Thursday, 1 August 2019

हे शामसुंदरा राजसा

आपल्या भारतीय संगीतात ज्या ६ अत्यंत महत्वाच्या "कोटी" आहेत त्यातील "कलासंगीत" आणि "जनसंगीत" यांना सर्वाधिक लोकाश्रय लाभला आहे. त्यातही "जनसंगीत" अधिक लोकप्रिय आहे. एका बाजूने असे म्हणता येईल, जनसंगीतावर कलासंगीताचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. अर्थात, यातूनच पुढे मग ललित संगीत गायनासाठी रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास जरुरीचा  असतो, हा विचार पुढे आला आणि सर्वमान्य झाला. थोडे बारकाईने अभ्यासले तर असे समजून घेता येईल, रागदारी संगीत शिकावे पण सखोल रियाझ आवश्यक नसतो आणि याचे कारण त्या गायकीत दडलेले आहे. रागदारी संगीत गायन हे स्वराभिमुख असल्याने, शब्दांना नेहमीच गौण स्थान प्राप्त होते व इथेच ललित संगीत आणि रागदारी संगीत यातील ढोबळ फरक ध्यानात येऊ शकतो. 
रागदारी संगीताच्या सततच्या रियाझाने गायकाचा गळा "जड" होतो आणि ललित  संगीताला तशी फारशी आवश्यकता नसते. ललित संगीताची सौंदर्यस्थळे ही काव्य, स्वररचना (फार तर ३,४ मिनिटांची) आणि ललित गायन या त्रयीवर आधारलेली असतात. याचाच दुसरा परिणाम असा होतो, जेंव्हा शास्त्रीय संगीताचे गायक ललित  संगीताकडे वळतात तेंव्हा काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात, जसे शब्दोच्चार किंवा गायन पद्धत वगैरे. बरेच शास्त्रीय गायक जेंव्हा ललित संगीत गायन करतात तेंव्हा शब्दोच्चाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आणि ते खडबडीत शब्दोच्चार तसेच ठेऊन (त्याबाबत फार काही सुधारणा अशक्य होत असावी!!) रचना आपल्या समोर येते. अशा वेळेस म्हणावेसे वाटते, इथे भावसंगीताच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. आणि याच मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर आपण "हे शामसुंदरा राजसा" या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. गाण्याची चाल ही "परज बहार" अशा जोड रागावर आधारलेली आहे. अनवट रागांचा भावसंगीतात उपयोग करून भावसंगीत रागदारी संगीताच्या जवळ आणायचे, हाच बरेचवेळा संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांचा उद्देश दिसतो. खरंतर, ललित संगीताधारे संपूर्ण राग कधीची कवेत येऊ शकत नाही परंतु जरी पूर्णावकाश अशक्य असला तरी रागाची ढोबळ ओळख करून देता येणे शक्य असते आणि इथे संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकर लक्षात राहतात. 
ही रचना उघडपणे "आधी चाल मग शब्द" या पद्धतीवर आधारलेली आहे. चालीचा आकृतिबंध मनात ठसवून, मग त्याच्यावर शब्दकळा आकारणे, ही नेहमीच crafting स्वरूपाची सर्जनशीलता म्हणता येईल. अर्थात अशा प्रकारे कविता लिहिणे हे बरेचवेळा आव्हान असते. वास्तविक शांताबाई शेळके या मुळातल्या सिद्धहस्त कवियत्री असल्याने, चालीवर शब्दरचना करताना,त्यात "कवित्व" सांभाळणे आवश्यक असते. कवितेची रचना थोडी "बंदिश" सदृश आहे परंतु "पानजाळी सळसळे का ? भिवविती रे लाख शंका !"  या ओळींतून कविता, भावकवितेकडे वळते. राधेची कृष्णाला केलेली विनवणी मांडताना, "पानांची सळसळ" आणि त्या आवाजाने मनात उभी राहणारी भीती तसेच त्यावेळी आजूबाजूला कुणीही नसणे, ही भावव्याकुळ अवस्था कवितेला अजिबात नवीन नाही परंतु निसर्गध्वनींतून तो प्रत्यय देणे, सुरेखपणे उमटले आहे. 
वर म्हटल्याप्रमाणे इथे रागदारी बंदिश हाताशी असल्याने, चालीचा आराखडा तयार करणे सहजशक्य झाले असावे. बंदिशींवरून गाणे तयार करताना, हा संगीतकार शक्यतो बंदिशींची पुनर्बांधणी करत नाही. अशी पुनर्बांधणी करणे, हे देखील सर्जनशीलतेचे एक लक्षण आहे. अर्थात हा पिंडधर्म असतो. त्यामुळे अंतरे बांधताना देखील मुखड्याचीच चाल कायम ठेवली आहे. तंबोऱ्याच्या रुणझुणत्या सुरांनी गाण्याची सुरवात होती आणि लगेच मुखडा सुरु होतो. साधा रूपक ताल आहे. वाद्यमेळ फारसा नाही, बासरी प्रमुख आहे गाण्याच्या पार्श्वभागी देखील तंबोऱ्याचेच सूर आहेत त्यामुळे कधीकधी भावगीत न वाटता, रागातली बंदिश असल्याचा भास होतो.  
गायिका किशोरी आमोणकर आहेत आणि मी वर म्हटल्याप्रमाणे, रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास केल्याची प्रखर जाणीव या गाण्याच्या गायनातून दृग्गोचर होते. रागदारी संगीताची तालीम मिळाल्याने काही शब्दोच्चार खटकू शकतात जसे, पहिल्या अंतऱ्यात "विनवुनी सांगते तुज" गाताना "विनवुनी" या शब्दातून "विनवणी" ही भावना यायला हवी पण तशी येत नाही आणि याचे कारण, पहिली ओळ गाताना जो सूर लावला आहे, जी लय पकडली आहे त्याला अनुसरूनच गायकी यायला भाग पडते अन्यथा चालीचा डोलाराच कोसळला असता. "विनवुनी" शब्दावर वजन द्यायची गरज नव्हती आणि तसे वजन दिल्याने त्या शब्दोच्चाराला "दटावणी"चे स्वरूप आले. कविता वाचल्यावर राधेची कृष्णाला केलेली आळवणी आहे. ही आळवणी, भावव्याकुळ व्हायला हवी. असाच प्रकार पुढील अंतरे गाताना थोड्याफार प्रमाणात झाला आहे. ललित संगीतात "हरकती", "छोट्या ताना" यातूनच सौंदयवृद्धी करायची असते. "गायकी" मांडण्यासाठी तुम्हाला रागदारी संगीताचे विशाल क्षेत्र उपलब्ध आहे. दुसऱ्या अंतऱ्याच्या शेवटच्या ओळीत "राहिले इथे थबकुनी" मधील "थबकणे" पुरेसे व्यक्त झालेच नाही. 
असे असूनही हे गाणे इतके लोकप्रिय झाले याचे कारण चालीचा अवीट गोडवा आणि अप्रतिम लयकारी. अर्थात हे गाणे ऐकून, किती रसिक "परज बहार" या अनवट रागाच्या वाटेला जातील याबाबत शंकाच आहे. एक बुद्धीगामी गाणे म्हणूनच या गाण्याचे वर्णन करता येईल. 

हे शामसुंदरा राजसा, मनमोहना 
विनवुनी सांगते तुज  
जाऊ दे मला परतुनी!

गाव गोकुळ दूर राहे 
दूर यमुनानीर वाहे 
हरवले मी कसे मज 
चालले कुठे घनवनी ?

पावरीचा सूर भिडला 
मजसी माझा विसर पडला 
नकळत पाऊले मम 
राहिली इथे थबकूनी !

पानजाळी सळसळे का ? 
भिवविती रे लाख शंका !
थरथरे , बावरे मन 
संगती सखी नच कुणी !


No comments:

Post a Comment