचा अभिनय आणि कथेची विस्कळीत मांडणी इत्यादी गोष्टींमुळे हा चित्रपट विस्मरणात गेला. 
"मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी;
गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या, शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी". 
कविवर्य बोरकरांनी, या ओळींतून जो आशय व्यक्त केला आहे त्याचीच प्रतिकृती जणू "सपना बन साजन आये" या गाण्यातून व्यक्त होते. जरा खोलवर विचार केला तर गाण्यातील शब्द देखील याच आशयाशी जुळणारे आहेत. केदार शर्मांचीच शब्दकळा आहे.
आता सरळ गाण्याकडे वळायचे झाल्यास, लता अगदी तरुण असतानाचे हे गाणे आहे. आवाजाची कोवळीक, लगेच गायनाचे वय दाखवून जाते."सोयी कलिया हस पडी, झुके लाजसे नैन, बिना की झनकार मे तरपन लागे रैन" अशा ओळीने हे गाणे सुरु होते. कुठेही ताल वाद्य नसून, पार्श्वभागी हलकेसे व्हायोलीन आणि बासरीचे तसेच गिटारचे मंद सूर!! परंतु त्याच सुरांनी रचनेची ओळख होते. इथे बघा, "झनकार" शब्द उच्चारताना, "झन" आणि "कार" असा विभागून गाताना, छोटासा आकार लावला आहे तसेच "लागे' म्हणताना, "ला" वर असाच बारीक आकार आहे पण तिथेच लताच्या आवाजाची कोवळीक ऐकायला मिळते आणि आकार लावताना, झऱ्याचे पाणी उतरणीवर यावे त्याप्रमाणे हळुवारपणे ती हरकत समेवर येते.वास्तविक इथे "सम" अशी नाही परंतु ज्या सुरांवर रचना सुरु होते, त्याच सुरांवर रचनेचे सूर परत येतात, ते हेच दर्शविण्यासाठी - "सोयी कलिया हस पडी" या शब्दांचा आशय व्यक्त करण्यासाठी!! 
लगेच "सपना बन साजन आये, हम देख देख मुसकाये, ये नैना भर आये, शरमाये" हि ओळ सुरु होते. इथे संगीतकाराने कमालीच्या हळुवारपणे पार्श्वभागी बासरीचे सूर वापरलेत. "मुसकाये" म्हणताना, वाटणारी मुग्ध लाज, पुढे "शरमाये" या शब्दाच्या वेळी अत्यंत आर्जवी होते आणि आर्जवीपण बासरीच्या मृदू स्वरांनी कशिदाकाम केल्याप्रमाणे शब्दांच्या बरोबरीने ऐकायला मिळते आणि ही रचना अधिक समृद्ध होत जाते. 
आपल्याकडे एक विचार नेहमी मांडला जातो, तीन मिनिटांच्या गाण्यात वैचारिक भाग फारसा अनुभवायला मिळत नाही पण अशी माणसे मनाचे कोपरे फार कोतेपणाने बंद करून टाकीत असतात. आता, वरील ओळीच्या संदर्भात, "शरमाये" या शब्दाबरोबर ऐकायला येणारी बासरीची धून कशी मन लुभावून जाते, हे अनुभवण्यासारखे आहे. काही सेकंदाचा "पीस" आहे परंतु त्याने गाणे एकदम वरच्या पातळीवर जाते. 
पहिल्या अंतऱ्यानंतर, व्हायोलीन एक गत सुरु होते आणि त्याच्या पाठीमागे अति मंजुळ आणि हलक्या आवाजात छोट्या झांजेचे आवाज येतात, हलक्या आवाजात म्हणजे फार बारकाईने ऐकले तरच ऐकायला येतात. व्हायोलीनची गात, तुकड्या तुकड्याने जिथे खंडित होते, तिथे झांजेचा आवाज येतो आणि तो सांगीतिक वाक्यांश उठावदार करतो. हे जे कौशल्य असते, तिथे संगीतकाराची बुद्धीमत्ता दिसते. रचना भरीव कशी करायची, ज्यामुळे मुळातली सुरवातीची चाल, पुढे विस्तारत असताना, अशा जोडकामाने भरजरी वस्त्र सोन्याच्या बारीक धाग्याने अधिक श्रीमंत व्हावे, असे ते संगीत काम असते आणि हे बहुतेक सगळ्याच गाण्यात असते पण आपण तिथे फारसे लक्ष देत नाही, हे दुदैव!! 
पुढील कडवे,"बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर , झुले खूब झुलाये, ये नैना भर आये, शरमाये!!" इथे लताची गायकी कशी समृद्ध होते बघा.  "बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर" ही ओळ आधीच्या पहिल्या ध्रुवपदाच्या चालीला सुसंगत आहे पण, नंतर, "झुले खूब झुलाये" म्हणताना, आवाजाला जो "हेलकावा" दिला आहे किंवा आपण "हिंदोळा" म्हणू, तो केवळ जीवघेणा आहे. शब्दांची मर्यादा दाखवून देणारा!! 
वास्तविक मधल्या अंतऱ्यात फारसे प्रयोग नाहीत, म्हणजे मुळातली चालच अति गोड असल्याने, त्या चालीला अनुलक्षून अंतरे बांधले आहेत. "नील गगन के सुंदर तारे चून लिये फुल समझ अति न्यारे, झोली मे भर लाये" इथे, "झोली मे भर लाये" हे शब्द म्हणताना, लाटणे आवाजात एक छोटासा "खटका" घेतला आहे पण तो कुठेही लयीत खटकत नाही, हे त्या आवाजाचे मार्दव!! वास्तविक, या कडव्याची सुरवात थोड्या वरच्या पट्टीत आहे परंतु शेवटची ओळ दुसऱ्यांदा म्हणताना, लय परत समेच्या सूरांकडे वळते, ती तिथे तो :खटका" घेऊन!! लताचे गाणे हे असे फुलत असते जे पहिल्या श्रवणात फारसे जाणवत नाही परंतु नंतर प्रत्येक घटक वेगवेगळा घेऊन ऐकायला लागलो की आपल्याला हातात केवळ शरणागती असते!! 
"मस्त पवन थी हम थे अकेले, झिलमील कर बरखा संग खेले; फुले नही समाये, ये नैना भर आये" हे गाताना, लताची शब्दामागील जाणीव अनुभवण्यासारखी आहे. "मस्त पवन थी" या शब्दांचा सांगीतिक आशय किती मृदू स्वरांतून ऐकायला मिळतो, खरेतर सगळे गाणेच हे अतिशय मुग्ध परंतु संयत प्रणयाचा आविष्कार आहे. नायिका, वयाने "नवोढा" आहे, पहिल्या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि त्यातून हे सूर उत्फुल्लपणे उमटले आहेत, इथे "उमटले" हा शब्दच योग्य आहे, कारण इथे भावनेत तोच आशय आविष्कृत झालेला आहे. मनापासूनची विशुद्ध प्रेमाची भावना, ज्याला थोडेशी अल्लड भावना, असे देखील म्हणता येईल, अशा भावनेचे शब्दचित्र आहे. त्यामुळे चाल बांधताना आणि गाताना कुठेही सूर, मुग्धता सोडून जाणार नाहीत, याचेच भान संगीतकाराने आणि गायिकेने नेमकेपणाने राखले आहे. 
जमाल सेन हे नाव आता तर विस्मृतीच्या गर्तेत कधीच लुप्त झाले आहे. त्यामुळे या गाण्याचे विस्मरण होणे साहजिकच!! तसे या गाण्यात भरून टाकणारे, चमत्कृतीपूर्ण तसेच अति गुंतागुंतीचे काहीही नाही परंतु मुळात जी सुरावट हाताशी आहे, तीच गोडव्याने भारलेली आहे.  या संगीतकाराच्या इतर काही रचना ऐकल्यावर काही ठाम विधाने नक्की करता येतात. सरळ, साध्या स्वररचना आणि कंठसंगीतावर भर देण्याची असोशी. शक्यतो पारंपरिक वाद्यांवर भर आणि रागाच्या आधारभूत स्वरांना हाताशी घेऊन स्वररचनेची बांधणी करायची.  गुंतागुंतीच्या स्वररचनेवर भर न देता, वेगवेगळ्या स्वनरंगांवर भर देण्याची वृत्ती. त्यातूनच स्वरविस्ताराच्या शक्यता निर्माण करण्याची उर्मी जाणवते. या गाण्याच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, अंगभूत भावस्थितीपुर्ण अशा यमन रागाची चौकट, काहीशी संथ लय, गीतांत गुंफलेला थोडा आलाप इत्यादींमुळे आहे गाणे एक संयमित, आणि प्रेमाच्या शारीर रंगावर भर न देणारे असे यशस्वी गीत इथे निर्माण झाले.
आवाजाची प्रत बघता, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातली रचना, हे सहज समजून घेता येते. या दृष्टीने ऐकताना, आवाजातील ज्या एका गुणाचे अगणित सांगीत-सौंदर्यशास्त्रीय परिणाम झाले आहेत, त्याचे वर्णन "प्रसाद" असे करता येईल. ज्या आवाजात प्रसादगुण असतो, त्यामुळे त्यातून वा त्याद्वारे सादर होणारे संगीत रसिकांना  थेट,लगेच आणि मूळ संगीतातील सर्व गुणांचा अपभ्रंश न  होता,ऐकायला मिळते. 
खरतर हे गाणे ऐकताना मला असेच वाटत होते, हल्लीच्या जमान्यात असे शांत, संयत गाणे कितपत पचनी पडू शकेल परंतु जेंव्हा हे गाणे मी जवळपास ८ वर्षांनी ऐकले आणि मला त्यात अजुनही तशीच "ताजगी" आढळली. या गाण्यात कुठेही अति वक्र ताना नाहीत की प्रयोगाचा अवलंब केलेला आहे पण मुळात हाताशी इतकी गोड चाल असल्यावर, अशा गोष्टींची गरजच पडत नाही, हेच खरे. ते स्वरांचे आर्जव, त्यामागील बासरीच्या मंजुळ हरकती, हेच या गाण्याचे खरे वैभव आहे आणि हेच वैशिष्ट्य, मला हे गाणे वारंवार ऐकायला भाग पडते. 
एक मजेदार किस्सा. फार पूर्वी, एका मैफिलीत, पंडित जितेंद्र अभिषेकींनी राग यमन सादर केला. साथीला अर्थात, त्यांचे शिष्य होते. गाताना, पंडितजींनी काहीशा वेगळ्या धर्तीच्या ताना घेतल्या आणि त्याचबरोबर लयीचे वेगळे बंध दाखवले. मैफिल संपल्यावर, शिष्यांनी पंडितजींना, या नवीन सादरीकरणाबद्दल विचारले असता, अत्यंत शांतपणे, पंडितजींनी, या गाण्याचा उल्लेख करून, या गाण्यातील लताबाईंच्या तानांचा उपयोग केला. चित्रपट गीत किती असामान्य माध्यम आहे, यासाठी आणखी वेगळे उदाहरण कशाला? 


Saturday, 25 January 2020

का रे दुरावा का रे अबोला


मुंबईतील चाळीतील जीवन  अभ्यासाचा आणि दीर्घ लेखनाचा (खरे तर पुस्तकाचा) विषय आहे. आता हळूहळू चाळ आणि चाळसंस्कृती लयाला जात आहे. कदाचित पुढील पिढीला फार काही कळणारच नाही. मागील शतकातील ७० च्या दशकातील "मुंबईचा जावई" या चित्रपटातील आजचे गाणे " का रे दुरावा, का रे अबोला " या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. 
गाण्याची पार्श्वभूमी ही तशी पारंपरिक आहे. दोन खोल्यांत राहणारे एकत्रित कुटुंब, त्यामुळे होणारी मानसिक कुचंबणा आणि नवपरिणीत २ तरुण जोडपी + एक वयस्कर जोडपे. अर्थात एकांत हा अभावानेच मिळणार. साधे कुजबुजणे देखील दुसऱ्याला ऐकू जाण्याची शक्यता. त्यातून सांसारिक कटकटींनी वैतागलेला नवरा. त्यातच रात्र होते आणि एका जोडप्यातील पुरुष मान वळवून झोपेला लागलेला. अर्थात त्याची बायको थोडी धीट, प्रणय चतुर आणि मुख्य म्हणजे आपल्या नवऱ्याला पुरेपूर ओळखणारी. याच पार्श्वभूमीवर हे प्रणयी थाटाचे गाणे. अर्थात नेहमीप्रमाणे लडिवाळपणा, काहीसा धीटपणा - अर्थात त्या २ खोलीत सामावू शकलेला. 
माडगूळकरांना चित्रपटीय भाषा किती वश झाली होती, हे या गाण्याच्या शब्दांकनातून जाणवते. एखाद्या जोडप्याच्या गद्य संवादी भाषेलाच माडगूळकरांनी पद्यरूप दिले आहे. पहिलीच ओळ - "का रे दुरावा, का रे अबोला" या काहीशा प्रश्नार्थक ओळीतूनच सुरवात केली आहे. अर्थात इथे एक ध्यानात ठेवायला हवे, प्रणय झाला तरी मागील शतकातील मध्याच्या काळातील काहीसा मुग्ध, संयत असाच होता. अर्थात त्यावेळचे मुंबईचे आणि मुख्य म्हणजे चाळीतील वातावरण लक्षात घेणे महत्वाचे आहे. ती मानसिक वृत्ती नेमकेपणाने जाणून माडगूळकरांनी शब्दरचना केली आहे. एका बाजूने हवाहवासा वाटणारा शृंगार परंतु जागेची अडचण असल्याने काहीसा कोंडमारा झालेला. "
अपराध माझा असा काय झाला" या पुढील ओळीतून पहिल्या ओळीतील प्रश्नार्थक पृच्छा अधिक गडद केलेली. चित्रपटात गाणी लिहिताना शैली ही अधिकाधिक चित्रमय असावी जेणेकरून पडद्यावरील पात्रांचे विशेष ठळकपणे उठून यावेत. माडगूळकरांची शैली कशी अधिक धीट होते आणि आरक्त शृंगार व्यक्त करते हे बघण्यासाठी - गाण्याच्या शेवटच्या ओळी बघाव्यात. 
"रात जागवावी असे आज वाटे 
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे "
आपला प्रियकर आता थोडा मोकळा झाला आहे काहीसा मिश्किल देखील झाला आहे, हे जाणवून ती नायिका आपली भावना अशा धीटपणे व्यक्त करते परंतु त्या धीटपणातही कुठेही उठवळ वृत्ती दिसत नाही. 
संगीतकार सुधीर फडक्यांनी शब्दकळेची जातकुळी ओळखून चाल बांधली आहे. राग यमन तर या संगीतकाराचा खास आवडीचा राग असावा इतक्या विपुल प्रमाणात या संगीतकाराने चाली निर्माण केल्या आहेत. सुधीर फडक्यांच्या स्वररचनेत नेहमी आघाती तालवाद्यांचा बराच वापर असतो असे निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे परंतु या गाण्याच्या बाबतीत ताल वाद्य म्हणून तबला वापरताना, एकूणच अतिशय धीमा स्वर ठेवलेला आहे. एकतर गाण्याचा समय रात्रीचा आहे आणि एकांतासाठी आसुसलेला आहे आणि हेच लक्षात ठेऊन संगीतकाराने आपली रचना बांधली आहे. गाण्याच्या सुरवातीच्या सतारीच्या सुरांतून रागाचे आणि चालीचे सूचना होते. स्वररचनेचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर ध्यानात येईल की एव्हाना या संगीतकाराची शैली प्रस्थापित झाली आहे आणि दोन अंतऱ्यामधील वाद्यमेळ तसेच चालीचे गायन करताना, ठराविक टप्पे सहजपणे लक्षात येतात. अर्थात जर का तुमची कारकीर्द जितकी मोठी तशी शैलीचे साचे तयार होणे क्रमप्राप्तच होत असतात. 
गायिका आशा भोसले यांची मराठीतील कारकीर्द खऱ्या अर्थाने सुधीर फडक्यांकडे खुलली. अर्थात आशाबाई नेहमीच ते श्रेय मनमोकळेपणी या संगीतकाराला देतात. सुधीर फडक्यांची स्वररचना ही नेहमीच शब्दानुकूल असते. कवितेतील कुठल्या शब्दावर जोर दिला म्हणजे त्यातील आशय अभिवृद्धी होते, हे सुधीर फडके नेहमीच पारखून घेतात आणि त्याचा परिणाम गायनावर होतो. गाण्याची पहिलीच ओळ म्हणायला "दुरावा" आणि "अबोला" शब्दांचे उच्चार ऐकण्यासारखे आहेत. काहीशी वंचना आहे पण लटका राग आहे, याची अचूक जाणीव आहे आणि हे सगळे आशाबाई आपल्या गायनातून दर्शवतात. आणखी एक उदाहरण बघायचे झाल्यास, दुसऱ्या अंतऱ्यातील "जवळी जरा ये हळू बोल काही" ही ओळ गाताना स्वर थोडा हलका ठेवला आहे. जोडपी प्रणयी कूजन थाटाचा स्वरांश असल्याने अशी गायकी खुलून दिसते. ही गायकी शब्दभोगी गायकी आहे. या सगळ्याचा परिणाम एक अतिशय सुंदर, संयत प्रणयाचे गाणे आपल्याला ऐकायला मिळणे. 

 का रे दुरावा, का रे अबोला 
अपराध माझा असा काय झाला 

 नीज येत नाही मला एकटीला 
कुणी ना विचारी, धरी हनुवटीला 
मान वळविसी तू, वेगळ्या दिशेला 

तुझ्यावाचुनी ही रात जात नाही 
जवळी जरा ये हळू बोल काही 
हात चांदण्याचा घेई उशाला 

रात जागवावी असे आज वाटे 
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे 
नको जागणे हे नको स्वप्नमाला 



Tuesday, 21 January 2020

स्टीफन डेवीस

रस्टनबर्ग इथे नोकरी करताना, अचानक U.B.group (विजय मल्ल्या पुरस्कृत) मध्ये नोकरी मिळण्याची संधी मिळाली. इतका मोठा ग्रुप म्हटल्यावर नाही म्हणायचे काहीच कारण नव्हते, फक्त बृवरीमध्ये नोकरी होती आणि बृवरी होती, Standerton या गावात. जोहान्सबर्ग पासून पश्चिमेला २०० किलोमीटर आत. अर्थात, साउथ आफ्रिकेत गावे देखील तशी सुस्थितीत असतात, त्यामुळे तसे टेन्शन नव्हते. एका शनिवारी, रस्टनबर्ग मधील मित्राने तिथे सोडण्याचे कबूल केले असल्याने, कसे जायचे, हा प्रश्न नव्हता. कंपनीने, माझ्या घराची सोय होईपर्यंत तिथल्या एका खासगी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. तिथे, "राम नायडू" वगळता, कुणाही माणसाशी फोनवर देखील बोललो नव्हतो (राम बरोबर देखील फोनवर बोलणे) तेंव्हा ओळखीचे कुणी असण्याचा प्रश्नच नव्हता.
रामची दुसऱ्या बृवरीत बदली झाल्याने, त्याच्या जागेवर माझी नेमणूक झाली होती. सोमवारी, तिथल्या ऑफिसमध्ये गेलो आणि सगळ्यांशी ओळख-पाळख करून घेण्यात गेला आणि इथेच मला स्टीफन भेटला. तो बृवरीचा General Manager तर मी, Finance G.M. अशी व्यवस्था होती. गाव अगदी छोटेखानी आहे, ना तिथे कुठला भव्य दिव्य मॉल की कुठला क्लब!! गावात ४,५ पब्स, गोल्फ क्लब आणि एक छोटेसे शॉपिंग सेंटर इतपतच पसारा आहे.
पहिल्या दिवशी स्टीफनशी अत्यंत जुजबी आणि औपचारिक ओळख झाली. इथे मला खऱ्याअर्थी गोऱ्या माणसाबरोबर काम करावे लागले. इतकी वर्षे बरीच गोरी माणसे संपर्कात आली पण ती सगळी तात्पुरत्या कामानिमित्ताने. त्यामुळे, या माणसांशी "नाळ" जुळली नव्हती. एकतर, गोरी माणसे, काम वगळता, फारसे संबंध तुमच्याशी ठेवत नाहीत आणि इथे देखील आपल्याला असाच अनुभव येणार, अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला सुरवात केली. वास्तविक, माझ्या हाताखाली देखील ४ गोरी(च) माणसे होती पण कितीही झाले तरी मी त्यांचा "बॉस" असल्याने, तसे जवळकीचे नाते निर्माण होणे, तसे अवघडच होते. (अर्थात पुढे सगळे व्यवस्थित झाले, तो वेगळा भाग!!)
वास्तविक माझे आणि स्टीफनच्या कामाचे स्वरूप भिन्न होते तरी देखील, काही नवीन खरेदी, काही रिपेरिंगची कामे आणि सर्वात महत्वाचे "रेव्हेन्यू कलेक्शन" याबाबत आमच्या भेटीगाठी सारख्या होत राहिल्या. आत्तापर्यंत, साउथ आफ्रिकेत नोकरी करताना, कंपनीने मला गाडी दिली असल्याने, मला गाडी विकत घेण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता परंतु इथे तशी पद्धत नव्हती आणि अर्थात माझे तसे "contract" असल्याने, गाडी विकत घेण्याचा प्रश्न उभा राहिला. गावात तर मी नवखा, त्यामुळे लगेच स्टीफनशी विषय काढला. त्याने लगेच, त्याच्या जावयाला फोन लावला - जावई जगप्रसिद्ध AVIS कंपनीत फार मोठ्या पदावर होता. आता, सासऱ्याकडून मागणी आल्याने, त्याने मला गाडी मिळवून देण्यासाठी बरीच मदत केली आणि या निमित्ताने, माझे स्टीफनशी ओळख आणखी घट्ट झाली. त्याला तसे नवल वाटायचे, मी इथे "एकटा" कसा राहतो? अर्थात, त्यालाच कशाला, इतकी वर्षे तिथे राहून, इतरांना देखील हाच प्रश्न पडायचा.
खरतर स्टीफननेच, मला घर शोधायला मदत केली. गाव तसे लहान - अगदी आकारमानाने देखील. जवळपास १५ ते २० हजार इतकीच लोकवस्ती आणि बव्हंशी सगळे गोरे. थंडीच्या दिवसात अत्यंत कडाक्याची थंडी, म्हणजे -४,-५ इतके तापमान जाणार!! त्यामुळे गावात फारसे उद्योगधंदे नाहीत. आमची बृवरी आणि जगप्रसिद्ध नेसले कंपनीचा कारखाना. इतक्याच मोठ्या कंपन्या.
एकदा, त्याची बायको - जेनी ऑफिसमध्ये आली आणि स्टीफनने माझी ओळख करून दिली. त्याला साजेशी अशीच बायको आहे. स्टीफन, मुळचा लष्करातील. त्यामुळे हाडपेर मजबूत. गोरा वर्ण, साधारण साडे पाच फुट उंची, निळे डोळे, डोळ्यांवर चंदेरी काडीचा चष्मा, अंगकाठी अत्यंत काटक आणि झपझप चालण्याची लकब आणि हसतमुख चेहरा, त्यामुळे समोरच्यावर लगेच छाप पडायची. सर्वात महत्वाचे म्हणजे, निर्णय लगोलग घेऊन, कामाचा फडशा पडायची वृत्ती. आम्ही, दोन वर्षे एकत्र होतो पण, ऑफिसवेळेत, त्याने माझ्याशी कधीही वायफळ गप्पा मारल्या नाहीत. ऑफिसमध्ये फक्त कामासंबंधी बोलणे आणि नंतर मात्र मित्रासारखे वागणे. हाच अनुभव मला पुढेदेखील वारंवार, गोऱ्या माणसांबाबत आला.
कामानिमित्ताने, आमच्या ऑफिसमध्ये अनेकवेळा हेड ऑफिसमधून काही वरिष्ठ अधिकारी यायचे, कधी ऑडीटर यायचे आणि त्यानिमित्ताने, आम्हाला त्यांना बाहेर जेवायला न्यायला लागत असे. अशा कार्यक्रमात, स्टीफन खुलत असे. गोरा माणूस तरी देखील इतके नर्म विनोद, प्रसंगी स्वत:ची चेष्टा करणार, कधी तरी त्याचे लष्करातील अनुभव सागणार. त्यांमुळे अशा पार्ट्या फार रंगतदार व्हायच्या. २००५ च्या ख्रिसमसला त्याने मला घरी बोलावले होते. व्हाईट लोकांच्या घरी त्यापूर्वी अगदी तुरळक गेल्याच्या आठवणी होत्या. इथे मात्र, हा समाज ख्रिसमस कसा साजरा करतात, याचा मन:पूत आनंद घेतला. इथे केवळ, ड्रिंक्स किंवा खाणे इतपतच मर्यादित समारंभ नसतो. घरात, अनेक खेळ खेळले जातात, नृत्ये केली जातात, विनोदी बोलणे तर अखंड चालू असते. केवळ नातेवाईकच जमतात असे नसून, इतर मित्र मंडळी एकत्र जमतात आणि एकूणच उत्सवी पद्धतीने ख्रिसमस साजरा केला जातो. त्या रात्री, स्टीफनने मला त्याच्या घरीच राहायचा आग्रह केला आणि मी तो मानला. तसे, या गावात सुरक्षिततेचा इतका गंभीर प्रश्न नव्हता, जितका मोठ्या शहरांत आहे. पण, तरीही अनिल एकट्याने इतक्या रात्री गाडी कशी चालवणार, म्हणून त्याने राहण्याचा आग्रह केला.
पुढे, त्याने मला, त्याच आग्रहापोटी, तिथल्या गोल्फ क्लबचे सभासदत्व घ्यायला लावले. गावात मनोरंजनाची तशी वानवा होती. आणि हा क्लब तर सगळ्या व्हाईट लोकांनी भरलेला. आलिशान क्लब संस्कृती म्हणजे काय, याचा साक्षात अनुभव घेता आला. कितीतरी रविवार सकाळ, मी इथे खेळण्यात घालवल्या. सुरवातीला, मला गोल्फ खेळातील ओ की ठो माहित नव्हते पण तिथे देखील स्टीफनने त्याची ओळख वापरून, माझ्याकडून, प्राथमिक धडे अक्षरश: घोटवून घेतले. इथेच, "बॉल डान्स" प्रकार अतिशय जवळून अनुभवता आला आणि आपल्याला वाटते तितके सहज हे नृत्य नसून, त्याचे देखील सुसंगत शास्त्र आहे, हे समजून घेता आले.
दुपारचे जेवण, आम्ही बहुतेकवेळा एकत्रच घेत असू. मला, आपल्या रीतीरिवाजानुसार संपूर्ण जेवणाची सवय तर हा माणूस, केवळ एखाद, दुसरे sandwich!! तरी देखील, हा माणूस काहीवेळा माझा डबा "शेयर" करीत असे, अगदी हक्काने!! पुढे, मला, कंपनीच्या अनेक डेपोज भेटी करण्याची जरुरी असायची आणि हे डेपोज, अत्यंत अंतर्गत भागात आणि अधिक करून, काळ्या लोकांच्या वस्तीत होते. सुरवातीला, आम्ही दोघे एकत्र जात असू. अशा भेटीतून, खरेतर मला साउथ आफ्रिकेचे अंतरंग समजून घेता आले.
दिवसेंदिवस कंपनीचा खर्च आणि उत्पन्न, यातील दरी वाढत असल्याने, आम्हा दोघांच्या ध्यानात, या बृवरीचे भवितव्य कळत होते. त्यानिमित्ताने, ऑफिस वेळ संपल्यावर, आम्ही दोघेच ऑफिसमध्ये बसून विचार करीत बसायला लागलो आणि उशीर झाला की मला बळजबरीने गाडीत बसवून, त्याच्या घरी जेवायला घेऊन जात असे. मला तर फार नवल वाटायचे कारण, इतर व्हाईट माणसे आणि हा, यात, बराच फरक होता. गोरे लोकं कितीही जवळचे झाले तरी, त्यांच्या घरात शक्यतो प्रवेश द्यायला नाखूष असतात. त्याबाबतीत स्टीफन अपवाद. २००७ मध्ये, बृवरी बंद पडणार, हे जवळपास नक्की झाले. मी पुढे प्रिटोरिया इथे महिंद्र कंपनीत नोकरी शोधली तर, स्टीफन त्यावेळेस, टांझानिया इथे नोकरीला गेला. अर्थात, ज्याला साउथ आफ्रिकेची सवय लागली आहे, त्याला इतर आफ्रिकन देशात स्वास्थ्य मिळणे, तसे दुरापास्त!! तसेच झाले, त्याने, परत याच कंपनीत प्रवेश मिळवला पण, डर्बन इथल्या बृवरी मध्ये. पुढे, मी, माझी गाडी विकली आणि दुसरी घेतली पण तिथे देखील स्टीफन मदतीला आला, परत त्याच्या जावयाला या कामी जुंपले.
तो डर्बन इथे आणि मी प्रिटोरिया इथे, त्यामुळे गाठीभेटी दुर्मिळ. फोनवरून संभाषण, इतपतच संपर्क. आता तर मी कायमचा भारतात आलो पण, तरीही अजून जे थोडे गोरे लोकं माझ्या संपर्कात आहेत, त्यात स्टीफन अग्रभागी!!

Wendi Farrell

मी साधारणपणे २००६ मध्ये प्रिटोरिया इथल्या महिंद्र साऊथ आफ्रिका या कंपनीत लागलो. १९९८ ते २००१ मी डर्बन सारख्या मोठ्या शहरात राहिलो होतो. त्यानंतर या शहरात राहायला आलो. एकूणच फिरायला जायचे तर शेजारील जोहान्सबर्ग शहर गाठायचे आणि परतायचे, असा परिपाठ असायचा पण आता या शहरात नोकरी मिळाली आणि सर्वात प्रथम घर शोधणे, या विषयाला महत्व देणे आवश्यक होते. त्याआधी मी Standerton इथे रहात होतो आणि तिथून निघताना, माझ्या जोहान्सबर्ग इथे राहणाऱ्या मित्राकडे घरातले सगळे सामान ठेऊन, भारतात सुटी घालवायला आलो. अर्थात काही दिवस घरी (मुंबईमधील) घालवल्यावर सरळ प्रिटोरिया गाठले. सुदैवाने लगेच मला ऑफिसजवळील Eco Park या कॉम्प्लेक्समध्ये घर मिळाले आणि लगेच मित्राकडून सगळे सामान आणून स्थिरस्थावर व्हायला लागलो. ऑफिसमध्ये, तेंव्हा विजय देसाई, महेंद्र भामरे, हेतल शाह आणि विजय नाक्रा ही कंपनीच्याच हेड ऑफिसमधून इथे ट्रान्स्फर झाली होती आणि त्यांच्याशी लगेच ओळख होणे साहजिकच होते. याच ऑफिसमध्ये मला वेन्डी भेटली, आमचा C.E.O. विजय नाक्राची वैय्यक्तिक सहाय्यक म्हणून कामाला होती - आता ती दुसऱ्या कंपनीत काम करते. काहीसा उंच शेलाटी बांधा, सडपातळ देहयष्टी, निळसर डोळे, सोनेरी केस, उजव्या गालाच्या खाली छोटासा तीळ आणि सर्वात महत्वाचे सहजपणे फुलणारे हास्य. पहिल्याच दिवशी माझ्या टेबलाशी येऊन, माझी ओळख करून घेतली. अर्थात तो पर्यंत पूर्वीच्या कंपनीतून गोऱ्या व्यक्तीशी संपर्क होणे, ओळख वाढणे इत्यादी बाबी अंगवळणी पडल्या होत्या. या ऑफिसमध्ये वरील ४ व्यक्ती आणि अस्मादिक सोडल्यास सगळे काम करणारे गौर वर्णीय होते. इतक्या घाऊक स्वरूपावर गोऱ्या व्यक्तींशी काम यापूर्वी कधीही केले नव्हते.
मी राहात होतो तो प्रसिद्ध "सेंच्युरियन" उपनगरीय भाग - जिथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडियम आहे, माझा कॉम्प्लेक्स देखील अतिशय देखणा, अवाढव्य असा होता. एकूण सगळेच मनासारखे घडले होते. ऑफिसमध्ये बहुसंख्य गोरे असल्याने त्यांचीच संस्कृती ऑफिसमध्ये होती - स्पष्ट बोलायचे झाल्यास, कामाच्या वेळात शक्यतो गप्पा टाळणे, काम करताना संपूर्णपणे मन लावून काम करणे इत्यादी. वास्तविक कामाच्या दृष्टीने माझा आणि वेन्डीचा फारसा संबंध नव्हता पण तरीही तिने मला पहिल्याच भेटीत घर शोधायला मदत केली आणि पेपरमधील जाहिरात दाखवून तिथल्या बाईचा फोन नंबर देऊन, संपर्क साधायला सांगितले आणि हे सगळे अतिशय साधेपणाने. कुठेही मी अनिलचे काम करून देत आहे, असला फालतू आविर्भाव नव्हता. कुठेही औषधापुरता देखील औपचारिकपणा नव्हता.
मला घर मिळाले आणि मी तिथे राहायला गेलो. वेन्डीला तसे सांगितले आणि तिने काहीही कारण नसताना, माझ्याशी हात मिळवून अभिनंदन केले. मला देखील जरा बरे वाटले. एकतर गोऱ्या व्यक्ती आपणहून स्वतः:हुन दुसऱ्याशी बोलायला, संबंध वाढवायला तयार नसतात. आज मी साऊथ आफ्रिका सोडून ९ वर्षे झाली पण आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. ऑफिसवेळेत गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता पण तरीही Good Morning Anil किंवा ऑफिस सोडून जाताना, Good Evening Anil, असे व्हायचेच. आमची मैत्री खरी व्हायला लागली ती शुक्रवार दुपारच्या काळात. शुक्रवार दुपार आली म्हणजे हळूहळू ऑफिसमधील ताणतणावाचे क्षण कमी व्हायला लागतात, वीक एन्ड कुठं नि कसा साजरा करायचा, या बद्दल बोलणी व्हायला लागतात. मी एकटाच रहात असल्याने, माझी चेष्टा होणे क्रमप्राप्तच होते, विशेषतः: आता कुठल्या मुलीबरोबर "डेटिंग" आहे? असला प्रश्न देखील ती विचारायची. पुढे ओळख वाढल्यावर आम्ही आमच्या कुटुंबाची माहिती एकमेकांना दिली, फोटो दिले. बरेचवेळा ती माझ्या टेबलाशी यायची आणि काहीतरी विषय काढून बोलायची. मी एकटा रहात आहे, याचे तिला थोडे कौतुकच होते, विशेषतः: जेवण बनवणे घर सांभाळणे सगळे एकट्याने करतो याचे तिला नवलच वाटायचे. ती नेहमी मला, आज जेवणात काय आहे? असला प्रश्न विचारायची आणि विचारताना स्वराला स्निग्धता असायची. वास्तविक आपले मसाले त्यांच्या पचनी पडायचे नाही त्यामुळे खाणे एकमेकांना देण्याचा प्रश्नच नव्हता. बरेचवेळा आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी बियर पार्टी असायची, तेंव्हा वेन्डी माझ्याशी बरेच खुलून बोलायची. पार्टी म्हणजे सगळाच मोकळेपणा असायचा, विषयाचे कसलेही बंधन नसायचे तरीही स्वाभाविक मर्यादा या पाळल्याच जायच्या. मी बियर घ्यायचो तर वेन्डी वाईन किंवा तत्सम ड्रिंक घ्यायची. पार्टी तशी उशिरापर्यंत चालायची तरीही शेवटपर्यंत वेन्डी तिथे हजर असायची.
तिथे कामाला असताना, मला ५० वर्षे पूर्ण झाली. वास्तविक मला काही फार मोठा समारंभ असा करायचा नव्हता. ऑफिसमधील आम्ही ४ भारतीय माझ्या घरी येणार होते, त्यानिमित्ताने घरी थोडे ड्रिंक्स, मी चिकन बिर्याणी बनवली होती, ती एन्जॉय करायची असेच पार्टीचे स्वरूप होते पण वेन्डीने माझा वाढदिवस कंपनीच्या मेलवर टाकला आणि सगळीकडून अभिनंदन सुरु झाले. थोड्या वेळाने वेन्डीच माझ्या टेबलाशी आली आणि अभिनंदन म्हणून मिठी मारली. त्यात कुठेही वखवखणे नव्हते की आणखी कुठलीही वासना नव्हती. आपला एक भारतीय मित्र, आज पन्नाशी गाठत आहे, याचा निखळ आनंद व्यक्त होत होता. वेन्डी कामात मात्र वाघ होती तसेच कामात अचूक होती. तिने केलेल्या कामात, निदान मी तरी कधीही चूक झालेली बघितली नाही.
कामाच्या संदर्भात देखील आमचे बोलणे व्हायचे, वास्तविक तिचे काम आणि माझे काम हे संपूर्णपणे वेगळे होते.
त्याच काळात एकदा मी भारतात सुटीवर आलो होतो. ऑफिसमधील दोन मैत्रिणींनी मला भारतातून येताना, "गुरु शर्ट" आणायला सांगितले होते. आता मुद्दामून सांगितले आहे म्हणून मी जरा चांगल्यातले शर्ट्स घेतले आणि परतल्यावर त्यांना दिले, त्यांनी लगोलग मला पैसे दिले. हा गोऱ्या लोकांचा व्यवहार असतो. वास्तविक मला काही फार खर्चिक असे नव्हते पण आपण दुसऱ्याकडून का म्हणून फुकट घ्यायचे? ही वृत्ती. आता वेन्डीने काही मला सांगितले नव्हते म्हणून मी काही तिच्यासाठी आणले नव्हते पण त्यावरून वेन्डीने माझी भरपूर चेष्टा केली. मी तुझी मैत्रीण तेंव्हा मी सांगायला कशाला पाहिजे? तूच स्वतः:हुन आणायला हवे होते!! असे तिचे म्हणणे आणि तसे बघितले तर त्यात काही फार चूक नव्हते. एका क्षणी तर मलाच माझी चूक कळली आणि मी ते मान्य केले. अर्थात त्यावरही वेन्डीने बराच खवचटपणा केला.
२००८ मध्ये आमच्या कंपनीने देशातील सगळ्या एजंट्सची वार्षिक मीटिंग ठरवली होती. अर्थात मॅनेजिंग सेक्रेटरी म्हणून वेन्डीला भरपूर काम होते आणि तसे तिने नेमकेपणाने केले. दोन दिवसांची मीटिंग होती आणि आदल्या दिवशी संध्याकाळी, दिवसभराचे सोपस्कार संपल्यावर डिनर पार्टी होती. त्यावेळेस मात्र मी आणि वेन्डी एका कोपऱ्यात ड्रिंक्स घेऊन शांतपणे बसून गप्पा मारीत होतो. पार्टी निमित्ताने तिने लाल जर्द रंगाचा गाऊन घातला होता. पांढऱ्या वर्णावर लाल गाऊन फारच खुलून दिसत होता आणि मला तिची चेष्टा करायची संधी मिळाली आणि मी ती भरपूर साधली.एकूणच आमच्यात कसलेही गैरसमज होतील असले काहीही नव्हते पण तरीही मैत्रीच्या मर्यादा आम्ही दोघेही पूर्णपणे सांभाळीत होतो. मनापासून मैत्री करावी पण मैत्री या नात्यांच्या सगळ्या मर्यादा ओळखाव्यात, हे मला वेन्डीकडून शिकता आले. निव्वळ निखळ मैत्री, त्यात कुठेही वखवख नव्हती आणि आता तर आम्ही दोन टोकाला रहात असताना केवळ अशक्य!! कंपनीचा व्यवहार त्यावेळी घसरत चालला होता, विजय देसाईला परत भारतात पाठवले गेले, महेंद्रची देखील वर्णी लागली होती. आम्हा सगळ्यांनाच आमचे भवितव्य दिसायला लागले होते. वास्तविक या कंपनीत मी रमलो होतो पण असे घडायचे नव्हते. मी कंपनी सोडायचा निर्णय घेतला आणि वेन्डीला सांगितला. तिला तितकासा आवडला नव्हता पण त्याला इलाज नव्हता - पुढे काही महिन्याने तिने देखील कंपनी सोडली.
आम्ही नंतर वेगवेगळ्या कंपनीत कामाला लागलो तरीही एकमेकांशी संपर्क राखून होतो. अर्थात बरेचवेळा फोनवरून बोलत असायचो. कंपनी सोडायचा एक दिवस आधी ती माझ्या टेबलाशी आली. मी टेबल आवरत होतो. तिला बहुदा कुठेतरी खट्टू वाटत असावे कारण तिची नजर तरी तेच सांगत होती. काहीशा रुद्ध स्वरांत तिनी माझा हात हातात घेतला, किंचित दाबला आणि आम्ही बहुदा शेवटचे असे, मिठीत शिरलो. किंचित क्षण असतील पण त्या मार्दवतेने मला देखील काहीसे भारावल्यासारखे झाले. कुठला अनिल आणि कुठली वेन्डी!! आता परत कधी भेटणार, याची सुतराम शक्यता नव्हती तरीही काहीसा लळा लागला होता. आता रोजच्या रोज भेटणे अशक्य.
पुढे मी कायमचा भारतात परतायचा निर्णय घेतला आणि तिला तसे फोनवरून कळवले. खरतर तिला खूपच आनंद झाला होता कारण आता मी माझ्या कुटुंबात जाणार होतो. मैत्रीच्या मर्यादा न सांगता आखून घेऊन तरीही सजग मैत्री कशी करावी, याचे सुंदर उदाहरण तिने मला घालून दिले. आजही आम्ही फेसबुकवरून संपर्कात आहोत आणि एकमेकांच्या  वाढदिवसाला आवर्जूनपणे फोन करून शुभेच्छा देतो. मैत्री नात्यात यापेक्षा आणखी काय वेगळे साधायचे असते?

Sunday, 12 January 2020

रैना बीती जाये

मध्यरात्र कलत होती तरीही आजूबाजूच्या कोठ्यांमधून कुठे वाद्याची सुरावट तर कुठे घुंगरांचा आवाज झमझमत होता. अजूनही इथे रात्रीचा अंमल पसरला नव्हता. माणसांची लगबग चालू होती आणि त्याच लगबगीत, एक धनाढ्य आपल्या शरीराचा तोल सावरीत तिथून निघायच्या मार्गावर होता. पाय लडखडत होते तर डोळे काहीसे तांबारलेले होते. अचानक पाठीमागून, धुंद मोगऱ्याचा सुवास यावा त्याप्रमाणे सूर कानावर येतात आणि त्याक्षणी त्याचे कान टवकारतात!! बाजूच्याच कोठीवरून अवर्णनीय आलाप कानावर आला आणि तो, त्या सुरांकडे खेचला गेला. डोळ्यात काहीशी अविश्वसनीय चमक आली आणि वरच्या मजल्यावर असलेल्या कोठीकडे पावले वळली!! आपण राजस श्रीमंत आहोत याची चेहऱ्यावर काहीशी गुर्मी घेऊन, जिन्यावरून धडपडत त्या कोठीवर प्रवेश करतो आणि तिथली मैफिल क्षणभर भांबावते. अचानक ओळखी निघतात आणि तुटलेली तार परत जुळून गाणे पुढे सुरु होते. 
"त्या अधरफुलांचे ओले मृदू पराग--
हालले,साधला भावस्वरांचा योग, "
वास्तविक कोठीवरील गाणे म्हणजे ईश्वराशी केलेला संवाद नव्हे!! तिथे भावनिक गुंतवणूक न होता, इष्काचे रंग उडवले जातात आणि मर्दानगीच्या मखरात ऐय्याशीची झिलई झगमगत ठेवतात!! असे असून देखील, यावेळचे सूर काही वेगळेच रंग दाखवीत होते. एका बाजूने शृंगारिक आवाहन तर दुसऱ्या बाजूने विरहाची काजळी!! 

 "नखें लाखिया दांत मोतिया वैदुर्यी नेत्र 
अवयव गमले चपल चिवट की मयवनिंचे वेत्र 
कात सोडिल्या नागिणीचे तें नवयौवन होतें 
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते 
प्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या अजरामर "जपानी रमलाची रात्र" कवितेतील या ओळी!! कोठीवरील गायिका/गणिका यांचे नेमके वर्णन या ओळींतून आपल्याला मिळते. 
१९७२ साली आलेल्या "अमर प्रेम" चित्रपटातील "रैना बीती जाये" या असामान्य गाण्याची ही पार्श्वभूमी. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत अनेक चित्रपट आपल्या गाण्यांच्या जोरावर गाजवले तरी देखील या चित्रपटातील गाण्यांनी, त्यांच्यावरील "पाश्चात्य संगीताचा" जबरदस्त ठसा संपूर्णपणे पुसून टाकला. 
आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीला एखाद्या साच्यात बसविणे किंवा त्याच्यावर एखादे "लेबल" चिकटवणे, ही आवश्यक मानसिक गरज वाटते, जणू त्याशिवाय त्या व्यक्तीची पूर्तता होणे कठीण!! अर्थात, असला प्रकार काही प्रमाणात जागतिक स्तरावर देखील आढळतो आणि मग त्यातून एकमेकांची तुलना ही आत्यंतिक गरज होऊन बसते!! एकदा अशा साच्यात त्या व्यक्तीला बसविले म्हणजे म्हणजे ते व्यक्तित्व पूर्ण होते. याची खरी गरज असते का? असला प्रश्न कुणी विचारत नाही आणि काहीवेळाने, त्या व्यक्तीला देखील, याची गरज भासायला लागते आणि बहुदा तिथेच ते व्यक्तिमत्व खुरटायला लागते. बऱ्याच उमलणाऱ्या कळ्या अशाच उखडलेल्या दिसतात.
"रैना बीती जाये" हे गाणे प्रकाशात येईपर्यंत, या गाण्याचा संगीतकार, "आर.डी.बर्मन" अशाच सावलीत वावरत होता!! त्याच्यावर, पाश्चात्य चालीवरून रचना करणारा संगीतकार, हे लेबल चिकटले होते, जणू काही या संगीतकाराने वेगळ्या प्रकारची गाणी कधीच दिली नाहीत!! वास्तविक, "घर आजा 
" किंवा "शर्म आती है" सारख्या अनुपम रचना त्याने दिल्या होत्या, हा जणू "इतिहास" झाला होता. "तिसरी मंझील" या चित्रपटाची आणि अशाच प्रकारची गाणी देणारा संगीतकार, हीच ओळख झाली होती. त्यातून, वडील, प्रसिद्ध संगीतकार, एस. डी. बर्मन यांच्या सावलीत वावरल्याने, "स्वयंप्रकाशित्व" थोडे परकेच झाले होते. 
"रैना बीती जाये, शाम ना आये, निंदिया ना आये" या धृवपदाने गाण्याची सुरवात होते. सुरवातीला, सारंगीचे सूर जवळपास ७ सेकंद आहेत पण ते सूर पुढील असामान्य आलापीला जणू बोलावत आहेत, असे वाजलेले आहेत. हा जो सुरवातीचा आलाप आहे, हा इतका जीवघेणा आहे, मंद्र सूर लागतो आणि क्षणात (अर्थ शब्दश: घेणे) तो सूर वरच्या पट्टीत जातो आणि तसाच परत खाली उतरतो!! हा जो आलाप आहे, हीच रचनेच्या अवघडतेची "खूण" आहे, जी खूण, पुढील रचना किती अधिक गुंतागुंतीची होते, त्याचे निदर्शक आहे. आलाप चालू असताना, त्याच्या पार्श्वभागी संतूरचे सूर छेडलेले आहेत आणि आलाप संपल्यावर त्या सुरांची ओळख होते. सुगम संगीताची बंदिस्त वीण, ही अशीच थोड्या थोड्या स्वरांनी बनत जात असते. हा जो जवळपास ३० सेकंदाचा आलाप आहे, हा आलाप जणू लताबाईंच्या गायकीचे अन्वर्थक लक्षण म्हणावे इतका समृद्ध आहे. बाईंची  गायकी, कुठे श्रेष्ठ आहे, त्याचे, हा आलाप, हे निदर्शक आहे. आलाप खर्ज सुरांतून तीव्र सुरात जातो आणि त्याच लयीत खाली उतरतो, फार "मुश्किल" गायकी आहे!! 
गाण्याची सुरवात "गुजरी तोडी" रागाच्या सुरांनी होते. संगीतकार म्हणून या गाण्यात केलेला एक अफलातून प्रयोग आपण पुढे बघणार आहोत. रागाधारित स्वर घ्यायचे पण रागाला बाजूला सारायचे, असले अत्यंत प्रशंसनीय कौशल्य या गाण्यातून आपल्याला बघता येते. 
गाणे, गायकी ढंगाने सुरु होते, स्वरविस्ताराच्या शक्यता जाणवतात पण तरी स्वरांचा जो "ठेहराव" आहे, तो अतिशय सुंदर आहे. थोडे तांत्रिक भाषेत मांडतो. पहिलीच ओळ आपण इथे उदाहरण म्हणून बघूया. "रैना बीती जाये, शाम ना आये" आता, गाण्याच्या संदर्भात मांडायचे झाल्यास, आपल्याला खालीलप्रमाणे स्वरावली मांडता येते. रचनेत "मध्यम" स्वर किती प्रभाव टाकतो, हेच आपल्याला यातून जाणून घेता येईल. तसे बघायला गेलो तर, "गुजरी तोडी" रागात "शुद्ध मध्यम" स्वराला स्थान नाही पण तरीही "रैना" शब्द या स्वरांनी सुगंधित होऊन ऐकायला मिळतो.  हीच तर खरी खासियत संगीतकार म्हणून सांगता येते. वर्जित स्वर देखील रचनेत उपयोगात आणून रचनेची श्रीमंती वाढवता येते. 

रैना बीती जा__ये         शाम ना आ ये 
मम  रेरे   ग __मम     म    धमे  म 

रैना  बीती जा__ये 
गमम रेरे   गममेध 

खरतर सुरवातीची जी दीर्घ आलापी आहे तिथे आपल्याला "गुजरी तोडी"रागाची ओळख पटते. "कोमल नि,ध,रे" असा प्रवास करीत "तीव्र मध्यम" स्वरावर जेंव्हा आलाप किंचित विश्रांती घेतो तिथे हा राग सिद्ध होतो. हा प्रकार जरा तांत्रिक आहे आहे पण सूर आणि त्याचे चलन समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. अगदी स्पष्ट मांडायचे झाल्यास स्वरावली केवळ रचनेचे अंतर्गत रूप दाखवते परंतु त्याचा नेमका अविष्कार हा नेहमीच प्रत्यक्ष सादरीकरणातून आपल्या समोर येतो हेच खरे. 
गाण्याचे शब्द जरा बारकाईने वाचले तर सहज ध्यानात येईल, रचनेवर मीराबाईच्या शब्दकळेचा प्रभाव आहे तसेच शब्दकळा समजायला अजिबात अवघड नाही. अर्थात मीराबाईच्या रचनेत जो समर्पण भाव ओतप्रोत भरलेला असतो, त्याची काहीशी वानवा दिसते. तसे बघायला गेले तर कोठीवरील गाण्यातील शब्दकळा ही बरेचवेळा ठुमरी अंगाने शृंगारिक असते आणि स्वररचना देखील त्याच धाटणीची असते. संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन यांनी, या प्रघाताला पूर्णपणे फाटा दिला आहे. गायकी वळणाची चाल आहे पण त्याला अतिशय बंदिस्त स्वरूप बहाल केले आहे. 
आणखी एक बाब इथे मुख्यत्वेकरून मांडायला हवी गाण्यातील तालाचे स्थान आणि चलन. हिंदी चित्रपट गीतांत, तालाच्या बाबतीत आमुलाग्र बदल जर कुणी घडवून आणला असेल तर तो याच संगीतकाराने. परंपरेपासून दूर जायचे पण तरीही एका विविक्षित क्षणी परंपरेकडे वळून बघायचे!! या गाण्यात ही जाणीव प्रकर्षाने आढळते. 
तालाच्या मात्रांमध्ये बदल अशक्य परंतु त्या मात्रा वापरताना, बरेचवेळा न स्वरी वाद्यांतून तालाच्या मात्रांना भरीवपणा प्रदान करायची खासियत या संगीतकाराचे खास वैशिष्ट्य मानावेच लागेल. इथे sound ही कल्पना ध्यानात घ्यावी लागेल. विशेषत: एकेकाळी स्वरवाद्य म्हणून प्रचलित असलेल्या गिटार वाद्याला तालवाद्य म्हणून प्रमुख स्थान देऊन, या वाद्याची नव्याने ओळख करून द्यायची!! 
गाण्यात बहुतेकवेळा ऐकायला मिळणारा "केरवा" ताल आहे पण ताल बारकाईने ऐकायला गेल्यास, ८ मात्रांच्या या तालाची शेवटची मात्रा या गाण्यात कशी घेतली आहे, हे ऐकणे म्हणजे समृद्ध अनुभव आहे. किंबहुना सगळ्या मात्रांचे सादरीकरण, हाच अभ्यासाचा भाग आहे. 

"शाम को भूला, श्याम का वादा 
संग दिये के जागे राधा"

गाण्याची सुरवात जरी "गुजरी तोडी" रागाच्या आधाराने केली असली तरी पहिला अंतरा घेताना, संगीतकाराने "खमाज" रागाचे स्वर घेतले आहेत!! कमाल झाली. गाणे मध्यरात्र कलत असतानाच्या प्रहरी सादर होत असताना, सुरवात गुजरी तोडी रागाने करायची तर अंतरा खमाज रागाच्या आधाराने करायची!! इथेच संगीतकाराचे बौद्धिक कौशल्य तर दिसतेच परंतु त्याचबरोबर अंतरा वेगळ्या रागात सादर करताना, गाण्याचे स्वरूप कुठेही डागाळत नाही, याची योग्य ती काळजी घेण्याची खासियत दिसते. किंबहुना, इथे खमाज राग आहे, हेच प्रथमक्षणी अजिबात ध्यानात येत नाही. अशा प्रकारे स्वररचना "वळवून" घेण्याची किमया खास या संगीतकाराची असेच म्हणायला लागेल.  

बिरहा की मारी प्रेमदिवानी 
तन मन प्यासा, अन्खियो में पानी"

या ओळीत "बिरहा", "प्रेमदिवानी" सारखे शब्द वापरून, मीरेच्या रचनेची आठवण करून दिली आहे. या ओळीत लताबाईंची खास गायकी दिसते. शब्दांची पारख असली म्हणजे गायन किती प्रभावी होते, याचे सुंदर उदाहरण इथे ऐकायला मिळते. शब्दातील आशय किती गहिरा करता येतो हे समजण्यासाठी, "तन मन प्यासा, अन्खियो में पानी" या ओळीचे सादरीकरण ऐकावे. ओळ किंचित वरच्या पट्टीत घेत असताना, कुठेही अक्षर तोडलेले नाही तसेच शब्दातील भावनांचा परिपोष योग्य प्रकारे मांडलेला आहे. मघाशी मी "खमाज" रागाच्या सुरांची आठवण करून दिली, त्या सुरांची या ओळीच्या संदर्भात नव्याने ओळख करून घेता येईल आणि "अन्खियो में पानी" गाताना परत मूळ चालीशी कसे जोडून घेतले आहे, हे समजून घेणे, हा बौद्धिक आयाम आहे. 
गाण्यात वाद्यमेळ म्हणावा तर संतूर,बासरी, बेस गिटार इतपतच वाद्ये आहेत पण प्रत्येक वाद्यातून रचना अधिकाधिक भरीव होत गेली आहे. राहुल देव बर्मन यांनी केवळ तालाच्या बाबतीत प्रयोग केले,हे म्हणणे तसे अर्धवट ठरेल. पारंपारिक वाद्यातून देखील असामान्य रसाचा परिपोष निर्माण करून त्यांनी आपला परंपरेचा अभ्यास किती खोल आहे, हे देखील या गाण्याद्वारे दाखवून दिले आहे आणि असे करताना पुन्हा वाद्यमेळाचे पारंपारिक साचे बाजूला सारून, रचनेची नव्याने ओळख करून दिली आहे. 
राहुल देव बर्मन यांच्या विषयी थोडे सारांशाने. तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधी परिणाम साधणे, ही या संगीतकाराचे आद्य ध्येय म्हणता येईल. म्हणूनच तारतेच्या ध्वनीपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सोपा करून घेतला. विशिष्ट रागचौकटीपासून दूर जाउन देखील रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती आणि या गाण्यात आपल्याला हेच वैशिष्ट्य बघायला मिळते. त्यांनी संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. यामुळेच हे गाणे आपल्याला आज इतकी वर्षे झाली तरी टवटवीत वाटते.

https://www.youtube.com/watch?v=RRk9pG5Upe4