मराठी भावगीत प्रांगणात अशी असंख्य गाणी तयार झाली ज्या गाण्यांत काहीही "बौद्धिक" नाही, काहीही प्रयोगशील नाही पण तरीही निव्वळ साधेपणाने त्या रचनांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः आकाशवाणीवर "भावसरगम" कार्यक्रम सुरु झाला आणि अनेक विस्मरणात गेलेल्या कवींच्या शब्दरचना असोत किंवा अडगळीत गेलेले संगीतकार असोत किंवा बाजूला पडलेल्या गायक/गायिका असोत, अनेक कलाकारांना अपरिमित संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्या संधीचे काहीवेळा सोने केले. ललित संगीतात रचना करताना, नेहमीच अभूतपूर्व काही घडते असे अपवादानेच घडते, खरेतर कुठल्याही कलेच्या क्षेत्राला हे विधान लागू पडते. असामान्य असे नेहमीच तुरळक असते तरीही निव्वळ साधेपणाचा गोडवा देखील तितकाच विलोभनीय असतो. यात एक गंमत असते, बहुतेक तथाकथित चोखंदळ रसिकांना वाटते, ज्या रचनेत काही "बुद्धिगम्य" नाही ती रचना टुकार असते!! जणू काही साधी, सोपी रचना करणे हे सहजसाध्य असते. खरंच तसे आहे का?
आजचे आपले गाणे असेच साधे, सरळ गाणे आहे. कविता मधुकर जोशी यांची आहे. कविता नीट वाचली तर त्यात काही अगम्य नाही. किंबहुना, "धरतीच्या कलशात" सारखी थोडी सरधोपट प्रतिमा आहे. विरहणीची व्याकुळता आहे, प्रियकराची वाट बघणे आहे पण तसे दर्शविताना शब्दकळेत काहीही नावीन्य नाही किंवा शाब्दिक चमत्कृती नाही. वाचायला मिळतो तो केवळ आणि केवळ थेटपणा. थोडा विचार केला तर ललित संगीतातील कवितेत असा "थेटपणा" असणे एकादृष्टीने चांगलेच असते. रसिकांचे सगळे लक्ष हे स्वराकृतीकडे लागते. मुळात, प्रत्येक कलाकृतीत काहीतरी "वेगळेपण" असावे हा अट्टाहास का असतो? "कमळमिठीमध्ये भृंग भेटता" ही कालिदासांची कल्पना पण तरीही इथे चपखल बसली आहे. यात नावीन्य तसे काहीही नाही परंतु प्रत्येक गाण्याच्या चालीचा स्वतंत्र असा "मीटर" असतो आणि त्यानुरूप कविता असावी, असे संगीतकाराला नेहमी वाटत असते आणि इथे तसेच झाले आहे. आशय म्हणून बघायला गेल्यास, पावसाच्या धारांनी निर्माण झालेल्या वातावरणात, आपल्या प्रियकराने आपल्या जवळ असावे, ही भावना मांडली आहे पण त्याचबरोबर पावसाने सतत बरसत रहावे अशी अपेक्षाव्यक्त केली आहे!! हा थोडा विरोधाभास वाटतो. प्रियकर आल्यावर पावसाने संततधार धारावी, जेणेकरून प्रियकर परत जाणार नाही, हे म्हणणे योग्य आहे.
संगीतकार दशरथ पुजारी हे नाव मराठी भावगीत संगीतात मान्यताप्राप्त झालेले नाव. जे मत कवितेबाबत मांडले आहे तेच मत स्वररचनेबाबत मांडता येते. ओठांवर सहज रुळणाऱ्या चाली या संगीतकाराने निर्माण केल्या. "सारंग" रागावर आधारीत स्वररचना आहे.खरतर रागाचे स्वर फक्त आधाराला घेतले आहेत. स्वरचनेचा विचार करायचा झाल्यास, "प्रियाविण उदास वाटे रात" ही ओळ मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. मुखड्याची पहिली ओळ काहीशी आनंदी स्वरांत आहे पण लगेच दुसऱ्या ओळीतील उदासवाणा भाव तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने घेतलेला आहे. तसेच पुढील रचना ऐकताना " आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात " ही ओळ स्वरांत मांडताना, "अंधारात" शब्द तितक्याच आर्ततेने घेतला आहे. ललित संगीत हे असेच खुलत जाते. वाद्यमेळ प्रामुख्याने बासरी आणि सतार या वाद्यांनी खुलवला आहे. अंतरे मात्र मुखड्याच्या स्वररचनेला समांतर असे बांधले आहेत पण एकूणच चालीची जातकुळी बघता ती तशीच असणे योग्य वाटते. या संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांच्या रचनांचे खास लक्षण असे की त्यात वाद्यरंग आकर्षक असतात. सर्वसाधारणतः वाद्यरंगात भिडलेले आणि काहीशी द्रुत लय पसंत करणारे, मुख्यतः वाद्यवृंदाच्या व गतिमान लयबंधांच्या साहाय्याने गीताची उभारणी करतात. संगीतकार आपल्या रचनेचा जाणीवपूर्वक असा रोख ठेवतात की रचना निदान काही प्रमाणात तरी सुरावटीकडे झुकलेली असावी. याचा एक परिणाम असा झाला,त्यांच्या रचनांचे मुखडे कायम लक्षात राहतात. मी वरती, "अंतरे समान बांधणीचे बांधले आहेत", या विधानाला वरील विवेचन पूरक आहे. त्यामुळे गीत साधे असले तरी त्याची खूण मनात रेंगाळत राहते. यामधून एक नक्की सिद्ध होते, या संगीतकाराने "आपण काही नवीन देत आहोत" असला आव कधीही आणला नाही. साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. अर्थात भारतीय संगीतपरंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित असतो आणि त्याची सांगीतिक गरज अशाच रचनांतून भागू शकते.
अगदी स्पष्टपणे मांडायचे झाल्यास, या गाण्यावर गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा निर्विवाद हक्क पोहोचतो. सुरेल आणि स्वच्छ गायकी तसेच श्रोत्यांपर्यंत स्वररचना थेटपणे पोहोचवण्याची हातोटी ही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. मुळात आवाजात कुठेही कसल्याच प्रकारचा भडकपणा नसल्याने, गायनात एकप्रकारची शालीनता नेहमी डोकावते. संयत अभिव्यक्ती, हे तर या गायिकेचे वैशिष्ट्य म्हणता येईल आणि प्रस्तुत रचना बघता, अशाच गायनाची आवश्यकता होती. याचाच परिणाम या गायनातून विस्तीर्ण असा भावपट धुंडाळता येतो. अर्थात असे असूनही ही गायिका प्रामुख्याने मराठी भावसंगीतापुरतीच सीमित राहिली, हे दुर्दैवच म्हणायला हवे.
रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात
बरस बरस तू मेघा रिमझिम
आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात
प्रासादी या जिवलग येता
कमळमिठीमध्ये भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात
मेघा असशी तू आकाशी
वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती नयने करती नित बरसात
No comments:
Post a Comment