खरंतर प्रणय भावना आणि प्रणय कविता, याला तसा अंत नाही, विशेषतः ललित संगीताचा विषय घेतला तर बहुतांशी कविता या प्रणय कवितेशी येऊन थांबतात. त्यामुळे त्यात साचेबद्धपणा येणे क्रमप्राप्तच ठरते, ढोबळ अभिव्यक्ती तर सहजच व्यक्त होते आणि उथळ रचना वाचायला मिळणे, हे भागदेय ठरते. प्रणयात एका ठराविक मर्यादेपर्यंत नावीन्य आणता येते किंवा असे म्हणता येईल, प्रतिमा उपमा किंवा इत्यादी अलंकारांना मर्यादेचा बराच मोठा काच सहन करावा लागतो. त्यातून मग, पुनर्वाचनाने शिळेपणा जाणवण्याची शक्यता अधिक. मुळात, ललित संगीतातील काव्याला, सुरांचा "मीटर" सांभाळणे अत्यावश्यक ठरते. ती त्याची पहिली अट असते. एक नक्की मान्यच करायला हवे, कुठल्याही संगीत आविष्कारात शब्द हा घटक तसा परकाच असतो मग ललित संगीतातून होणारी अभिव्यक्ती कितीही सक्षम असली तरी.
आजचे आपले गाणे या म्हणण्याला पुष्टी देणारे आहे. "पहिलीच भेट झाली" हे मराठीतील अतिशय प्रसिद्ध असे प्रणयी थाटाचे गीत आहे आणि कविता म्हणून आस्वाद घेताना, त्याच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवून देणारे आहे. "भावकविता" म्हणून विचारात घेता, कवितेतील प्रतिमा सगळ्या तशा सरधोपट, नेहमीच्या वापरातल्या आहेत. "राधा", " नाचतात मोर" किंवा "अंगातून सतारी" या प्रतिमा, प्रतिमा म्हणून काही खास नाहीत किंवा आत्तापर्यंत असंख्यवेळा असंख्य कवितेतून वाचायला मिळालेल्या आहेत. पहिल्या दोन ओळींतून कवितेचा भावार्थ स्पष्ट होतो. अर्थात, ललित संगीतातील काव्याची ही एक मर्यादा असते - इथे मोजक्याच प्रतिमा आणि अभिव्यक्ती शक्य असते. गाण्याच्या शेवटच्या ओळीत - "ताऱ्यात वाचतो अन या प्रीतीची कहाणी" इथे "अन" या शब्दाची खरंच गरज होती का? परंतु स्वरिक लय सांभाळणे गरजेचे असल्याने हा शब्द वापरला आहे अन्यथा या शब्दातून वेगळे काहीही सांगितले जात नाही. तेंव्हा ललित संगीतातील काव्याचा आस्वाद घेताना या मर्यादा लक्षात ठेऊनच आस्वाद घेणे आवश्यक ठरते.
पाडगांवकरांची कविता या सगळ्याचे सम्यक भान ठेऊन आशय व्यक्त करते. मुळात, संगीतकाराचा आशय ध्यानात घेऊन कविता घडवली जाते. अर्थात असे करताना,आशय शिळा होऊ नये, याची काळजी घेते. "अपूर्व बाधा" - जागेपणात राधा" अशी जोड घालताना, या शब्दांनी आधीच्या भावनेची पूर्ती होईल, याची काळजी घेतली जाते आणि असे करताना कुठेही शाब्दिक लय बिघडत नाही, हे महत्वाचे. गाणे हे युगुलगीत आहे तेंव्हा कवितेतील प्रत्येक कडवे हे त्या भूमिकेला धरूनच बांधले आहे आणि अर्थातच त्यातून जे म्हणणे मांडले जाते, त्याची पूर्तता होते. इथेच मंगेश पाडगांवकर वेगळे दिसतात. ओळ संपवायच्या आधी त्या भावनेची पूर्वसूचना देतात आणि मगच शेवट करताना ती भावना पूर्ण व्यक्त होते आणि असे करताना, स्वरिक लय कुठेही अडखळत नाही.
संगीतकार श्रीनिवास खळे हे नेहमीच शब्दांना प्राधान्य देऊन चाल बांधणाऱ्या पंथाचे संगीतकार, परिणामी चाल बांधताना त्यातील आशय कुठेही गुदमरणार नाही किंवा आशयाचा संकोच होणार नाही, याची वाजवी काळजी घेणारे संगीतकार. रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने चालीचा बंध तयार करताना, कुठेतरी रागदारी संगीताचा स्पर्श नेहमीच दिलेला असतोखळे काकांच्या चाली काहीशा संथ असतात पण लयीच्या अंगाने बघायला गेल्यास त्यात अनेक अवघड वळणे असतात मग ती एखादी हरकत असेल किंवा कुठे छोटी तान असेल. विशेषतः ओळीच्या मध्येच एखाद्या शब्दावर हरकत घेऊन तीच चाल फार अवघड करून टाकण्याचे त्यांचे कसब असामान्य दर्जाचे होते. "पहिलीच भेट झाली" हे मुखड्यातील शब्द आणि पहिला अंतरा घेताना हेच शब्द "पहिलीच भेट झाली" येतात परंतु अंतरा पार वेगळ्या स्तरावर सुरु होतो, किंचित वरच्या सूरांत घेतला जातो पण अंतरा संपता पुन्हा ज्या प्रकारे मुखड्याकडे वळवला जातो, हे अवलोकणे बुद्धिनिष्ठ आहे. तसेच आणखी एक उदाहरण बघताना, "डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर" या ओळीतील स्वप्नावस्था दाखवताना, सुरांचे तितकेच हळवेपण विलोभनीय आहे. प्रणयी भावना आहे आणि ती दर्शविताना सोज्वळ, सालस ऋजुता पण दाखवली आहे. खरंतर प्रत्येक अंतऱ्यासाठी वेगळी स्वररचना करणे, हा सर्जनशीलतेचा अपूर्व असा सोहळा असतो.
अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गाताना हाच भाव कायम राखला आहे. कुठेही "गायकी" दाखवलेली नाही. मुळात गाण्याची चाल इतकी गोड, मधुर आहे की त्यात आणखी भर टाकायची आवश्यकताच नाही. चाल हळूहळू दुगणित जाते पण तरीही तालाच्या मात्रा कसलाच अधिकार दाखवत नाहीत. खरतर आयुष्यात गायनाच्या जितक्या संधी मिळाल्या त्यापेक्षा अधिक संधी मिळायला हव्या होत्या,अशा ताकदीचा गळा सुमन कल्याणपूर यांना लाभला आहे. निकोप, स्वच्छ, दाणेदार आणि सहजपणे निमुळता होत जाणारा आवाज. काही गाण्यांच्या बाबतीत लताबाईंच्या तोडीसतोड गायन करण्याची क्षमता दाखवली पण दुर्दैवाने फक्त मराठी भावगीतांपुरतीच ओळख राहिली.
अरुण दात्यांच्या सुरवातीच्या काळात, त्यांच्यावर तलत मेहमूद यांचा प्रभाव होता पण सुदैवाने तो प्रभाव लवकरच पुसला गेला आणि त्यांना स्वतःची गायकी सापडली. कुठेही आवाज न पिचता वरच्या पट्टीत सहज गाऊ शकणार गळा तरीही खालच्या पट्टीत अधिक खुलणारा.
तेंव्हा अशा या गाण्याच्या बाबतीत गाण्याचे सगळे घटक तुल्यबळ असल्याचे दिसते. असे भाग्य फार थोड्या गाण्यांच्या बाबतीत लाभते.
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न राहिले मी, किमया अशी कुणाची?
डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची
लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्नेही मिलनाची
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यात वाचतो अन या प्रीतीची कहाणी
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
No comments:
Post a Comment