लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले ....!
लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे ....!
प्रसिद्ध कवी पु.शि.रेग्यांची अतिशय छोटेखानी कविता तरी एका समृद्ध अनुभवाला सामोरी जाणारी कविता. रेग्यांच्या कविता बहुतांशी "भावकविता" असतात आणि वरील कविता हे एक समर्पक उदाहरण ठरते. मोजक्या शब्दांतून अर्थपूर्ण भावाशय मांडायची अप्रतिम शैली म्हणून रेग्यांच्या कवितेची समर्थ ओळख करून देता येईल. साधी लिलीची फुले परंतु त्यातून नायिकेच्या २ स्वतंत्र भावनांची ओळख करून दिली जाते. शब्दातील लय अचूकपणे सांभाळून एकदम कलाटणी दिली जाते. रेग्यांच्या कविता वाचताना मला काहीवेळा एका इंग्रजी वाक्याची फार आठवण येते - Witten by Maurice Barres "And it is I alone whom I have for the feminine perfume of my soul." आजचे आपले जे गाणे आहे - "ये हवा ये रात ये चाँदनी" या गाण्यातील कवितेशी काहीसा मिळत जुळता असा आशय वरील कवितेत मला आढळला. प्रणयी थाट तर खराच परंतु प्रणयाच्या जोडीने दु:खाची आर्त,व्याकुळ करणारी जाणीव दर्शविणे, ज्यायोगे कवितेतील आशय मनात संपृक्तपणे रिक्त होतो.
"संगदिल" चित्रपटातील गाणी प्रसिद्ध शायर राजिंदर कृष्णन यांनी लिहिली आहेत. हिंदी चित्रपटात भरपूर गाणी लिहूनही ज्या कवींनी आपला दर्जा एका ठराविक पातळीच्या खाली घसरू दिला नाही, अशा काही मोजक्या कवींच्या यादीत या कवीचे नाव नक्की येते. कुठल्याही आविष्कारात सातत्य आले म्हणजे दर्जाशी प्रतारणा होणे हे साहजिक असते. कुणीही कलाकार कधीही सातत्याने वर्षानुवर्षे एकाच दर्जाची निर्मिती कधीही करू शकत नाही, हे निव्वळ अशक्यप्राय असते आणि मग अशा वेळी आपल्या हातात एकच मुद्दा असतो आणि तो म्हणजे त्या कलाकाराने आपल्या कारकिर्दीत "उच्च शिखर" किती वेळा गाठले आहे, याची तपासणी करणे. या मुद्द्यावर विचार केला तर राजिंदर कृष्णन यांनी निश्चितच प्रशंसनीय कामगिरी केली आहे. गझलच्या वजनात कविता लिहिली आहे परंतु चित्रपटासारख्या माध्यमात जिपडद्यावरील पात्राच्या भावना,हेच कविता लिहिण्याचे मूळ कारण असते तिथे खऱ्या अर्थाने गझल वृत्तात कविता लिहिणे फार अवघड असते. किंबहुना जर का चित्रपटात "मुशायरा" सारखी मैफिल असेल तर तिथे अचूक गझल वृत्त मांडता येते. परंतु असे प्रसंग एकुणातच विरळा असतात. तेंव्हा ही कविता म्हणजे "नझम" वृत्तातील कविता ठरते. कविता बरीषाशी उर्दू भाषिक आहे पण तरीही अर्थ आकळायला फारसा त्रास होत नाही. कविता वाचतानाच त्यातील लय आणि गेयता लक्षात येते. चित्रपट गीतांसाठी हे मुद्दे फार महत्वाचे असतात. एका बाजूने एक आशय आणि दुसऱ्या बाजूने त्या आशयाशी समांतर पण काहीशा तिरोभावाने शब्दांची रचना केली आहे. "मुझे क्यू ना हो तेरी आरझू,तेरी जुस्तजू में बहार है" ही ओळ जरा बारकाईने वाचली तर माझा मुद्दा लक्षात यावा. चित्रपट गीतात काव्य कसे मिसळता येते (काही जणांच्या मते याची काही गरज नसते पण ते असो....) या साठी प्रस्तुत कविता हे सुंदर उदाहरण आहे.
संगीतकार सज्जाद हुसेन यांनी या गीताची तर्ज बांधली आहे. मळलेली पायवाट सोडून वेगळ्याच लयबंधांनी गाणे सजवण्याचे अलौकिक कौशल्य बाळगून असलेला संगीतकार. चाल बांधताना गायकी अंग तर ठेवायचेच परंतु त्यात हरकती ठेवताना शब्दांगणिक "अर्धतान"या सांगीत अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करून घ्यायचा. गाण्याच्या चालीत भैरवी रागाची छाया तरळत आहे. गीताचा जरी प्रणयी थाटाचे असले तरी त्यात विरही छटा ही आहेच. भैरवी रागिणीचे अंगभूत सौंदर्य लक्षात घेऊन, स्वररचना केली आहे. खरे तर भैरवी राग "मुखडा" चालू असतानाच बाजूला सारला जातो पण राग बाजूला सारत आहोत असा अभिनिवेश कुठेही आढळत नाही. या संगीतकाराच्या चाली गायला अवघड असतात कारण शब्दागणिक लयबंधांचे प्रयोग. "ये हवा ये रात ये चाँदनी, तेरी एक अदा पे निसार है" ही ओळ आपण ऐकायला घेतली तर ओळीतील पहिला भाग दरबारी रागावर आहे आणि सरळ, सुश्राव्य आहे परंतु ओळीचा उत्तरार्ध " तेरी एक अदा पे निसार है" गाताना "अदा" या शब्दानंतर अति अवघड हरकत घेतली आणि चालीचे स्वरूप कठीण करून टाकले आहे. लयीच्या अंगाने ऐकायला घेतले तर माझे विधान पटू शकेल.
पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हा देखील हीच पद्धत अवलंबली आहे. सुरवात किंचित वरच्या सुरावटीत केली आहे (मुखड्यापेक्षा वेगळी) पण "तेरी एक नजर में हैं क्या असर" हा चरण गाताना ओळीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध वेगळा बांधला आहे म्हणजे जी शैली मघाशी मुखड्याच्या पहिल्या ओळीशी घेतली आहे त्याच अंदाजात "तेरी एक नजर में हैं क्या असर" ही ओळ गाताना गायली आहे. थोडे तांत्रिक भाषेत मांडायचे झाल्यास, गीतभाव पक्केपणाने नोंदवणाऱ्या पहिल्या चरणांचे दोन अर्ध अनुक्रमे सा या मूळ स्वरावर आणि मी या त्याच्याशी संवाद साधणाऱ्या पण सप्तकाच्या मध्यावर असलेल्या स्थानावरच्या स्वरावर संपतात. त्यामुळे ऐकताना एक पूर्णता आणि एक अपूर्णता, या दोहोंची प्रतीती येते. खरतर पहिल्या मात्रेस फारसा उठाव न देणाऱ्या सात मात्रांचा रूपक ताल योजला आहे, हे एकूण गाण्याच्या प्रकृतीस साजेसेच आहे.
गायक म्हणून तलत मेहमूद यांच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. चालीतील अवघडपणा गळ्यातून नेमकेपणाने दर्शवला आहे. तलत मेहमूद यांनी आपल्या गळ्याची जातकुळी नेमकेपणाने ओळखली होती आणि आपल्या गळ्याला कुठल्या प्रकाराची गाणी साजून दिसतील याचा त्यांच्या मनात पक्केपणाने विचार ठसला होता. गायक म्हणून विचार केल्यास, आवाज अतिशय सुरेल, शक्यतो मंद्र किंवा शुद्ध सप्तकात गायचे - तार सप्तकात जरी काहीवेळा गायन केले तरी तसे गायन करणे हा त्यांचा पिंड नव्हता हेच खरे. तारता पल्ला तसा मर्यादित तसेच आवाजाची गाज देखील अनाक्रोशी, आणि संयत. किंबहुना संयत गायन हेच तलत मेहमूद यांच्या गायनाचे खरे वैशिष्ट्य. प्रस्तुत गीत गायन या विधानाला पूरक उदाहरण म्हणून सांगता येते. अगदी स्पष्ट सांगायचे झाल्यास, बेगम अख्तर यांनी रूढ केलेल्या गझल गायकीच्या आसपास जर कुणी गेले असेल तर तलत मेहमूद यांचेच नाव घ्यावे लागेल. गळ्यातील कंप (कारकिर्दीच्या सुरवातीला याच कंपावर टीका झाली होती परंतु संगीतकार अनिल बिस्वास यांनी तेच वैशिष्ट्य कायम राखून तलत मेहमूद यांच्या आत्मविश्वास वाढवला) जाणीवपूर्वक वापरून काव्यातील विरही, व्याकुळ आशयाची व्याप्ती वाढवण्याचे कौशल्य निव्वळ अजोड असे होते. परंतु आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडतो. आपण जी कुठली गीते गायची आहेत, त्याच्या संहितेबाबत हा गायक विलक्षण चोखंदळ होता. याबाबत आणखी असे विधान करता येईल, लखनौच्या वारसा म्हटल्यावर दोन गोष्टी स्वाभाविक वाटतात - उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची. अशा विचारसरणीला हिंदीच कशाला एकूणच कुठल्याही चित्रपटसृष्टीत संधी फार मर्यादित असतात. याचाच अनिवार्य परिणाम या गायकाच्या कारकिर्दीवर झाला.
ये हवा ये रात ये चाँदनी, तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यू ना हो तेरी आरझू,तेरी जुस्तजू में बहार है
तुझे क्या खबर है ओ बेखबर, तेरी एक नजर में हैं क्या असर
जो गझब में आए तो कहर है, जो हो मेहरबां तो करार है
तेरी बात, बात हैं दिलनशी, कोई तुझसे बढ के नहीं हसीन,
है कली कली पे जो मस्तिया, तेरी आँख ये खुमार है
No comments:
Post a Comment