Tuesday, 14 May 2019

एकनाथ सोलकर

१९७१ ची इंग्लंडमधील भारत/इंग्लंड मधील ओव्हल मैदानावरील सामना. चंद्रशेखरचा "जादुई" हात करामत दाखवत होता आणि इंग्लंडचे  जवळपास हतबल झाले होते. खेळपट्टीवर इंग्लंडचा विकेटकीपर अॅलन नॉट आला होता - इंग्लंडचे शेवटचे आशास्थान, विशेषतः अॅलन नॉटची unorthodox फलंदाजी नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी असायची, सामना एकहाती फिरवण्याची किमया साधून जाणारी अलौकिक कला अॅलन नॉटकडे होती. चंद्रशेखरने आपली गोलंदाजी सुरु केली, एक चेंडू अचानक उसळला आणि गरकन फिरला (हे तर चंद्रशेखरचे खास वैशिष्ट्य - चेंडूचा वेग आणि अचानक फिरणारी फिरकी)!! अॅलन नॉट किंचित भांबावला आणि त्याच्या ग्लोव्हजला चेंडूचा किंचित स्पर्श झाला आणि चेंडू लेग साईडला थोडासा उडाला आणि मैदानावर आश्चर्य घडले. जो झेल केवळ स्वप्नावस्थेत देखील अशक्य वाटत होता, तो झेल फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील सोलकरने जमिनीसमांतर शरीर झोकून झेल पकडला!! प्रेक्षक तर अवाक झालेच परंतु भारतीय संघातील इतर खेळाडू आणि खुद्द अॅलन नॉटचे डोळे विस्फारले. निव्वळ अचाट क्षेत्ररक्षणाचा अलौकिक आविष्कार होता. मुळात हा झेल नव्हताच परंतु एकनाथने त्याचे झेलात रूपांतर केले. नसलेले झेल पकडणे, त्याचे रूपांतर करणे, यामुळे आजही एकनाथ सोलकर हा फॉरवर्ड शॉर्ट लेगचा "बादशहा" समजला जातो. एखाद्या फलंदाजांची किंवा गोलंदाजांची दहशत वाटणे, क्रिकेटमध्ये नेहमीच आढळते परंतु फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर उभा आहे, ही वास्तवता फलंदाजाच्या काळजात धडकी भरवणारी होती. 
सडपातळ बांधा, शेलाटी उंची, अत्यंत लवचिक शरीर आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊनच एकनाथ सोलकर जन्माला आला होता. मंदगती तसेच मध्यमगती गोलंदाजी, कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची मानसिक तयारी आणि खरे सांगायचे तर "फॉरवर्ड शॉर्ट लेग" ही क्षेत्ररक्षणाची जागा त्यानेच जगद्विख्यात केली. अगदी नेमके सांगायचे झाल्यास, क्रिकेट पुस्तकाच्या दृष्टीने सोलकर फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या जागेपेक्षा थोडा १,२ इंच पुढेच उभा राहायचा!! जे प्रत्यक्ष क्रिकेट खेळले आहेत, त्यांना या विधानातील दाहकता समजून घेता येईल. सर्वसाधारणपणे, कुठलाही फलंदाज हा लेगकडे फटाके खेळण्यात वाकबगार असतो आणि तिथेच ही जागा अधिक धोकादायक असते पण सोलकरने याची कधीच पर्वा केली नाही आणि बेडरपणे तिथे उभा राहून, निव्वळ अशक्यप्राय वाटणारे झेल घेऊन, संघाला नेहमीच प्रचंड मोठे योगदान दिले. 
एकनाथच्या शरीरात हाडे आहेत का? असला कौतुकमिश्रित प्रश्न आम्ही मित्र एकमेकांना  विचारत असू. वास्तविक त्याची मध्यमगती गोलंदाजी ही कामचलाऊ अशीच होती पण तरीही त्याने इंग्लंडच्या बॉयकॉटला गोंधळात टाकले. बहुदा इंग्लंडमधील हवामान एकनाथच्या मदतीला येत असणार परंतु सोलकर अप्रतिम मंदगती गोलंदाजी टाकायचा. त्यावेळी भारतीय संघात जगप्रसिद्ध त्रिकुट असल्याने त्याला फार वेळा संधी मिळाली नाही परंतु टाइम्स शिल्ड किंवा रणजी सामन्यातून सोलकर आपल्या मंदगती गोलंदाजीचा दर्जा दाखवून द्यायचा. त्यावेळी टाइम्स शिल्ड मध्ये मफतलाल आणि स्टेट बँक हे संघ अतिशय नावाजलेले संघ होते. मफतलाल मधून सोलकर तर स्टेट बँकेतून वाडेकर खेळायचे आणि त्यांचे द्वंद्व बघणे, आमच्या सारख्या तरुण मुलांना पर्वणी असायची. त्यावेळी, मॅच सुरु होण्याआधी मैदानावर थोडा वेळ नेट प्रॅक्टिस चालायची आणि मी अगदी जवळून ती प्रॅक्टिस बघत असे. एकदा, मफतलाल आणि स्टेट बँक असा सामना सुरु होता. सकाळची नेट प्रॅक्टिस सुरु होती. एकनाथने स्पिन गोलंदाजी सुरु केली. मी नेटच्या पाठीच उभा होतो. फलंदाज कोण होता, ते आता आठवत नाही पण सोलकरने एक चेंडू  टाकताना,मनगट शर्टाच्या मागे लपवून उलटे फिरवले (कसे केले हे आजही मला अगम्यच आहे) आणि चेंडू  डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या दृष्टीने ऑफ स्पिन केला होता, मनगटाची हालचाल तशीच होती पण अखेरच्या क्षणी, त्याने फ्लिपर टाकला ( तो फ्लिपर होता हे नंतर कळले) आणि फलंदाज गोंधळला!! तो कधी बाद झाला, ते त्यालाच कळले नाही. दिसले ते फक्त एकीच्या (त्याला सगळेजण "एकी" या नावानेच हाक मारायचे) चेहऱ्यावरील निर्मळ हास्य. पुढे सामना सुरु झाल्यावर वाडेकर फलंदाजीसाठी आला आणि त्याला एकीने तसाच चेंडू टाकला आणि वाडेकर फसला. स्लिपमध्ये झेल दिला आणि बाद झाला. वास्तविक स्पिन गोलंदाजी खेळण्यात वाडेकर दादा माणूस होता पण सोलकरने त्याला चुटकीसरशी उडवला!! सामना एकहाती मफतलाल संघाला जिंकवून दिला. 
एकी मुंबई संघाचा खऱ्याअर्थी आधारस्तंभ होता. हा खेळाडू कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असायचा. कसोटी सामन्यात एकदा तर सलामीला उतरलेला होता. आत्मविश्वास अंगात ठासून भरलेला होता म्हणूनच हेल्मेट नसलेल्या काळात देखील फॉरवर्ड शॉर्ट लेग सारख्या जागेवर बिनधास्त वावरायचा. चंद्रशेखरच्या अकल्पित गोलंदाजीवर झेल पकडणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. म्हणूनच आजही सोलकर, वाडेकर आणि वेंकट हे स्लिप आणि फॉरवर्ड शॉर्ट लेग मधील असामान्य क्षेत्ररक्षक मानले जातात. (यात विकेटकीपर म्हणून किरमाणीचे नाव घ्यायलाच लागेल) त्यावेळी मुंबई संघात, Caught Solkar Bowled Shivalkar हे वाक्य मुंबईत चलनी  नाण्यासारखे प्रसिद्ध होते. 
एकनाथ सोलकर हा मी पाहिलेला पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याला अथ पासून इथी पर्यंत बघितलेला आहे. त्याकाळी मी, एका क्लबमधून खेळत असे. आठवड्यातील ५ दिवस मी कॉलेज करीत होतो आणि शनिवार/रविवार मी आणि इतरजण, आमच्या घराच्या पाठीमागील ५ मैदानांवर (ग्रॅण्ट, विल्सन, हिंदू, इस्लाम आणि पारसी असे लोकप्रिय जिमखाने आजही आहेत) प्रॅक्टिस करीत असू. बरेचवेळा हिंदू जिमखान्याच्या खेळपट्टीलगत खेळत असू. विशेषतः रविवारी सकाळी सोलकर हिंदू जिमखान्यावर यायचा आणि आमचा खेळ बघत असे. क्वचित कधी एखाद, दुसरा शब्द बोलत असे. वास्तविक आम्ही खेळत असू, तेंव्हा सोलकर निवृत्त झालेला होता पण तरीही इतका मोठा खेळाडू, आमचा खेळ बघत आहे, याचेच अप्रूप आम्हा सगळ्यांना वाटत असे. मी शाळेत  असताना,त्यावेळी क्रिकेट खेळाडूंच्या फोटोंची चिकट वही केली होती.  सोलकरच्या अलौकिक झेलांच्या फोटोंनी ती वही भरलेली होती. त्यावेळी देखील मला फार नवल वाटायचे, हा माणूस असे अशक्यप्राय झेल कसे काय पकडू शकतो? सुनील गावस्करने एकेठिकाणी स्पष्ट लिहिले आहे,  बेदी,प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट यांनी मिळवलेल्या बळींमध्ये सोलकरचा वाटा तितकाच महत्वाचा आहे. नसलेले झेल  पकडून, सोलकरने प्रतिस्पर्धी संघाच्या मनात निव्वळ दहशत बसवली होती. एका क्षेत्ररक्षकाने अशी जरब बसवणारे खेळाडू तसे फार विरळाच असतात, पुढे जॉन्टी ऱ्होड्सने ती परंपरा पुढे चालवली होती. 
सोलकर तसा धडाकेबाज फलंदाज होता परंतु वाडेकर प्रमाणे बहुदा त्याला देखील शतक झळकवायचे म्हणजे दडपण यायचे. नव्वदीपर्यंत हे फलंदाज दादागिरी करायचे पण शतक जवळ आले की "फोबिया"!! मला वाटते, १९७५ च्या मुंबईतील सामन्यात सोलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव शतक झळकावले होते. तो सामना मला आजही आठवत आहे (लॉइडने भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा केला होता) शतक येईपर्यंत सोलकर दिमाखात खेळत होता पण नव्वदीत पोहोचल्यावर स्वारी गडबडायला लागली. अक्षरश: कुंथत त्याने शतक पूर्ण केले. असे असले तरी सोलकर हा सोलकर होता. आजही कुणी अप्रतिम झेल पकडला तर सोलकरची आठवण येते. 
एक प्रसंग आठवत आहे. भारतात वेस्टइंडीज विरुद्ध सामना चालू होता. सोलकर त्यावेळी राखीव खेळाडू म्हणून संघात होता. क्षेत्ररक्षण करताना. काही कारणपरत्वे सोलकर मैदानावर अवतरला आणि त्याला त्याच्या नेहमीच्या जागी - फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे केले. परंतु त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या लॉइडने त्याला हरकत घेतली (अशी हरकत घेता येते, याचाच पत्ता नव्हता, आता नियम बदलला आहे) आणि सोलकरला स्क्वेयर लेगला उभे केले. गमतीचा भाग म्हणजे तिथे देखील सोलकरने जमिनीसमांतर झेप टाकून लॉइडचाच झेल पकडला - लॉइड थक्क. पुढे लॉइडने प्रांजळपणे कबूल केले, सोलकर इथे देखील तितकाच असामान्य क्षेत्ररक्षक असेल याची कल्पना केली नव्हती आणि सोलकरचे मनापासून कौतुक केले. केव्हढा हा मोठा सन्मान म्हणायला हवा. सोलकरने अशी दहशत पसरवली होती . 
आजही फॉरवर्ड शॉर्ट लेग या जागेवरील अनभिषिक्त सम्राट म्हणून एकनाथ सोलकर ओळखला जातो. 
image.png

image.png

No comments:

Post a Comment