आपल्या भारतीय लोकसंगीतात प्रचंड वैविध्य आहे आणि थोडे बारकाईने ऐकल्यास त्यात बरेचवेळा साद्ध्यर्म्य आढळून येते. लोकसंगीताचा जनक कोण? हा प्रश्न कायम अधांतरीच राहणार पण लोकसंगीताने आयुष्यात रंग आणले, हे वास्तव नाकारणे कठीण. याचा परिणाम असा झाला, विशेषतः ललित संगीताच्या अनुरोधाने बोलायचे झाल्यास, स्वररचनेत बरेचवेळा विलक्षण सरमिसळ दिसते, वैविध्य ऐकायला मिळते. प्रत्येक राज्याच्या लोकसंगीताचे ठराविक, खास असे साचे असतात आणि बहुतांशी रचना त्या साच्यातच बनवलेल्या असतात. आता आपले लोकसंगीत असल्याने त्याबाबत सर्जनशीलतेच्या अंगाने कुणी फारशी तक्रार करीत नाही. सगळेच संगीतकार लोकसंगीताचा कायम आधार घेत आले आहेत, काहीजण त्यात वेगवेगळे प्रयोग करून, तेच लोकसंगीत नव्याने पेश करतात पण आधारभूत साचा तोच असतो. दुसऱ्या राज्यातील लोकसंगीताचा आधार घेऊन, स्वररचना बांधणे, हे काही नवीन नाही. सगळ्या भाषेत अशी देवाण-घेवाण चालूच असते. सुदैवाने भारतातील लोकसंगीत प्रचंड वैपुल्याने भरलेले आहे. प्रत्येकाचं घाट वेगळा, ताल वाद्ये वेगळी, स्वरबंध वेगळे आणि लयीचे बंध वेगळे. त्यामुळे पारंपरिक लोकसंगीतात जेंव्हा वेगळ्याच राज्याची एखादी लोकप्रिय धून किंवा आराखडा घेऊन, स्वररचना अवतरते तेंव्हा ऐकायला देखील खूपच नावीन्य मिळते. आजचे गाणे "अंतरंगी तो प्रभाती, छेडितो स्वरबासरी" हे गाणे अशाच नाविन्याने नटलेले आहे. गाण्याची स्वररचना ऐकली तर लगेच समजून घेता येते, चाल गुजरातमधील काठियावाड/ सौराष्ट्र या भागातील लोकसंगीतावर आधारित आहे. गाण्याचा ठेका आणि रचना त्याच लोकसंगीतावर आधारित आहे.
गाण्याची शब्दरचना गुरुनाथ शेणई यांची आहे. शब्दरचनेवरून जाणता येते, रचना भक्तिमार्गी आहे. कृष्ण हा जसा उत्तर भारतातला तसाच आणि तितकाच राजस्थान/गुजरात भागात गणला जातो. मला तर नेहमी प्रश्न पडतो, जर का आपल्या भारतीय संस्कृतीत कृष्ण, गवळणी, राधा वगैरे मंडळी नसती तर संस्कृतीचे काय स्वरूप राहिले असते? कवितेत कृष्णाचेच गुणवर्णन आहे आणि त्यादृष्टीनेच सगळी कविता लिहिली आहे. कवितेतील रुपके, उपमा आपल्या नेहमीच्याच परिचयाच्या आहेत. सलग, सोपी अशी शब्दकळा असून, रचना गेयताबद्ध आहे. जिथे "खटका" हवा किंवा ओळ संपायला हवी, तिथेच संपली आहे. ललित संगीताच्या दृष्टीने हे फार महत्वाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. संगीतकार जेंव्हा चाल बांधतो तेंव्हा शब्द हे स्वरिक लयीला बाधक असता कामा नयेत. स्वरलयीचा स्वतःचा असा एक "मीटर" असतो आणि त्यामध्येच रचना बांधणे गरजेचे असते. त्यामुळेच सगळ्या आविष्काराला एक देखणे स्वरूप प्राप्त होते.
अंतरंगी तो प्रभाती, छेडितो स्वरबासरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी
या रचनेचा संगीतकार मधुकर गोळवलकर आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे चालीचा उगम हा सौराष्ट्र इथल्या लोकसंगीतात आढळतो. मधुकर गोळवलकर यांची कारकीर्द प्रामुख्याने गाजली ती "जयोस्तुते" या गाण्याने परंतु एकूणच सगळी कारकीर्द झाकोळलेली राहिली. का? या प्रश्नाला उत्तर नाही. मुळातले तार शहनाई वादक, पुढे सारंगी या वाद्यावर प्रभुत्व मिळवले. अर्थात शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण. सतारीच्या सुरांनी गाण्याची सुरवात होते, पुढे बासरीचे स्वर मिसळतात आणि मिश्र काफी रागाच्या सावलीत चाल बांधलेली आहे, याचा थोडा अंदाज येतो. मुखडा दोन वेगवेगळ्या लयीत समोर येतो. सुरवातीची पहिली ओळ ठाय लायोत आहे पण तीच पळ परत घेताना एकदम दुगणीत लय जाते तसेच तालाची गती दुप्पट होते. ज्यांना कुणाला गुजरात इथल्या लोकसंगीताची ओळख असेल त्यांना ही खूण लगेच ध्यानात येईल. खरतर सगळी रचना याच तत्वाने बांधली आहे.
डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी
पाहती देहात कोणी थोर साधक उन्मनी
सानुल्या बिंदुपरीं तो नांदतो संताघरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी
गाण्याचे २ अंतरे आहेत पण अंतरा बांधताना, संगीतकाराने सुरावट मुखड्याशी मिळती जुळती ठेवली आहे. लोकसंगीताचा एक विशेष असा असतो, तालवाद्ये फार जोरकसपणे वाजत असतात आणि तालाच्या मात्रांवर गाणे तोलले जाते. अंतरा जरी सम पातळीवर ठेवला असला तरी संगीतकाराने काही सुंदर हरकती दिल्या आहेत जसे "डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी" ही ओळ गाताना, उठावण थोडी वेगळ्या सुरांवर आहे, छोटीशी हरकत घेतली आहे. तसेच पुढे "सानुल्या बिंदुपरीं तो नांदतो संताघरी" ही ओळ वरच्या सुरांत घेत, परत लय वाढवलेली आहे. ही धाटणी नेमकी गुजरातमधील लोकसंगीताचीच आहे. वाद्यमेळ आणि त्याची रचना ही तशीच ठेवलेली आहे, थोडक्यात पुनरावृत्त ठेवलेली आहे.
भावना भिजल्याभरांनी आश्रय नयनीं दाटले
अस्तिकाचे गीत गाता सार उमजे त्यातले
सर्वसाक्षी शाम माझा राहतो हृदयांतरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी
गायक म्हणून जयवंत कुलकर्णी हे प्रामुख्याने गाजले ते दादा कोंडक्यांचा आवाज म्हणून आणि तीच त्यांची बव्हंशी ओळख राहिली आहे पण हे गाणे ऐकल्यावर तशी ओळख असणे किती एकांगी आहे, हे ध्यानात येईल. काहीसा "खडा" आवाज परंतु लवचिकता रचनेनुसार आणलेली आढळते.आवाज स्वच्छ आहे, ध्वनीचा पाळला फार विस्तृत नाही पण वरचे सूर परिणामकारकपणे घेतले जातात. या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास, लोकसंगीताला आवाज नेहमीच खडा लागतो आणि जितका तार सप्तकात गाऊ शकेल, तितका तो आवाज प्रभावी ठरतो. इथे जयवंत कुलकर्णी यांचा आवाज सुरेल तर आहेच पण जोरकस देखील आहे.
ही रचना ऐकताना, जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजाची मोहिनी रसिकांच्या मनावर निश्चित पडते आणि झालेली प्रसिद्ध ओळख किती तुटपुंजी आहे, हे लक्षात येते.
No comments:
Post a Comment