Friday, 31 May 2019

नीला लाड

नीलाची आणि माझी ओळख म्हटले तर शाळेपासून आहे. माझा धाकटा भाऊ, राजू शाळेच्या नाटकांतून नेहमी कामे करीत असे आणि त्या गृपमध्ये नीला होती. नीलाचे नाटकातील काम मात्र आता आठवत नाही (तिला तरी आठवत असेल काय?) त्यानिमित्ताने नीला घरी यायला लागली. खरतर नीला आमच्यापेक्षा माझ्या आई-वडिलांशीच जास्त गप्पा मारायची. मी त्यावेळी "बाळू" होतो. मुलींशी बोलायचे!! बापरे!! या पार्श्वभूमीवर मी घरी आलेल्या नीलाबरोबर जेव्हड्यास तेव्हडे बोलत असे किंबहुना घरात ज्या गप्पा चालत, त्यात माझा सहभाग नाममात्र असे. त्यावेळी तिच्या भावाशी - सतीशबरोबर माझे मैत्री जमली होती (आजही आहे ). त्यातून शाळेपासून नीलाचा थोडा वचक असायचा. N.C.C.मधून दिल्ली च्या २६ जानेवारीच्या परेडसाठी झालेली निवड आणि त्यामुळे तिचा शाळेत तसा  दबदबा होता - हे इथले सगळे मान्य करतील.आमच्या घरी मात्र नीला फार वेगळी आणि मोकळी असायची ( हे मी आज लिहीत आहे, हे ध्यानात घ्यावे!!) त्यानिमित्ताने आम्ही दोन्ही कुटुंबे त्यावेळी जवळ आलो होतो. नीलाच्या आईबरोबर मात्र मी खूप बोलत असे. तिच्या आंबेवाडीतील घरी मी असंख्यवेळा गेलो असेन. 
पुढे नीला विल्सन कॉलेजमध्ये गेली आणि एकदा सतीशने बातमी आणली - आज विल्सन जिमखान्यावर नीलाची क्रिकेट मॅच आहे!! नीला क्रिकेट देखील खेळते, ही मला "बातमीच" होती. लक्षात घ्या, त्यावेळी Ladies Cricket आजच्यासारखे प्रकाशात आलेले नव्हते. सामन्याचा तपशील आता आठवत नाही. त्यामुळे एकूणच माझ्या मनातील प्रतिमा एकदम वेगळीच झाली. N.C.C. मधील पराक्रम, नाटकात कामे आणि आता क्रिकेट!! ही बया आयुष्यात काय, काय करते याचाच अचंबा होत होता. याच सुमारास तिचे, आताच्या भाषेत लिहायचे झाल्यास  अनिलबरोबर "डेटिंग" सुरु झाले होते ("अनिल" नावाची माणसे किती सहिष्णू, सर्वसमावेशक आणि शांत प्रवृत्तीची असतात, हे इथे काही जणांना नक्कीच मान्य व्हावे!!)  आणि मला वाटतं ग्रॅज्युएट होण्याआधीच नीला बोहल्यावर चढली!! तिच्या लग्नाला गेल्याचे आठवत आहे. पुढे नीला वाशीला राहायला गेली आणि माझ्या भेटी तुरळक झाल्या. कधीतरी गिरगावात येणार तेंव्हा तिच्या घरी पहिल्यांदा जाणे, क्रमप्राप्तच होते. 
नंतर मी देखील परदेशी गेलो आणि जरी ओळख असली तरी भेटी संपल्यातच जमा होत्या. सुटीत जेंव्हा मी घरी यायचो तेंव्हा कशीतरी चर्चगेट स्टेशनसमोरील तिच्या ऑफिसमध्ये भेटायला जात असे. तेंव्हा नीला आजच्यासारखी "वजनदार" झालेली नव्हती. सहज भेट मिळत असे!! मला वाटते, २००३/४ पर्यंत ती या ऑफिसमध्ये होती. अर्थात मी चुकत असेन कारण मी तिला भेटणार ते मी सुटीवर येणार तेंव्हा. पुढे समजले, नोकरीनिमित्ताने ती सिंगापूरला गेली. पुढील वाटचालीतील ही एक महत्वाची पाऊलखुण होती, हे आता समजते. आता ती देखील परदेशी म्हटल्यावर भेट तर दूरच राहिली, निदानपक्षी फोनवरचे बोलणे देखील दुरापास्त झाले. पुढे सतीशबरोबर बोलताना कळले, नीला आता दिल्लीला फार वरच्या पोस्टवर आलेली आहे. तेंव्हा मात्र एकाबाजूने अभिमान तर दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थी दबदबा जाणवला. आपली एक  मैत्रीण,सरकारी खात्यात  पदावर कार्यरत आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब होती/आहे. त्यातून दिल्ली तो  बहोत दूर है, हे मनावर बिंबलेले!! पुढे शाळेचा गृप झाला आणि तिचा फोन नंबर मिळाला. अर्थात एकमेकांच्या कुटुंबांची चौकशी झाली. तिचे नेहमी म्हणणे असायचे ( आता मुंबईत बदली झाली म्हणून "असायचे" हा  शब्द) मी दिल्लीला यावे. इथे मला मुंबई बाहेर पडणे जमत नव्हते तिथे दिल्ली काय जमणार!! 
नीलाचे एका बाबतीत कौतुक करावेसे वाटते, इतक्या वरच्या पदावर काम करीत असताना देखील नीलाचे पाय जमिनीवरच राहिले. मी तर तिला कितीवेळा अडनिड्या वेळी फोन करीत असतो तरी ती फोन उचलते आणि "अनिल, मी मीटिंगमध्ये आहे, काही काम आहे का? नसल्यास नंतर फोन करते" इतपत बोलते आणि खरतर आश्चर्य वाटू नये पण वाटते, पण त्याच दिवशी संध्याकाळी माझा फोन खणखणतो!! मोबाईलवर "नीला लाड" हे नाव झळकते!! बोलायला ती अजूनही तशीच आहे, माझी चेष्टा स्वीकारण्याइतपत समंजस आहे आणि जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा माझे पाय खेचण्याची तयारी देखील दाखवते. इथे आता गृपवर माझे "पंडितजी" हे नाव मला बहुदा कायमचे चिकटलेले आहे. खरतर माझे बारसे झाले तेंव्हा माझ्या आई-वडिलांनी माझे नाव "अनिल" ठेवले आहे , हे आता नव्याने सांगायची वेळ आली आहे. असो, मला तसे कुणी गंभीरपणे स्वीकारतच नाही त्याला कोण काय करणार आणि अशी पाळी आणण्यामध्ये नीलाची भूमिका मध्यवर्ती आहे!! एका बाजूने नीलाचा अभिमान वाटतो आणि तरीही फोनवर बोलताना,  " काय ग नीले" असे बोलण्याचा आनंद घेता येतो. आणखी एक विशेष सांगायचं  राहिला,फोनवर बोलताना नीला आपला मानमरातब सहजपणे बाजूला ठेवते आणि मोठ्या आवाजात हसते. हे जरा नवलच आहे म्हणा पण म्हणूनच ती "नीला लाड" आहे. फक्त गृपतर्फे एकच इच्छा, दिल्लीला होती तेंव्हा गृपमधील कार्यक्रमांना हजर राहणे अशक्य होते पण आता "माहेरी" आली आहेस तर कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला "दर्शन" द्यावे!!

Thursday, 30 May 2019

अलका देसाई

आपला गृप स्थिरस्थावर होण्याच्या काळात, सुरवातीला बरीचशी नावे अनोळखी होती. बरे, फोटो बघून ओळखणे फारच दुरापास्त होते. मी ज्यांना प्रत्यक्ष ओळखत होतो, त्यांचे चेहरे देखील बरेच बदललेले होते तिथे अनोळखी चेहऱ्यांबद्दल काय बोलायचे. अशा वेळेस, मी संजीव तांबेला फोन केला होता आणि त्याच्याकडून काही ओळखी निघतात का? अशी पृच्छा केली. त्यावेळी माझ्या कानावर अलकाचे नाव आले आणि सर्वात गमतीचा भाग म्हणजे इयत्ता पहिलीपासून, संजीव, मी, अलका, नेत्रा अशी काही नावे चिकित्सक शाळेत एकत्र होतो. अनिल थक्क!! इतकी जुनी ओळख असून चेहरा अजिबात परिचित वाटत नव्हता, किंबहुना कसलीच ओळखीची खूण डोळ्यासमोर येत नव्हती. नेत्रामध्ये केसाचा भाग सोडला तर फारसा फरक पडला नव्हता आणि नेत्रा तेंव्हा शाळेतील  खेळांमध्ये नेहमीच सहभागी असायची म्हणून ओळख होती. अर्थात पुढे पिकनिकमध्ये प्रत्यक्ष भेट झाली पण त्याआधी फोनवर बोलाचाली सुरु झाल्या होत्या. 
एक इथे मान्यच करायला हवे, सुरवातीला मी अलकाशी थोडा जपूनच बोलत होतो आणि ती देखील जशास तसे बोलत असायची. बरेचवेळा तिची खिल्ली उडवावी,असे मनात यायचे पण "प्रथमाग्रासे मक्षिकापात:" नको म्हणून तोंड आवरायचो. असे बरेच दिवस चालू होते आणि आमची संवादाची गाडी जेमतेम उपचारापुरतीच चालायची. एकदा मी प्राचीशी फोनवर बोलताना अलकाचा विषय काढला आणि तिच्याशी बोलताना, औपचारिकपणा फार आड येतो असे बोललो. हे ऐकल्यावर "जाऊबाई" लगेच तिची बाजू घेऊन, बोलायला लागल्या!! अलका फार मजेशीर बोलते, हसरी आहे वगैरे मुक्ताफळे बोलताना उधळली. आता एक पुणेकर दुसऱ्या पुणेकराची बाजू घेणारच - हा सांस्कृतिक प्रभाव आहे म्हणा!! खरतर पिकनिकमध्ये देखील मी अलकाशी फार बोलल्याचे आठवत नाही त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुढे असाच कधीतरी फोन केल्यावर मी थोडा खवचटपणा केला आणि पलीकडून सणसणीत उत्तर आले!! अनिलचा श्वास हलका झाला. मनात आले, पक्की "पुणेकरीण" दिसत आहे. एकीचा अनुभव घेतच होतो आणि तिच्या जोडीला दुसरी खमकी पुणेकरीण आली. 
एक मात्र नक्की, आजही अलका माझ्याबरोबर पहिली पासून चिकित्सकमध्ये होती, हे चित्र काही पुरेसे स्पष्ट झालेले नाही. मला नेहमी जशास तसे, ही प्रवृत्ती भावते आणि मी ते सुख उपभोगतो. उगीच मी बरा, तू बरा, असले शिळोप्याच्या शिळे बोलणे फारसे पचनी पडत नाही. दोन ठोश्याना निदान एक तरी ठोसा द्यावा, ही माझी वृत्ती. हळूहळू "मूळा-मुठेचे" पाणी जाणवायला लागले. अर्थात गेली जवळपास ३०, ३५ वर्षे पुण्याला राहिल्यावर वाण नाही तरी गुण लागणारच म्हणा. त्यातून कुणी खमक्या पुणेकर भेटला की मला मनापासून आनंद होतो. इथे तर दोन दोन पुणेकर!! पुणेकरांचे तिरकस बोलणे अलकाच्या बोलण्यात नेहमी येते कदाचित मी देखील तसाच बोलतो म्हणून अलका बोलत असेल. तशी ती खळखळून हसणाऱ्यातली नाही. फोनवर हसली तर कान  देऊन ऐकायला लागते!! 
मला तिचा काही बाबतीत फार हेवा वाटतो. अलकाला कधीही फोन करा, एकतर तिच्या घरी कुणीतरी जेवायला आलेले असते किंवा ती तरी कुणाकडे जेवायला जात असते!! सतत दुसऱ्याला जेवायला घालण्यात तिला विलक्षण आनंद मिळतो अर्थात अस्मादिकांचा यात अजून नंबर लागलेला नाही कारण जेंव्हा केंव्हा मी पुण्याला जातो तेंव्हा ही कुठेतरी जेवणाच्या कार्यक्रमात गुंतलेली असते किंवा घरात पाहुणे आलेले असतात. गेले वर्षभर माझ्या पुण्याच्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्या आहेत पण प्रत्येक फेरीत, फोन केल्यावर बाईसाहेबांच्या घरी कुणी आलेले नाही, असे झालेच नाही!! एकदा मी तिला फोनवर बोललो देखील, "पुणेकरआगत स्वागत करताना हात राखून ठेवतात का?" माझा स्वभाव बघता तिने सावध व्हायला पाहिजे पण गफलतीने बाईसाहेब बोलून गेल्या - मी कधी रे हात राखून वागते? मला हेच उत्तर अपेक्षित होते आणि  "मग,एका खमक्या मुंबईकराला अजूनही आमंत्रण मिळत नाही, याचा नेमका कसा अर्थ घ्यायचा?" इथे बाईसाहेब थोड्या वरमल्या. खरे तर हा मला आश्चर्याचा धक्काच होता. अस्सल पुणेकर आणि इतक्या लगेच गप्प!! मग लक्षात आले, अलका पुणेकर असली तरी जन्मस्थान मुंबई!! मातीचा म्हणून काही गुण असतोच की. वास्तविक ती स्वतःला पुणेकरच म्हणवून घेते - म्हणवून घेणारच, सासर पुण्याचे म्हटल्यावर कुठेतरी लळा लागणारच!! एक नक्की, पुणेकर आणि मुंबईकर अशी तुलना करणे आणि एकमेकांना टोमणे मारणे, हा आमच्या संभाषणातील निखळ आनंद आहे. इतक्या लोकांचे स्वागत करणारी अलका, तिच्या घरी मात्र मी एकदाच गेलो होतो पण जेवायला नाही!! 
आज साठीला आलेली असताना देखील अलकाची फिरायला जाण्याची इच्छा मात्र जबरदस्त आहे. सारखे कुठेतरी फिरायला जात असते. तशा आमच्या साध्या विषयांवर देखील गप्पा होतात पण हे उद्मेखूनपणे सांगावे लागते कारण गप्पांची अखेर कुठल्यातरी टोमण्यानेच होते. चैनच पडत नाही. आमचा तसा एकमेकांना दर आठवड्याला फोन होतो मुख्य म्हणजे पुणेकर असून ती मला फोन करते!! बाब थोडी अविश्वसनीय आहे पण विश्वास ठेवावा अशी आहे - जन्मस्थान मुंबई असल्याचा हा पुरावा म्हणायचा का? वरती मी उल्लेख केला तसे तिला पण मी शाळेतला अनिल असा आठवत नाही ( हे मात्र फार छान !!) आणखी एक बाब, मी लिहिलेल्या बहुतेक लेखांवर ती प्रतिक्रिया देत असते!! हा मैत्रीचा खरा गैरफायदा आहे पण ती उत्तर पाठवते. इतर पुणेकरांनी काहीतरी शिकण्यासारखे आहे अर्थात मुंबईकरांना देखील हेच वाक्य लागू होते म्हणा. अलका गात नाही (हे भाग्य म्हणायचे का?) पण तिला बरीच गाणी पाठ आहेत आणि ती जेंव्हा मला उत्तर पाठवते त्यावरून ध्यानात येते. 
 असो, आजही समजा माझा फोन झाला नाही तर "का फोन केला नाहीस?' असा फोन देखील तिचा येतो. कधी माझी तब्येत बिघडली असेल तर तिच्या बोलण्यात काळजी उमटते. 
मैत्रीच्या नात्यात या पेक्षा अधिक काही अपेक्षा ठेवू नये.  

Wednesday, 29 May 2019

सतीश करंदीकर

वास्तविक एकेकाळी म्हणजे १९८४ ते १९८९ पर्यंत मी आणि सतीश एकाच कंपनीत कामाला होतो - त्यावेळी कंपनीचे नाव B.S.E.S. Limited असे होते. पुढे मी १९८९साली कंपनी सोडली. सतीश मात्र अजूनही त्याचा कंपनीत कामाला आहे. सांगायचं मुद्दा असा, या ५ वर्षांत, एकाच कंपनीत असून आमची एकदाही भेट झाली नव्हती. सतीश तेंव्हा अंधेरीला E.D.P. Department मध्ये होता आणि मी सांताक्रूझला Accounts Dxepartment मध्ये होतो. मला अंधेरीला जायची वेळच कधी नाही. खरतर, सतीश या कंपनीत आहे, हेच मुळी मला २,३ वर्षांनंतर कळले पण भेटीचा योग्य नव्हता, हेच खरे. पुढे मी परदेशी नोकरीसाठी गेलो आणि भारतातले संबंध फारच विरळ व्हायला लागले. 
२००१ मध्ये मी प्रकृती कारणास्तव भारतात आलो आणि जवळपास २ वर्षे राहिलो होतो. सुरवातीला प्रकृतीचेच काही धड नव्हते म्हणून घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. काही महिन्यांनी मी घराबाहेर पडायला लागलो आणि एकदा मी ट्रेनने कुठेतरी जात असताना, सतीश मला त्याच डब्यात भेटला. त्याला आता ही भेट आठवत नसेल - कशाला आठवेल?  अशा भेटी सामान्य लोकंच लक्षात ठेवतात!! असो, तेंव्हा आमचा विषय हा मिलिंद देसाई (आमचा सामायिक मित्र) हाच होता. त्यावेळी मिलिंद  देखील एका त्रासातून जात होता. माझ्या आजाराविषयी मीच बोलायला फारसा उत्सुक नव्हतो त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. 
पुढे मी परत परदेशी गेलो आणि होते ते संबंध देखील गोठले!! त्यानंतर एकदा सुटीवर भारतात आलो होतो, बहुदा २००६ मध्ये आणि काही कामानिमित्ताने गिरगावात फिरत असताना, अचानक सतीश भेटला आणि काही जुजबी विषयावर बोलणे झाले आणि आम्ही दोघेही आपल्या रस्त्याला लागलो. आमची खरी ओळख झाली ती, आपला ग्रुप जुळायला लागला तेंव्हा. एकतर गिरगावात तसे जुने मित्र फारसे कुणी राहिले नव्हते आणि मी त्यासुमारास कायमचा भारतात परतलो होतो. त्यामुळे नित्यनेमाने भेटी व्हायला लागल्या. त्यातून सतीशला भारतीय संगीताची अमाप आवड, हा मुद्दा आम्हाला अधिक जवळ यायला कारणीभूत झाला. अगदी प्रांजळपणे मांडायचे झाल्यास, सतीशने जितके "गाणे" (भारतीय संगीत) ऐकले आहे, त्याच्या निम्म्याने देखील मी ऐकलेले नाही. आजही दरवर्षी डिसेम्बरमध्ये, पंढरीला वारी करावी त्याप्रमाणे हा पुण्याला सवाई गंधर्व महोत्सवाला हजेरी लावतो. मैफिलींना जाण्याबाबतची त्याची चिकाटी वाखाणण्यासारखीच आहे. मी देखील संगीताच्या मैफिलींना जातो पण माझे प्रमाण त्यामानाने अल्पसे आहे. बरेचवेळा सतीश मला फोन करतो आणि एखाद्या कार्यक्रमाची माहिती देतो, माझे तिकीट बुक करतो आणि माझे मैफिलींना जाणे होते. 
किंबहुना, काही  बाबतीत त्याचा उत्साह निव्वळ अफलातून आहे. एक उदाहरण देतो, २०१५ साली मी एका वृत्तपत्रात भारतीय शास्त्रीय संगीतावर साप्ताहिक कॉलम लिहायला लागलो (आणि ते वृत्तपत्र दीड वर्षांत बंद पडले!!). वास्तविक पाहता, माझे लेख म्हणजे काही मूलभूत मुद्द्यांना हात घालून, तांत्रिक दृष्ट्या अभ्यासपूर्ण नव्हते (तसे लिहायला मला आजही आवडेल पण ....) पण आपला एक शाळामित्र एखाद्या पेपरमध्ये लिहीत आहे, याचा त्याला खरा आनंद झाला होता. प्रत्येक आठवड्याला मला न चुकता फोन करायचा आणि कुठल्या रागावर लिहीत आहेस? अशी चौकशी करायचा. आजही मी आणखी एका वृत्तपत्रात साप्ताहिक कॉलम लिहीत आहे आणि आजही त्याचा चौकशीसाठी फोन येतो. त्यानिमित्ताने आमच्या संगीत या विषयावर भरपूर गप्पा होतात, मला काही नवीन सापडते आणि त्याचा मी लेखांत उपयोग करतो. तसे बघितले तर सतीशला शास्त्रात फारसे गम्य नाही पण त्याला सुरेल, कणसूर आणि बेसूर स्वरांची जाण आहे. बरेचवेळा मला लिहायला प्रवृत्त करतो - मी लिहीत असतो पण मी खूप आळशी आहे आणि ते जाणून सतीश मला टोचत असतो. आज माझ्या ब्लॉगवर ३०० पेक्षा अधिक लेख लिहून झाले आहेत म्हणजे जवळपास १,३०० छापील पाने, त्यातील जवळपास १५० लेख तरी संगीत या विषयावर आहेत. या सगळ्या व्यापात सतीशचा सहभाग बराच आहे. 
तसे बघितले तर आमच्यात मतभेदाचे विषय भरपूर आहेत. एकतर सतीश कट्टर आस्तिक आहे आणि मी तितकाच कट्टर नास्तिक आहे पण सतीश चुकूनही मला, त्याची भूमिका समजावत नाही कारण त्यालाही माहीत आहे, मी सहजपणे मत बदलणारा नाही. अर्थात हा विषय आमच्यात फारसा कधी येत नाही. दुसरा मतभेद म्हणजे सतीश कडवट म्हणावा असा हिंदुत्ववादी आहे आणि मला, मी हिंदू आहे, तितके पुरेसे आहे. अर्थात याचा परिणाम आमच्या राजकीय भूमिकेवर पडतो. खरतर मला राजकारणात फारसे स्वारस्य नाही, मला राजकीय मते आहेत पण त्याचा बडिवार माजवावा असे वाटत नाही. काही अपवाद प्रसंगी आमचे वाद झाले आहेत पण आम्ही समजूतदारपणे बाजूला सारले आहेत. 
सध्या आमचा "रागदर्शन" म्हणून संगीताचा गृप तयार झाला आहे आणि आमचे आतापर्यंत ४,५ कार्यक्रम जाहीररीत्या झाले आहेत. असा गृप जमवायचा, असे कार्यक्रम करायचे, ही सगळी धडपड सतीशचीच. त्यानेच सगळ्या कलाकारांना गोळा  केले, माझ्या मागे लागून कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी लिहून घेतले, किंबहुना अजूनपर्यंत तरी हाच परिपाठ चालू आहे. माझा मुळातला स्वभाव  बघता, असली धडपड करणे माझ्या स्वभावात बसत नाही. पण सतीश सगळी धडपड आनंदाने करीत असतो. माझ्याकडून लिहवून घेत असतो आणि मी देखील मैत्रीखातर त्याचे म्हणणे गुमानपणे ऐकतो कारण लिहिणे हा माझा श्वास आहे. सतीशची आणि माझी मैत्री अनेक मतभेदांसहित अशी तरून राहिली आहे. 

प्राची गुर्जर

२०१४ साल असणार, चिकित्सक ग्रुपची जुळवाजुळव चालत होती. मला अनेक नावे परिचित तर अनेक नावे अपरिचित असा धूसर खेळ चालू होता. जी नावे परिचित होती, त्यांना माझ्याकडून फोन जात होते, ओळख नव्याने होत होती. त्यातच विनयने, चौपाटीवर भेटायचं घाट घातला आणि तिथे बरेचजण (बहुतेकजण ओळखीचेच होते पण नव्याने) भेटले. अर्थात हा अंगभूत गुणच आहे पण मी टवाळी करायला सुरवात केली. सुदैवाने सगळ्यांनी एन्जॉय केली आणि तिथेच पहिल्या पिकनिकचा बेत नक्की केला गेला. तत्पूर्वी, ग्रुपवर कुणाचाही वाढदिवस आला की फोन करणे, व्हाट्सअपवर अभिनंदन करणे (इतरवेळेस गुडूप असणारे अभिनंदन करायला जातीने हजर असतात!!) इत्यादी बाबी सुरु झाल्या. अशाचवेळी प्राचीचा वाढदिवस आला आणि व्हाटसअपवर अभिनंदन करायचे क्रियाकर्म उरकून घेतले!! दुपारी मनात आले, चला फोन तर करूया आणि मी फोन केला. अर्थात, फोन उचलला नाही (आलेला फोन न उचलणे ही  प्राचीची खासियत आहे!!) आणि मी देखील परत काही फोन केला नाही. एकतर ही बाई (मुलगी!!) कशी दिसते, कशी वागते, काहीच कल्पना नाही. तेंव्हा परत फोन करण्याचा कशाला अगोचरपणा करायचा, हाच विचार केला होता. परंतु संध्याकाळच्या वेळेस प्राचीने फोन केला!! ( हे थोडे नवलच म्हणायचे) मी ऑफिसमध्ये होतो पण तरी फोन उचलला. " अनिल, फोन केला होतास?" हेच पहिले वाक्य. पहिल्या भेटीतच एकेरी उल्लेख आणि स्पष्ट बोलणे, अस्मादिकांना बरे वाटले. "वाढदिवस आहे ना तुझा, म्हणून फोन केला होता." नंतर थोडे जुजबी बोलणे झाले आणि परंत कधीही फोन कर, अशी प्राचीची पृच्छा. " अरे अनिल आपण फ्रेंड आहोत तेंव्हा कधीही फोन कर" असे मोकळ्या थाटाचे बोलणे झाले आणि फोन बंद झाला. 
प्राचीशी ओळख झाली ती अशी. नंतर व्हाट्सअपवर आमचा खरा खट्याळपणा सुरु झाला. मला कुणी विरोध केला की मला मनापासून आवडते आणि इथे तर प्राची, माझ्या प्रत्येक वाल्याला विरोध करीत होती. इथे एक स्पष्ट केले पाहिजे, विरोधी सूर लावायला प्राचीने सुरवात केली - मी केलीच असती असे नाही. आता ती आपणहून वाकड्यात शिरत आहे म्हटल्यावर अनिल फॉर्मात. आम्ही रोजच्यारोज भांडत असायचो, आजही त्यात फारसा फरक नाही. पण आम्ही हा विरोधी सूर भरपूर एन्जॉय केला. पुढे ठरल्याप्रमाणे मळवलीला पिकनिक झाली आणि तिथे "औंधची महाराणी" प्रथम भेटली. अर्थात तोपर्यंत फोनवर आमच्या बऱ्याच गप्पा झाल्यामुळे प्रत्यक्ष भेटताना फालतू असा संकोच, उपचार वगैरे काहीच झाले नाही. फोनवर काहीवेळा मी अति गंभीर (हे प्राचीचे प्रांजळ मत पण मला तसे वाटत नाही) बोलणे झाल्यामुळे तिच्या मनात माझी एक प्रतिमा झाली होती (बरे झाले ती प्रतिमा लवकरच भंग पावली). रात्री जेवणे झाल्यावर गाण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रम सुरु झाला ( एक विसरलो - ग्रुपवर मी त्यावेळी रोजच्यारोज  एखाद्या गाण्याची लिंक टाकत असे, गाण्याबद्दल चार शब्द लिहीत असे, त्यावरून प्राचीनेच माझे "पंडितजी" असे नव्याने बारसे केले!!) अर्थात अस्मादिक खुश. त्यावेळेस, प्राचीने प्रथमच "गळा" काढला, आजही ते गाणे आठवत आहे. "रहते थे कभी उनके दिल में" हे लताबाईंचे लयीला अवघड असलेले गाणे संपूर्णपणे गायले. आता मात्र थक्क व्हायची पाळी अनिलची!! ही बया इतकी  चांगली गात असेल हे मी स्वप्नात देखील कल्पिले नव्हते. अर्थात तेंव्हा मी आणि विजयने (तो नेहमीच करतो) भरपूर धुडगूस घातला होता आणि प्राचीच्या मनातली माझी प्रतिमा भंगली (तिने पुढे अनेकवेळा स्पष्टपणे बोलून दाखवले आहे) पण ते बरेच झाले. अशा तऱ्हेने पिकनिक संपली पण माझी प्राचीशी झालेली ओळख आणखी घट्ट झाली. खरेतर या पिकनिकने माझी अनेकांशी चांगली ओळख झाली. 
नंतर मी पुढे एका वृत्तपत्रात लिहायला लागलो आणि माझा मित्रपरिवार थोडा पसरायला लागला. वृत्तपत्रातील लेख मी आवर्जूनपणे काही मित्र/मैत्रिणींना पाठवायला लागलो. अर्थात लिहिणारा अनिल आणि प्रत्यक्षातला अनिल, यातील फरक मी जाणीवपूर्वक वेगळा ठेवत होतो, आजही तसेच करतो. पुढे एकदोनदा पुण्याला गेलो असताना तिच्या घरी गेलो. सुदैवाने  तिच्या नवऱ्याचे नाव देखील "अनिल!!" आता इतका मसाला माझ्या हाती आल्यावर मी काय प्राचीला असा सहज सोडणार!! शक्यच नाही. कधी कधी माझ्या मनात यायचे, मी जरा अति चेष्टा करतो की काय? म्हणून काही वेळा फोनवर प्राचीला विचारत असे. बहुदा प्राचीने माझे "पाणी" ओळखले असावे कारण नंतर तिने माझ्यावर बाजी उलटवली!! बाजी उलटवणे, मला बोलण्यात लटकवणे या कलेत प्राची एकदम "वाकबगार", इतकी की समोरच्याला "गार" करून टाकणार. काहीवेळेस आम्ही फोनवर चक्क तासभर गप्पा मारलेल्या आहेत. 
आता या महाराणीचे काही दोष - हिचे कितीही मनापासून कौतुक केले तरी हिला पटत नाही. वास्तविक प्राचीचे समाजकार्य निव्वळ अफाट आहे आणि त्या कार्याची दखल काही पारितोषिके मिळवून घेतली गेली आहे  अथकपणे अंधांसाठी तिचे काम चाललेले असते आणि मुख्य म्हणजे निस्पृहपणे चालते आणि याचा मला हेवा वाटतो. काहीवेळेस कौतुक केले तरी कौशल्याने विषय बाजूला सारला जातो. दुसरा मुद्दा, आपल्याला आलेला फोन उचलायचा असतो,हे प्राची शिकलीच नाही!! मी तर काहीवेळा बोलतो "प्राची तू फोन उचललास, आज सत्यनारायणाची पूजा घालायला लागणार!!" माझा नास्तिक स्वभाव ओळखून त्यातील टोमणा स्वीकारण्याइतका स्वागतशील स्वभाव आहे. पण, पहिल्या फटक्यात फोन उचलला, असे सहसा घडत नाही. तिसरा मुद्दा, मी अनेक ठिकाणी लेख लिहीत असतोआणि माझी मैत्रीण म्हणून मी (निर्लज्जपणे !!) लेखाची लिंक तिला पाठवीत असतो पण अनिल आपला मित्र आहे, हे नेमके ती विसरते आणि प्रतिक्रिया देत नाही. अनिल पण कोडगाच आहे, इतका अनुभव असून देखील लेखाची लिंक पाठवित असतो. बहुदा एखादा कागदाचा कपटा चिमटीत धरून कचरा पेटीत  टाकावा,तितक्या सहजपणे प्राची त्या लिन्ककडे दुर्लक्ष करते. 
आता असे  वाटते,इतके सगळे घडूनही माझी मैत्री कशी? स्पष्ट सांगायचे  झाल्यास,आम्ही अतिशय तुरळक प्रसंग सोडले तर एकमेकांशी सहज, साध्या भाषेत कधीच बोलत नाही. "नमस्कार" बोलताना देखील त्यात तिरकस भाव असणे अगत्याचे आहे. बहुदा विरोधाभासावरच आमची मैत्री टिकली असावी आणि मला त्याचेच खरे आकर्षण आहे. 

पहिलीच भेट झाली

खरंतर प्रणय भावना आणि प्रणय कविता, याला तसा अंत नाही, विशेषतः ललित संगीताचा विषय घेतला तर बहुतांशी कविता या प्रणय कवितेशी येऊन थांबतात. त्यामुळे त्यात साचेबद्धपणा येणे क्रमप्राप्तच ठरते, ढोबळ अभिव्यक्ती तर सहजच व्यक्त होते आणि उथळ रचना वाचायला मिळणे, हे भागदेय ठरते. प्रणयात एका ठराविक मर्यादेपर्यंत नावीन्य आणता येते किंवा असे  म्हणता येईल, प्रतिमा उपमा किंवा इत्यादी अलंकारांना मर्यादेचा बराच मोठा काच सहन करावा लागतो. त्यातून मग, पुनर्वाचनाने शिळेपणा जाणवण्याची शक्यता अधिक. मुळात, ललित संगीतातील काव्याला, सुरांचा "मीटर" सांभाळणे अत्यावश्यक ठरते. ती त्याची पहिली अट असते. एक नक्की मान्यच करायला हवे, कुठल्याही संगीत आविष्कारात शब्द हा घटक तसा परकाच असतो मग ललित संगीतातून होणारी अभिव्यक्ती कितीही सक्षम असली तरी. 
आजचे आपले गाणे या म्हणण्याला पुष्टी देणारे आहे. "पहिलीच भेट झाली" हे मराठीतील अतिशय प्रसिद्ध असे प्रणयी थाटाचे गीत आहे आणि कविता म्हणून आस्वाद घेताना, त्याच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवून देणारे आहे. "भावकविता" म्हणून विचारात घेता, कवितेतील प्रतिमा सगळ्या तशा सरधोपट, नेहमीच्या वापरातल्या आहेत. "राधा", " नाचतात मोर" किंवा "अंगातून सतारी" या प्रतिमा, प्रतिमा म्हणून काही खास नाहीत किंवा आत्तापर्यंत असंख्यवेळा असंख्य कवितेतून वाचायला मिळालेल्या आहेत. पहिल्या दोन ओळींतून कवितेचा भावार्थ स्पष्ट होतो. अर्थात, ललित संगीतातील काव्याची ही एक मर्यादा असते - इथे मोजक्याच प्रतिमा आणि अभिव्यक्ती शक्य असते. गाण्याच्या शेवटच्या ओळीत - "ताऱ्यात वाचतो अन या प्रीतीची कहाणी" इथे "अन" या शब्दाची खरंच गरज होती का? परंतु स्वरिक लय सांभाळणे गरजेचे असल्याने हा शब्द वापरला आहे अन्यथा या शब्दातून वेगळे काहीही सांगितले जात नाही. तेंव्हा ललित संगीतातील काव्याचा आस्वाद घेताना या मर्यादा लक्षात ठेऊनच आस्वाद घेणे आवश्यक ठरते. 
पाडगांवकरांची कविता या सगळ्याचे सम्यक भान ठेऊन आशय व्यक्त करते. मुळात, संगीतकाराचा आशय ध्यानात घेऊन कविता घडवली जाते. अर्थात असे  करताना,आशय शिळा होऊ नये, याची काळजी घेते. "अपूर्व बाधा" - जागेपणात राधा" अशी जोड  घालताना, या शब्दांनी आधीच्या भावनेची पूर्ती होईल, याची काळजी घेतली जाते आणि असे करताना कुठेही शाब्दिक लय बिघडत नाही, हे महत्वाचे. गाणे हे युगुलगीत आहे तेंव्हा कवितेतील प्रत्येक कडवे हे त्या भूमिकेला धरूनच बांधले आहे आणि अर्थातच त्यातून जे म्हणणे मांडले जाते, त्याची पूर्तता होते. इथेच मंगेश पाडगांवकर वेगळे दिसतात. ओळ संपवायच्या आधी त्या भावनेची पूर्वसूचना देतात आणि मगच शेवट करताना ती भावना पूर्ण व्यक्त होते आणि असे करताना, स्वरिक लय कुठेही अडखळत नाही. 
संगीतकार श्रीनिवास खळे  हे नेहमीच शब्दांना प्राधान्य देऊन चाल बांधणाऱ्या पंथाचे संगीतकार, परिणामी चाल बांधताना त्यातील आशय कुठेही गुदमरणार नाही किंवा आशयाचा संकोच होणार नाही, याची वाजवी काळजी घेणारे संगीतकार. रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने चालीचा बंध तयार करताना, कुठेतरी रागदारी संगीताचा स्पर्श नेहमीच दिलेला असतोखळे काकांच्या चाली काहीशा संथ असतात पण लयीच्या अंगाने बघायला गेल्यास त्यात अनेक अवघड वळणे असतात मग ती एखादी हरकत असेल किंवा कुठे छोटी तान असेल. विशेषतः ओळीच्या मध्येच एखाद्या शब्दावर हरकत घेऊन तीच चाल फार अवघड करून टाकण्याचे त्यांचे कसब असामान्य दर्जाचे होते. "पहिलीच भेट झाली"  हे मुखड्यातील शब्द आणि पहिला अंतरा घेताना हेच शब्द "पहिलीच भेट झाली" येतात परंतु अंतरा पार वेगळ्या स्तरावर सुरु होतो, किंचित वरच्या सूरांत घेतला जातो पण अंतरा संपता पुन्हा ज्या प्रकारे मुखड्याकडे वळवला जातो, हे अवलोकणे बुद्धिनिष्ठ आहे. तसेच आणखी एक उदाहरण  बघताना, "डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर" या ओळीतील स्वप्नावस्था दाखवताना, सुरांचे तितकेच हळवेपण विलोभनीय आहे. प्रणयी भावना आहे आणि ती दर्शविताना सोज्वळ, सालस ऋजुता पण दाखवली आहे. खरंतर प्रत्येक अंतऱ्यासाठी वेगळी स्वररचना करणे, हा सर्जनशीलतेचा अपूर्व असा सोहळा असतो. 
अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गाताना हाच भाव कायम राखला आहे. कुठेही "गायकी" दाखवलेली नाही. मुळात गाण्याची चाल इतकी गोड, मधुर आहे की त्यात आणखी भर टाकायची आवश्यकताच नाही. चाल हळूहळू दुगणित जाते पण तरीही तालाच्या मात्रा कसलाच अधिकार दाखवत नाहीत. खरतर आयुष्यात गायनाच्या जितक्या संधी मिळाल्या त्यापेक्षा अधिक संधी मिळायला हव्या  होत्या,अशा ताकदीचा गळा सुमन कल्याणपूर यांना लाभला आहे. निकोप, स्वच्छ, दाणेदार आणि सहजपणे निमुळता होत जाणारा आवाज. काही  गाण्यांच्या बाबतीत लताबाईंच्या तोडीसतोड गायन करण्याची क्षमता दाखवली पण दुर्दैवाने फक्त मराठी भावगीतांपुरतीच ओळख राहिली. 
अरुण दात्यांच्या सुरवातीच्या काळात, त्यांच्यावर तलत मेहमूद यांचा प्रभाव होता पण सुदैवाने तो प्रभाव लवकरच पुसला गेला आणि त्यांना स्वतःची गायकी सापडली. कुठेही आवाज न पिचता वरच्या पट्टीत सहज गाऊ शकणार गळा तरीही खालच्या पट्टीत अधिक खुलणारा. 
तेंव्हा अशा या गाण्याच्या बाबतीत गाण्याचे सगळे घटक तुल्यबळ असल्याचे दिसते. असे भाग्य फार थोड्या गाण्यांच्या बाबतीत लाभते. 

पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची 
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची 

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा 
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा 
माझी न राहिले मी, किमया अशी कुणाची? 

डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर 
फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर 
झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची 

लाजून वाजती या अंगातुनी सतारी 
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी 
मी लागले बघाया स्वप्नेही मिलनाची 

वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी 
ताऱ्यात वाचतो अन या प्रीतीची कहाणी 
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची 
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची 


Monday, 20 May 2019

अंतरंगी तो प्रभाती

आपल्या भारतीय लोकसंगीतात प्रचंड वैविध्य आहे आणि थोडे बारकाईने ऐकल्यास त्यात बरेचवेळा साद्ध्यर्म्य आढळून येते. लोकसंगीताचा जनक कोण? हा प्रश्न कायम अधांतरीच राहणार पण लोकसंगीताने आयुष्यात रंग आणले, हे वास्तव नाकारणे कठीण. याचा परिणाम असा झाला, विशेषतः ललित संगीताच्या अनुरोधाने बोलायचे झाल्यास, स्वररचनेत बरेचवेळा विलक्षण सरमिसळ दिसते, वैविध्य ऐकायला मिळते. प्रत्येक राज्याच्या लोकसंगीताचे ठराविक, खास असे साचे असतात आणि बहुतांशी रचना त्या साच्यातच बनवलेल्या असतात. आता आपले लोकसंगीत असल्याने त्याबाबत सर्जनशीलतेच्या अंगाने कुणी फारशी तक्रार करीत नाही. सगळेच संगीतकार लोकसंगीताचा कायम आधार घेत आले आहेत, काहीजण त्यात वेगवेगळे प्रयोग करून, तेच लोकसंगीत नव्याने पेश करतात पण आधारभूत साचा तोच असतो. दुसऱ्या राज्यातील लोकसंगीताचा आधार घेऊन, स्वररचना बांधणे, हे काही नवीन नाही. सगळ्या भाषेत अशी देवाण-घेवाण चालूच असते. सुदैवाने भारतातील लोकसंगीत प्रचंड वैपुल्याने भरलेले आहे. प्रत्येकाचं घाट वेगळा, ताल वाद्ये वेगळी, स्वरबंध वेगळे आणि लयीचे बंध वेगळे. त्यामुळे पारंपरिक लोकसंगीतात जेंव्हा वेगळ्याच राज्याची एखादी लोकप्रिय धून किंवा आराखडा घेऊन, स्वररचना अवतरते तेंव्हा ऐकायला देखील खूपच नावीन्य मिळते. आजचे गाणे "अंतरंगी तो प्रभाती, छेडितो स्वरबासरी" हे गाणे अशाच नाविन्याने नटलेले आहे. गाण्याची स्वररचना ऐकली तर लगेच समजून घेता येते, चाल गुजरातमधील काठियावाड/ सौराष्ट्र या भागातील लोकसंगीतावर आधारित आहे. गाण्याचा ठेका आणि रचना त्याच लोकसंगीतावर आधारित आहे. 
गाण्याची शब्दरचना गुरुनाथ शेणई यांची आहे. शब्दरचनेवरून जाणता येते, रचना भक्तिमार्गी आहे. कृष्ण हा जसा उत्तर भारतातला तसाच आणि तितकाच राजस्थान/गुजरात भागात गणला जातो. मला तर नेहमी प्रश्न पडतो, जर का आपल्या भारतीय संस्कृतीत कृष्ण, गवळणी, राधा वगैरे मंडळी नसती तर संस्कृतीचे काय स्वरूप राहिले असते? कवितेत कृष्णाचेच गुणवर्णन आहे आणि त्यादृष्टीनेच सगळी कविता लिहिली आहे. कवितेतील रुपके, उपमा आपल्या नेहमीच्याच परिचयाच्या आहेत. सलग, सोपी अशी शब्दकळा असून, रचना गेयताबद्ध आहे. जिथे "खटका" हवा किंवा ओळ संपायला हवी, तिथेच संपली आहे. ललित संगीताच्या दृष्टीने हे फार महत्वाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. संगीतकार जेंव्हा चाल बांधतो तेंव्हा शब्द हे स्वरिक लयीला बाधक असता कामा नयेत. स्वरलयीचा स्वतःचा असा एक "मीटर" असतो आणि त्यामध्येच रचना बांधणे गरजेचे असते. त्यामुळेच सगळ्या आविष्काराला एक देखणे स्वरूप प्राप्त होते. 

अंतरंगी तो प्रभाती, छेडितो स्वरबासरी        
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी 

या रचनेचा संगीतकार मधुकर गोळवलकर आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे चालीचा उगम हा सौराष्ट्र इथल्या लोकसंगीतात आढळतो. मधुकर गोळवलकर यांची कारकीर्द प्रामुख्याने गाजली ती "जयोस्तुते" या गाण्याने परंतु एकूणच सगळी कारकीर्द झाकोळलेली राहिली. का? या प्रश्नाला उत्तर नाही. मुळातले तार शहनाई वादक, पुढे सारंगी या वाद्यावर प्रभुत्व मिळवले. अर्थात शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण. सतारीच्या सुरांनी गाण्याची सुरवात होते, पुढे बासरीचे स्वर मिसळतात आणि मिश्र काफी रागाच्या सावलीत चाल बांधलेली आहे, याचा थोडा अंदाज येतो. मुखडा दोन वेगवेगळ्या लयीत समोर येतो. सुरवातीची पहिली ओळ ठाय लायोत आहे पण तीच पळ परत घेताना एकदम दुगणीत लय जाते तसेच तालाची गती दुप्पट होते. ज्यांना कुणाला गुजरात इथल्या लोकसंगीताची ओळख असेल त्यांना ही खूण लगेच ध्यानात येईल. खरतर सगळी रचना याच तत्वाने बांधली आहे. 

डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी 
पाहती देहात कोणी थोर साधक उन्मनी 
सानुल्या बिंदुपरीं तो नांदतो संताघरी 
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी 

गाण्याचे २ अंतरे आहेत पण अंतरा बांधताना, संगीतकाराने सुरावट मुखड्याशी मिळती जुळती ठेवली आहे. लोकसंगीताचा एक विशेष असा असतो, तालवाद्ये फार जोरकसपणे वाजत असतात आणि तालाच्या मात्रांवर गाणे तोलले जाते. अंतरा जरी सम पातळीवर ठेवला असला तरी संगीतकाराने काही सुंदर हरकती दिल्या आहेत जसे "डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी" ही ओळ गाताना, उठावण  थोडी वेगळ्या सुरांवर आहे, छोटीशी हरकत घेतली आहे. तसेच पुढे "सानुल्या बिंदुपरीं तो नांदतो संताघरी" ही ओळ  वरच्या सुरांत घेत, परत लय वाढवलेली आहे. ही धाटणी नेमकी गुजरातमधील लोकसंगीताचीच आहे.  वाद्यमेळ आणि त्याची रचना ही तशीच ठेवलेली आहे, थोडक्यात पुनरावृत्त ठेवलेली आहे. 

भावना भिजल्याभरांनी आश्रय नयनीं दाटले 
अस्तिकाचे गीत गाता सार उमजे त्यातले 
सर्वसाक्षी शाम माझा राहतो हृदयांतरी 
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी

गायक म्हणून जयवंत कुलकर्णी हे प्रामुख्याने गाजले ते दादा कोंडक्यांचा आवाज म्हणून आणि तीच त्यांची बव्हंशी ओळख राहिली आहे पण हे गाणे ऐकल्यावर तशी ओळख असणे किती एकांगी आहे, हे ध्यानात येईल. काहीसा "खडा" आवाज परंतु लवचिकता रचनेनुसार आणलेली आढळते.आवाज स्वच्छ आहे, ध्वनीचा पाळला फार विस्तृत नाही पण वरचे सूर परिणामकारकपणे घेतले जातात. या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास, लोकसंगीताला आवाज नेहमीच खडा लागतो आणि जितका तार सप्तकात गाऊ शकेल, तितका तो आवाज प्रभावी ठरतो. इथे जयवंत कुलकर्णी यांचा आवाज सुरेल तर आहेच पण जोरकस देखील आहे. 
ही रचना ऐकताना, जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजाची मोहिनी रसिकांच्या मनावर निश्चित पडते आणि झालेली प्रसिद्ध ओळख किती तुटपुंजी आहे, हे लक्षात येते.