Thursday, 30 May 2019

अलका देसाई

आपला गृप स्थिरस्थावर होण्याच्या काळात, सुरवातीला बरीचशी नावे अनोळखी होती. बरे, फोटो बघून ओळखणे फारच दुरापास्त होते. मी ज्यांना प्रत्यक्ष ओळखत होतो, त्यांचे चेहरे देखील बरेच बदललेले होते तिथे अनोळखी चेहऱ्यांबद्दल काय बोलायचे. अशा वेळेस, मी संजीव तांबेला फोन केला होता आणि त्याच्याकडून काही ओळखी निघतात का? अशी पृच्छा केली. त्यावेळी माझ्या कानावर अलकाचे नाव आले आणि सर्वात गमतीचा भाग म्हणजे इयत्ता पहिलीपासून, संजीव, मी, अलका, नेत्रा अशी काही नावे चिकित्सक शाळेत एकत्र होतो. अनिल थक्क!! इतकी जुनी ओळख असून चेहरा अजिबात परिचित वाटत नव्हता, किंबहुना कसलीच ओळखीची खूण डोळ्यासमोर येत नव्हती. नेत्रामध्ये केसाचा भाग सोडला तर फारसा फरक पडला नव्हता आणि नेत्रा तेंव्हा शाळेतील  खेळांमध्ये नेहमीच सहभागी असायची म्हणून ओळख होती. अर्थात पुढे पिकनिकमध्ये प्रत्यक्ष भेट झाली पण त्याआधी फोनवर बोलाचाली सुरु झाल्या होत्या. 
एक इथे मान्यच करायला हवे, सुरवातीला मी अलकाशी थोडा जपूनच बोलत होतो आणि ती देखील जशास तसे बोलत असायची. बरेचवेळा तिची खिल्ली उडवावी,असे मनात यायचे पण "प्रथमाग्रासे मक्षिकापात:" नको म्हणून तोंड आवरायचो. असे बरेच दिवस चालू होते आणि आमची संवादाची गाडी जेमतेम उपचारापुरतीच चालायची. एकदा मी प्राचीशी फोनवर बोलताना अलकाचा विषय काढला आणि तिच्याशी बोलताना, औपचारिकपणा फार आड येतो असे बोललो. हे ऐकल्यावर "जाऊबाई" लगेच तिची बाजू घेऊन, बोलायला लागल्या!! अलका फार मजेशीर बोलते, हसरी आहे वगैरे मुक्ताफळे बोलताना उधळली. आता एक पुणेकर दुसऱ्या पुणेकराची बाजू घेणारच - हा सांस्कृतिक प्रभाव आहे म्हणा!! खरतर पिकनिकमध्ये देखील मी अलकाशी फार बोलल्याचे आठवत नाही त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुढे असाच कधीतरी फोन केल्यावर मी थोडा खवचटपणा केला आणि पलीकडून सणसणीत उत्तर आले!! अनिलचा श्वास हलका झाला. मनात आले, पक्की "पुणेकरीण" दिसत आहे. एकीचा अनुभव घेतच होतो आणि तिच्या जोडीला दुसरी खमकी पुणेकरीण आली. 
एक मात्र नक्की, आजही अलका माझ्याबरोबर पहिली पासून चिकित्सकमध्ये होती, हे चित्र काही पुरेसे स्पष्ट झालेले नाही. मला नेहमी जशास तसे, ही प्रवृत्ती भावते आणि मी ते सुख उपभोगतो. उगीच मी बरा, तू बरा, असले शिळोप्याच्या शिळे बोलणे फारसे पचनी पडत नाही. दोन ठोश्याना निदान एक तरी ठोसा द्यावा, ही माझी वृत्ती. हळूहळू "मूळा-मुठेचे" पाणी जाणवायला लागले. अर्थात गेली जवळपास ३०, ३५ वर्षे पुण्याला राहिल्यावर वाण नाही तरी गुण लागणारच म्हणा. त्यातून कुणी खमक्या पुणेकर भेटला की मला मनापासून आनंद होतो. इथे तर दोन दोन पुणेकर!! पुणेकरांचे तिरकस बोलणे अलकाच्या बोलण्यात नेहमी येते कदाचित मी देखील तसाच बोलतो म्हणून अलका बोलत असेल. तशी ती खळखळून हसणाऱ्यातली नाही. फोनवर हसली तर कान  देऊन ऐकायला लागते!! 
मला तिचा काही बाबतीत फार हेवा वाटतो. अलकाला कधीही फोन करा, एकतर तिच्या घरी कुणीतरी जेवायला आलेले असते किंवा ती तरी कुणाकडे जेवायला जात असते!! सतत दुसऱ्याला जेवायला घालण्यात तिला विलक्षण आनंद मिळतो अर्थात अस्मादिकांचा यात अजून नंबर लागलेला नाही कारण जेंव्हा केंव्हा मी पुण्याला जातो तेंव्हा ही कुठेतरी जेवणाच्या कार्यक्रमात गुंतलेली असते किंवा घरात पाहुणे आलेले असतात. गेले वर्षभर माझ्या पुण्याच्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्या आहेत पण प्रत्येक फेरीत, फोन केल्यावर बाईसाहेबांच्या घरी कुणी आलेले नाही, असे झालेच नाही!! एकदा मी तिला फोनवर बोललो देखील, "पुणेकरआगत स्वागत करताना हात राखून ठेवतात का?" माझा स्वभाव बघता तिने सावध व्हायला पाहिजे पण गफलतीने बाईसाहेब बोलून गेल्या - मी कधी रे हात राखून वागते? मला हेच उत्तर अपेक्षित होते आणि  "मग,एका खमक्या मुंबईकराला अजूनही आमंत्रण मिळत नाही, याचा नेमका कसा अर्थ घ्यायचा?" इथे बाईसाहेब थोड्या वरमल्या. खरे तर हा मला आश्चर्याचा धक्काच होता. अस्सल पुणेकर आणि इतक्या लगेच गप्प!! मग लक्षात आले, अलका पुणेकर असली तरी जन्मस्थान मुंबई!! मातीचा म्हणून काही गुण असतोच की. वास्तविक ती स्वतःला पुणेकरच म्हणवून घेते - म्हणवून घेणारच, सासर पुण्याचे म्हटल्यावर कुठेतरी लळा लागणारच!! एक नक्की, पुणेकर आणि मुंबईकर अशी तुलना करणे आणि एकमेकांना टोमणे मारणे, हा आमच्या संभाषणातील निखळ आनंद आहे. इतक्या लोकांचे स्वागत करणारी अलका, तिच्या घरी मात्र मी एकदाच गेलो होतो पण जेवायला नाही!! 
आज साठीला आलेली असताना देखील अलकाची फिरायला जाण्याची इच्छा मात्र जबरदस्त आहे. सारखे कुठेतरी फिरायला जात असते. तशा आमच्या साध्या विषयांवर देखील गप्पा होतात पण हे उद्मेखूनपणे सांगावे लागते कारण गप्पांची अखेर कुठल्यातरी टोमण्यानेच होते. चैनच पडत नाही. आमचा तसा एकमेकांना दर आठवड्याला फोन होतो मुख्य म्हणजे पुणेकर असून ती मला फोन करते!! बाब थोडी अविश्वसनीय आहे पण विश्वास ठेवावा अशी आहे - जन्मस्थान मुंबई असल्याचा हा पुरावा म्हणायचा का? वरती मी उल्लेख केला तसे तिला पण मी शाळेतला अनिल असा आठवत नाही ( हे मात्र फार छान !!) आणखी एक बाब, मी लिहिलेल्या बहुतेक लेखांवर ती प्रतिक्रिया देत असते!! हा मैत्रीचा खरा गैरफायदा आहे पण ती उत्तर पाठवते. इतर पुणेकरांनी काहीतरी शिकण्यासारखे आहे अर्थात मुंबईकरांना देखील हेच वाक्य लागू होते म्हणा. अलका गात नाही (हे भाग्य म्हणायचे का?) पण तिला बरीच गाणी पाठ आहेत आणि ती जेंव्हा मला उत्तर पाठवते त्यावरून ध्यानात येते. 
 असो, आजही समजा माझा फोन झाला नाही तर "का फोन केला नाहीस?' असा फोन देखील तिचा येतो. कधी माझी तब्येत बिघडली असेल तर तिच्या बोलण्यात काळजी उमटते. 
मैत्रीच्या नात्यात या पेक्षा अधिक काही अपेक्षा ठेवू नये.  

No comments:

Post a Comment