Thursday, 15 October 2020
कमोदिनी काय जाणे
भक्ती ही संकल्पना धर्मकल्पनेशिवाय उद्भवत नाही. भक्ती या विशिष्ट धर्माविष्काराशी संगीताचा संगम होऊन एक खास परंपरा भारतात आठव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत जोमदारपणे पसरली. नाट्य आणि संगीत यांच्याशी आपुलकीने जवळीक करून भक्तिसंगीताने जी प्रगटने निर्माण आणि प्रसृत केली ती नेहमीच अभिमानाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. देशी भाषा, प्रादेशिक केंद्रे, अखिलभारतीय आवाहनाचा आणि आकलनाचा आशय, शास्रोक्तपासून ते अगदी लोकसंगीतापर्यंतच्या सर्व प्रणालींशी राखलेले जवळचे संबंध, संतांची भ्रमणे आणि त्यांनी अंमलात आणलेल्या खास प्रचारपद्धती इत्यादी अनेक विशेषांनी भारतीय भक्तिसंगीत परंपरा विलक्षण समृद्ध झाल्या आहेत. आजही त्यांचे कार्य चालूच आहे. धर्म आणि संगीत यांच्या परिणामकारी संयोगातून उपलब्ध होणारे भक्तिसंगीताचे रसायन हे आपल्या आजच्या गीताच्या सार्थतेचा एक भरभक्कम पुरावा आहे!!
संत तुकारामांचे अभंग, हा आजही कालौघात नष्ट न झालेला संशोधन विषय आहे. सतराव्या शतकात निर्मिलेले अभंग आजही अभ्यासकांना साद घालतात आणि त्यांच्या अभंग रचनेतून निरनिराळे अर्थाचे पदर निर्देशित करत असतात. मुळात अभंग हे अल्पाक्षरी छंदोबद्ध काव्य होय. विठ्ठल भक्ती हेच या रचनांचे केंद्रीभूत विषय आहेत. आज जो वारकरी पंथ महाराष्ट्रभर पसरलेला आहे त्यामागील अधिष्ठान हे तुकारामांचे अभंग आहेत. अर्थात देवाची आळवणी हे प्रधान अंग ठरल्यावर मग त्यातील आशयाची दिशा देखिल नक्कीहोते आणि एकुणच प्रतिमा संयोजन वगैरे मुद्दे विठ्ठल भक्ती आविष्कृत करण्याकडे राहतात. जरी विठ्ठलभक्ती अभंगात असली तरी तुकारामांनी ज्या प्रतिमा वापरल्या आहेत, त्या केवळ अपूर्व आहेत. साधे फुल घेतले तरी त्याला "कमोदिनी" सारखा नादमय शब्द वापरणे आणि त्या अनुषंगाने कमोदिनी आपल्या सुगंध कसा जाणणार? असा प्रश्नार्थक आशय घेऊन पहिलीच ओळ लिहिणे आणि त्याचा परिणाम भुंग्याची असोशी दाखवत, त्या प्रतिमेची पूर्तता करणे, सगळेच अविस्मरणीय आहे. एकीकडे आळवणी करायची परंतु दुसऱ्या बाजूने त्याच विठ्ठलाला प्रश्न विचारणे, असे एकूण या अभंगाचे स्वरूप आहे. पहिल्याच कडव्यात याची प्रचिती येते. "तुझे नाव घेण्यातील परमावधीचे सुख तिला कळणार नाही कारण ते फक्त आम्हीच जाणतो" अशी अभिव्यक्ती तुकारामांना इतरांपासून वेगळे करते. खरतर सगळाच अभंग हा विश्लेषण करण्याइतका महत्वाचा आहे. आपण इथे फक्त तोंड ओळख करून घेणे इष्ट ठरेल.
संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कारकिर्दीतील "अभंग तुकयाचे" या रचना सर्वोच्च रचना असे म्हणता येईल. प्रत्येक अभंग हा काव्य, स्वररचना आणि गायन, या तिन्ही घटकांना सामायिक महत्व देऊन निर्मिलेला आहे. प्रस्तुत गाणे हे "आरभी" या अत्यंत अनवट रागावर आधारलेले आहे (रागाबद्दलची माहिती डॉ. अनुराधा डबली बाईंच्या सौजन्याने मला मिळाली आहे). हा राग एका बाजूने दुर्गा तर दुसऱ्या बाजूने मांड रागाशी साहचर्य दर्शवतो तरीही राग हणून स्वतंत्र अस्तित्व टिकवतो. कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात" केलेला राग आहे. "औडव - संपूर्ण" अशा जातीचा हा राग असून आरोहात "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य आहेत. अर्थात हा राग तसा फार प्रचलित राग नाही. याच रागाची आणखी ठळक इथे मांडायची झाल्यास, Youtube वर कुमार गंधर्वांनी आपल्या परिचित मध्य लयीत "चंद्रिका ही जणू" हे नाट्यगीत गायले आहे. अर्थात संगीतकार म्हणून खळेकाका नेहमीच रागाची पुनर्रचना करून गाण्याची चाल बांधतात. अर्थात तांत्रिक भाग जरा बाजूला ठेवला तरी देखील स्वररचना म्हणून ऐकायला गेल्यास, गाण्यातील अनेक "अनवट" जागा आणि लय वळवून घेण्याचे कौशल्य आपल्याला स्तिमित करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गाण्यातील प्रत्येक अंतरा "स्वतंत्र" बांधलेला आहे. अंतरे निरनिराळ्या अंगाने बांधायचे हे खळेकाकांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे. पहिलाच अंतरा एकदम वरच्या सुरांत सुरु होतो आणि मुखड्याच्या चालीशी ताडून बघितले तर हे "वळण" एकदम भिन्न आहे, हे आकळते. वास्तविक मुखडा अगदी संथ लयीत बांधलेला आहे आणि त्यावरून संपूर्ण गाण्याची कल्पना येणे अशक्य आहे. खळेकाकांच्या स्वररचनेतील नेहमीची वैशिष्ट्ये इथे नेहमी ऐकायला मिळतात जसे, शब्द संपवताना लय किंचित खेचलेली असणे जेणेकरून गायकीचा कस लागणे. लय खेचणे म्हणजे फक्त तार स्वरात जाणे असे नसून संथ लय असताना देखील हाच परिणाम करून दाखवतात
*कमोदिनी काय जाणे, तो परिमळ*
*भ्रमर सकळ भोगितसे*
जसे इथे मुखडा गाताना, "कमोदिनी" हा शब्द उच्चारताना "मो" अक्षरानंतर किंचित वळण घेतले आहे किंवा पुढील ओळ संपवतानाचा "भोगितसे" शब्द घेताना "भो" अक्षर किंचित हेलावून घेतले आहे. परिणाम असा होतो, सरळ, गोड वाटणारी चाल अवघड होऊन बसते आणि हा सगळं निमिषभराचा स्वरिक खेळ असतो.
*तैंसे तुज ठावे नाही तुझे नाम*
*आम्हीच ते प्रेमसुख जाणो*
हा पहिला अंतरा तेंव्हा या अंतऱ्याची बांधणी करताना, खळेकाका सुरवातीलाच वरच्या सुरांत आरंभ करतात आणि रसिकांना एकदम चकित करतात. आता हा अंतरा अर्थाच्या दृष्टीने बघितल्यास, इथे खुद्द विठ्ठलालाच त्याचे नाव ठाऊक नाही आणि मग तद्नुषंगाने तुझ्या नामाच्या उच्चारण्यातील प्रेम, गोडवा हा फक्त भक्तांनाच ठाऊक!! हा जो विरोधाभास आहे, हेच या अभंगाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे. *तैसे तुज ठावे नाही तुझे नाम* ही ओळ सुरवातीपासून हळूहळू वरच्या सुरांत शिरायला लागते आणि टप्प्याटप्याने स्वरिक उंची गाठली जाते आणि दुसऱ्या ओळीत आम्हीच त्या नामस्मरणात सुख जाणतो या जाणिवेत पहिल्या ओळीची पूर्तता होते आणि ती पूर्तता पुन्हा मुखड्याच्या स्वरांशी जुळवून घेताना पूर्ण होते. ही होणारी पूर्तता आणि त्यातील असोशी, शब्द आणि सूर यांच्या मनोहर खेळणे अविस्मरणीय होते.
*मातें तृण बाळा दुधाची ते गोडी*
*ज्याची नयें जोडी त्यासी कामां*
दुसऱ्या अंतऱ्याची बांधणी पुन्हा शुद्ध स्वरी सप्तकात केलेली आहे आणि असे का? याचे उत्तर तुकारामाच्या शब्दातच दडलेले आहे. या कडव्यातील शब्द बघता, "माते, "बाळा"" आणि "दुधाची गोडी" या शब्दांतच वरील प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. यात पुन्हा गंमत अशी आहे, मुखड्याची बांधणी आणि या अंतऱ्याची बांधणी संपूर्णपणे भिन्न आहे. तसेच जरा अक्षर संख्येकडे लक्ष दिल्यास, दोन्ही ओळीतील शब्दसंख्या विषम आहे पण लय सांभाळताना खळेकाकांनी अतिशय छोट्या हरकती ठेवलेल्या आहेत जसे दुसरी ओळ बांधताना, *नये* आणि *जोडी* हे शब्द गाताना निमिषभर अंतर ठेवले आहे आणि इथेच गाण्याची चाल अवघड होते पण लयीची पूर्तता होते.असे करताना कुठेही शब्द तोडला आहे, असे होत नाही, म्हणजेच शब्दांना पूर्ण न्याय दिला जातो.
*तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं*
*नाही त्याची भेटी भोग तिये*
हा शेवटचा अंतरा आणि इथे कवी म्हणून तुकारामांनी नेहमीची प्रतिमा परंतु लोलक फिरवून, निराळी आकृती समोर आणावी तास आशय आपल्यापुढे आणला आहे. वास्तविक शिंपला आणि मोती याचे साहचर्य जगाला ठाऊक आहे परंतु त्यांची भेट कधीही होत नसते आणि हाच विचार, सगळ्या अभंगात विरोध तत्वाने केलेला आहे.
शेवटचा अंतरा संपवताना "नाही त्याची भेटी भोग तिये" या ओळीचे गायन करताना ओळीची सुरवात, आधीच्या ओळीशी संवाद साधत सुरु होते परंतु "भोग तिये" या इथे लय मंदावते. हे सगळे अचानक झाले असते तर कुठेतरी खटकले असते परंतु ताल त्याच गतीत ठेऊन, स्वरांवरील आघातात फरक केला आणि गळ्याची परीक्षा बघितली!!
लताबाईंच्या कारकिर्दीतील अवर्णनीय शिखर गायकी या रचनांमधून ऐकायला मिळते. प्रस्तुत गाण्याची स्वररचना सुरवातीला शांत, संथ असल्याने थोडी फसगत होते कारण पुढे हीच रचना अतिशय बिकट वळणे घेत, प्रत्येकवेळी समेवर येताना चकित करत समोर येते. संत तुकारामांच्या शब्दातील आर्जवी आशय आणि चालीतील गर्भित कठीणता, याचा अचूक मेळ लताबाईंनी आपल्या गायकीतून पेश केला आहे. वर मी स्पष्ट केल्याप्रमाणे "कमोदिनी" या शब्दातून फुलाची मृदुता आणि "परिमळ " शब्दातून स्वरिक सुगंध दिलेला ऐकणे, ही कानाची तृप्ती करते!! इथे चांगल्या अर्थाने शब्द भोगून गायकी सिद्ध झालेली आहे. वरच्या स्वरांत प्रवास करत असताना इप्सित स्थळ आल्यावर स्वर उतरी घेऊन पुन्हा मुखड्याशी नाते प्रस्थापित करणे, हा सहज, साधे गायन नव्हे परंतु ऐकताना याची जाणीव श्रोत्यांना जरादेखील करून दिली जात नाही आणि हा प्रवास कठीण आहे. स्वरांतील ओलावा कायम ठेवत तेच स्वर उच्चारताना त्यातील अवघडपणा किंचित्काल दर्शवणे अतिशय अवघड आहे आणि हे शिवधनुष्य, लताबाईंनी अतिशय सहजपणे आणि लालित्य तसेच प्रासादगुण कायम ठेवीत साधला आहे. इथे शब्दोच्चारांनी आशयाचा नेमका वेध घेतलेला आहे. "तैंसे तुज ठावे नाही तुझे नाम ।" या वाक्यातील किंचितसा फटकळपणा दाखवताना क्षणात पुढील ओळीतील "आम्हीच ते प्रेमसुख जाणो" या ओळीतील अभिमान आणि आर्जव त्याच तीव्रतेने प्रकट केले आहे.
या अल्बममधील सगळ्याच रचना असामान्य आहेत पण म्हणूनच कुठले गाणे निवडावे, याबद्दल माझा थोडा संभ्रम झाला होता. श्रोत्यांच्या मनात असा सुंदर संभ्रम निर्माण करणे, हा ललित संगीताचा गुण मानता येईल आणि इथेच हे गीत फार वेगळ्या उंचीवर पोहोचते.
https://www.youtube.com/watch?v=GX50bNbZr7M
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment