Wednesday, 28 September 2022
आप की आँखो में कुछ महके हुए अंदाज हैं
१९७० च्या दशकात, हळूहळू हिंदी चित्रपट कथानकाच्या दृष्टीने *कात* टाकायला लागला. प्रेमकहाण्या होत्याच परंतु कहाण्यांचे स्वरूप, भाषा, विषय,हाताळणी, यात बदल व्हायला लागला. त्यामुळे एकूणच चित्रपट अधिक चोखंदळ झाला. भाषा *नाटकी* न होता, त्याला सामान्य माणसांच्या बोलीचे स्वरूप प्राप्त झाले. अर्थात अजूनही *नवसिनेमा* हा शब्द ऐकायला मिळाला नव्हता परंतु येणारा चित्रपट, सामान्य माणसांच्या वेदनांचे रूप घेऊन अवतरायला लागला होता. याच विचाराचे प्रतिबिंब *घर* या चित्रपटात बघायला मिळाले. आपल्याकडे आजही *बलात्कारीत* स्त्री कडे बघण्याच्या दृष्टिकोन, बराचसा *शिसारी* आणणारा असतो, जरी प्रत्यक्ष त्या स्त्रीची कसलीही चूक नसते. पुरुषप्रधान संस्कृतीचे हे आजही प्रधान अंग आहे.
याच पार्श्वभूमीवर आधारित आजचे गाणे ऐकायला घेऊया. नुकतेच लग्न झालेले असते आणि घरांतील वडीलधारी माणसांच्या मनाविरुद्ध जाऊन केलेले लग्न. अर्थात नव्हाळीचा रंग उतरलेला नसतो आणि अजूनही एकमेकांची पुरती ओळख देखील झालेली नसती. या परिस्थितीतील प्रणयोत्सुक भावनेचा ओलसर रंग अनुभवत असलेल्या जोडप्याचे हे गाणे आहे.
प्रसंग नेमका जाणून घेऊन, प्रसिद्ध शायर गुलजार यांनी कविता लिहिलेली आहे. गुलजार शक्यतो मळलेल्या वाटेने चालत नाहीत. प्रचलित शब्दच कवितेत वापरतात पण त्या शब्दांची जडण-घडण वेगळ्या धर्तीवर करतात आणि आपल्यासमोर आशयाचा नवीन अद्भुत आविष्कार करून दाखवतात. *लब हिले तो मोगरे के फुल खिलते हैं कहीं* हीच पहिल्या कडव्याच्या सुरवातीची ओळ, किती सुंदर अभिव्यक्ती आहे. *लब* म्हणजे *ओठ*! एकदा हा अर्थ ध्यानात आल्यावर मग पुढील मोगऱ्याच्या फुलांची संगती लागते. कवितेतील शब्द असे असावेत की ते शब्द, हीच अपरिहार्यता असावी. तिथे दुसरा कुठलाही शब्द *उपरा* वाटणार. सक्षम कवितेचे हे एक प्रधान अंग मानावे लागेल. ध्रुवपदात - *आँखो में कुछ महके हुए अंदाज* हा विचार मांडल्यावर, त्याची परिपूर्ती तशाच काव्यात्म अंदाजातच व्हायला हवी. मुळात प्रसंग ध्यानात घेतल्यावर मग या सांगायचं कवितेतील तार्किक संगती लागते. ध्रुवपदातील भावना, पुढील कडव्यांतून विस्तारित करताना, मग प्रणयोत्सुक छेडछाड येणे अपेक्षित असते. दुसऱ्या कडव्यातून हेच आपल्याला वाचायला मिळते. *बातों में फ़िर कोई शरारत नहीं* लेकिन फिर *आपकी बदमाशीयों के ये नये अंदाज हैं*! इथे भावनांची पूर्तता होते. आता संपूर्ण कविता वाचल्यावर कुठेही अगम्य, अवघड शब्द वाचायला मिळत नाहीत परंतु शब्दांची घडण अशाप्रकारे होते, तिथे आशय वेगळ्याच अनुभूतीतून समोर येतो. हे जे *वेगळेपण* आहे, इथे कवी आणि कविता मनाला भावते आणि खरंतर *भावकविता* वाचायला मिळते.
संगीतकार राहुल देव बर्मन यांनी स्वररचना करताना, शब्दांचे हेच वेगळेपण ध्यानात घेऊन, स्वररचना केली आहे. चाल *केदार रागाच्या* साहचर्यात बांधली आहे. या रागात कितीतरी हिंदी गाणी तयार झाल्याचे, आपल्याला माहीत असेल. काही गाणी तर रागाचे प्रचलित चलन लक्षात घेऊन, त्यावर आधारित गाणी बांधल्याचे,बघायला मिळाले आहे. अर्थात राहुल देव बर्मन हे शक्यतो रागाची प्रचलित स्वरचौकट मोडून रचना करणारे संगीतकार म्हणून ख्यातकीर्त आहेत. इथेही आपल्याला हेच ऐकायला मिळते. क्वचित *कोमल निषाद* स्वरांचा उपयोग केला जातो परंतु *दोन्ही मध्यम आणि इतर शुद्ध स्वर* हेच या रागाचे प्रमुख अंग मानले गेले आहे. आता या दृष्टीने स्वररचनेतील मुखडा आपण बघू.
*आप /की /आंखो / में /कुछ*
*रे ग सा/नि प /सा नि नि/नि /नि* इथे *नि कोमल* आहे.
*महके /हुए /से /राज /हैं*
*निरे सारे/सा ध /ध नि /(रे ग म ग)/मग रेग सा...*
*आप /से /भी /खूबसूरत*
*ध प /(ध प म)/म /म प (ध)प म ग सा*
*आपके / अंदाज /हैं*
*सारे सा नि....ध/ध...नि(रे ग म ग)/म ग रे सा*
इथे स्वरलिपी लिहिण्यामागे एकच उद्देश आहे, चालीत *कोमल निषाद* कसा चपखलपणे बसवलेला आहे जो खरतर केदार रागाच्या चलनात बसत नाही. ललित संगीताचे खरे सौंदर्य बघायला गेल्यास, रागाचा आधार घ्यायचा परंतु त्याच्या आजूबाजूचे *वर्जित* स्वर देखील त्यात सामील करून घ्यायचे आणि स्वररचनेचे स्फटिकीकरण करून, आपल्या व्यासंगाचा परिचय करून द्यायचा. राहुल देव बर्मन यांनी देखील गुलजार यांच्या प्रमाणेच मळकी वाट सोडून, नवी वाट *निर्माण* करण्याचे धाडस दाखवले. अगदी दुसरे उदाहरण याच गाण्याच्या संदर्भात बघायचे झाल्यास, गाण्यातील *ताल केरवा* बघावा. केरवा तालाचे चलन आणि या गाण्यातील मात्रांचे चलन, जरी सारखे असले तरी *पारंपरिक* नाही. राहुल देव बर्मन यांनी आयुष्यभर तालाच्या मात्रांशी सतत *खेळ* मांडला होता, मग तालातील *धा* ही मात्रा चक्क *गिटार* वाद्यावर घ्यायची आणि इतर मात्रांचे *वजन* कमीजास्त प्रमाणात ठेवायचे. तालाच्या मात्रांशी सतत वेगवेगळ्या नजरेतून *खेळायचे*, हेच सूत्र नेहमी अंगिकारले होते.
गाण्यात अनेक ठिकाणी, या संगीतकाराने *मींड* तसेच *मुरकी* या अलंकाराचा उपयोग केलेला दिसतो. उदाहरणार्थ ध्रुवपदातील *आप* हा शब्द किंवा *आँखो* या शब्दांवर छोटी का होईना *मींड* घेतलेली ऐकायला मिळते. पुढे पहिल्या अंतऱ्यात *लब हिले* इथे *हिले* या शब्दावर धैवत स्वरावर छोटीशी मींड घेऊन, शब्दाचा स्वरिक अर्थ अधिक खोल करून दाखवला आहे.अशी अनेक सौंदर्यस्थळे या गाण्यातून दाखवता येतील परंतु मग या लेखाची लांबी प्रमाणाबाहेर जाण्याची भीती असल्याने, इथेच थांबतो.
किशोर कुमार आणि लताबाईंचे गायन, हा आणखी वेगळा भाग जिथे या गाण्याची *खुमारी* अधिक वाढते. गायन *शब्दभोगी* आहे!! याचा अर्थ काय? कवीने मांडलेल्या शब्दांचे *उच्चारण* हे, त्या आशयाचा अचूक *अर्क* दाखवून देतात. असे गायन कधीच सोपे, सरळ नसते. मुळात, कवितेची *जाण*, गायकाला असण्याची जरुरी असते. कवितेत कुठल्या शब्दाला *महत्व* आहे, त्याचे उच्चारण कशाप्रकारे केल्यास, शाब्दिक आशयाचे विस्तारीकरण होऊ शकेल, इत्यादी मुद्दे इथे महत्वाचे ठरतात. किशोरकुमार या गायकीत *माहीर* होता. अगदी मुखड्याच्या सुरवातीपासून किशोरकुमार, शब्दांना *गोंजारून* गायन करताना दिसतो. नेहमीचे *यॉडलिंग* तर इथे तिळमात्र ऐकायला मिळत नाही. आणि लताबाई! शब्दोचित गायकी कशी मांडायची याचा सुंदर आलेख इथे बघायला मिळतो. *बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं* ही ओळ संपवताना, किंचित किणकिणत्या स्वरांची *जोड* दिली आहे आणि त्याच स्वरांत पुढील ओळ सुरु केली आहे. *शब्दप्रधान गायकी* कशी गायला हवी, याचा सुंदर मानदंड, या दोघांनी प्रस्थापित केला आहे. दुसरा मुद्दा असा मांडता येईल, इतक्या शांत,संयत प्रकृतीच्या स्वररचनेत *गायकी* कशी मांडता येते, हे देखील या दोन्ही गायकांनी दाखवून दिले आहे. एखादी हलकी मुरकी देखील, स्वरिक सौंदर्यात किती वैविध्याने भर टाकते, या दृष्टीने यांचे गायन असामान्य ठरते. तेंव्हा अशा सगळ्याच दृष्टीने अप्रतिम ठरलेल्या गीताची लोकप्रियता आजही अबाधित आहे, यात नवल ते काय!!
आप की आँखो में कुछ महके हुए अंदाज हैं
आपसे भी खूबसूरत, आपके अंदाज हैं
लब हिले तो मोगरे के फुल खिलते हैं कहीं
आप की आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं
आपकी खामोशियां भी आपकी आवाज हैं
आपकी बातों में फ़िर कोई शरारत तो नहीं
बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं
आपकी बदमाशीयों के ये नये अंदाज हैं
आपकी आँखों में कुछ 4K Song: Ghar | Kishore K, Lata Mangeshkar | R D Burman Hits | Vinod Mehra, Rekha - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment