Thursday, 22 September 2022

इतना ना मुझसे तू

आपल्या भारतीय संगीतात जरी फार पूर्वी वाद्यसंगीत प्रचलित होते तरी मध्ये कुठेतरी ही परंपरा खंडित झाली आणि आपण प्रामुख्याने *मौखिक* संगीताकडे पूर्णपणे वळलो. असे म्हणतात, १५व्या शतकात अमीर खुसरोने *सतार* वाद्याचा शोध लावला. अर्थात या विधानावर बरीच मतांतरे आहेत तरी १९व्या शतकापर्यंत तरी आपल्याकडे *वाद्यवादन* जवळपास नव्हते, असे म्हणता येईल. हळूहळू, भारतीय संगीतात वाद्यांचा प्रवेश होत गेला आणि आता तर वाद्यसंगीत पूर्णपणे प्रतिष्ठित झाले आहे. निरनिराळ्या वाद्यांनी भारतीय संगीतात नवे रंग, नवे प्रवाह आणले आणि एकूणच भारतीय संगीत अनेकांगाने फुलवले गेले. असे झाले तरी, भारतीय संगीतात *वाद्यमेळ* ही मुळातली पाश्चात्य संगीतातील संकल्पना फारशी रुजली नाही आणि जिथे ही कल्पना रुजली, ते *जनसंगीत - चित्रपटसंगीत* मात्र फार लवकर लोकप्रिय झाले. चित्रपट माध्यम अल्पावधीत लोकप्रिय झाले आणि तद्नुषंगाने *ऑर्केस्ट्रा* पद्धत भारतात रुळली. एकदा ही कल्पना स्वीकारल्यावर मात्र, अनेक सांगीतिक कल्पना, पाश्च्यात्यांकडून आपण स्वीकारल्या, मग तो त्यांचा *ढंग* असेल, किंवा पाश्चत्य वाद्ये असतील किंवा जशाच्या तशा स्वररचना असतील, चित्रपटाने हे सगळे स्वीकारले आणि त्याची यशस्वी रुजवण केली. चित्रपट संगीत अधिक वैविध्यपूर्ण झाले. मी थोडी वेगळ्या अंगाने सुरवात केली कारण आजचे गाणे हे मुळातली प्रसिद्ध *सिम्फनी* हाताशी धरून, केलेले आहे पण *अंधानुकरण* नव्हे. *सांगीतिक चोरी* आणि *सांगीतिक रूपांतरण* यात फार बारीक रेषा असते आणि त्याबाबत ठाम ठोकताळे बांधणे अवघड असते तरी जर का *तौलनिक अभ्यास* केल्यास, फरक ओळखता येतो. आजचे गाणे, *इतना ना मुझसे तू प्यार बढा* हे गाणे म्हटले तर सरळ,सरळ *मोझार्ट* या प्रतिभावंत ऑस्ट्रियन संगीतकाराच्या ४०व्या सिम्फनीवर प्रेरित होऊन बांधलेले आहे. अर्थात, संगीतकार सलील चौधरी, यांनी ही बाब कधीही *लपवून* ठेवली नाही आणि उघडपणे मान्य केले आहे. आपण एकूणच जरा विस्ताराने याचा विचार नंतर करूया. त्याआधी गाण्यातील कवितेचा विचार करूया. प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांनी हे गीत लिहिले आहे. शैलेंद्र यांच्या शैलीबाबत म्हणायचे झाल्यास, भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे तादात्म्य होऊन, त्याच मातीत रुजणारी कविता, असे प्रामुख्याने म्हणता येईल. अर्थात, चित्रपट गीत हे क्षेत्रच असे आहे, इथे प्रसंगानुरूप कविता करणे भाग पडते. अतिशय सोपी आणि सहज समजून घेता येणारी कविता त्यांनी नेहमी दिली. आजच्या गाण्यातील कविता देखील या विधानाला अपवाद नाही. युगुलगीत आहे तेंव्हा पुरुषी आणि स्त्रीत्वाच्या भावना या नेहमी वेगळ्याच असणार आणि तेच प्रमाण ठेवले आहे. आपल्याकडे काय होते, *सोपी* शब्द आला की लगेच आपण हातात तराजू घेतो आणि दर्जा ठरवून टाकतो!! प्रत्यक्षात सहज कविता लिहिणे फार अवघड असते. *मैं एक बादल आवारा* इथे सुरवातीची कल्पना मंडळी आहे आणि लगेच पुढील ओळीत *किसीका सहारा बनूं* आणि शेवटाला *बेघर बेचारा* असे लिहून कल्पना विस्तार पूर्ण केला. अशा अनेक कल्पना या कवितेत आढळतात. *जनम जनम के साथ* म्हणताना *नाम जल की धारा* लिहून अचूक स्त्री भावना मांडली आहे. युगुलगीत पूर्ण झाले. गाण्याची खरी मजा ही स्वररचना आणि त्याचा मागोवा घेण्यात आहे. जर का आपण मूळ सिम्फनी ऐकलीत तर लगेच ध्यानात येऊ शकेल, सलिलदांनी सिम्फनीचा फक्त सुरवातीचा भाग घेतला आहे. वास्तविक सिम्फनीत G Minor आहे, म्हणजे थोडक्यात Minor Scale based on G,consisting G,A,Bb,C,D,Eb and F.इथे B,E या नोट्स, भारतीय भाषेत *कोमल* स्वर आहेत. (पाश्चात्य स्वरलेखन इथे घेता येत नाही, याची कृपया नोंद घ्यावी) वेगळ्या शब्दात, *निषाद* आणि *गंधार* स्वर कोमल आहेत आणि बाकीचे शुद्ध आहेत. आता या स्वरांचे भारतीय *भैरव* रागाशी काय संबंध? आपल्या भैरव रागात तर *रिषभ आणि धैवत* कोमल आणि बाकीचे सगळे शुद्ध स्वरूपात लागतात . (इथे *षड्ज* आणि *पंचम* हे स्वर *अविकृत* असतात, हे धरलेले आहे) म्हणजेच सिम्फनीमधील सप्तक ताडून बघितले तर, काहीही साम्य आढळत नाही. अर्थात हा झाला *तांत्रिक* भाग. गाण्याच्या संदर्भात ऐकायला गेल्यास, सिम्फनीचे सुरवातीचे सूर आणि भारतीय सूर ऐकले तर *ध प प (३वेळा) ग रे सा सा नि* या पठडीत सूर ऐकायला मिळतात. आता हे स्वर गाण्याच्या संदर्भात कसे लागतात, हे बघूया. *इतना ना / मुझसे तू / प्यार / बढा* *ध(को)प प प /ध(को)प प प/ ध(को)प प/प ग(को)* *के / मैं /एक / बादल /आवारा* *ग(को)/ ग(को)रे /रेसा / स नि(को)ध(को)/ ध(को)म प म ग(को)* अर्थात आणखी देखील स्वरलेखन लिहिता येईल. पुढे जाऊन स्वरविस्तार ऐकला तर विस्तार बराच वेगळा आहे. याचाच अर्थ, सलिलदांनी, सिम्फनीचे सुरवातीचे सूर घेतले आणि त्यावर भारतीय बनावटीची चाल निर्माण केली. जरी ढाचा भारतीय अंगाने विकसित केला असला तरी अंतऱ्यामधील वाद्यमेळ हा पुन्हा पाश्चात्य संगीताच्या धर्तीवर रचलेला आहे पण त्यात कुठेही *अंधानुकरण* नाही. इथे काही जण लगेच म्हणतील, मोझार्ट यांनी भैरव रागाचा आधार घेतला तर ते साफ चुकीचे आहे. केवळ आढ्यताखोर व्यक्तीच असे विधान करू शकेल. किंबहुना असे म्हणता येईल, सलिलदांनी हिंदी चित्रपट संगीताला, पाश्चात्य संगीतातील अभिजात संगीतकार मोझार्ट, बीथोवन यांच्या असामान्य स्वररचनांची ओळख करून दिली आणि तशी देताना, भारतीय स्वरतत्व कायम ठेवले आहे. हे अजिबात सोपे नाही. त्यासाठी पाश्चात्य संगीताचा गाढा अभ्यास आवश्यक असतो. गाण्याची सुरवात पाश्चात्य तालवाद्यांनी केली आहे पण अंतरे सुरु करताना, भारतीय बनावटीची तालवाद्य वापरली आहेत. महत्वाचा भाग म्हणजे यात कुठेही लवमात्र विसंगती किंवा जोड वाटत नाही. एखादी पाश्चात्य स्वररचना आपल्याला भारून टाकते पण त्याचा उपयोग करताना, आपल्या संगीतात कसे बेमालूमपणे मिसळता येते, याचे हे गाणे एक अप्रतिम उदाहरण आहे. आपल्यासमोर *भैरव* राग म्हटल्यावर एक पारंपरिक स्वरचित्र उभे राहते परंतु गाणे जरी पारंपरिक ढाच्यातले नसले तरी *आधारभूत* स्वर त्या रागिणीशी नाते सांगतात आणि असे नाते यशस्वीपणे जुळवण्याची असामान्य काम संगीतकार सलिलदांनी केले आहे. आता आपण गाण्याच्या शेवटच्या घटकाकडे वळूया. गाणे अगदी सरळ,सरळ द्रुत गतीत आहे आणि तरीही प्रणयगीताच्या भावनेचे प्रत्यंतर देते. लताबाई आणि तलत यांनी युगुलगीत कसे गावे याचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. वास्तविक लयीला अतिशय अवघड गाणे आहे, गाण्यात पाश्चात्य धाटणीचे सूर आहेत परंतु जो दृष्टिकोन संगीतकाराचा आहे, तोच दृष्टिकोन ध्यानात घेऊन, गायन केले आहे. आता इतक्या द्रुत गतीत गीत बांधले असल्याने, ताना वगैरे अलंकार फारच मर्यादित स्वरूपाचे येतात. गंमत अशी आहे, गाण्यातील भावनांचा परिपोष मात्र सुरेखपैकी सांधला आहे. पहिला अंतरा मुखड्याच्या लयीच्या दुप्पट आहे परंतु गाताना, शब्दांचे औचित्य अत्यंत काळजीपूर्वक सांभाळले आहे. खरंतर हे गाणे संपूर्णतया संगीतकाराचे गाणे आहे. आपल्याच गाण्यावर आपल्या शैलीची छाप कशी सोडायची, याचे हे गाणे अतिशय सुंदर उदाहरण, असे मानता येईल. इतना ना मुझसे तू प्यार बढा, कि मैं एक बादल आवारा, कैसे किसीका सहारा बनूं, कि मैं खुद बेघर बेचारा. इस लिये तुझसे प्यार करूं, के तू एक बादल आवारा, जनम जनम से हुं साथ तेरे, के नाम मेरा जल की धारा. मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं, मेरा साथ कहां तक दोगी तुम,मैं देश विदेश का बंजारा. ओ नील गगन के दिवाने,तू प्यार ना मेरा पहेचाने, मैं तब तक साथ चलूं तेरे, जब तक ना कहे तू मैं हारा. क्यू प्यार में तू नादान बने,एक बादल का अरमान बने, अब लौट के जाना मुश्किल हैं, मैंने छोड दिया हैं जग सारा.

No comments:

Post a Comment