Sunday, 18 September 2022
मैं सोया अंखिया मिचे
आपल्याकडे कारण नसताना, एक मुद्दा, विशेषतः जनसंगीतात नेहमी मांडला जातो. रचनाकाराने नेहमी संगीताचे *पायाभूत* शिक्षण घेणे आवश्यक आहे. एका मर्यादित अर्थाने हे विधान चुकीचे नाही पण त्याबाबत कायम आग्रह धरणे कितपत योग्य आहे? त्यामुळे प्रश्न उद्भवतो, ज्या कलाकारांनी असे पायाभूत शिक्षण घेतले नसेल तर त्यांची निर्मिती ग्राह्य धरायची की नाकारायची? अशा प्रकारची विचारधारा,त्या कलाकारावर अन्याय तर करत नाही का? विशेषतः हिंदी चित्रपट संगीताच्या प्रांगणात या विधानाचे नको तेव्हडे प्राबल्य माजले आहे. उदाहरणे तुरळक असतील पण नक्की आहेत. किंबहुना, अशा रचनाकारांनी जेंव्हा शास्त्रोक्त ढंगाची गाणी तयार केली तेंव्हा काही क्षण तरी मन दिढ:मूढ होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे या रागावर आधारित रचनांमध्ये कसलेही न्यून सापडत नाही! अशा वेळी निश्चितच प्रस्तुत विधान कायम उराशी बाळगून आपण अशा रचनाकारांवर अन्याय करत असतो.
अशाच एका रचनाकाराने आजची रचना केलेली आहे - *मैं सोया अंखिया मिचे* या गीताचे जनक हे सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी.नैयर आहेत. अर्थात या गीताबद्दल आपण नंतर थोड्या विस्ताराने चर्चा करूया. या गीतासाठी सुप्रसिद्ध उर्दू शायर कमर जलालाबादी आपली शब्दकळा पुरवली आहे. त्यांनी खरंतर अनेक चित्रपटांसाठी गीतरचना केल्या आहेत आणि बव्हंशी लोकप्रिय झालेल्या आहे. अर्थात सातत्य राखणे तसे खूप अवघड असते तरी एका मर्यादित तत्वाने विचार केल्यास, या कवितेत काही ढोबळ, सांकेतिक शब्दरचना आढळते पण एक,दोन ठिकाणे चमकदार शब्दयोजना केलेली आढळते. मुखड्यातील पहिल्याच ओळीत *अंखिया* शब्दाची जोड *झुल्फ* या शब्दाने केलेली, फार वेधक आहे परंतु पहिल्या कडव्याचा शेवट करताना * तू आजा और मैं पीछे* सारख्या काहीशा सपक शब्दांनी केला आहे. अर्थात, इथे एक बाब लक्षात ठेवायला हवी, चित्रपट गीत करताना, संगीतकाराचा *स्वरिक आकृतिबंध* महत्वाचा असतो. संगीतकाराने जो चालीचा *मीटर* आखून दिलेला आहे, त्याच्या मर्यादेतच शब्दरचना करायची असते. हे एक प्रकारे *शब्दांचे क्राफ्टिंग* म्हणायला हवे. *तारों को पसिना आया* सारखी एखादी ढोबळ शब्दकळा वाचायला मिळते. प्रणय गीत ही चित्रपट संगीताची कायमच मागणी असते आणि प्रत्येकवेळेस, कुठल्याही कवीला आपल्या व्यासंगाचा *फुलोरा* अतिशय मर्यादित ठेवावाच लागतो. ही एक प्रकारची शाब्दिक कसरत असते आणि या कसरतीतून कुठलाच कवी नामानिराळा राहू शकलेला नाही. कदाचित म्हणूनच *चित्रपट गीतांना* काव्य म्हणून आवश्यक अशी मान्यता मिळत नाही.
अर्थात या गाण्याची खरी खुमारी ही स्वररचनेत आहे. *राग पिलू* वर आधारित रचना आहे. वास्तविक राग पिलू हा लोकसंगीताच्या संकरातून बनला आहे, असे अनेक मान्यवर मानतात आणि म्हणूनच हा राग *मौखिक* सादरीकरणात ऐकायला फारसा मिळत नाही परंतु ठुमरी,चैती,होरी, गझल अशा उपशास्त्रीय संगीतात या रागाचे उपयोजन विपुल प्रमाणात आढळते. आता ठुमरी, चैती वगैरे गीतप्रकार हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहार भागातून आल्याचे दाखले बघायला मिळतात तेंव्हा याच भागातून पिलू रागाची उत्पत्ती झाली असावी, असे म्हणायला वाव आहे.
मुळात राग पिलू हा प्रणयी आणि विरही थाटाच्या रचनांसाठी प्रसिद्ध आहे, अशा या गीतात त्याचे प्रत्यंत पडणे, क्रमप्राप्तच ठरते. अगदी गीताच्या पहिल्या सुरापासून,, दोन्ही गंधार, धैवत आणि निषाद स्वरांचे प्राबल्य दिसते आणि प्रामुख्याने, कोमल स्वरांनी या गीताला नटवले आहे. एकूणच या चित्रपट गीताचे चित्रीकरण बघता, हळुवार स्वरांची योजना करणे काहीसे भाग पडते, असे म्हणता येईल. अगदी मुखड्याची स्वररचना बघितल्यास, *मैं सोया अंखिया मिचे* अशा शब्दांना तशाच प्रकारच्या नाजूक स्वरांचे कोंदण मिळायलाच हवे. संगीतकार नैयर यांच्या बाबत एक आक्षेप नेहमी घेतला जातो आणि तो म्हणजे, मुखडा बांधून झाला की त्याच्याच सावलीत पुढील अंतरे बांधलेले असतात. वास्तविक पाहता, नवनवीन अंतरे बांधणे, हे सर्जनशीलतेचे विकासशील रूप होय परंतु हा संगीतकार त्या वाटेला फारसा गेल्याचे आढळत नाही. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, वेगवेगळ्या लयबंधाने लक्ष वेधले जाते तरीही मन गुंतते, ते निव्वळ सुरावटीवर. याचा परिणाम, या संगीतकाराकडून नवनवीन मुखडे फार तुरळकरीत्या बांधलेले दृष्टीस पडतात आणि हा काहीसा अपरिहार्य भाग आहे. आता जरी पहिल्या अंतऱ्याची सुरवात वरच्या पट्टीत केलेली ऐकायला मिळते पण जरा बारकाईने ऐकल्यास, मुखड्याच्या स्वररचनेची पुनरावृत्ती, जरा वेगळ्या ढंगात केली आहे, हे समजून घेता येते.
एक महत्वाचा मुद्दा, सर्वसाधारणपणे नैयर यांना, *तालगीताचे* संगीतकार मानले जाते आणि याचे कारण त्यांच्या स्वररचनेत तालावर भर अधिक दिसतो, विशेषतः तालातील *ठेका*, यावर या संगीतकाराचा सर्वाधिक भर असतो. थोडे बारकाईने ऐकले तर हा आक्षेप फार चुकीचा नाही परंतु समग्र कारकीर्द बघितली तर, ज्याला *मेलडी* म्हणता येईल, अशा धाटणीची गीते त्यांनी बांधली आहेत पण आपल्यालाच प्रत्येक कलाकाराला कुठल्या ना कुठल्यातरी *लेबल* मध्ये अडकवल्या खेरीज चैन मिळत नाही. हा त्या संगीतकारावर अन्याय असतो. प्रस्तुत गीत, माझ्या या विधानांना पुरावा म्हणून सांगता येईल.
एखादी मंजुळ सुरावट गायला मिळाली की गायक कसे *सोने* करतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून या गाण्याचा निर्देश करता येईल. अतिशय शांत, ओघवती स्वररचना आहे, परंतु त्यातील गोडवा नेमका ओळखून, मोहमद रफी आणि आशा भोसले यांनी गायन केले आहे. वास्तविक पहाता रफी यांचा आवाज बराचसा पहाडी ढंगाकडे झुकणारा तरी देखील इथे या गाण्यात त्यांनी आपली शैली अत्यंत वेगळी ठेवली आहे. मुळात चाल तशी असल्याने, कुठेही अनावश्यक हरकती,ताना वगैरे अजिबात नाहीत. अंतऱ्याच्या सुरवातीला आशा भोसले यांचा थोडा *आलाप* ऐकायला मिळतो पण तो स्वररचनेला अतिशय सुसंगत आहे. गाण्याचे सौंदर्य वाढवणारा आहे. गायन करताना, स्वतःची खास वैशिष्ट्ये तर दाखवली आहेतच, जसे आशाबाईंच्या गळ्यातील स्वरांचा पल्ला वगैरे पण कुठेही त्यांची कुरघोडी नाही. एका सुंदर, सोप्या लयीत गायन केले आहे. रफी यांनी देखील प्रसंगी *कुजबुजत्या* स्वरांचा वापर केला आहे आणि एकूणच गाण्याच्या प्रकृतिधर्माशी सुंदरपणे जोडला आहे, कुठेही जरादेखील *नाट्यात्मता* आढळत नाही. अर्थात याचे श्रेय थोडेफार संगीतकाराकडे जाऊ शकते. शब्दांना गोंजारून कसा विशिष्ट परिणाम साधायचा, यासाठी हे गायन बारकाईने अनुभवावे.
मैं सोया अंखिया मिचे, तेरी झुल्फो के नीचे,
दुनिया को भूल दिवानी, अब रहा जमाना पीछे.
ये कौन हंसी शरमाया, तेरी बाहो के नीचे
अब चाहे कही भी ले जा, तू आजा और मैं पीछे.
ये मेरे नैन कंवारे, तेरी अंखिया देख के हारे,
ओ जनम-जनम के साथी, मेरी मांग में भर दे तारे.
Main Soya Akhiyan Meeche - Phagun 1958 - Madhubala Song - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment