मराठी भावगीत प्रांगणात अशी असंख्य गाणी तयार झाली ज्या गाण्यांत काहीही "बौद्धिक" नाही, काहीही प्रयोगशील नाही पण तरीही निव्वळ साधेपणाने त्या रचनांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः आकाशवाणीवर "भावसरगम" कार्यक्रम सुरु झाला आणि अनेक विस्मरणात गेलेल्या कवींच्या शब्दरचना असोत किंवा अडगळीत गेलेले संगीतकार असोत किंवा बाजूला पडलेल्या गायक/गायिका असोत, अनेक कलाकारांना अपरिमित संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्या संधीचे काहीवेळा सोने केले. ललित संगीतात रचना करताना, नेहमीच अभूतपूर्व काही घडते असे अपवादानेच घडते, खरेतर कुठल्याही कलेच्या क्षेत्राला हे विधान लागू पडते. असामान्य असे नेहमीच तुरळक असते तरीही निव्वळ साधेपणाचा गोडवा देखील तितकाच विलोभनीय असतो. यात एक गंमत असते, बहुतेक तथाकथित चोखंदळ रसिकांना वाटते, ज्या रचनेत काही "बुद्धिगम्य" नाही ती रचना टुकार असते!! जणू काही साधी, सोपी रचना करणे हे सहजसाध्य असते. खरंच तसे आहे का?
आजचे आपले गाणे असेच साधे, सरळ गाणे आहे. कविता शांताराम नांदगावकरांची आहे. नांदगावकर हे कधीही प्रथा दर्जाचे कवी म्हणून मान्यताप्राप्त कवी नव्हते परंतु कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी काही अर्थपूर्ण कविता लिहिल्या हे देखील तितकेच खरे. आता प्रस्तुत कवितेत नवीन असे वाचायला मिळत नाही किंवा नवा आशय समोर येत नाही. साधी प्रणयी व्याकुळता सांगणारी शब्दरचना आहे. त्यातील प्रतिमा देखील सरधोपट म्हणाव्या अशा आहेत. "निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी" या ओळीत तसे काहीही नाविन्यपूर्ण सिवाचायाला मिळत नाही, या उलट "वितळलेला चंद्र" सारखी अगम्य शब्दयोजना वाचायला मिळते . अर्थात ललित संगीताची प्राथमिक मागणी - गेयताबद्ध कविता असणे, इथे पुरी होते. तसे बघितले तर सोपी कविता लिहिणे कधीही सहज घडणारे नसते परंतु साध्या शब्दांतून देखील बराच अर्थपूर्ण आशय सामावला जातो. दुर्दैवाने इथे तसे काही हाताला मिळत नाही. प्रणयिनीची व्याकुळ अवस्था आणि प्रियकराची सतत वाट बघणे, ही अनादी काळापासून साहित्यात वावरत असलेली भावना आहे. परंतु बहुदा "रात्र आहे पौणिमेची, तू जरा येऊन जा" ही मुखड्याची ओळ संगीतकाराला भावली असावी.
संगीतकार दशरथ पुजारी हे मराठी भावसंगीताच्या प्रांगणातील मान्यताप्राप्त नाव. जे मत कवितेबाबत मांडले आहे तेच मत स्वररचनेबाबत मांडता येते. ओठांवर सहज रुळणाऱ्या चाली या संगीतकाराने निर्माण केल्या. "चंद्रकौंस" रागाधारित चाल आहे. खरतर रागाचे स्वर फक्त आधाराला घेतले आहेत. स्वररचनेचा विचार करायचा झाल्यास, या गाण्याचा "मुखडा" जरा बारकाईने ऐकल्यास, "जाणिवा थकल्या जीवाच्या, एकदा ऐकून जा" ही ओळ खास ऐकण्यासारखी आहे. ओळीतील आर्तता इतकी समृद्धपणे आपल्या समोर येते की गाणे आपल्या मनाची पकड घेते ती शेवटपर्यंत सोडत नाही. ललित संगीताच्या चालीबाबत हा विशेष, विशेषरीत्या लक्षात ठेवायला हवा. गाण्याने रसिकाला पहिल्या सूरापासून भारून टाकायला हवे. रसिकाचे सगळे लक्ष केवळ आणि केवळ गाण्याकडे केंद्रीभूत होणे अत्यावश्यक असते. संगीतकाराचे हे खरे कौशल्य. वाद्यमेळ हा बराचसा सतार आणि व्हायोलिन या वाद्यांवर आधारित आहे. किंबहुना गाण्याच्या सुरवातीचा जो स्वरिक वाक्यांश आहे, त्यातच चंद्रकौंस रागाची ओळख दडलेली आहे. गाण्यात एकूण ३ अंतरे आहेत. अंतरे बांधताना फार काही बदल किंवा वेगळ्या सुरांवर केलेली नसून मुखड्याचा चालीशी समांतर बांधले आहेत.
या संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांच्या रचनांचे खास लक्षण असे की त्यात वाद्यरंग आकर्षक असतात. सर्वसाधारणतः वाद्यरंगात भिडलेले आणि काहीशी द्रुत लय पसंत करणारे, मुख्यतः वाद्यवृंदाच्या व गतिमान लयबंधांच्या साहाय्याने गीताची उभारणी करतात. संगीतकार आपल्या रचनेचा जाणीवपूर्वक असा रोख ठेवतात की रचना निदान काही प्रमाणात तरी सुरावटीकडे झुकलेली असावी. याचा एक परिणाम असा झाला,त्यांच्या रचनांचे मुखडे कायम लक्षात राहतात. मी वरती, "अंतरे समान बांधणीचे बांधले आहेत", या विधानाला वरील विवेचन पूरक आहे. त्यामुळे गीत साधे असले तरी त्याची खूण मनात रेंगाळत राहते. यामधून एक नक्की सिद्ध होते, या संगीतकाराने "आपण काही नवीन देत आहोत" असला आव कधीही आणला नाही. साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. अर्थात भारतीय संगीतपरंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित असतो आणि त्याची सांगीतिक गरज अशाच रचनांतून भागू शकते.
अगदी स्पष्टपणे मांडायचे झाल्यास, या गाण्यावर गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा निर्विवाद हक्क पोहोचतो. सुरेल आणि स्वच्छ गायकी तसेच श्रोत्यांपर्यंत स्वररचना थेटपणे पोहोचवण्याची हातोटी ही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. मुळात आवाजात कुठेही कसल्याच प्रकारचा भडकपणा नसल्याने, गायनात एकप्रकारची शालीनता नेहमी डोकावते. संयत अभिव्यक्ती, हे तर या गायिकेचे वैशिष्ट्य म्हणता येईल आणि प्रस्तुत रचना बघता, अशाच गायनाची आवश्यकता होती. याचाच परिणाम या गायनातून विस्तीर्ण असा भावपट धुंडाळता येतो. अर्थात असे असूनही ही गायिका प्रामुख्याने मराठी भावसंगीतापुरतीच सीमित राहिली, हे दुर्दैवच म्हणायला हवे.
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जीवाच्या, एकदा ऐकून जा
निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी
मिसळल्या मृदू भावनाही झोपल्या पानांतुनी
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा
पाखरे पाहून जा,जी वाढली पंखांविना
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा
अर्थ तू ऐकून जा,फुलवील जो वैराण ही
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा
No comments:
Post a Comment