Wednesday, 16 February 2022
आज कल पाँव जमी पर नहीं पडते मेरे
चित्रपट संगीत हे जनप्रिय संगीत कोटीत मोडते. प्रस्तुत संगीत कोटीची खास वैशिष्ट्ये ध्यानात घेतल्याशिवाय चित्रपट संगीताच्या सामर्थ्याचा वेध घेता येणे अशक्य. जनप्रिय संगीत कोटीचे स्वरूपच असे आहे की त्यामुळे निव्वळ सांगीतिक निकषांचा वापर अनैसर्गिक आणि अवास्तव ठरतो. एक आक्षेप असे घेतला जातो, चित्रपटसंगीत हे मुद्दाम रचलेले असते तसेच इतर स्रोतांपासून घेतलेले असू शकते. पहिल्या प्रकारचे संगीत संबंधित चित्रपटाबरोबर संबंधित चित्रपटाबरोबर बेमालूमपणे एकजीव होईल असे गृहीत धरले जाते.रचलेले संगीत सांगीतदृष्ट्या मातब्बर नसले तरी कथनाच्या कार्यात सक्षम असू शकते. याउलट दुसऱ्या स्रोतांतून आयात केलेले किंवा उचललेले संगीत स्वतःचे लागेबांधे आणि संदर्भ घेऊन येत असल्याकारणाने अधिक प्रभावी ठरू शकते. अर्थात या सगळ्या मर्यादा ध्यानात घेऊनच आपण आजचे गाणे *आज कल पाँव जमी पर नहीं पडते मेरे* आस्वादायला घेणार आहोत.
चित्रपट *घर* मधील हे प्रसिद्ध गाणे, गुलजार यांनी लिहिलेले, राहुल देव बर्मन यांनी चाल दिलेली आणि लताबाईंनी गायलेले. आता गुलजार यांची गाणी बऱ्याच वेळा *भावकविता* म्हणून गणल्या जातात. अर्थात वरील गाणे कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्द अगदी सोपे, साधे आहेत. त्यामुळे शब्दांचा अर्थ समजून घ्यायला कसलाच त्रास होत नाही - अर्थात *परलगी* हा शब्द थोडा वेगळा आहे. याचा वेगळा अर्थ *अर्धांगवायू* किंवा *लुळे* असा लावता येतो. मुळात चित्रपट गीत हे जात्याच समाजातील सर्व थरांतील लोकांसाठी असते आणि त्यामुळे त्यात *भावकविता* असण्याची शक्यता फार कमी असते. त्याला अनेक कारणे आहेत.
या गाण्यातील भावावस्था, नायिका प्रेमाच्या भावनेने उत्साहीत झालेली आहे आणि त्यातूनच *आज कल पाँव जमी पर नहीं पडते मेरे* ही अभिव्यक्ती समोर येते. आता हीच उत्साही भावना सगळ्या कवितेत वेगेवेगळ्या पद्धतीने मांडली आहे. *परलगी आँखो को देखा है कभी उडते हुए* किंवा शेवटच्या अंतरा संपवताना *थाम लेना जो कभी देखो हमें उडते हुए* या ओळी सत्कृदर्शनी चमत्कृती दर्शवतात पण वस्तुतः तशा नसून, धृपदाच्या पहिल्या ओळीतील आशय जास्त विस्तारित करतात. अर्थात कविता म्हणून आणखी खोलात शिरल्यावर, शेवटच्या अंतऱ्यातील ओळी - * हर बात पे कुछ होता है* ही झाल्यावर मग पुढील ओळीतील - दिवसाच्या आणि रात्रीच्या प्रहरातील भावना दर्शविताना, काहीसा *सांकेतिक ढोबळपणा* आलेला आढळतो. कविता डागाळत नाही पण कवितेचा म्हणून स्वतःचा असा ठाशीव आकृतिबंध असतो असतो आणि त्यामुळे कवितेची रचना अतिशय अंतर्मुख आणि खोल अशी जाणीव होते, त्या भावनेला थोडासा *ढळ* पोहोचतो, इतकेच आणि हे इतके लिहिले कारण कविता गुलजार यांची आहे म्हणून.
आता अशी सक्षम कविता हाती येते तेंव्हा संगीतकाराला देखील चालीचे निरनिराळे बंध सुचू शकतात. मुळात राहुल देव बर्मन हे स्वरलय, ताल याबाबत नेहमीच सजग भूमिका घेणारे. त्यामुळे त्यांच्या चालीत साचेबद्ध वृत्ती दिसत नाही, किंबहुना काही वेळा तर *अनपेक्षितता* मनाला मोहवून जाते. आता या गाण्याच्या तालाची बांधणी, या गाण्याची लय ठरवते. काहीसे द्रुत लयीत गाणे बांधले असले तरी देखील शब्दांचा योग्य तो आदर ठेऊन. आणि हे जास्त महत्वाचे. सुरवातीला सतार, व्हायोलिनचे सूर मदतीला घेतले आहेत आणि एका विविक्षित क्षणी *गिटार* सुरु होते. जरा बारकाईने ऐकल्यास ज्या प्रकारे गिटारचे सूर वाजतात, तिथेच तालाचा आकृतिबंध निश्चित केला जातो. गाण्याची पुढील लय या मार्गाने आक्रमित होते. गाणे उन्मुक्त स्वरूपाचे असले तरी उथळ नाही, त्यामुळे चालीला प्रवाहीपण लाभते. अंतऱ्यांची बांधणी समान घाटाची आहे पण तरीही थोडेफार वैविध्य ऐकायला मिळते, म्हणजे चालीत बारीकसे चढ-उतार आहेत. थोडे बारकाईने ऐकल्यास समजून घेता येते.
राहुल देव बर्मनवर नेहमी पाश्चात्य चालींची उचल करणारा संगीतकार म्हणून*आरोप* केला जातो. अर्थात काही रचनांबाबत तथ्य जाणवते परंतु आरोप व्हावा इतक्या हलक्या दर्जाचे त्यांचे संगीत नक्कीच नव्हते. असे असूनही त्यांचे संगीत नेहमीच सर्जनशीलतेची खात्री पटवणारे आहे. एका बाजूने आधुनिक स्वनांचा यथायोग्य वापर तसेच तालाच्या पारंपरिक आकृतिबंधाला झुगारून, त्याला आधुनिकता प्रदान करण्याचे कौशल्य निर्विवाद होते. जी चित्रपटीय शैली शंकर/जयकिशन यांनी स्वीकारली त्याचाच विस्तारक्षम आविष्कार आपल्या रचनांमधून त्यांनी सतत घडवला. मग त्यासाठी परस्पर विरोधी, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे त्यांना बरेच आकर्षण होते. अर्थात एक मर्यादा इथे स्पष्ट करतो - आधारभूत विधान मिळाले तरच ते सार्थपणे फुलवू शकत होते आणि याचे उदाहरण म्हणून प्रस्तुत गीताचा निर्देश करता येईल.
हेच प्रवाही तत्व लताबाईंनी आपल्या गायनातून मांडले आहे.आता बघा, गाण्यात *उडते हुए* हे शब्द वारंवार येतात परंतु प्रत्येकवेळी त्या शब्दांचा अर्थ, त्या मागील शब्दांना अनुरोधून गुलजार यांनी लिहिला आहे आणि तोच भाव लताबाईंनी आपल्या गायकीतून स्वच्छपणे गायला आहे. ते जे *उडणे* आहे, ते काल्पनिक आहे, मानसिक भरारी आहे आणि तोच भावनिक आवेग लताबाईंनी अप्रतिमरीत्या दाखवला आहे. आणखी एक उदाहरण बघूया. दुसऱ्या अंतऱ्यात, पहिल्या ओळीत *हल्कासा नशा रहता है* हे शब्द गाताना, आपला आवाज किंचित मृदू आणि हलका ठेवला हे पण इतकाही हलका नाही की त्याचे हलकेपण विरळ व्हावे. *नशा हलका* ही प्रणयी उत्फुल्लता त्या गायकीतून स्पष्ट केली आहे. हेच लताबाईंच्या गायकीच्या अनेक वैशिष्टयांपैकी एक वैशिष्ट्य. आता थोडे तांत्रिक विश्लेषण करायचे झाल्यास, *जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है* या ओळीतील *देखा* शब्द घेताना किंचित लांबवला आहे आणि तिथे *आंदोलित धैवत* स्वर जो लावला आहे, तो निव्वळ अफाट आहे. गमतीचा भाग असा आहे, ओळ *धैवत* सुरावरच सुरु होते पण हा स्वर वेगळा आणि नंतरचा स्वर वेगळा आहे. दुसरे असेच उदाहरण बघूया, *उडते हुए* गाताना पुन्हा *धैवत* स्वराचाच वापर केला आहे. नीट बारकाईने ऐकल्यास प्रत्येक स्वराची *गाज* वेगळी आहे, हे समजून घेता येते. अर्थात हे कौशल्य जितके संगीतकाराचे, त्यापेक्षा अधिक गायिकेचे कारण त्या स्वरावलीचे तंतोतंत प्रत्यंतर देणे हे गायक कलाकाराच्या हाती असते आणि रसिकांच्या दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या कानावर पहिला *संस्कार* होतो, तो गायकीचा.
इथे एकूणच गाण्याचा दर्जा फार वरच्या स्तरावर जातो.
आज कल पाँव जमी पर नहीं पडते मेरे
बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उडते हुए
जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है
लोग कहते है कि बस हात कि रेखा है
हमने देखा है दो तकदीरो को जुडते हुए
नींद सी रहती है, हल्कासा नशा रहता है
रात दिन आँखो में एक चेहरा सा बसा रहता है
परलगी आँखो को देखा है कभी उडते हुए
जाने क्या होता है, हर बात पे कुछ होता है
दिन में कुछ होता है, और रात में कुछ होता है
थाम लेना जो कभी देखो हमें उडते हुए
Aaj Kal Paon Zameen Par - Rekha, Lata Mangeshkar, Ghar Romantic Song - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment