Saturday, 9 May 2020

हाये जिया रोये

"आज अंधारी रात आहे, चंदेरी दरिया नसे 
तारांची बरसात आहे,विश्व सारे स्तब्ध आहे. 
कसल्या तरी धुंदीतला,ओठांवरी शब्दार्ध आहे,
दूरचाही दीप नाही,सारीकडे काळोख आहे 
अंतरंगी त्यातही पण, ओळखीचा प्रकाश आहे. 
आज अंधारी रात आहे. 
कवी अनिल यांच्या "सांगाती" या कवितासंग्रहात ही कविता. वास्तविक या कवीला नेहमी "प्रेमकवी" अशा लेबलात आपण अडकवून टाकले आहे - आपल्या समाजाला हा छंद जडला आहे आणि त्याशिवाय कसलीच पूर्ती होत नाही पण त्यामुळे बहुतेकवेळा एकांगी अन्याय केला जातो हे देखील तितकेच खरे आहे. खरतर अनिलांनी काव्याच्या बाबतीत अनेक प्रयोग केले. गद्यप्राय रचना आणि शब्द यांचा वापर बरेचवेळा दिसतो. पण कित्येकदा "काव्यमय" शब्द आणि रचना आढळतात,जसे वरील कवितेच्या ओळींतून दिसते. मुक्तछंदाने बद्ध-छंदाची चौकट मोडली खरे. त्यामुळे केवळ ओळीच लांबलचक झाल्या नसून भाषा देखील नवनवीन तऱ्हेने वळवण्यास आरंभ झाला. छंदोबद्ध रचनांतील कर्मठपणा संपला आणि या मार्गावरील कवी अनिल हे एक ठळक नाव घ्यावे लागेल. 
"आज अंधारी रात आहे, चंदेरी दरिया नसे 
तारांची बरसात आहे,विश्व सारे स्तब्ध आहे."
या ओळींच्या संदर्भात मी आजच्या "हाये जिया रोये" या गाण्यातील कवितेचा विचार केला. कवी प्रेम धवन यांनी एकेकाळी आपल्या शब्दरचनांनी हिंदी चित्रपट सृष्टी बरीच गाजवली होती तरीही कवी म्हणून त्यांचे नाव साहिर,शकील किंवा मजरुह यांच्या पंक्तीत घेता येईल का? याचा, या कवितेच्या संदर्भात विचार केला तर प्रणयी तडफड या हिंदी चित्रपटातील सरधोपट भावनेच्या भोवती गाण्याची निर्मिती झाली आहे. याच नजरेतून बघायला गेल्यास, कवितेतील प्रतिमायोजन पारंपरिक आहे. चंद्र,तारे यांच्या साक्षीने प्रणयभंग होणे ही कल्पना तशी जुनीच आहे किंवा त्यांच्या साक्षीने प्रकारची आळवणी करणे यामध्ये काहीही नावीन्य नाही. खरतर चित्रपट गीतांच्या संदर्भात एकुणातच विचार केला तर प्रसंग एकसाची असतात तरीही त्यातून नव्या प्रतिमा, शब्दांची नव्याने जडण-घडण करणे आणि त्यातून नवी अनुभूती देणे या शक्यता धुंडाळता येतात आणि तशा रचना काही कवींनी केल्या आहेत देखील. अर्थात सातत्य राखण्याच्या प्रयत्नात सपक शब्दरचना होणे साहजिक ठरते. प्रेम धवन हे चित्रपट सृष्टीत १९४६ साली आणि सतत कार्यमग्न होते. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे प्रस्तुत कवितेत काही खास दर्जेदार वाचायला मिळत नाही. अर्थात ललित संगीताच्या आकृतिबंधाला अनुसरून कवितेत "गेयता" दिसते तसेच शब्द वाचताना एक लय सापडते. 

संगीतकार हंसराज बहेल यांची हिंदी चित्रपटातील कारकीर्द तशी फार मोठी होती असे नक्कीच नाही परंतु जे चित्रपट केले त्यात त्यांनी काही दर्जेदार स्वररचना बांधून आपले स्थान निर्माण केले, हे निश्चित. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने बहुतेक रचना रागावर आधारित आहेत परंतु रागाचे काही स्वर आधाराला घ्यायचे आणि त्यातून गाण्याची चाल निर्माण करायची, अशा मतांचे जे काही रचनाकार होते त्यात हंसराज बहेल यांचे नाव घ्यावेच लागेल. याचा परिणाम असा झाला, मुखडा रागाची छाया दर्शवतो परंतु पुढील विस्तारीकरण वेगळ्याच अंदाजात समोर येते. एकंदरीने हा संगीतकार गंभीर संगीताकडे बराचसा झुकला होता असे विधान नक्की करता येते. आणखी एक विशेष मांडता येईल - लताबाईंच्या आवाजामुळे उपलब्ध झालेल्या तारस्वर मर्यादांच्या लोभात पडलेल्या रचनाकाराचे आणखी एक उदाहरण म्हणून या संगीतकाराचे नाव घेता येईल. तसेच थोडे तांत्रिक मांडायचे झाल्यास, अनेक सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक कारणांमुळे भारतीय रचनाकारांचे भारतीय कलासंगीतपरंपरांशी नाते काय होते, ते तपासावे लागते. बहुतेकवेळा रचनाकारास भारतीय राग - ताल - संगीतप्रकर इत्यादींचे ज्ञान किती आणि त्याने जाणता वा अजाणता यांचा वापर केला त्याची गुणवत्ता काय, याची चर्चा कमीजास्त प्रमाणात तपशिलात जाऊन करणे हे कर्तव्य ठरते. या दृष्टीने आजची रचना फार महत्वाची ठरते. वास्तविक कारकीर्द तशी छोटी तरीही त्या कारकिर्दीत त्यांनी अशा प्रकारची अतिशय महत्वपूर्ण रचना सादर केली. या रचनेची बांधणी कशी केली हे बघणे वेधक ठरेल. यात त्रिताल हा ताल असून आरंभी आवाहन केलेला दरबारी कानडा हा राग आहे, मजणजे मुखडा या रागाच्या स्वरांशी संवादी आहे. परंतु लवकरच संगीतकार उघड उघड भासणाऱ्या शास्त्रीय बंधनातून रचनेस मुक्त करून तिला गीताच्या प्रांगणात आणून ठेवतो. परंत थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास, स्थायी-अंतरा या बांधणी सूत्राचा हा संगीतकार स्पष्टपणे त्याग करतो. याऐवजी पाठोपाठ येणारी कडवी हे रचनातत्व कार्यकारी होते. आणि मग दरबारी रागाचे ढोबळ कारुण्य बाजूला सारून काफी या रागिणीची संदिग्ध आणि सुखद नरमाई समोर  आणली जाते. अंतऱ्यांची चाल बारकाईने ऐकल्यास काफी रागाचे स्वर मिळतात. एकापाठोपाठ येणाऱ्या चरणांत ही भावस्थिती अनेक गुंतागुंतीच्या सांगीत वाक्यांशातून विणली जाते. एकदा मुखडा बांधल्यावर, पुढे वेगवेगळ्या अंदाजात अंतरे बांधणे हे एक सर्जनशीलतेचे महत्वाचे अंग मानावेच लागेल. 
आता सर्वात महत्वाचा भाग. लताबाईंची गायन. चाल "तर अति गुंतागुंतीची आहे, हे वर म्हटलेच आहे. अंतरा सुरु करताना मध्य सप्तकातील सूर ऐकत असताना क्षणात चाल अति तार सप्तकात जाते!! "तुमने तो देखा होगा, ऐ चांद तारों" ही पहिल्या अंतऱ्यातील पहाच ओळ ऐकावी. "तुमने तो देखा होगा" ओळीचं पूर्वार्ध शुद्ध सप्तकात अवगाहन करतो पण पुढील क्षणात "ऐ चांद तारों " हा उत्तरार्ध अति तार स्वरांत जातो. लगेच त्याच लयीच्या अंगाने पुढील ओळ "कित गाये मोरे सैंय्या"  मूळ पहिल्या ओळीशी संवादित्व राखतात आणि त्यापुढील "सारा जग सोये" इथे मुखड्याच्या स्वरांशी नाते प्रस्थापित होते. हे सांगीतिक वळण कमालीचे बिकट आहे. दुसरा अंतरा याच स्वरान्तराने बांधलेला आहे. लताबाईंनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत वरच्या स्वरांतील गाणी असंख्य गायली आहेत परंतु इतक्या तार स्वरात पोहोचून पुढील स्वर खालच्या स्वरांत घ्यायचा,अशा पद्धतीची गाणी फार विरळा गायली आहेत. आता प्रश्न इतकाच उभा राहतो - लताबाईना इतक्या उंच स्वरांत गायला लावणे अपरिहार्य होते का? 
हाये जिया रोये रोये, पिया नाही आये 
इक मैं ही जागू, सारा जग सोये 
हाये जिया रोये

तुमने तो देखा होगा, ऐ चांद तारों 
कित गाये मोरे सैंय्या, तुम ही पुकारो 
जाओ उनको इतना बताओ 
 हाये जिया रोये

कब तक जिये कोई, बिरहा की मारी 
चंदा तेरी चाँदनी मोहें लागी अंधियारी 
आओ सैंय्या अब आ जाओ 
हाये जिया रोये



No comments:

Post a Comment