Saturday, 16 March 2019

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी

एक सनातन वादाचा विषय आहे - गाण्यांमध्ये कविता असावी का नसावी? आणि त्यामागोमाग प्रश्न असा येतो, "गीतकार" हा "कवी" असतो का? आपल्याकडे गीतकाराची वेगळी पंगत मांडलेली असते म्हणून हा प्रश्न उद्भवला. आता जर का गाण्यांत कविता असावी, हे मान्य केले तर मग हाताशी येणारी कविता, मग त्यात गीतात्मकता असली तरी तिला कविता म्हणणे का जड जाते? आणि अर्थात तद्नुषंगाने कवितेचा आस्वाद त्यानुरुपच ठरवला जातो!! खरतर, प्रत्येक नवी कविताच नव्हे तर पूर्वी वाचलेली कविता पुन्हा वाचताना, सतत नवे आव्हान देत असते. याही अर्थाने कवितेचा आस्वाद हा नित्यनूतन असा शोध असतो. कवितेतून व्यक्त होणारा आशय आणि भाषा, या दोन्ही अंगाने कवी हा शोध घेत असतो. या दुहेरी शोधाचा परिपाक म्हणजेच कवितेचा घाट, कवितेचा आकार आणि हे सर्वमान्य आहे. जर का हेच तत्व तथाकथित गीताच्या बाबतीत पाळले गेले असेल तर मग गीतकार, या पायरीला वेगळी मान्यता का द्यायची? 
आजचे आपले गाणे, याच दृष्टिकोनातून बघितले कवितेच्या पातळीवर निश्चितच एक सुंदर कविता म्हणून वाचनानंद देते आणि प्रत्येकवेळी आस्वादाच्या नवीन खुणा दाखवते. कवी मंगेश पाडगावकर, यांची ओळख कवी म्हणून तर ख्यातकीर्त आहेच पण हल्लीच्या मानदंडाच्या हिशेबात गीतकार म्हणून फार वरच्या दर्जाचा कवी असे मान्य करावेच लागेल.  पाडगांवकरांनी पहिल्याच दोन ओळीत कवितेचा भावार्थ सांगितलेला आहे आणि पुढील ओळींतून याच भावार्थाचा निरनिराळ्या प्रतिमांतून विस्तार केलेला आहे. खरतर, विराणी ही मराठीत ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली आहे तेंव्ती भावना, भावना म्हणून अजिबात नवीन नाही परंतु खरा कवी, तीच भावना मांडताना, आशय, घाट, प्रतिके आणि भाषा यांद्वारे नव्याने जाणीव करून देतो. पाडगांवकरांनी नेमके तेच केले आहे. 

डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी 
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी 

संगीतकार यशवंत देव, हे कवी स्वभावाचे संगीतकार, स्वतः: त्यांनी काही सक्षम गाणी लिहून, आपला अधिकार सिद्ध केलेला आहे. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे - चाल ही कवितेतच दडलेली असते, संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो. अर्थात याचा परिणाम, देवांच्या चाली या नेहमीच शब्दानुकूल तर असतातच पण बरेचवेळा शब्दांमधील दडलेला अर्थ, ते स्वरांच्याद्वारे व्यक्त करतात. गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ, स्वरमंडळ, सतार आणि व्हायोलिनच्या सुरांनी सजवला आहे आणि त्यातून लगोलग मारवा रागाचीच आठवण येते. खरतर, ललित संगीताबद्दल लिहिताना रागदारी संगीताचा उपयोग करण्यात तसा फारसा अर्थ नसतो कारण बहुतेकवेळा सुरवातीचा राग बाजूला सारून, स्वररचना वेगळ्याच रागाश्रयाने विस्तार करते. इथे देखील चाल पुढे पूर्वी कल्याण रागात शिरते. दुसरे म्हणजे इथे कवीचे शब्द महत्वाचे म्हटल्यावर त्या अनुषंगानेच स्वररचना तयार होणे क्रमप्राप्तच ठरते. 

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही 
तेंव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी 

पहिल्या अंतऱ्याआधीचा वाद्यमेळ जरा बारकाईने ऐकला तर वाद्ये तीच आहेत आणि अस्ताईच्याच सुरांचा विस्तार केला आहे. वेगवेगळे अंतरे बांधणे बरेचवेळा बुद्धीगामी असू शकते परंतु जर चाल तितकीच सक्षम (चाल सक्षम आहे, इथे संगीतकाराचेच मत अखेरचे) असेल तर त्याची फारशी गरज नसते. पहिला अंतरा संगीतबद्ध करताना, पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द "दोन्ही" याच्यावर किंचित जोर दिला आहे. गाणे तयार करताना, कुठल्या शब्दाला महत्व द्यायचे जेणेकरून आशयावृद्धी होते, इथेच संगीतकाराची काव्याबद्दलची सखोल जाण व्यक्त होते. अर्थात त्यामुळे गाण्याला देखील वेगळेच परिमाण लाभते. 

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती 
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी 

गायक म्हणून अरुण दात्यांचे विश्लेषण करायचे  झाल्यास, सुरवातीच्या काळात त्यांच्या आवाजावर हिंदीतील तलत मेहमूद यांचा फार प्रभाव होता परंतु सुदैवाने त्या प्रभावातून त्यांनी लगेच सुटका करून घेतली. गमतीचा भाग म्हणजे बालपण इंदूरसारख्या सरंजामी, हिंदी भाषिक शहरात जाऊन देखील मराठी शब्दोच्चाराबाबत त्यांनी अचूक दक्षता घेतली. आपला गळा कसा आहे आणि आपण कुठल्या प्रकारची गाणी गाऊ  शकतो,याचा त्यांना योग्य अंदाज होता तसेच गाण्यातील कवितेबाबत ते आग्रही होते. थोडे बारकाईने ऐकले तर आवाजाचा पल्ला फार विस्तृत नव्हता परंतु वरच्या सुरांत गायन करणे जरादेखील अवघड होत नव्हते. छोट्या हरकती, अर्ध ताना घेणे सहज जमत होते. " ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी " ही ओळ हळूहळू तार स्वरांत जाते आणि तसे गाताना आवाज कुठेही पिचत नसून, सहजपणे जातो. अर्थातच जेंव्हा "आपली आवड" याला महत्व दिले जाते तेंव्हा तुम्हाला गायनाच्या संधी भाराभार मिळत नाहीत. ललित संगीतात, प्रत्येक  वेळेस,उत्तम चाल तसेच सक्षम कविता मिळत नसते आणि याचा परिणाम, अरुण दात्यांना चित्रपटासारख्या विस्तृत क्षेत्रापासून पारखे व्हावे लागले. अर्थात हा तोटा आपल्या मराठी रसिकांचा झाला. 

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही 
मी पापण्यांत माझ्या ही झाकीली विराणी 

हे गाणे ऐकताना आपल्याला एक श्रीमंत आणि आपल्या रसिकत्वाची पायरी विस्तारल्याची जाणीव होते. कलेचे मुलतत्व तर हेच म्हणायला हवे. असे  म्हणतात,जी गाणी हळूहळू मनाच्या गाभ्यात शिरतात, तीच गाणी इतिहासात चिरंतनत्व पावतात. प्रस्तुत गाणे हे असेच शांतपणे मनात रचले जाते. 


धुंद येथ मी स्वैर झोकितो

आपल्याकडे सर्वसाधारणपणे मराठी कविता म्हटली की लगेच समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी किंवा प्रणय कविता हाच दृष्टिकोन ठेवला जातो परंतु या पलीकडे देखील मराठी कविता भावनांचे अनेक तरंग दाखवते. विशेषतः: रगेल आणि रंगेल भाववृत्तीचे दर्शन मराठीत तसे अभावानेच आढळते. मराठी मनाची ती एक मर्यादा मानवी लागेल. अर्थात काही कवींनी जाणीवपूर्वक या प्रांतात समृद्ध रचना केल्या आहेत पण एकूणच कवितांचा अवकाश बघता, प्रमाण तुरळकच आहे. आजचे गाणे हे अशा प्रकारचे आहे. ग.दि.माडगूळकरांच्या कविता रचनेत जरी मराठी संस्कृतीचा आणि मातीचा विपुल आढळ असला तरी देखील त्यांनी काही अपवादात्मक कविता लिहिल्या, त्यातील ही कविता. ढंगदार आणि तरीही संयत रचना करणे हा माडगूळकरांच्या प्रकृतिधर्म. लावणीचा बाज स्वीकारताना देखील, त्यातील रांगडा श्रुंगार शब्दबद्ध करताना, कुठेही औचित्याचा भंग होणार नाही याचीच काळजी घेतली आहे. वास्तविक प्रस्तुत कवितेबाबत काही मांडायचे झाल्यास, मद्य घेतानाची तरल अवस्था आणि धुंदावस्थेत असूनही घरात असलेल्या बाळाची आणि त्याच्या आईची काळजी, असे दुहेरी पातळीवरील वर्णन आहे. मद्य सेवन करणारा "मी" धुंद होत असताना सुद्धा शुद्धीवर आहे. एकाच वेळी मद्याचा आस्वाद चालू आहे पण त्याचबरोबर कुटुंबाची काळजी आहे. खरतर हे कुणाही संयत, सक्षम माणसाबद्दल म्हणता येईल. प्रासादिक आणि सुबोध शब्दरचना  माडगूळकरांच्या कवितेचे प्रधान वैशिष्ट्य म्हणता येईल. इथे देखील, कविता म्हणून स्वतंत्रपणे वाचताना, ध्रुवपदांच्या ओळीतच आशयाची संकल्पना रेखीवपणे मांडलेली आहे. रात्रीची मदिरधुंद वेळ आहे आणि त्याचवेळी काहीशा द्विधा मनस्थितीत बायकोची आणि तद्वत आपल्या बाळाची आठवण येऊन, काहीशा विकल मनस्थितीचे यथार्थ वर्णन आहे. 

धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले 
त्याचवेळी तू असशील तेथे बाळा पाजविले 

एकदा का पहिल्याच ओळीत आशय स्पष्ट झाल्यावर पुढे वेगवेगळ्या प्रतिमांनी तोच आशय अधोरेखित करणे आणि त्याद्वारे कवितेची बांधणी घट्ट करणे, हे आणखी एक वैशिष्ट्य माडगूळकरांच्या कवितेबाबत अवश्यमेव लिहावे लागेल. दोन वेगळी चित्रे आणि त्यातील विरोधाभास, संपूर्ण कवितेत हाच दृष्टिकोन ठेवलेला आहे. " माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी " किंवा " माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी "  या वाक्यातून ज्या परिसरात "मी" बसलेला आहे, याचे नेमके वर्णन केलेले आहे. कविता अल्पाक्षरी असते ती अशी. 

येथ विजेचे दिवे फेकतो उघड्यावर पाप 
ज्योत पणतीच्या असेल उजळीत तव मुख निष्पाप 
माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी 
ओठांवरती असेल तुझिया अमृतमय ओवी 

गायक आणि संगीतकार, या दोन्ही भूमिकेत इथे आपल्याला सुधीर फडके भेटतात. खरतर, सुधीर फडक्यांची बहुतांश कारकीर्द ही मराठी चित्रपटाच्या भोवती बहरलेली दिसते परंतु त्यांनी काही थोड्याच अशा भावकवितांना चाली लावल्या आणि स्वतः:च्याच आवाजात चित्रपटबाह्य अशा संगीतरचना सादर केल्या. एक निरीक्षण - जेंव्हा एखादा संगीतकार खाजगी गीत संगीतबद्ध करायला घेतो, तेंव्हा बहुतांशी हाताशी असलेले काव्य हे, कविता म्हणून अधिक घाटदार, समृद्ध काव्याशय इत्यादी घटक आवर्जूनपणे बघतो. कवितेत गेयता असणे, गरजेचेच असते परंतु गेयता बघताना, ओळींमधून दिसणारा शाब्दिक लय देखील तितकाच महत्वाचा असतो आणि तिथे संगीतकाराची नजर अधिक तीक्ष्ण असते. गाण्याची सुरवातच, कसलाही वाद्यमेळ न वापरता केलेली आहे. कवितेत एका ओळीतून एक कल्पना तर दुसऱ्या ओळीतून विरोधी कल्पना, हा विरोधाभास ध्यानात घेऊन, फडक्यांनी संगीतरचना केली आहे आणि स्वतः:च गायन करीत असल्याने, तो विरोधाभास प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे. गायक म्हणून सुधीर फडके किती बारकाईने विचार करतात - "निष्पाप" शब्द गाताना, "ष" अक्षराचा उच्चार मुद्दामून ऐकण्यासारखा आहे. उच्चारात स्पष्टता आहे पण स्पष्टता आणताना बहुतांशी "खडखडीत" उच्चार होतात आणि गाण्याचा रसभंग होऊ शकतो आणि सुधीर फडक्यांनी नेमके तेच टाळले आहे. असे शब्द सुरांद्वारे गायचे, हे सहज जमण्यासारखे नसते. 

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी 
मत्पुजेस्तव असशील शोधीत सखे, स्वप्नसृष्टी 
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली 
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली 

गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, व्हायोलिन, बासरी इतपतच वाद्ये ठेवली आहेत तर तालवाद्याचा ध्वनी देखील काहीसा "दबका" ठेवला आहे, जेणेकरून माडगूळकरांच्या शब्दांना कुठेही धक्का बसू नये. दुसरी महत्वाची बाब म्हणजे गायन करताना, प्रत्येक ओळीतील आशय ध्यानात घेऊन, आवाजाचा स्तर कमी, जास्त ठेवला आहे. तसेच पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, याची "उठावण" ऐकण्यासारखी आहे. दुसरा अंतरा घेताना स्वर किंचित उंचावला आहे. खरतर सुधीर फडक्यांचा गळा शक्यतो मंद्र आणि मध्य सप्तकात अधिक करून खुलणारा आहे पण प्रसंगी तार स्वर घेणे त्यांच्या गळ्याला सहज जमत होते. तसे बघितले तर अंतऱ्याची चाल जवळपास तशीच ठेवली आहे.  

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप?
शीलवती तू, पतिव्रते मी मूर्तिमंत पाप!!

गाण्याचा शेवट करताना मात्र एके ठिकाणी जरा दोष आढळतो. शेवटची ओळ गाताना,  शीलवती तू, पतिव्रते मी मूर्तिमंत पाप "  - नायिकेचे वर्णन करताना, " शीलवती तू , पतिव्रते - मी मूर्तिमंत पाप " अशी गायला हवी होती. इथे गाताना, " पतिव्रते मी " असे शब्द गायले गेले आहेत. पटकन लक्षात येत नाही पण जरा बारकाईने ऐकले तर समजून घेता येते आणि याचे मुख्य कारण स्वररचनेची लयच अशी बांधलेली आहे की जर का दोन्ही शब्द "सुटे" गायले गेले असते तर लय बिघडली असती आणि मग समेची मात्रा घ्यायला प्रयास पडला असता. "शब्दप्रधान गायकी"च्या मर्यादा या अशा दिसतात. 


Monday, 11 March 2019

ईश्वर महाराज

साउथ अफिकेतील वास्तव्यात, सर्वात जवळ, माझ्या कुणी आला असेल हा माणूस. पीटरमेरीत्झबर्ग शहरात रहाणारा (आता नाही पण….) तिथल्या भारतीय समाजात अविभाज्य घटक म्हणावा, इतकी सगळ्यांशी याची मैत्री. याच्याच मुळे, मला तिथल्या भारतीय वंशाच्या समाजात अगदी अंतरंग म्हणावे, इतक्या जवळकीने माणसे अनुभवता आलि. या माणसाच्या घरात मी आणि माझे मित्र, कधीही जाऊ शकत होतो, याच्या बायकोशी हक्काने जेवायला सांगत असे. वीणा ( याची बायको) देखील अतिशय आत्मीयतेने आमचे स्वागत करीत असे. या घराचा दरवाजा, आम्हाला २४ तास उघडा असायचा.
जवळपास साडे पाच फूट उंची, रंग काळसर, गोल गरगरीत पोट, डोळ्यांवर काळसर झाक असलेला चष्मा, सतत हसतमुख चेहरा आणि मुख्य म्हणजे, भारताबद्दल अतीव माया. पुढे, पुढे तर ईश्वर, आमची ओळख, त्याच्या कुटुंबातील घटक, अशीच करून द्यायला लागला होता.हिंदी उच्चार त्यातल्या त्यात नेमके करू शकणाऱ्या फार थोड्या व्यक्तींमध्ये याची जिम्मा करता येउल, अन्यथा तिथल्या लोकांचे हिंदी उच्चार खुद्द प्रेमचंदला देखील घेरी आणणारे आहेत. अर्थात, त्या बाबतीत या समाजाला दोष देण्यात काही अर्थ नाही,. १९८८ पर्यंत, सगळ्या जगाने वाळीत टाकलेला देश!! त्यामुळे, भारताशी, या समाजाचा कसलाच संबंध राहिला नाही. भारतातून, चोरट्या मार्गाने ज्या हिंदी चित्रपटाच्या व्हिडियो मिळायच्या, त्यावरून भाषेचे "शिक्षण" घ्यायचे. तिथले गुजराती मात्र भारतीय संस्कृती(च) नव्हे तर गुजराती भाषा अत्यंत अस्खलित बोलतात आणि याचे कारण, त्यांनी मात्र भारताशी नाळ जोडून ठेवली होती पण तो वेगळा विषय आहे.
सुरवातीला, आमच्यातील बुजरेपणा आणि मुख्य म्हणजे आमचे तर्खडकरी उच्चार बदलून, तिथले इंग्रजी उच्चार, अगदी जिभेवर घोटवून घेतले, असे म्हणता येईल. वास्तविक, याचा व्यवसाय म्हणजे दारूचा पब आणि त्याला जोडून हॉटेल. Raisethorpe या उपनगरात, याचे घर आणि पब होता. मानाने अतिशय मोकळा धाकला असल्याने, तिथल्या भारतीय समाजात, त्याला सगळेजण "अंकल" म्हणूनच ओळखायचे. हॉटेलमधील कस्टमर, मुख्यत्वेकरून, भारतीय किंवा काळे. पण, याचा पब मात्र अतिशय प्रसिद्ध होता. गर्दी नाही, अशी फारशी वेळ यायचीच नाही. मी, बहुतेकवेळा, शुक्रवार संध्याकाळी तिथेच "पडलेला" असायचो. जो पर्यंत, पब चालू आहे, तोपर्यंत मी तिथे Billiards खेळत असे. जशी संध्याकाळ उगवायला लागायची, तशी तिथे मग, आमच्या ग्रुपमधले इतर "खेळाडू" यायचे. त्यापुढे मग, रात्रभर धमाल. आम्ही मित्र (भारतातून आलेले) तिथे एकटेच रहात असल्याने, आमच्यावर जेवण करायला बंदी असायची!! वीणा किंवा इंद्रा, जेवणाचा सोहळा मांडायचे.
ईश्वरच्या घरी सगळ्यात म्हणजे त्याचा मुलाचा २१वा वाढदिवस. साउथ आफ्रिकेत २१वा वाढदिवस, फार मोठा मानला जातो. त्यानिमित्ताने जंगी पार्टी होते, त्यावेळी, वडील मुलाला एकतर नव्या गाडीची चावी देतात किंवा नव्या घराच्या किल्ल्या. तो पर्यंत मुलाने, कुठेतरी स्वत:चे जमवलेले असते आणि मग ते दोघे, या पार्टीचा आरंभ, त्यांच्या डांसने करतात आणि मग, हळूहळू इतर जोडपी त्यांना साथ द्यायला लागतात. ईश्वरने आम्हाला आधीच सांगितले होते, आजची रात्र इथेच काढायची आणि चुकूनही घरी जायचे नाही. शनिवार रात्र आणि हवेत थंडगार गारवा. ईश्वरने घराच्या पुढील हिरवळीवर मोठा तंबू बांधला होता आणि या पार्टीसाठी खास म्युझिक सिस्टीम बसवली होती. इथेच मी, इथले कलाकार, "मूळ" हिंदी गाण्यांची कशी वासलात लावतात, हे ऐकले. It's South African Re-Mix music and known as "चटनी सॉंग्स"!!
मुलाने जसे नृत्याला आरंभ केला तशी ईश्वर फॉर्म मध्ये!! इतका वजनदार माणूस पण, नृत्य इतके सुंदर केले की मी बघतच राहिलो. नंतर वीणासोबत "बॉल डान्स" केला आणि त्यावेळी त्याला इतर बघ्यांनी टाळ्यांची जबरदस्त साथ दिली. मला त्यावेळी पाश्चात्य नृत्याचा गंध देखील नव्हता, तेंव्हा अनिल टिपिकल "मुंबई डान्स" मध्ये मश्गुल!! पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी चालू होती. मग, तिथेच त्याच्याच घरात झोपलो, ते रविवारी दुपारपर्यंत!!
हा माणूस तसा अतिशय भाबडा होता. आमच्यावर मात्र खूप विश्वास. त्यावेळी माझ्याबरोबर सतीश म्हणून एक मित्र रहात असे. माझ्याच कंपनीत काम करायला होता, आपल्या चेंबूर मधला. तो, आमच्या कंपनीत contract basis वर आला होता. कंपनीचे काम संपले तशी त्याची परत जायची वेळ आली. ईश्वरला काय, पार्टीसाठी कारण सापडले. शनिवार रात्री, त्याने आमच्या सगळ्या ग्रुपला बोलावले आणि नेहमीप्रमाणे, पार्टी रंगवली. जशी जायची वेळा आली, तशी त्याने सतीशच्या गळ्यात, आठवण म्हणून सोन्याची चेन अडकवली!! आम्ही सगळेच थक्क. आम्ही कोण? केवळ नोकरीसाठी या गावात आलेले आणि प्रत्येकाचा निवास हा तसा तात्पुरता (तसेच पुढे घडत गेले, मी आणि विनय पुढे तिथून बाहेर पडलो) आणि जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत(च) मी तिथे राहणार,हे विधीलिखीत!!
असे असून देखील, या माणसाने आम्हाला लळा लावला, अगदी पैशाची तमा न बाळगता, सढळ हाताने खर्च करीत असे. दाराशी मर्सिडीज सारखी श्रीमंत गाडी, आम्ही ती आमचीच म्हणत असू. या गावापासून केवळ १०० किलोमीटर वर जगप्रसिध्द डर्बन शहर. तिथे तर त्याने आम्हाला अगणित वेळा नेले आणि तिथल्या जगप्रसिद्ध बीचेस वर हिंडवून आणले. त्याला आमच्याकडून कपर्दिक फायदा होण्याची शक्यता अजिबात नव्हती तरी देखील, तो विचार देखील मनात न आणता, त्याने आमच्यावर अतोनात माया केली.
ईश्वरचे "खाणे" सर्वात मोठा असूयेचा भाग होता. हा माणूस, काहीही, कधीही आणि कितीही खात असे. त्याच्या खाण्याला कसलीच काळवेळ नसायची. अंगात मधुमेह ठाण मांडून बसलेला, रक्तदाबाचा विकार नव्याने जडलेला तरीही बेमुर्वतपणे सगळ्या गोळ्या बाजूला सारून, याचे ड्रिंक्स आणि खाणे चालायचे.
याचा परिणाम झाल्याशिवाय कसे राहील. १९९७ मध्ये, त्याच्या अचानक छातीत दुखायला लागले तशी तिथल्या हॉस्पिटलमध्ये भरती केले.डॉक्टरने, त्याच्या बायकोला, पथ्य पाण्याबाबत बाबत सूचना दिल्या आणि घरी रवानगी केली. तेरड्याचा रंग ३ दिवस, या न्यायाने, ईश्वरने आठवडाभर सगळे निमुटपणे सहन केले आणि परत पहिले पाध्ये पंचावन्न. आम्ही देखील त्याबाबत ईश्वरशी जरा गंभीरपणे बोललो तशी हसून, त्याने विषय उडवून टाकला.
पुढे, विनय १९९७ च्या डिसेंबरमध्ये आणि मी १९९८ च्या जूनमध्ये डर्बन इथे नोकरी पकडली आणि त्याचा निरोप घेतला. असे असून देखील मी बरेचवेळा त्याच्या घरी जात असे - विशेषत: शनिवार रात्र तिथे काढत असे. आता, सोबतीला, त्याचा मोठा मुलगा आणि त्याची सून देखील असायची. १९९८ च्या ऑक्टोबर मध्ये त्याने पीटरमेरीत्झबर्ग इथे मुलाचे लग्न केले. त्यावेळी, त्याने मला आणि विनयला, लग्नघरी आणण्यासाठी चक्क गाडी पाठवली होती. लग्न अत्यंत आलिशान पद्धतीने केले, अगदी वैदिक पद्धतीने. तेंव्हाच,मला, ईश्वर खंगलेला दिसला. तसे मी त्याच्या बायकोशी बोलून दाखवले पण तिने देखील थोडेसे उडवून लावले.
१९९९ च्या फेब्रुवारीत, विनयचा मला फोन आला, "अनिल, ईश्वर गेला"!! मनाला चटका बसला. माणूस थोडा खंगलेला भासला पण, इतक्यात असे काही घडेल, याची सुतराम शक्यता नव्हती. घरी आल्यावर, आमच्या ग्रुपमधून माहिती कळली, आदल्या रात्री छातीत दुखत असताना देखील, नेहमीप्रमाणे ड्रिंक्स घेतले आणि मध्यरात्री छातीतील कळा वाढायला लागल्या. वीणाला त्रास होऊ नये म्हणून, तसाच भेलकांडत बाथरूममध्ये गेला आणि तिथेच कोसळला!! काही मिनिटांचा खेळ.
जाताना, त्याच्या मनात काय विचार आले असतील? ज्या कुणी व्यक्ती डोळ्यासमोर आल्या असतील? त्यात मी असेन का? असले अनेक निरर्थक प्रश्न मनात आले.मैफिलीचा राजा मात्र निघून गेला होता. त्यानंतर मी अनेकवेळा त्या गावात गेलो पण, प्रत्येकवेळी "कृष्णेकाठी आता पहिले कुंडल उरले नाही" असेच वाटत राहिले.

रात्र काळी घागर काळी

आपल्याकडे संत काव्याला संगीतबद्ध करायची मोठी परंपरा आहे आणि त्यानिमित्ताने संत काव्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचले, ही फार मोठी उपलब्धी म्हणायला हवी. संत काव्याचा नेमका अर्थ कळला नाही तरी देखील सुरांच्या साहाय्याने. तेच काव्य परिचित वाटायला लागते. नुसते वाचताना काव्याचा आस्वाद अवघड जातो कारण संत काळातील मराठी आता जवळपास लयालाच गेली आहे. कुठलेही काव्य वाचताना जर का एखाद्या शब्दाचे अचूक अर्थ मिळाला नाही तर एकूणच आस्वादात विक्षेप निर्माण होतो, हे मान्यच करायला हवे. 
आपले भारतीय संगीत भक्तीपर संगीत आहे, असे विधान वारंवार केले जाते. असे म्हटले जाते कारण भक्तिसंगीत फार पूर्वापार चालत आलेले आहे, त्याला इतिहास आहे. सर्वसाधारणपणे इ.स. ८०० पासून भक्तिसंगीत वेगवेगळ्या देवळांत फिरू लागले. इतिहास हेच सांगतो, संतकवी आणि तत्वज्ञानी भक्तांमुळे वैष्णव भक्ती देशभर फैलावली. याचाच परिणाम महाराष्ट्रात भक्तिसंगीताचा फैलाव प्रचंड प्रमाणात झाला. संगीतशास्त्रात ज्या ६ कोटी सांगितल्या आहेत, त्यातील धर्म संगीत कोटीच्या जवळ भक्तीसंगीत येते आणि याचा परिणाम, भक्ती संगीत धर्मपर झाले. 
आजची आपली संगीतरचना, संत नामदेवांच्या अभंगावर आधारलेली आहे. कवी म्हणून विचार करायचा झाल्यास, संत ज्ञानेश्वरांच्या बरोबरीने वावर केल्यावर, साहजिकच "ज्ञानेश्वरी" बरोबर तुलना होणे साहजिकच ठरते. कवितेतील काव्य आणि आशय, याबाबतीत नामदेवांच्या रचना काहीशा कमी पडतात, हे म्हणावेच लागेल. असे असून देखील त्यांचे अभंग अतिशय लोकप्रिय झाले कारण त्यातील सरळ, साधी अभिव्यक्ती. अर्थात या अभंगाची भाषा ही जवळपास ७०० ते ८०० वर्षांपूर्वीची असल्याने त्याकाळातील मराठी आणि काही शब्द याबाबत अनभिज्ञता निर्माण होते. उदाहरणार्थ "बुंथ" (आवरण), " एकावळी " (एक पदरी हार), " कांस कांसिली " (नेसलेले लुगडे/पातळ). आता हे शब्द सध्याच्या काळात कुणीही वापरात नसल्याने बाद झाले आहेत (मी या गाण्याच्या निमित्ताने अर्थ शोधून काढले इतकेच).  काव्य म्हणून बघायला गेल्यास, एका किर्र रात्री, एक अभिसारिका किंवा गोपी, कालिंदीच्या काठावर घागर घेऊन पाणी भरायला निघाली अर्थात पाणी भरणे हे एक निमित्त परंतु त्या निमित्ताने कृष्णाचे दर्शन घेण्याचा ध्यास. आता ती निघाली, त्यानिमित्ताने तिची वस्त्रप्रावरणे, स्पंदने आणि विष्णुदासांचा लटका विरोध इत्यादी घटना यात येतात.  

रात्र काळी, घागर काळी 
यमुनाजळे ही काळी वो माय 

काव्याच्या ओळी वाचतानाच, शाब्दिक लय आपल्याला सापडतो आणि एकामागोमाग ओळींचा ध्वन्यार्थ ध्यानात येतो. संत काव्याचा एक विशेष सान्गता येईल, बरेचवेळा आशय थेटपणे मांडला जातो ,उगीच  आडवळणे  घेतली जात नाहीत. 
संगीतकार दत्ताराम गाडेकर आहेत. इथे एक प्रश्न नेहमी उद्भवतो. दत्ताराम गाडेकर आणि असेच काही संगीतकार, यांची कारकीर्द अतिशय अल्पकाळ असल्याने मूल्यमापनाच्या दृष्टीने फार अडचणी निर्माण होतात. हिंदीत एखादा दुसरा चित्रपट केल्याचे वाचायला मिळते आणि मराठीत काही भावगीते स्वरांकित केली. तेंव्हा या संगीतकाराचे मूल्यमापन हे याच गाण्याच्या संदर्भात होईल. चाल अगदी सरळ, सोपी  आहे, कुठेही कसलीच वक्र लय नाही की प्रयोग केलेले नाहीत. यात गमतीचा भाग असा आहे, आपल्याकडे सोपी चाल निर्माण करणे, याला फारशी मान्यता मिळत नाही जणू काही सोपी चाल कुणीही करू शकतो. प्रत्यक्षात सोपी चाल तयार करण्यासाठी तितकाच आवाका असणे जरुरीचे असते. 
बुंथ  काळी, बिलवर काळी 
गळा मोतीं एकावळी काळी वो माय

गायक गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर आहेत. गायक म्हणून आकाशवाणीने प्रसिद्धीच्या झोतात आलेले हे गायक. विशेषतः: मराठी भावगीतांच्या प्रांतात गोविंद पोवळ्यांनी लक्षणीय योगदान दिलेले आहे. गायक म्हणून विचार करताना काही खास बाबी ध्यानात येतात. आवाजाचा पल्ला फार विस्तृत नाही, शक्यतो छोट्या हरकती घेण्याकडे अधिक कल. गेल्यावर शास्त्रोक्त संगीताची तालीम झाल्याची काही खास लक्षणे दिसत नाहीत. (खरंतर ललित संगीतासाठी रागदारी सांगीताची "तालीम" घ्यायलाच हवी, हाच मानदंड फार चुकीच्या अर्थाने मांडला गेला आहे) 

मी काळी काचोळी काळी 
कांस कांसिली ते काळी वो माय

तंत्राच्या दृष्टीने मांडायचे झाल्यास, गोविंद पोवळ्यांच्या आवाजात, भारतीय संगीतात "गमक" म्हणून प्रसिद्ध असलेला आवाजाचा लगाव ऐकू येतो तसेच आवाज जलद गती पेलू शकतो. या गाण्याची चाल थोडी द्रुत आहे पण छोट्या हरकती सुरेखपैकी घेतल्या आहेत,  पण दीर्घ ताण वा तत्सम प्रकार त्यांच्या पसंतीचे वाटत नाही. 

एकली पाण्याला नवजाय साजणी 
सर्वें पाठवा मूर्ती सांवळी वो माय 

हेच वैशिष्ट्य थोड्याफार प्रमाणात प्रभाकर नागवेकरांच्या बाबतीत मांडावेसे वाटते. किंबहुना, या  गाण्यात,दोघांचे आवाज एकमेकांना पूरक असे झाले आहेत. या गायकीला जोडून कोरस गायन घेतले आहे. अशा प्रकारच्या स्वररचना गाताना, गळा हलका ठेवणे तसेच शब्दोच्चार देखील सहज गळ्यातून काढणे गरजेचे असते. विस्तार करू शकता येईल अशा जागा असतात परंतु संगीतकाराने जे गायला सांगितले आहे, त्याच नकाशात वावर करून आपले इप्सित गाठायचे, इतपतच उद्दिष्ट असते आणि त्याबाबत या दोन्ही गायकांनी समयोचित न्याय दिला आहे. 
       
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी 
कृष्णमूर्ती बहू काळी वो माय

आकाशवाणीने अशा असंख्य अपरिचित कलाकारांना प्रकाशाच्या झोतात आणले. गोविंद पोवळे हे नाव या बाबतीत निश्चितच घ्यावे लागेल. वास्तविक स्वतः: संगीतकार आहेत आणि त्यांच्या बहुतेक स्वररचना या आकाशवाणीवरूनच प्रसिद्ध झाल्या. संगीत रचना देखील त्यांच्या गायकीच्या धर्माला अनुसरून केलेल्या आहेत. खरंतर संगीतकार दत्ताराम गाडेकर, गोविंद पोवळे किंवा प्रभाकर नागवेकर, ही सगळीच फार गुणी कलाकार परंतु योग्य संधीच्या अभावी फारशी लोकमान्यता मिळू शकली नाही, हेच खरे. 


Saturday, 9 March 2019

डेव्हिड गॉवर

१९७८ साली, पाकिस्तान इंग्लंडशी कसोटी सामान्यांची मालिका खेळण्यासाठी आली होती. एजबॅस्टन कसोटी सामन्यात एक कुरळ्या केसांचा पोरसवदा वाटणारा, काहीसा संथ चालणारा परंतु आत्मविश्वासाने भारलेला तरुण नव्याने प्रवेश करीत होता. इंग्लंडमधील काऊंटी सामने बरेच गाजवले होते पण यापूर्वी देखील अनेक खेळाडू अनेक काऊंटी सामने गाजवून दिमाखात कसोटी सामन्यात प्रवेश करतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशाचे धनी होतात. पाकिस्तान संघातील बरेचसे खेळाडू तेंव्हापासून इंग्लंडमध्ये वारंवार खेळत असल्याने, (दुसरा संघ वेस्टइंडीज) त्यांना या खेळाडूंची माहिती होती. गोलंदाज लियाकत अलीने पहिलाच चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा टाकला आणि या खेळाडूने इतक्या सहजतेने पूलच्या फटक्याने चौकार वसूल केला की बघणारे अचंबितच झाले. कसोटी सामन्यातील पहिलाच चेंडू ज्या आत्मविश्वासाने तडकावला होता, तो आत्मविश्वास या खेळाडूंबरोबर कायम स्वरूपी वास करून होता. डेव्हिड गॉवरचे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील पदार्पण हे असे दणक्यात साजरे झाले. गॉवर काउंटी सामन्यात खोऱ्याने धावा करत होता पण भारतात त्यावेळी तशी फारशी माहिती कळायची नाही. सटीसामासी "विस्डेन"चा अंक वाचायला मिळायचा आणि त्यातून बऱ्याच क्रिकेट सामन्यांचे वृत्त वाचायला मिळायचे. 
अशा पदार्पणाचे तेंव्हा बरेच कौतुकही झाले होते. मला वाटते, त्यावेळी स्पोर्ट्स स्टार मासिकाच्या मुखपृष्ठावर याची छबी झळकली होती. काहीसे सुस्तावलेले डोळे, चक्क आळशी वाटावा अशा हालचाली पण हातात बॅट आली की संपूर्ण अवतार बदलायचा. डावखुरे फलंदाज निसर्गत:च शैलीदार, देखणे असतात, त्यातून गॉवरला जन्मजात कवच-कुंडले लाभावित अशी शैली लाभली होती. वर मी त्याच्या पूल या फटक्याविषयी लिहिले पण फलंदाजीच्या भात्यामधील जवळपास सगळेच स्ट्रोक्स हा खेळाडू अतिशय सहजपणे खेळत असे. फटका मारताना, त्याने कधी जोर लावला आहे, इम्प्रोवाईज करण्याचा प्रयत्न केला आहे असे कधीच वाटले नाही. पेळूतून हळुवारपणे सूत निघावे त्या धर्तीवर हा फलंदाजी करायचा. गॉवरच्या खेळात एकाच गोष्टीचा अभाव होता - एखाद, दुसरी मालिका वगळल्यास, कामगिरीत सातत्याचा कायम अभाव राहिला. कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळून १८ शतके, हे काही असामान्यत्वाचे लक्षण नव्हे पण सांख्यिकी शास्त्र इथेच अपुरे पडते. ५० धावा काढल्या पण शतक नाही, असा एक मानदंड निर्माण झाला आहे पण यातून, सामना कुठल्या स्थितीत होता? त्या ५० धावांचे नेमके मोल कसे करायचे? इत्यादी प्रश्न उद्भवतात. 
त्यातून गॉवर जेंव्हा इंग्लंडचा कप्तान होता, तेंव्हा इंग्लंडला ५-० असा लागोपाठ दोन मालिकेत वेस्टइंडीजकडून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आणि त्याहून वाईट म्हणजे त्याची वैय्यक्तिक कामगिरी देखील बरीच खालावली. अर्थात अपयशी माणसाला नेहमीच टीकेचे धनी व्हावेच लागते. वेस्टइंडीजचा संघ याच काळात जगज्जेता होता आणि केवळ इंग्लंडच नव्हे तर इतर कुठलाच संघ  टिकाव  धरू शकत नव्हता. इंग्लंड संघातील Alan Lamb वगळता एकही खेळाडू समाधानकारक धावा काढू शकला नव्हता. गॉवर  अति वेगवान गोलंदाजी खेळू शकतो  का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि दुर्दैवाने या प्रश्नाला कधीच समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 
अर्थात इंग्लंडचे पारंपरिक शत्रू - ऑस्ट्रेलिया विरुद्ध मात्र गॉवर भलताच चमकला. १९८५ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका ही निव्वळ गॉवरची मालिका म्हणून गणली जाईल. टेन्टब्रिज इथे १६६, एजबॅस्टनला २१५ तर ओव्हल इथे १५७!! या मालिकेत  फलंदाज खऱ्या अर्थी चमकला - तब्बल ७३२ धावा मालिकेत काढून करंडक इंग्लंडकडे ठेवला. १९८६ मध्ये नेमेचि येतो पावसाळा प्रमाणे धावांचा रतीब आटला!! युट्युब वर २१५ धावांची इनिंग बघायला मिळते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजांचा ताफा भरात होता. थॉमसन (उतरणीला लागलेला!!), मॅकडरमॉट, लॉसन सारखे गोलंदाज होते पण ज्याप्रकारे ३१४ चेंडूत ही इनिंग सजवली होती, ते निव्वळ निखळ सौंदर्य होते. त्यात पारंपरिक पद्धतीचे कव्हर ड्राईव्ह, मिडविकेटला फ्लिक, नाजूक लेट कट तर होतेच पण त्यापलीकडील फटके देखील बघण्यासारखे होते आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे फटका खेळताना शरीराची होणारी लयबद्ध लय!! कुठेही ओढून ताणून खेळण्याचा प्रयत्न नाही, अकारण जोर लावल्याचा आविर्भाव नाही. सगळी इनिंग ही रेशमी धाग्याने गुंफलेली होती. या खेळाडूला "कलाकार" का म्हणायचे याचा हा अनुभव आहे. खरा फलंदाज हा नेहमी कुठे क्षेत्ररक्षक आहे, याची फारशी फिकीर करत नाही. किंबहुना ज्याप्रकारे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ज्या प्रकारे मारतो, तिथे निव्वळ कौशल्यच नव्हे तर खरे सौंदर्य दिसून येते. 
वास्तविक फक्त इंग्लंडचाच विचार केला तर कितीतरी अलौकिक फलंदाजांची नावे घेता येतील पण तरीही गॉवर या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि म्हणूनच उठून दिसायचा. याची फलंदाजी म्हणजे सुंदर अदाकारी असायची. चेंडू नुसता तटवला तरी हाताची हालचाल देखणी असायची, मग एखादा कव्हर ड्राइव्ह बघणे म्हणजे एखादे नयनरम्य नैसर्गिक चित्र जिवंत व्हावे,या असेच असायचे. कुठेही बेंगरूळपणा नावालाही दिसायचा नाही. यांच्या फलंदाजीला मर्यादा नव्हत्या का? असा प्रश्न विचारला तर काही दोष दाखवता येतील पण मग निर्दोष फलंदाज फक्त पुस्तकातूनच अवलोकिता येईल. इथे कुणीही खेळाडू champion नाही. प्रत्येक फलंदाजात काही ना काहीतरी कमतरता ही असतेच. अशा वेळी, या सगळ्या मर्यादा समजून घेऊन, जर का एखादा फलंदाज आपल्याला फलंदाजीचे अननुभूत सौंदर्य दाखवत असेल तर त्याला रुक्ष अशा आकडेवारीत अडकवणे योग्यच नाव्हे आणि आकडेवारीत न अडकता, फलंदाजीचे अलौकिक सौंदर्य दाखवून देणाऱ्या मोजक्या आणि अतिशय दुर्मिळ झालेल्या फलंदाजांच्या नामावळीत डेव्हिड गॉवर आपले नाणे खणखणीतपणे वाजवून घेतो.