Thursday, 29 October 2020

समईच्या शुभ्र कळ्या - चिकित्सात्मक लेख 

खानोलकरांच्या साहित्याचा सम्यक आढावा घेतले तर एक बाब लगेच ध्यानात येते. खानोलकरांना *स्त्री* जितक्या आतून समजली आहे तितकी मराठी साहित्यात अपवादात्मकरीत्या वाचायला मिळते. स्त्री रेखाटणे यात नावीन्य काही नाही परंतु स्त्रीचे विचारविश्व जाणून घेऊन त्याला शब्दरूप देणे खानोलकरांना चांगलेच जमले आहे. अगदी कवितेसारखे अल्पाक्षरी माध्यम लक्षात घेतले तरी हेच उत्तर आपल्याला मिळते. अर्थातच खानोलकरांच्या कवितेत स्त्री ही केंद्रीभूत आहे पण तिचे कवितेतील वावरणे, अस्तित्व टिकवणे इत्यादी अतिशय बारकाईने बघायला मिळते. मराठीत कविता भरपूर लिहिल्या जातात परंतु त्या कवितांमधील प्रत्येक कवितेला  *भावकविता* म्हणता येईल का? जर तसे नसेल तर कुठली कविता ही *भावकविता* म्हणून गणली जाईल? खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो.  अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीतील स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.काळाची जाणीव हलकेच पुसून टाकणारी ही नवीन जाणीव आपल्याला निराळ्याच परिणामाची अनुभूती देते. खरे तर आपल्याला जो क्षण अनुभवता आलेला असतो, त्या क्षणाच्याच साऱ्या संवेदन विश्वाला जिवंत करणे, सक्षम लेखनाची पहिली पायरी म्हणायला हवी आणि ही पायरी गाठली की रसिक वाचक देखील त्या संवेदनविश्वाची खरी अनुभूती घेऊ शकतो. वेगळ्या शब्दात, भूतकाळाचा तो क्षण पुन्हा वर्तमानात आणताना, त्यावेळच्या संवेदनेसह लेखनातून प्रकट होणे. त्या क्षणाच्या जाणिवेतील मनाच्या जागृत, अर्धजागृत आणि सुप्त पातळ्यांवरील संज्ञाप्रवाह, त्याच पातळीवरील अनुभवांचेच शब्दरूप प्रकट करणे, हेच तर कवितेच्या अननुभूत आणि अर्धुकलेल्या वाटेचे खरे संचित मानावे. अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. आणि या वाटेवर चालत असताना मला आरतीप्रभुंची *समईच्या शुभ्र कळ्या* ही कविता वाचायला मिळाली. कवितेच्या प्रथम वाचनात, कविता *दुर्घट* वाटू शकते (*दुर्बोध* किंवा *अगम्य* नव्हे.....) कारण सुरवातीच्या ओळी!!  *समईच्या शुभ्र कळ्या* *उमलवून लवते* *केसांतच फुललेली* *जाई पायाशी पडते* खरंतर *समईच्या शुभ्र कळ्या* हेच शब्द आपले लक्ष वेधून घेतात परंतु पुढे *लवते* या शब्दाशी आपण थबकतो!! "लवते" हा शब्द "लवणे-लवून राहणे" या शब्दांशी जोडला ते लगेच अर्थ कळू शकतो कारण ज्योत ही नेहमीच *अधोमुखी* असते जरी वात पेटवताना उभी असली तरी!! दुसरा एक अर्थ काढता येतो, ज्योत ही नेहमी *निमुळती* असते आणि ते निमूळतेपण, कळ्यास्वरूप असते. आता हे एकदा नक्की झाल्यावर भावाकवितेची पहिली अट पूर्ण होते. भावकवितेत आलेला शब्द हा तोच असणे महत्वाचे असते. त्याला दुसरा पर्यायी शब्द असूच शकत नाही. *भिवयांच्या फडफडी* *दिठीच्याही मागे पुढे* *मागे मागे राहिलेले* *माझें माहेर बापुडें* स्त्री संत्रस्त अवस्था हे तर लगेच कळते परंतु "भिवयांची फडफड"आणि त्यातून व्यक्त झालेली "माहेरची आठवण"आणि आठवण कशी येते तर "दिठीच्या मागे-पुढे" येते. कवितेतील प्रत्येक शब्द हा आपल्या आधीच्या आणि नंतरच्या शब्दांशी एक आंतरिक नाते जोडून येते आणि आशयाची व्याप्ती पूर्ण करतो. कवितेच्या ध्रुवपदातील ज्योतीचे लवणे आणि पापणी फडफडणे यांची इथे सांगड घातली आहे. *सांचणाऱ्या आसवांना* *पेंग येते चांदणीची,* *आजकाल झाले आहे* *विसराळू मुलखाची* *गांठीमध्ये ग जीवाच्या* *तुझी आंगाऱ्याची बोटे* *वेडी उघडाया जाते* *उगा केतकीचे पाते* कवितेत प्रतिमा संयोजन कसे करावे याचे सुरेख उदाहरण इथे बघता येते. "जीवाच्या गाठी" म्हटल्यावर त्यात "आंगाऱ्याची बोटे!" खानोलकरांच्या आयुष्यावर कोकण आणि कोकणी जीवन याचा प्रचंड प्रभाव आहे आणि त्याचा बऱ्याच ठिकाणी प्रत्यय येतो. कोकणात "धूप","अंगारे" या गोष्टीचे प्रचंड प्रस्थ आहे आणि त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे आणि पर्यायाने पावित्र्य. जीवाभावाच्या गाठीचा संबंध अंगाऱ्याबरोबर जोडून त्यांनी कवितेला स्थानिक परिमाण तर दिलेच आहे परंतु त्याशिवाय पुढील ओळी वाचताना तीच गाठ उघडायची तर तिथे "केतकीचे पाते" हे शब्द वापरले आहेत. आता केतकीचे पाते नेमके डोळ्यासमोर आणल्यास आपल्याला कळू शकेल, हे पाते एका बाजूने अतिशय तलम, हळुवार असते आणि उलट बाजूने अतिशय काटेरी असते!! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केतकीचे पाते अतिशय सुगंधी असते. कवितेत प्रतिमा वाचताना जर का हे संदर्भ लक्षात आले नाही तर मग त्या कवितेची खरी खुमारी ध्यानात येणे अवघड. तसेच आधीच्या कडव्यातील संदर्भ असेच आहेत. डोळ्यांत अश्रू आहेत परंतु ते पापणीतच अडकलेले आहेत. त्यामुळे जडशीळ झाले आहेत. अर्थात याचा संबंध पुढील ओळीतील "विसराळू" शब्दाबरोबर जोडलेला आहे. "पेंगलेले" डोळे असल्याने विचारचक्र थांबले आणि मन विसराळू झाले. असा एक अर्थ काढता येतो. *थोडी फुले माळू नये* *डोळां पाणी लावू नये* *पदराच्या किनारीला*  *शिवू शिवू ऊन ग ये* *उगा बावरते मन* *भरू येतां केसर;* *अशा वेळेची वाटते*  *अंगावर घ्यावी सर* एकच कल्पना परंतु आरतीप्रभू निरनिराळ्या प्रतीकांतून खेळवत असतात आणि तेच जुने संदर्भ नव्या जोडणीतून आपल्यासमोर नव्याने उभे राहतात. "पदराच्या किनारीला ऊन लागणे, ही सहज क्रिया आहे परंतु त्या उन्हाचे साहचर्य "शिवू शिवू" शब्दातून स्पष्ट केले आहे. किंचित स्पर्श झालेला आहे आणि तो स्पर्श "शिवू शिवू" अशा अबोध शब्दांनी पूर्ण केला आहे. कवितेच्या सुरवातीलाच स्त्री अम्लान दु:खात गंधाली आहे, हे मांडले आहे आणि आता ती मांडणी "केसांत फुले न माळणे" आणि त्या कृतीने डोळ्यात दहिवर साठण्याच्या कृतीला बांध घालणे. हे सगळे काही शब्दांत व्यक्त केले आहे. तेंव्हा अशा कातर वेळी "मन द्विधा होणे" क्रमप्राप्तच असते आणि इथे आरतीप्रभूंनी डोळ्यांतील अश्रूंना "केसर" म्हटले आहे आणि चित्राचा भाव किती लगेच बदलतो. हे सगळे एखाद्या कॅलिडोस्कोप मधील  बदलत्या चित्रांच्या आकृतीप्रमाणे बदलतो. मन कानकोंडे झाले आहे, कुणाशी काही व्यक्त करावेसे वाटत नाही, अशा *तृषार्त* अवकाळी, अंगावर पावसाची सर घ्यावी  आणि तृप्त व्हावे, ही भावना अनाठायी अजिबात वाटत नाही.  *डोळ्यांतील बाहुल्यांनी* *घरीदारी उतरावे,* *असें काहीसे वाटते* *याला कसली ग नांवें?* *हांसशील हास मला* *मला हासूही सोसेना ;* *अश्रू झाला आहे खोल* *चंद्र झाला आहे दुणा !* कवितेचा शेवट करताना आरतीप्रभू आपल्याच संकल्पनांशी खेळत आहेत. कवितेत "डोळ्यातील अश्रू" ही साधी घटना परंतु वेगवेगळ्या प्रतीकातून वेगवेगळे संदर्भ देऊन मांडली आहे. डोळ्यातील प्रत्येक घटकाचा त्यांनी इथे उपयोग करून घेतलेला आहे जसे "डोळ्यातील बाहुल्या" !! या बाहुल्यांना त्यांनी *जिवंत* केला आहे. किती समर्पक कल्पना आहे. आपले दु:ख हलके करण्यासाठी खुद्द या बाहुल्यांनी खाली उतरावे!! आणि करताना त्यात काही गैर नाही, असे वाटावे. सगळे मानसिक द्वंद्व परंतु निरनिराळ्या प्रतीकांतून आशय अधिक सघन करीत नेलेला आहे. कवितेची बांधणी आणि वीण कुठेही *हलकी* होत नाही. किंबहुना वाचक अधिकाधिक गुंतत जातो. अर्थात या सगळ्या भावनांना कुठेतरी वाट मोकळी करायला हवी या उद्देशानेच मनातल्या मनात आपल्या सखीशी संवाद साधत आणि त्यातील काही अनाकलनीय विचारांनी आपल्या सखीला हासू आवरत नाही, हे लक्षात आल्यावर आपली आपणच हतबलता मान्य केली जाते. झालेले दु:ख काय प्रतीचे आहे - "मला साधे हसणे देखील अप्राप्य झाले आहे" अशी हताश कबुली देणे, यामध्ये आरतीप्रभूंनी साधले आहे. पुन्हा एकदा अश्रूंची वेगळी *जात* दर्शवली आहे. वरती "भरू येता केसर" मध्ये अश्रू डोळ्यातच साकळले आहे आणि आता तेच अश्रू आता इतके खोल गेले आहेत की दिसणारा चंद्र देखील "दुणा" वाटायला लागतो. *समईची ज्योत तशीच विरहिणीसारखी एकटीच जळत राहते.* 

1 comment:

  1. माळू नये असंच का वाचतोय आपण ? थोडी फुले माळून ये , डोळा पाणी लावून ये .... असं पाहिलं तर ? समई देवापुढे लावून लवते - म्हणजे देवाच्या पायाशी लवते

    ReplyDelete