Friday, 18 February 2022
एक चिरंजीव क्षण
आपले आयुष्य ते किती अल्पसे आणि त्यात घडणाऱ्या घटना देखील तशाच सामान्य आणि काळाच्या ओघासमोर विस्मरणात जाणाऱ्या. तरीही आपल्यावरील काही संस्कार कायमचे टिकलेले असतात. आठवायलबसलॊ तर काहीच आठवणार नाही परंतु प्रसंग, एखादा अवचित भोगायला लागलेला क्षण समोर येतो आणि मनावर कर्कश काळी रेघ ओढून मनातच कुठेतरी लुप्त होतो - पुन्हा कधीतरी अवचित दर्शन देण्यासाठी. खरंतर आपले आयुष्य जरी आपल्यापुरते महत्वाचे, मौल्यवान वगैरे असले तरी वस्तुस्थिती ही आपले आपल्यावरील अपरिमित प्रेम इतपतच मर्यादित असते. या अफाट जगाच्या संदर्भात आपण आणि आपलेअस्तित्व क्षणकाल अल्प इतपतच असते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. त्याला क्षणभंगुरत्वाचा भेसूर शाप असतो. आता आपल्याला कधीतरी थोडेफार दु:ख होते पण नक्की काय होते? बऱ्याचवेळा आपला झालेला अपेक्षाभंग आणि वस्तुस्थितीकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष, हेच दोन मुद्दे प्रामुख्याने कारणीभूत होत असतात परंतु आपल्याला त्या क्षणी झालेला दु:ख आणि त्याचा आवेग, यात आपले स्वत्व विसरतो आणि झालेले दु:ख कुरवाळत बसतो. आयुष्य असे कधीही थांबत नसते. आयुष्याची स्वतःची अशी गती असते आणि ती सतत चालूच असते.
अशावेळी आपल्यावर झालेले संस्कार आपल्या कधीही मदतीला येत नसतात आणि आपण दिढ:मूढ होतो!! काही वेळेस मनात विचार येतो, संस्कार म्हणजे तरी काय? आपल्या लहानपणी आपल्या आजूबाजूला जे काही घडत असते, ऐकायलामिळात असते, त्या सगळ्याचे आपल्या मनावर होत असलेले पडसाद!! परंतु आपले मन तरी स्थिर असते का? पृथ्वीच्या गतीप्रमाणे आपले मन देखील भिरभिरत असते आणि मग लहानपणातील संस्कार आणि नंतर पुढील आयुष्यात येणारे अनुभव यात तणाव निर्माण होतो आणि तिथे तडजोड करतो. परवाच मी कुठेतरी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात,(ज्ञानेश्वरीचे वाचन अजून तरी माझ्याकडून झालेले नाही. त्या संदर्भात अनेक लेख, निबंध आणि काहींपुस्तके, इतपतच वाचन!!)
*म्हणोनि सद्भाव जीवगत*
*बाहेर दिसती फाकत*
*स्फटिकगृहीचे डोलन*
*दीप जैसे*
या ओवीच्या संदर्भात एक विवरण वाचल्याचे आठवले. यातील शेवटच्या ओळींचा अर्थ सांगताना, *स्फटिकाच्या घरात उजळलेल्या दिव्यांच्या ज्योती जशा बाहेरून दिसतात तसे सज्जनांचे अंगभूत सद्भाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून बाहेर पडतात* हे जेंव्हा मी प्राथम वाचले तेंव्हा मनावर स्फटिकागत चरका उमटला. वास्तविक ज्ञानेश्वरीतील अशी असंख्य उदाहरणे मला इथे देता येतील परंतु यातील मूळ मुद्दा असा आहे, या वाचनाने झालेला संस्कार खरंच कायमस्वरूपी असेल का? आपल्याला अनुभव असंख्य येत असतात परंतु त्यातील काही अनुभव आपल्या मनात रुतून बसलेले असतात आणि त्यातील एक विचार म्हणजे *सद्भाव*!! इथे पुन्हा झालेले संस्कार, आपल्याला काय दर्शवतात, तीच दिशा आपण पकडून राहतो. तशी पकडून राहणे आपल्याला सोयीस्कर असते.
मला कविता आवडतात पण म्हणून सगळ्याच कविता एकजात सुंदर असतात का? आजवरचा अनुभव मला नकारात्मक उत्तर देतो कारण माझ्यावर कविता वाचनाचे जे संस्कार झालेत आणि ते संस्कार वर्षानुवर्षे घट्ट झालेत, त्यालाच अनुसरून मी हे विधान करतो. तेंव्हा हे विधान ही वैय्यक्तिक आवड असते. मग कधीकधी त्याच्या समर्थनार्थ वाद घालतो, क्वचित भांडणे होतात पण या सगळ्या कृतीमागे माझ्यावरील संस्कार, हेच कारणीभूत असतात. आपण आपली जी जपतो, त्याच्यावर अतोनात प्रेम करतो आणि प्रत्येक कविता, ही माझ्या चष्म्यातून बघतो!! म्हणजेच दृष्टी एकांतिक ठेवतो पण आपण ते मान्य करायला तयार नसतो कारण याच संस्कारातून मनात साचलेला हेकटपणा, आपल्यात अहंकार निर्माण करतो.
आरतीप्रभूंच्या एका कवितेतील काही आली मला आजही अतिशय आवडतात.
*घुमावयाचे गगन खोलवर, तिथे चिमूटभर घुमते गाणे*,
*तुटते चिंधी जखमेवरची,आणिक उरते संथ चिघळणे*
या ओळी जेंव्हा मी प्रथम वाचल्या तेंव्हाच झालेला संस्कार आजही तितकाच टवटवीत आहे. खरे तर ही अवस्था आपल्या सगळ्यांचीच असते. आपल्याला फार काहींतरीअलौकिक करायची इच्छा असते, मनात तसे मांडे देखील खात असतो परंतु वस्तुस्थितीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, आपण आपले हात पोळून घेतो!!
आपण खरतर इतके भ्रमिष्ट असतो की आलेले अपयश देखील स्वीकारायचे भान राहात नाही आणि मग उरते ते मृगजळामागील फरफटणे. वयाची संध्याकाळ आली कि कधीतरी आपण कुठल्या वाटेचा प्रवास केला, आणि याच वाटेवरून प्रवास करायची खरंच आपली इच्छा होती का? असले असफल प्रश्न, मनाला विंधत बसतात. परंतु वेळ तर निघून गेलेलीअसते आणि हाती उरते ती निव्वळ उफराटी हळहळ!! त्या हळहळीला ना वेदनेची किनार असते, ना वास्तवाची जोड असते. मग खरंच हे संस्कार आपल्याला किती उपयोगी पडतात? माझे मत असे आहे, एका ठराविक मर्यादेपलीकडे त्याला फारसा अर्थ नसतो.
आपण आणि आपला ठरवलेला मार्ग, यात बरेचवेळा प्रचंड अंतर असते आणि ज्या मार्गावरून जायची इच्छा नसते किंवा जो मार्ग अपरिचित असतो, तिथेच आपली पावले नेमकी का पडतात? केवळ *प्राक्तन* किंवा *नियती* इतके ढोबळ उत्तर देणे योग्य ठरेल का? असे तर नव्हे, आपण आपली सुटका करून घेण्याच्या अनिवार ओढीमुळे, आपण आपल्या सोयीचे अर्थ काढतो आणि समाधान करून घेतो. हेच संस्कार आपल्यावर झालेले असतात का? वर्षामागून वर्षे निघून जातात, नवनवीन अनुभवाने आपण देखील शिकत असतो. जुने संस्कार मोडतात आणि तिथे नव्या संस्कारांची प्रतिष्ठापना होते. यातले आपण जाणीवपूर्वक फार कमी करतो. आपले *अबोध* मन आपल्या नकळत हे निर्णय घेत असते. मनाचा अचूक थांग तर कधीही लागणार नसतो. म्हणूनच बरेचवेळा आपण असा निर्णय का आणि कसा घेतला, याचे समर्पक आणि अचूक उत्तर कधीही मिळत नाही आणि आपण *नियती* म्हणतो आणि आपलीही सुटका करून घेतो. आपल्याला फार खोलात शिरून विचार करायची सवयच नसते त्यामुळे *कार्यकारणभाव* आपल्याला कधीही शोधावा असे वाटतच नाही.
दुसरे असे, आपण आपल्यालाच बरेचवेळा *शरणागत* अवस्थेला आणून ठेवतो पण त्यातून *उत्तर* मिळत नसते. किंबहुना नव्या गुंत्याची नवी तयारी करत असतो. असाच एक गुंता मी कायमचा माझ्या भोवती करून ठेवला आहे. मला कळते, मी चुकत आहे पण माझ्याच मर्यादा, माझी चूक सुधारायला प्रवृत्त करायला देत नाहीत. हा माझ्यावरील संस्कार तर नकीच नव्हे पण त्यावेळची तात्कालिक प्रतिक्रिया कायमचे प्राक्तन स्वीकारून बसलो आहे.
मी लागोस इथे रहात असताना, २२ नोव्हेंबरच्या दुपारी मला बातमी मिळाली, माझी आई २ दिवस आधी कायमची निघून गेली!! मी एकटा होतो, आजूबाजूला कुणालाच *माझी आई* म्हणजे काय? हे सांगण्याची सोय नव्हती. ज्या क्षणी मला ती बातमी कळली, तो *क्षण* आजही माझ्या मनात चिरंजीव होऊन बसला आहे. आज, या घटनेला ३० वर्षे व्हायला आली पण तो क्षण कायमचा *थिजलेला* मनात बसला आहे - हे माझ्यावर संस्कार कधीच झाले नव्हते!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment