Friday, 2 August 2019

मग माझा जीव

सर्वसाधारणपणे उर्दू भाषिक गझला या बऱ्याच प्रमाणात प्रायोगिक असतात म्हणजे,  एखाद्या कलाकाराची, मग ती अति प्रसिद्ध चाल असली तरी देखील, दुसरा कलाकार आपल्या मगदुराप्रमाणे वेगळ्या चालीत तीच गझल सादर करीत असतो. काहीवेळा तर संपूर्ण वेगळी स्वररचना तयार केली जाते. हातात असलेल्या शायरीचा भावार्थ वेगळेपणाने टिपून, नवी चाल निर्माण करणे, बरेचवेळा घडत असते. त्यामानाने मराठीत असे फारसे घडत नाही. काही रचना अपवाद आहेत पण एकूणच प्रमाण अपवादस्तरावरच आहे. आजचे आपले गाणे असेच अपवाद म्हणून गणले जाईल. 
सुरेश भटांच्या या कवितेला प्रथम संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी लताबाईंच्या स्वरबद्ध केले आहे. पुढे हीच कविता, प्रसिद्ध कवी सुधीर मोघ्यांनी वाचली आणि त्यांनी याच कवितेला नव्याने चाल लावली आणि श्रीकांत पारगावकरांकडून गाऊन घेतली. या चालीच्या निमित्ताने कवी सुधीर मोघे, संगीतकार म्हणून अधिक प्रकाशात आले. प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या बहुसंख्य कविता या "गीत" तत्वावर आधारित लिहिलेल्या असतात. कविता वाचतानाच त्यातील "लयीची" कल्पना येते. आजच्या मुक्तछंदाच्या काळात, छंदोबद्ध कविता काहीशी मागे पडली आहे. खरतर "मराठी गझलकार" म्हणून सुरेश भट यांचे नाव प्रसिद्ध झाले असले तरी "गझल" छंदांव्यतिरिक्त इतर छंदात देखील त्यांनी बऱ्याच अनुपमेय कविता केल्या आहेत. प्रस्तुत कविता ही गज़लेच्याच वजनात तरीही भावगीत स्वरूपात लिहिलेली कविता आहे. सुरेश भटांच्या कवितेत शब्द हे नेहमीच फार चोखंदळ वृत्तीने अवतरतात, काहीशा भोगवादाच्या अर्थाने येतात. शब्द नेहमीच्याच परिचयातले असतात परंतु ज्याप्रमाणे उर्दू शायरीत बरेचवेळा अचानक चमकदार प्रकारे शब्द समोर येतात आणि आशयाची उलटापालट होते आणि वाचणारा काहीसा चमकतो, तेच तत्व सुरेश भटांच्या कवितेत आढळते. "वाटेवर वणवणेल", "ज्योतीसह थरथरेल" किंवा "अंगणात टपटपेल" इत्यादी शब्दजोड स्वतंत्रपणे कुठेही अगम्य नाहीत परंतु एकत्रितपणे वाचायला मिळतात, तेंव्हा आपल्याला नव्या अनुभूतीची जाणीव होते. खरतर मुळातली कविता अजून दीर्घ आहे परंतु ललित संगीताचा आकृतिबंध हा मर्यादित असल्याने संगीतकार नेहमीच अशावेळी त्याला अधिक भावणाऱ्या ओळींची निवड करतो - तशी निवड करावीच लागते. 
सुधीर मोघे हे नाव मराठी कलेच्या प्रांगणात प्रामुख्याने "कवी" म्हणून ख्यातकीर्त आहे. "पक्षांचे ठसे" पासून अनेक वर्षे सुधीर मोघे हे कविता लिहीत होते. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात छंदोबद्ध कविता करणाऱ्या मोजक्या कवींपैकी हे नाव एक नाव होते. अर्थात कवी म्हणून नाममुद्रा झाली तरी संगीताचे पायाभूत शिक्षण न घेता, त्यांनी संगीत क्षेत्रात थोडीफार मुशाफिरी केली. "माझे मन तुझे झाले" सारखी रम्य स्वररचना त्यांच्या नावावर आहे आणि त्याच "यमन" रागात त्यांनी ही आणखी एक रचना सादर केली आहे. "यमन" राग कसा सगळ्या संगीतकारांना भारून टाकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. मुळात कविताच इतकी अप्रतिम आहे की त्याला स्वरबद्ध  करताना, वाद्यमेळाचा भरमसाट उपयोग करण्याची आवश्यकताच वाटत नाही. तालवाद्य म्हणून "तबला" तर स्वरवाद्य म्हणून प्रामुख्याने "बासरी" वापरली आहे. जेंव्हा एखादा कवी संगीतकाराच्या भूमिकेत शिरतो तेंव्हा अर्थाने अर्थानुकूल स्वररचना आपल्या समोर येणार, याचा अंदाज करता येतो. रचनाकाराच्या दृष्टीने बघायला गेल्यास, तिसरा अंतरा "जेंव्हा रात्री कुशीत" सारखी शब्दकळा येते तिथे स्वररचना वेगळी केल्याचे ध्यानात येते. अर्थात, रात्रीचा समय आणि कुशीत येणे अशी प्रणयानुकूल अवस्था लक्षात  घेता,चाल एकदम हळुवार होते. स्पष्टच लिहायचे झाल्यास, मुखड्याची चाल आणि हा अंतरा यात फरक फरक पडला आहे पण आशय व्यक्त होण्यात कुठेही किंतु निर्माण होत नाही.  
चाल म्हणून स्वतंत्रपणे ऐकली तर साधी, सरळ आणि सोपी आहे . कुठेही गुंतागुंतीच्या रचना ऐकायला मिळत नाहीत पण त्याची फारशी जरुरीची भासत नाही. गुंतागुंतीची स्वररचना करणे, हे एक सर्जनशीलतेचे लक्षण मानायला हवे पण आवश्यक मानदंड नव्हे. आपल्याकडे हा एक विचार अधिक प्रबळ आहे (कारण नसताना) चाल अवघड असेल तरच ती बुद्धीगामी म्हणावी. याचाच वेगळा अर्थ असा मांडता येईल, या टीकाकारांना साधी चाल बांधणे किती अवघड असते, याचा अवकाश कळलेला नसतो. 
श्रीकांत पारगावकर यांचा गायक म्हणून विचार करताना, अत्यंत सुरेल गळा, छोट्या हरकती अचूकपणे घेण्याचे कसब इत्यादी बाबी लक्षात येतात. थोडक्यात ललित संगीताला आवश्यक असा गळा आहे परंतु लोकप्रियतेच्या स्पर्धेत मागे पडला आहे. शक्यतो मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात गायचे, असा विचार दिसतो. इथे काहीशा हळव्या आठवणीतील रचनेत असा गळा शोभून दिसतो. तारता पल्ला फार विस्तृत नाही फार तर दीड सप्तक एकाचवेळी घ्यायची, इतपतच रेंज दिसते पण कुठेही चाचपडणे नाही. सलग हरकत घेणे अवघड जात नाही. असे असून देखील नाव का मागे पडले? हा प्रश्नच आहे. 

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल ! 
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

सहज कधी तू घरात; 
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेंव्हा तू नाहशील 
दर्पणात पाहशील 
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेंव्हा रात्री कुशीत,
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल !

मग सुटेल मंद, मंद 
वासंतिक पवन धुंद ;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !


No comments:

Post a Comment