Thursday, 3 February 2022
पुस्तक वाचन
आपल्याकडे "वाचन" म्हटले लगेच काही अप्रस्तुत बाबी समोर येतात. त्यातील महत्वाची बाब म्हणजे पुस्तकातून "समाज प्रबोधन" किती झाले? या प्रश्नाचे उत्तर शोधणे होय. आपल्याकडे समाज प्रबोधन या पदाचा इतका अवास्तव पगडा बसला आहे की त्याशिवाय लिहिलेले साहित्य हे एकतर टुकार साहित्य किंवा ते लिखाण साहित्यच नव्हे, असा विचार प्रचंड प्रमाणात बळावला गेला. परिणामी अनेकांची निर्मिती नाहक दुर्लक्षिली गेली तर काही जणांची लिखाणाची इच्छाच लयाला गेली!! लिखाणात सामाजिक जाणीव असणे ठीक आहे पण ते लिखाणाचे व्यवच्छेदक लक्षण नव्हे. साहित्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक हेतू, असे स्वरूप आहे.
विशेषतः प्रवास वर्णने, विनोदी अंगाने लिहिलेले लेखन इत्यादी साहित्य निव्वळ निखळ स्वरूपात वाचणे जवळपास अशक्य व्हावे असली तिरपागडी अवस्था झाली आहे. खरंतर कुठलेही साहित्य हे निखळ दृष्टीने वाचावे, असे मला वाटते. मुळात, वाचन करताना कुठेही "पूर्वग्रह" मनाशी न बाळगता वाचन केले तर आपल्याला वाचनाचा खरा आनंद मिळू शकतो पण बरेचवेळा वाचनात आलेली समीक्षा किंवा उडत, उडत कानावर पडलेल्या इतरेजनांच्या प्रतिक्रिया, आपल्या वाचनावर गाढ परिणाम करतात आणि आपली निखळ दृष्टी दूषित होऊन बसते. अशा परिस्थितीत केलेले वाचन म्हणजे केवळ छापील शब्दांवरून फिरवलेली नजर, इतपतच असते. आपण आपली समजूत करून घेतो, मी ते पुस्तक वाचले आणि थोडक्यात, इतरांसमोर बढाई मारायला मोकळे होतो!! परंतु हे खरे वाचन नव्हे.
विशेषतः: कवितेसारखे अत्यंत लवचिक आणि अंतर्मुख साहित्य वाचताना तर वरील दृष्टिकोन अतिशय घातक ठरतो. या प्रक्रियेत कविता तर समजून घेणे तर दूरच राहिले परंतु आपण दुरान्वयाने त्या कवींवर अन्याय करीत असतो. अर्थात मनात पूर्वग्रह का बाळगला जातो? एक कारण असे संभवते, आपण आपल्याशीच प्रामाणिक नसतो. आपल्या मतांवर ठाम नसतो. अर्थात हा भाग थोडा मनोविश्लेषणाकडे झुकणारा आहे आणि म्हणून बाजूला ठेवणे श्रेयस्कर. साहित्याचे हेतू काय असतात? हा एक उपप्रश्न या निमिताने समोर येतो. लिहिणारा मनाशी एक ठराविक हेतू बाळगून लिहीत असतो आणि हे तर सर्वश्रुत आहे. मग ते हेतू असंख्य विभ्रमाचे असू शकतात आणि इथेच वाचन करताना गफलत होऊ शकते. लेखकाच्या हेतूशी जर का वाचन सांगड घालू शकला नाही तर मग वाचले जाणारे साहित्य कधीही मनात ठसले जात नाही. नुसतीच पाने उलटली जातात. अर्थात लेखकाचा हेतू ओळखून वाचन करणे, हे वाचनाचा एकमेव निकष नव्हे कारण त्यामुळे आपण आपल्याच विचार चक्रावर बंधने घालतो परंतु लेखकाच्या हेतूविषयी मनात जाण ठेवण्यात काहीही चूक नाही, विशेषतः "गंभीर" विषयावरील लेखनाबाबत लेखकाचा हेतू समजून घेण्याने, एकूणच पुस्तकाची जडण, घडण तसेच विषयचा आपल्या मनावर होणार परिणाम इत्यादी बाबी अधोरेखित होतात. आपण देखील वाचताना तितकेच गंभीर होतो आणि वाचनाला सुरवात करतो.
बरेचवेळा बरेचजण प्रश्न उपस्थित करतात, वाचन कशासाठी करायचे? त्याने काय फरक पडतो? अर्थात बहुतेकांचा रोख आर्थिक उद्दिष्टाकडे असतो परंतु मग हाच विचार केल्यास, कुठलीही "कला" ही "निरर्थक" असते. आस्वादाच्या कक्षेत आर्थिक विचार येणे, हेच आस्वादाच्या प्रक्रियेला मारक ठरते. मी, मघाशी "निखळ" शब्द योजला, त्यामागे हा देखील विचार होता. इथे मी फक्त "आस्वाद" हाच दृष्टिकोन ठेवला आहे. असे बरेचवेळा सांगितलेले जाते, चांगल्या वाचनाने व्यक्तिमत्व प्रगल्भ होते किंवा व्यक्तिमत्व अधिक विचारी बनते. आता हाच विचार डोळ्यासमोर ठेवला तर मग मघाचचा आर्थिक विचार अदृश्य होऊ शकतो.
अर्थात वाचन कसे व्हावे? कुठल्या विषयावर व्हावे? असे अनेक प्रश्न इथे येतात. वाचन "स्वान्तसुखाय" व्हावे, हे तर झालेच परंतु वाचताना इतर कुठलेच विचार मनात न आणता, पुस्तकाच्या विषयाशी "तद्रूप" होता आले , तर बघावे. एक बाब तर निश्चित मान्य करावीच लागेल, वाचन केल्याने आपल्या मनोभूमीत बारा/वाईट फरक पडू शकतो. "वाईट" अशा अर्थी कारण लिखाणातून तुम्ही नेमके काय वेचता? हे फक्त आपण वाचकच ठरवत असतो. तुमच्यावरील संस्कार त्या विचारांना दिशा देतात. सकस वाचनाने तुमच्यावर झालेल्या संस्कारांना बळकटी मिळू शकते, क्वचित प्रसंगी झालेला संस्कार सर्वस्वी वेगळा असेल तर आयुष्याला वेगळी दिशा मिळू शकते. मुळात तुमच्या मनाची मशागत कुठल्या तऱ्हेने झाली आहे? हा प्रश्न महत्वाचे ठरतो. मन पूर्णपणे "मोकळे" असेल तर मग तिथे पूर्वग्रह वगैरे ग्रहांची दिशा उद्भवत नाही पण सर्वसामान्यपणे असे क्वचित घडत असते.
निकोप मन ही मनोवस्था फार दुर्मिळ आणि म्हणून अधिक महत्वाची ठरते. वाचन करताना हाच दृष्टिकोन सर्वात महत्वाचा. त्यामुळे होत असलेले वाचन किंवा होणारे वाचन, याचा साहित्यिक आनंद तसेच मनावरील घडणार आनंद, दोन्ही जरी वेगळ्या प्रतीचे असले शेवटी फायद्याचेच असतात आणि त्यातूनच आपली आपल्याला "वेगळी ओळख" मिळू शकते. इथेच विचारांना वेगळी दिशा प्राप्त होऊ शकते. मघाशी मी जे म्हटले, "व्यक्तिमत्व प्रगल्भ होणे", ही प्रक्रिया इथे सुरु होऊ शकते. "होऊ शकते" असे म्हणण्याचे कारण प्रत्येकाबाबत असेच घडेल, हा विचार अविचार ठरू शकतो!! परंतु आपल्याला काय समजले आहे, आयुष्याचे किती भान आहे तसेच आपल्या आजूबाजूला जे घडते आहे, त्याचा अन्वयार्थ लावणे या आणि अशा असंख्य वैचारिक भावना मनात येऊ शकतात आणि त्या सगळ्या घुसळणीतून जो वैचारिक अर्क तयार होतो, तिथेच आपल्याला वेगळी दिशा मिळण्याचा संभव उत्पन्न होऊ शकतो.
आपल्याला जर का "जैसे थे" असेच राहायचे असेल तर सगळेच मुसळ केरात!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment