Tuesday, 27 October 2020

मैंने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है

कलाकृती म्हणजे मानवाने जाणीवपूर्वक, विशिष्ट माध्यमातून आणि विशिष्ट साधनांद्वारे केलेली एक नवीन अनुभवाकृती होय. एकदा का हे मान्य केले की मग कलाकृतीतील प्रत्येक घटकाच्या निवडीला, त्याच्या गुणवत्तेला आणि आणि तशा अनेक घटकांतील संबंधांना त्यांतूनच निर्मण केलेल्या पूर्णाकृतींच्या संदर्भात योजलेले, नेमके व विशिष्ट स्थान असते किंबहुना, ते तसे असल्यामुळेच ती कलाकृती *ती* कलाकृती होते. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो, आपल्याला कलाकृतीमधील अनुभवविश्वाची जी जाण व्हायची ती कलाकृतीच्या विशिष्ट साधनांतील - रंग, घनाकार, सूर, शब्द - शरीराद्वारे आणि केवळ त्यांच्याच द्वारे. कारण त्यांच्याशिवाय आपल्याकडे आधाराला काहीही नसते. रसास्वादाच्या क्रियेत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. किंबहुना आपण आज ज्या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत, त्या आस्वादामागे याच विचारांची प्रक्रिया अंतर्भूत आहे, असे मला फार वाटते. चित्रपट गीतांत *भावकविता* आणता येते आणि तशा शब्दरचनेतून देखील चोखंदळ रसिकांना सकस वाचनानंद मिळू शकतो - हेच शायर साहिर लुधियान्वी यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. वास्तविक बघता, काहीवेळा साहिर यांच्यावर टीका देखील झालेली आहे परंतु त्या टीकेला जराही न जुमानता या शायराने आपली कविता गाण्यांसाठी वापरली. या शायरीमध्ये उर्दू शब्दांची पखरण अपेक्षितच होती. नायिकेचे स्मरणरंजन आणि ते देखील केवळ एकाच नजरभेटीचे!! शायरीमध्ये एक, दोन ठिकाणी थोडे धक्कातंत्र वापरले आहे पण ते देखील संयत प्रणयाच्या अंगाने. - "आंच देती हुई बरसात की याद आती हैं" ही ओळ आधीच्या ओळीशी ताडून बघितली तर आपल्याला समजून घेता येईल. "अजनबी सी हो मगर गैर नहीं लगती हो" ही ओळ तर किती काव्यात्मक आशय घेऊन अवतरते. खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. हाय ये फूल सा चेहरा, ये घनेरी झुल्फे मेरी शेरों से भी तुम मुझको हसीन लगती हो या ओळींतून मी जे वरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचेच थोडेफार प्रत्यंतर आपल्याला येऊ शकते. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, "मेरी शेरों से भी तुम मुझको हसीन लगती हो" ही भावना एखाद्या जातिवंत कवीने मांडावी, यातच त्याची प्रणयी भावना अधिक उठून दिसते. संगीतकार रोशन यांनी अशी तलम शायरी स्वरबद्ध करताना "पिलू" रागाचा आधार घ्यावा, हा योगायोग नकीच नव्हे. हा राग खास प्रणयी थाटाचा मानला जातो. विशेषतः उपशास्त्रीय संगीतात, ठुमरी, गझल किंवा होरी सारख्या रचनांतून याच रागाचा उपयोग भरपूर प्रमाणात आढळतो. "रिषभ" वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु "गंधार","मध्यम" आणि "निषाद" दोन्ही प्रकारे लागतात. "धैवत" स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग "औडव-संपूर्ण" असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या "धैवत" स्वराच्या स्पर्शाने!! आता गाण्याच्या स्वररचनेकडे वळूया - मैंने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है - भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर जिला "सम" म्हणतात, त्यावर सगळा भर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या प्रस्तुत गीताची सम "निराघात" आहे हे जाणवते. पहिल्या ओळीतील "शायद" शब्दातील "य" अक्षरावर सम येऊन गेली हे ऐकताना लक्षात येत नाही!! चालीचा प्रवाह वा सुरावटीचे चलन अबाधित राहते, हा याचा फायदा म्हणता येईल. कवीने शब्दरचनेत जी ऋजुता मंडळी आहे त्याला ही अशी निराघात सम वेगळे परिमाण देते हे निश्चितच. प्रस्तुत गाणे हे एका मुशायऱ्यात सादर केलेले असल्याने, मुळात रोशन यांचा वाद्यमेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असल्याने, इथे देखील त्याचेच प्रत्यंतर येते. सर्वसाधारण कल बाजूला सारून टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे किंवा मध्यसप्तकातील स्वर वा संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात त्यांनी कसूर केलेली नाही. याच गाण्यातील सरोद आणि सारंगीचे स्वर नीटसपणे ऐकावे म्हणजे वरील विधान समजून घेता येईल. चालीचे स्वरूप, सारंगी तसेच सरोद या वाद्यांना दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग यामुळे या वाद्यसंगीताचे नक्षीकामात रूपांतर होण्याचा धोका पूर्णपणे टाळला आहे. यासाठी संगीतकाराच्या कल्पकतेला पावती दिलीच पाहिजे. सगळे अंतरे जवळपास समान बांधणीचे आहेत परंतु चालीतील अंगभूत लालित्य इतके अप्रतिम आहे की याची साधी जाणीव देखील होत नाही. . *अजनबी सी हो मगर गैर नहीं लगती हो* *वेहम से भी जो हो नाजूक वो यकीन लगती हो* *हाय ये फूल सा चेहरा, ये घनेरी झुल्फे* *मेरी शेरों से भी तुम मुझको हसीन लगती हो* मुखड्याला समांतर बांधणी असून सुद्धा चालीत वैविध्य आणले आहे. रोशन यांचा पिंड हा मुळात मध्य सप्तकात रचना बांधण्याचा होता आणि इथे तर स्मरणरंजनातील भावना बघायला मिळते. अर्थात जरी स्मरणरंजन असले तरी प्रणयी थाटाचे स्मरण आहे. त्यामुळे लय आणि चाल अंतर्गत वळणे घेत चालते म्हणजेच बघा, कवितेतील उपमा स्वरांकित करताना त्यातील ऋजुता अप्रतिमरीत्या सांभाळली आहे. तो काळ ध्यानात घेता प्रेम हे व्यक्त करताना अव्यक्तातून व्यक्त होणे पसंत केले जात असे. "वेहम से भी जो हो नाजूक वो यकीन लगती हो" या ओळीतील नाजूक भावना कुठेही अनावश्यक *वजन* देऊन आपल्या समोर येत नाही. त्याची गरजच नाही. *देखकर तुम को किसी रात की याद आती है* *एक खामोश मुलाकात की याद आती है* *जहन में हुस्न की ठंडक का असर जागता हैं* *आंच देती हुई बरसात की याद आती हैं* हे गाणे जितके संगीतकाराचे आहे तितकेच गायकाचे देखील आहे. मोहम्मद रफी यांनी आपली *संयत* गायकी बहुदा संगीतकार रोशन यांच्यासाठी खास राखून ठेवली होती असे मानायला बराच वाव आहे. केवळ हेच गाणे नसून इतर गाणी देखील या विधानाला पूरक म्हणून दाखवता येतील. खरे तर संगीतकाराची स्वररचना ही नेहमीच गायकाद्वारे आपल्या समोर येत असते आणि अशी गाणी तर नेहमीच गायकाच्या मगदुरामुळे भुरळ घालतात. "एक खामोश मुलाकात की याद आती है" या ओळीतील "खामोश" किंवा त्याच ओळीतील "याद" शब्द या संदर्भात ऐकणे जरुरीचे आहे. *जिसकी पलके मेरी आँखों पे झुकी रहती हैं* *तुम वोही मेरे खयालो की परी हो के नहीं* *कहीं पहले की तरह फिर तो ना खो जाओगी* *जो हमेशा के लिये हो वो ख़ुशी हो के नहीं* संपूर्ण चालीत स्निग्ध आणि मुग्ध याचा भावनांचा दरवळ आहे त्यामुळे गाण्याला एकप्रकारचे *खानदान* लाभलेले आहे. शायरीतील उर्दू शब्दांमुळे भाषिक श्रीमंती मिळाली असल्याने आणि संगीतकार रोशन यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीला अनलंकृतपणे सादर केल्याने, सगळी रचनाच भावविभोर झाली आहे. "जिसकी पलके मेरी आँखों पे झुकी रहती हैं" या ओळीतील गायन माझ्या वरील विधानांना पूरक असेच झाले आहे. वास्तविक पहाता मोहमद रफी यांच्या आवाजात एक भरीवपणा आहे आणि मर्दानी जोमदारपणा आहे परंतु अशा प्रकारच्या गीतांत ते आपल्या आवाजात सहकंपनयुक्त लगाव ऐकायला मिळतो आणि हा त्यांच्या आवाजाचा खास गुण म्हणावा लागेल. या संदर्भात आपल्या असे विधान सहज करता येईल, त्यांनी आपल्या गायनाचा असामान्य आदिनमुना पुढील पिढीसमोर ठेवला आणि ही कामगिरी चित्रपट संगीताच्या इतिहासात नेहमीच वाखाणली जाईल. अर्थात अशा प्रकारची समृद्ध गाणी एकूणच फार विरळा ऐकायला मिळतात. https://www.youtube.com/watch?v=0_pilWUMOFI

No comments:

Post a Comment