"मध्यरात्री नभघुमटाखाली,
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती
कवी बा.भ.बोरकरांच्या "तेथे कर माझे जुळती" या अमाप लोकप्रिय कवितेतील शेवटचा चरण. खरतर या कवीच्या नावाशी ही कविता निगडित झाली आहे. या कवितेबाबत एक मुद्दा - अशा कविता व्यापक आवाहनक्षेत्र संपादन करतात म्हणून त्या कमी प्रतीच्या असतात!! असा एक अभिप्राय नेहमीच लोकप्रिय असतो परंतु हा अभिप्राय असमंजसपणाचा आहे,हे या कवितेने निखालस सिद्ध केले आहे. शिवातील सुंदरतेचा शोध हा बोरकरांच्या कवितेचा स्थायीभाव आहे. या शोधला या कवितेत एक मनोहर शब्दरूप मिळाले आहे. ही कविता म्हणजे संस्कृतीला आधारभूत असलेल्या माणसाच्या दिव्यत्वाला केलेला एक भावपूर्ण नमस्कार आहे अर्थात अशा सगळ्या दिव्यत्वाचा शोध घेताना अचानक विरक्ती येते आणि त्या विरक्तीचे काव्यस्वरूप म्हणजे वरील ओळींनी केलेला अक्षय समारोप. अशा तऱ्हेचा विदग्ध समारोप फार थोड्या कवितांच्या वाटेला येतो. आजचे आपले जे गाणे आहे - "तेरे बिना सुने नयन हमारे" या गाण्यातील आशय आणि भाव हा वरील ओळीशी मिळता जुळता आहे. चित्रपटातील नायक अतिशय संत्रस्तावस्थेत व्याकुळ झालेला आहे आणि नजरेसमोर केवळ निराशा हेच दिसत आहे. अशा काळवंडलेल्या मनस्थितीचे वर्णन गाण्यात केलेले आहे.
सुप्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शब्दकळा आहे. सातत्याने लिहून देखील कवितेची एक ठराविक पातळी ठरवून त्या पातळीच्या खाली त्यांची रचना बहुतांशी गेली नाही. चित्रपट गीते म्हणजे नेहमी हुकुमाबर लेखन. त्यात अनेक घटक अस्तित्वात असतात आणि त्यामुळे प्रतिभेला मर्यादा पडू शकतात. परिणाम काव्याचा दर्जा खालावणे. त्यातून चित्रपटात गीते लिहायची म्हणजे पडद्यावरील पात्रानुरूप तसेच प्रसंगानुरूप लिहिणे भाग पडते. इतक्या प्रकारच्या मर्यादा सांभाळून शैलेंद्र यांनी अर्थपूर्ण गीते लिहिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काव्यातील भाषा ही सहज,सोपी आणि कुणालाही समजेल अशी ठेवली. खरंतर असे म्हणता येईल , भारतीय मातीशी नाते जुळवून घेणारी त्यांची शब्दकळा होती. आता इथे सुरवातीच्या ओळीत "बाट तकत गए सांझ सकारे" त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकसंगीताच्या आधारे संदर्भ घेतले आहेत. तसेच "दिन का है दुजा नाम उदासी" या ओळीतील आशय कुणालाही समजून घेणे अवघड नाही. अशीच दुसऱ्या अंतऱ्यातील दुसरी ओळ उदाहरण म्हणून बघता येईल - "साया भी मेरा मेरे पास ना आया"!! किती साध्या ओळी आहेत बघा. आपलीच सावली पण आपल्या सोबत नाही, व्याकुळता किती मनात साठून राहिलेली आहे ,याचे प्रत्यंतर घेता येते.
संगीतकार एस.डी.बर्मन यांनी चाल लावली आहे. चित्रपटातील गाणे हे नेहमी चित्रपटाच्या प्रसंगाशी तसेच पात्रांशी सुसंवादी असावे या विचारसरणीचे जे थोडे रचनाकार होते , त्यातील प्रमुख नाव. तसेच बंगाली लोकसंगीताचा यथायोग्य वापर करून त्यांनी आपल्या रचनांत बरीच विविधता आणली. काफी रागावर चाल आहे .एक निष्कर्ष काढता येतो . संगीतकार नौशाद यांनी हिंदी चित्रपटगीतांचा साचा तयार करण्यात पुढाकार घेतला तर सचिनदांनी त्याचा आवाका आणि आशय वाढवण्यात हातभार लावला. म्हणजे तसे बघता दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या प्रवृत्तीचा पाठपुरावा करत सचिनदांनी किमया साधली. दुसरा महत्वाचा निष्कर्ष काढता येतो - सांगीत परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो सुसंस्कृत संयम दाखवला. चित्रपटसंगीतातील संगीत या अंगावर भर देता यावा म्हणून हालचालींकडे किंवा ठरीव (कधी कधी बटबटीत) अभिनयाकडे गीताला खेचू पाहणाऱ्या शक्तींना पायबंद घालण्याचा प्रयत्न जारी ठेवला. आता या गीताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गीताची लय ही मध्य सप्तकात ठेवली आहे. विरही थाटाचे गीत असल्याने वाद्यमेळ देखील अतिशय मर्यादित आहे. गाण्यात जरी स्त्री आणि पुरुष असे दोन आवाज असले युगुलगीत असे स्वरूप नाही. सुरवातीलाच व्हायोलिन आणि बासरीचे सूर आहेत जे काफीरागाची ओळख करून देतात. पुढे वाद्यमेळ म्हणून संतूर वाद्याचा लक्षणीय वापर आहे. सचिनदांच्या संगीतरचनेचे आणखी वैशिष्ट्य दाखवायचे झाल्यास कुठेही आक्रोशी सादरीकरण होत नाही आणि गीत हे नेहमी "गीतधर्म" जागवते. सुरवातीलाच पुरुषी आवाजात हलका असा "आकार" ऐकायला मिळतो आणि चालीचे स्पष्ट सूचना होते. गीतातील भावनेचा परिपोष करायचा परंतु तसे करताना कधीही भडकपणा आणू द्यायचा नाही. मी वरती "संयतपणा" असा उल्लेख केला तो या गीताच्या संदर्भात चपखल बसतो. अंतरे मुखड्याशी समांतर बांधले आहेत. सचिनदांच्या बाबतीत बरेचवेळा असा प्रकार आढळतो, अंतरे बांधताना बरेचवेळा मुखड्याच्या चालीचा विस्तार असेच स्वरूप दिसते. चाल कुठेही अकारण वरच्या सुरांत जात नाही कारण तशी गरजच भासत नाही. अनेक प्रतिभावंत रचनाकारांप्रमाणे सचिनदांच्या संगीताचे वर्गीकरण करावेच लागते इतकी विविधता त्यांनी आपल्या संगीतात दाखवली होती. त्यांनी सांगीत प्रयोग केले तसेच चित्रपटगीतातही प्रयोग केले. अभारतीय संगीताचे स्वागत करणारे, पण तरीही भारतीय राहणारे संगीत रचण्यात त्यांनी विलक्षण यश मिळवले. गुणगुणण्यासारखे, लक्षात राहणारे संगीत वाद्यवृदाने रचावे परंतु भारून टाकणारे नव्हे,हे त्यांचे ध्येय होते. याचा परिणाम त्याची ऐकणाऱ्याबरोबर नाती जुळली हे नक्की होते.
हे गीत प्रामुख्याने मोहमद रफीचे जरी शेवटचा अंतरा लताबाईंनी गायला असला तरी. रफींचे अतिशय संयत , भावव्याकुळ गायन हीच या गाण्याची खरी खासियत आहे. जर अशाप्रकारची चाल गायला मिळाली तर आपण कसे गारुड घालू शकतो याचे अप्रतिम उदाहरण रफींनी दाखवून दिले आहे. गायन करताना जो संयम संगीतकाराने स्वररचनेत दाखवला आहे त्याचेच अचूक अनुकरण किंवा सादरीकरण रफींनी आपल्या गायनातून दर्शवले आहे. संगीतकाराला अभिप्रेत असलेली स्वराकृती आपल्या गळ्यातून इथे जिवंत केली आहे. एरव्ही काही प्रमाणात "नाट्यात्म" भासणारे गायन इथे संपूर्णपणे सुसंस्कृतपणा वावरते. कुठेही खटका घेण्याचा हव्यास नाही ,उगीच "गायकी" दाखवायचा यत्न नाही. सचिनदांनी जे आर्जव स्वररचनेत मांडलेले आहे त्याचा सुंदर परिपोष आपल्या गायनातून रफींनी केलेला आहे , परिणामी चाल आणि शब्द हळूहळू मनात उतरत जातात. वाद्यमेळाची मिळालेली संयत साथ देखील वाखाणण्यासारखी आहे. लताबाईंना गायला केवळ शेवटचा अंतरा मिळाला आहे. जे मुळात आहे त्याचेच वर्धिष्णू स्वरूप लताबाईंनी आपल्या गायनातून सादर केले. दोघांनीही गायन करताना आपल्या गळ्यातील धार किंचित कमी केली आहे. त्यामुळे शाब्दिक आशय आणि चालीतील अनुस्यूत गोडवा कमालीचा खुलतो.
तेरे बिना सुने नयन हमारे
बाट तकत गए सांझ सकारे
रात जो आए ढल जाये प्यासी
दिन का है दुजा नाम उदासी
निंदिया ना आये अब मेरे द्वारे
जग में रहा मैं जग से पराया
साया भी मेरा मेरे पास ना आया
हंसने के दिन भी रो के गुजारे
ओ अनदेखे ओ अनजाने
छुप के ना गा ये प्रेम तराने
कौन है तू मोहे कुछ तो बता रे