Saturday, 16 May 2020

कळीदार कपूरी पान

आपल्या महाराष्ट्रात लोकसंगीताला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत धर्म संगीत, भक्ती संगीत, प्रादेशिक संगीत तसेच लावणी इत्यादी संगीत प्रकार येतात. तसे बघितले तर लावणी ही पेशवेकाळापासून सुरु झाली होती. मध्यंतरी या कलेला उतरती कळा प्राप्त झाली होती . अर्थात आजही फार मोठी उर्जितावस्था आलेली नाही म्हणा. लावणीच्या सादरीकरणात २ प्रकार ढोबळ मानाने बघायला मिळतात. १) बारीवरील लावणी, २) बैठकीची लावणी. आजचे आपले गाणे हे बैठकीची लावणी म्हणूनच ऐकायचे आहे. बैठकीची लावणी ही बरीचशी आदबशीर, सुसंस्कृत आणि ठराविक प्रकारच्या गायनाची मागणी करणारी आहे, म्हणजे कुणीही गायिका उठली आणि बैठकीची लावणी गायला बसली असे संभवत नाही. गळ्यावर  संगीताची पद्धतशीर तालीम घ्यावी लागते तसेच गायन संस्कार घडवून घ्यावे लागतात. उपशास्त्रीय संगीतातील महत्वाचा आविष्कार म्हणून बैठकीच्या लावणीकडे बघणे अधिक श्रेयस्कर ठरेल. डॉ.अशोक रानड्यांनी तर बैठकीच्या लावणीची तुलना थेटपणे उत्तर भारताच्या ठुमरी बरोबर केली आहे. तद्नुषंगाने विचार करायचा झाल्यास, जसे ठुमरी गायन सादर करण्यासाठी गायक/गायिकेला ठुमरीचा अंदाज, लहेजा तसेच शब्दांना प्राधान्य देऊन गायन करणे जरुरीचे असते त्याप्रमाणेच बैठकीच्या लावणीबाबत हे निकष पाळावेच लागतात. प्रणयी आवाहन खरे पण त्यात कुठेही उथळपणा किंवा बटबटीतपणा नावाला देखील दिसता कामा नये आणि हा दंडक पाळणे जरुरीचे असते. 
कवी राजा बढे यांची शब्दकळा आहे. थोडे बारकाईने वाचले तर राजा बढे हे जरी कवी असले तरी त्यांची प्रसिद्धी खासकरून गीतकार अशीच झाली आहे. त्यांच्या बहुसंख्य रचना संगीतबद्ध झाल्यामुळे बहुदा ही प्रसिद्धी झाली असावी. आता लावणी म्हटली त्यात श्रुंगाराचे आवाहन आलेच परंतु या कवितेतील शब्द वाचताना कुठेही शब्द आपला दर्जा घसरू देत नाहीत आणि कवी म्हणून राजा बढे यांचे कौतुक करायलाच हवे. आता माडीवर मैफिल रंगायची म्हणजे प्रथेप्रमाणे विड्याचे आदानप्रदान होणे क्रमप्राप्तच ठरते. मुखड्यातच विड्याचे वर्णन आणि आलेल्या रसिकाला विडा घेण्याचे आमंत्रण - आमंत्रण हे आर्जवी असावेच लागते जेणेकरून त्या रसिकाची मती गुंग व्हावी. आपण देत असलेला विडा कसा आहे याचे वर्णन झाल्यावर तो विडा रसिकाला देण्याची कृती "घ्या हो मनरमणा" याच शब्दातून व्यक्त व्हायला हवी होती. आदबशीर आर्जव असे झाल्यावर रसिक ती माडी कशाला सोडून जाईल? दुसऱ्या अंतऱ्याची शब्दरचना खास वाचण्यासारखी आहे. लावणी सादर होत आहे म्हणजे तिथे नृत्य तर यायलाच हवे. नृत्यांगनेचा कमरेचा (नोकदार) झोक, काजळी नजर आणि खिडकीतून चमचमणारी चांदणी (असा बेहोष करणारा माहोल) तसेच लाल ओठांचे वर्णन करताना - "छेडिता लालडी मुलाम"!! खरतर मराठीतील नजाकतदार ठुमरी असे या कवितेचे वर्णन करता येईल. 
अशी ढंगदार कविता हाताशी आल्यावर संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी तशीच आर्जवी आणि शृंगारिक चाल तयार केली. वास्तविक खळेकाका हे शांत, संथ स्वरांचे रचनाकार म्हणून ख्यातकीर्त तरीही ही चाल बांधताना पठ्ठे बापूरावांच्या खानदानी परंपरेशी  जुळवणारी रचना निर्माण केली. यमन रागाशी थोडे साधर्म्य दाखवते पण लगेच रागाला बाजूला सारून चालीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. खळेकाकांची चाल म्हणजे लयीचे अवघड बंध, हे ओघानेच येते. इथेही चाल सरळ आपल्यासमोर येत नाही. लावणीचा सगळा डौल चालीत उतरला आहे पण चाल आपले खानदान सोडत नाही. ढोलकी खणखणत आहे पण ताल चालीवर स्वार होत नसून स्वरांनी निर्माण केलेले जग अधिक खुलवून मांडतो. अर्थात खळेकाका चाल बांधताना कवीच्या शब्दांना आणि त्यातील अमूर्त अशा आशयाला अधिक खोलवर मांडतात. गाण्याची सुरवात करताना "कळीदार" आणि नंतर मुखड्याच्या उत्तरार्ध घेताना लय दुगणित घेतली आहे पण "घ्या हो मनरमणा" गाताना आर्जव अप्रतिमरीत्या व्यक्त झाले आहे आणि चालीची खुमारी आणखी वाढते. अंतरे कसे बांधले आहेत याचा स्वतंत्र अभ्यास करण्यासारखे आहे. एकतर अंतरे वेगळ्याच सुरांवर बांधले आहेत तरीही पुन्हा मुखड्यावर येताना लयीचा सगळा डौल चालीत उतरला आहे. 
गायिका सुलोचना चव्हाण म्हणजे लावणी खानदानाची महाराणी असेच वर्णन करावे लागेल. आवाजातली धार,ठसका आणि विशिष्ट शब्दांवर जोर देऊन गाण्याची लज्जत वाढवणारी शैली. या लावणीत देखील ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. खळेकाकांनी चालीत आणलेला ढंगदारपणा सुलोचनाबाईंनी अतिशय खुमासदारपणे गायला आहे. ढोलकीच्या मात्रेगणिक येणारी अर्धतान किंवा हरकत ही मुद्दामून अभ्यास करावी अशा योग्यतेची आहे. आपण बैठकीची लावणी गात आहोत तेंव्हा स्वरांत छचोरपणा जरादेखील न येता माडीवर आलेल्या रसिकाला खिळवून ठेवण्याचा सामर्थ्य त्यांनी आपल्या गायनातून दाखवून दिले आहे. एकाबाजूने आवाहन करायचे पण दुसऱ्या बाजूने लाचारीपासून दूर राहून रसिकाला खिळवून ठेवायचे,  अशी दुहेरी कसरत इथे सुलोचनाबाईंनी आपल्या गायनाद्वारे दाखवून लावणी गायनाचा आदीनमुना पेश केला आहे.  


कळीदार कपूरी  पान, कोवळं छान, केशरी चुना 
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा, घ्या हो मनरमणा 

बारीक सुपारी निमचिकनी घालून 
जायपत्री वेलची लवंग वरि दाबून 
बांधले तसे या कुडीत पंचप्राण 
घ्या रंगत करी मर्दूनी चतुर्दशगुणी संख्या सजणा 

कंबरेचा झुलता झोक,नूर बिनधोक उरी मावेना 
काजळी नजर छिनीमिनी चांदणी रैना 
छेडिता लालडी मुलाम, तुमची गुलाम झाले सजणा 
पायीं पैंजण छुन्नक चैना 


No comments:

Post a Comment