Saturday, 10 August 2019

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

मी जेंव्हा प्रस्तुत सदर लिहायचे ठरवले तेंव्हा अर्थातच मराठी गाणी, हाच विषय ठरला होता आणि त्या हिशेबात, मराठी भावगीते हाच केंद्रबिंदू ठरावाला होता. अर्थात, मराठी चित्रपट गीते संपूर्णपणे वगळायची असा निश्चित हेतू नव्हता परंतु शक्यतो मराठी खाजगी भावगीते हाच प्राधान्यक्रम निश्चित केला होता. चित्रपट गीते विचारात घेतली म्हणजे मग, निव्वळ गाणे हाच प्रधान हेतू राहात नाही तर गाण्याचे चित्रीकरण, पडद्यावरील अभिनय, चित्रपटाची कथा इत्यादी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात आणि मग लेखाची लांबी पसरट होणार. त्यामुळेच या सदरात चित्रपट गीते तुरळकपणे घेतली आहेत. असे असून देखील आज मी असेच अतिशय सुंदर असे चित्रपटगीत विचारात घेत आहे. "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गाणे म्हणजे मुळात कवी आरतीप्रभू यांची सत्यकथेत आलेली कविता आहे. नंतर "नक्षत्रांचे देणे" या नावाने त्यांच्या कवितांचा संग्रह आला आणि पुढे संगीतकार भास्कर चंदावरकरांच्या ही कविता वाचनात आली.  "सामना" चित्रपटात, एक पार्श्वगीत म्हणून चपखल बसली. 
खरेतर आरतीप्रभू हे कधीही चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे कवी नव्हते, त्यांचा तसा पिंडच नव्हता. अतिशय मनस्वी कलाकार म्हणून ख्यातकीर्त असल्याने फार कुणी संगीतकार त्यासारख्या वाटेला गेले नाहीत. एक कविता म्हणून वाचायला गेल्यास, या कवितेवर दीर्घ निबंध लिहावा लागेल, अशा वकुबाची कविता आहे. नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. कवितेचा आशय अगदी स्पष्ट आहे, आयुष्यातील अत्यंत निराशावस्थेतील अभिव्यक्ती आहे, अगदी टोकाची वाटावी अशीच आहे आणि त्यासाठी, "दिवे विझून जाणे" किंवा "वृक्ष झडत जाणे" अशा अगदी वेगळ्या आपल्याला सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा वापरल्या आहेत. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणिवेची प्रतीती देते आणि ती देताना वाचक काहीसा झपाटला जातो. "कोण देते हळी, त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे" या सारखी विलक्षण ताकदीची ओळ खरेतर चित्रपट गीतांसाठी अजिबात योग्य नाही. बहुदा म्हणूनच हे गाणे चित्रपटात पार्श्वगीत म्हणून वापरले असणार. 
संगीतकार भास्कर चंदावरकर हे मुळातले सतार वादक, पंडित रविशंकर यांचे गंडाबंध शिष्य. अर्थात रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास तरीही विशेषतः पाश्चात्य संगीताकडे अधिक ओढा दिसून येतो. विशेषतः "सिंफनी" संगीताचा अधिक बारकाईने अभ्यास केलेला आढळतो. आता या गाण्यापुरता विचार केल्यास, सुरवातीच्या व्हायोलिन आणि मेंडोलिन वाद्यांच्या सुरावटीतून याची प्रचिती घेता येते. अर्थात त्याकाळच्या एकूणच सगळ्या संगीत रचना बघता, अशा प्रकारे वाद्यमेळ रचणे, हा नवीन प्रयोगच होता. गाण्याची चाल देखील कवितेच्या आशयाशी पूर्णपणे तद्रूप झालेली आढळेल. तालाला तबला आणि पाश्चात्य बोन्गो ही तालवाद्ये आहेत. गाण्यात २ अंतरे आहेत आणि त्याची समान तत्वावर बांधणी केली आहे. गाण्यातील ताल फार सुंदर वापरला आहे. मुखडा किंवा अंतरा संपताना, शेवटची "मात्रा" विशेष वजनाने घेतली असल्याने त्याला एक वेगळेच वजन प्राप्त होते. तसेच दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, व्हायोलिनवरील एक छोटी "गत" चालू असताना आणि संपत असताना त्यात ज्याप्रकारे स्वरांची "वळणे" घेतली आहेत, तशा प्रकारचा स्वराकाश मराठीत फारच अभावानेच  ऐकायला मिळतो. मघाशी मी पाश्चात्य संगीताचा उल्लेख केला तो इथे नेमकेपणाने ऐकायला मिळतो. खरेतर हे एकप्रकारे "फ्युजन" म्हणता येईल परंतु अंधपणा नव्हे. एक  नक्की,या गाण्याने मराठीत एक नवीन " पायवाट" निर्माण झाली. 
गायक रवींद्र साठे यांची ठाम ओळख या गाण्याने झाली असे म्हटले तर फार चुकीचे ठरू नये. आपल्या नावावर एखादी तरी अशी स्वररचना असावी तिथे त्याच्यावर आपली नाममुद्रा कायम स्वरूपी उमटलेली असावी, असे स्वप्न बऱ्याच जणांचे असते. अर्थात असे  होणे,ही दीर्घ कारकिर्दीच्या दृष्टीने मर्यादा देखील होऊ शकते. स्वच्छ, गंभीर प्रकृतीचा गळा तसेच तिन्ही सप्तकात वावर करण्याची क्षमता ही खास वैशिष्ट्ये मांडता येतील. याच गाण्यापुरते लिहायचे झाल्यास, पहिल्या अंतऱ्यातील तिसरी ओळ - "जीवनाशी घेती पैजा घोकून, घोकून" एकदम वरच्या स्वरांत घेतली आहे. तोपर्यंत गायन हे खालच्या पट्टीत चाललेले आहे. असे एकदम वरच्या पट्टीत सहजपणे आवाज  लावणे,हे कौशल्याचेच काम आहे. तिथे जाताना आवाज कुठेही चिरकत नाही तर तसाच स्वच्छ, निर्मळ लागतो. दुर्दैव असे इतक्या अवघड लयीचे गाणे यशस्वी गाउनही, आज त्यांच्या नावावर फार काही रचना दिसत नाहीत. ललित संगीतात एक नवा मानदंड या रचनेने निर्माण केला आणि तो यशस्वीपणे रुजवला, हेच खरेतर या गाण्याचे मोठे यश आहे. 


कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे 

कशासाठी उतरावे तंबू ठोकून 
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून ? 
जगतात येथे कोणी मनात कुजून !
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ?

दीप सारे जाती येथे विरून, विझून 
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून 
जीवनाशी घेती पैजा घोकून, घोकून 
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे !

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी 
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी 
कोण देते हळी, त्याचा पडे बळी आधी 
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे



6 comments: